बिल्लवांची तक्रार
दहाजणांची तक्रार : साधु शिवप्रसाद आणि मी त्या प्रांतांतील निरनिराळ्या ब्राह्म समाजांची स्थिति पाहून व प्रचार करून आलों. प्रत्येक ठिकाणीं अंतस्थ कलह आणि राजकारणाची अवास्तव धास्ती हीं लक्षणें सर्वसामान्य दिसत होतीं. ज्यांनीं उठावें त्यांनीं नवीन समाज स्थापावा; पक्ष आणि तट वाढवावे; बाहेरून प्रचारक गेल्यास आपापली बाजू सांगून त्याचे कान भरवावेत. या प्रकारामुळें प्रचारकांची फार ओढाताण होई. कामांत मोठा अडथळा होत असे. ता. १८ जून १९२४ रोजीं मी मंगलोर शहरीं परत आलों. येईपर्यंत मंगलोर ब्राह्म समाजांत एक भयंकर वितुष्ट माजून राहिलें. ब्राह्म समाजांतील १० बिल्लव जातीय पुढार्यांच्या सह्यांनीं मला रजिस्टर पोस्टानें पत्र आलें होतें. तें मला २० जूनला पोंचलें. सही करणार्यांची माझ्या उलट त्यांत अशी तक्रार होती कीं, (१) त्यांनीं पुष्कळ विनंती करूनही मी आपली गांधी टोपी घालावयाची सोडीत नाहीं. (२) व्हायकोमच्या दौर्यावर असतांना कालिकत येथें व दक्षिण मलबारांत जाहीर सभांतून मीं राजकीय विषयांवर भाषणें करून राजकीय चळवळींत भाग घेतला. (३) सही करणारे दहा गृहस्थ व इतरही कित्येक सभासद सरकारी नोकर आणि इतर युरोपियन कंपनीचे नोकर असल्यानें माझ्या राजकारणापासून त्यांना मोठा धोका पोंचणें संभवनीय आहे. (४) म्हणून मी अतःपर राजकारणांत भाग घेणार नाहीं असा लेख माझ्या सहीनिशीं लिहून ज्या वृत्तपत्रांतून माझी राजकीय चळवळ प्रसिद्ध झाली होती त्यांतून लेख प्रसिद्ध करावा. (५) असें लवकर न झाल्यास समाजाची जादा साधारण सभा बोलावून योग्य तो उपाय करावा लागेल.
मीं ताबडतोब उत्तर दिलें कीं, ''मी मंगलोर येथें परत आल्यावर खुलासा घेऊन मग ही तक्रार केली असती तर चाललें असतें. दौर्यावर मीं जी चळवळ केली व भाषणें केलीं त्यांचा विषय राजकारण मुळींच नसून समाजसुधारणा व धर्मसुधारणा हाच होता. अर्थात् मी राजकारणांत भाग घेणार नाहीं असें लिहून देण्यास मुळींच बांधलेला नाहीं. तो माझा व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न आहे. समाजाच्या हिताला बाध न आणतां राजकारणाच्या मूल तत्त्वाबद्दल ऊहापोह करणें माझें पवित्र कर्तव्य आहे. आतां तरी तक्रार करणार्यांनीं समक्ष भेटून तक्रार मिटवावी. ज्या कलकत्त्याच्या साधारण ब्राह्मसमाजाचा प्रतिनिधि म्हणून मी येथें कार्य करीत आहें त्यांच्या सांगण्यावरूनच मी व्हायकोमला गेलों आणि जें जें मीं केलें तें तें सर्व त्यांना पसंत पडेल अशी माझी खात्री आहे.'' गांधी टोपीविषयीं त्यांची तक्रार अगदींच पोरकटपणाची होती. पण त्या काळीं गांधी टोपीच्या उलट सरकारचा मोठा रोष होता हें मात्र खरें. एखाद्या घरीं एखादा गांधी टोपीवाला पाहुणा आला तरीसुद्धा सरकार त्या घरावर नजर ठेवीत असे, असें मला कळलें. गांधी टोपी घालावयाचा माझा आग्रहच असेल तर निदान तिचा रंग तरी काळा असावा असा ह्या दहाजणांचा आग्रह होता. पण ज्या अर्थी ही बाब मोठी तत्त्वाची नव्हती त्या अर्थी मी त्यांची समजूत करण्यासाठीं डोक्यावर कांहींच घालावयाचें नाहीं असें व्रत घेतलें. तें अद्यापि चालू आहे. खादी न वारपण्याविषयीं त्यांनीं आपला आग्रह सोडून दिला. निषेध करणार्या त्या दहा सभासदांमध्यें दोन मोठे पोलीस अधिकारी होते. त्यावरून वारा कुणीकडून वाहात आहे हें मला कळलें. हें सर्व प्रकरण मीं ताबडतोब साधारण ब्राह्म समाजाच्या कमिटीकडे पाठवलें. त्यांनीं माझी बाजू पूर्णपणें उचचली. साधारण ब्राह्म समाजाच्या अध्यक्षांनीं मंगलोर ब्राह्म समाजाच्या अध्यक्षाला एक स्वदस्तुरचें पत्र लिहून आपल्या मिशनरीचा व प्रतिनिधीचा हा मोठा उपमर्द होत आहे अशी स्पष्ट तक्रार केली. साधारण ब्राह्म समाजाकडून जी दरमहा नेमणूक मला होती त्यांतील थोडासा भाग (दरमहा २५ रु.) मंगलोर समाजाकडून कलकत्त्यास जात असे. याशिवाय माझा कोणताही खर्चाचा बोजा मंगलोर समाजावर कलकत्त्यास जात असे. याशिवाय माझा कोणताही खर्चाचा बोजा मंगलोर समाजावर नव्हता. पण ही विक्षिप्त तक्रार मजकडे आल्याबरोबर मी हा थोडासा भागसुद्धां स्वीकारण्याचें ताबडतोब नाकारलें. पण हें प्रकरण कांहीं सलोख्यानें मिटेना.
दि. ब. बंगेरा : पुढें समाजाचे बिल्लव जातीय सभासद दिवाणबहादुर व सेवानिवृत्त डिस्ट्रिक्ट जज्ज एम. बंगेरा नांवाचे एक गृहस्थ होते. त्यांच्या भावाच्या मुलीचें लग्न निघालें. समाजाचा पुरोहित ह्या नात्यानें तें लग्न मीं लावावें अशी रा. बंगरा यांनीं इच्छ प्रादर्शित केली. रा. बंगेरा ह्यांचे भावी जांवई ह्यांनीं निषेधपत्रकावर सही केली होती. त्यांनीं आपली सही करत घेऊन मजविषयींचा विश्वास प्रकट करीपर्यंत मला ह्या लग्नविधींत भाग घेतां येणार नाहीं असें मीं स्पष्ट कळवलें. रा. बंगेरा ह्यांना राग येऊन हें प्रकरण अधिकच चिघळूं लागलें.
अशा वेळीं पुण्याला अहल्याश्रमाच्या नवीन इमारतीचें उद्धाटन करण्यासाठीं मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन ऑक्टोबर महिन्यांत येणार होते. त्यांच्या स्वागतार्थ मीं पुण्यास यावें असें पुणें शाखेकडून अगत्याचें आमंत्रण आलें, म्हणून मी पुण्यास आलों तो दोन महिने इकडेच होतों. पुढच्या नाताळांत काँग्रेसची बैठक बेळगांवास झाली. त्या वेळीं अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारक परिषदेची बैठक काँग्रेसच्या मंडपांत झाली. आंध्र प्रांतीय श्री. रामलिंगम् रेड्डी यांनीं अध्यक्षस्थान स्वीकारलें होतें. ह्या परिषदेपुढें महात्मा गांधी यांचें मुख्य भाषण झालें. परिषदेची व्यवस्था करण्यासाठीं पुण्याहून रा. पाताडे मजबरोबर बेळगांवास आले होते. परिषदेचें काम संपल्यावर आम्ही दोघे गोव्यास गेलों. एकदोन दिवस तेथें राहून जुनें व नवें गोवें येथील प्रेक्षणीय स्थळें पाहिलीं. जानेवारी १९२५ च्या आरंभीं गोव्याहून मी परत मंगलोरला आलों व पाताडे परत पुण्यास गेले. दहा निषेधकांचा वाद मंगलोरांत अद्याप धुमसतच होता. निषेधकांपैकीं कोणीही समक्ष भेटण्यास तयार होईना. वादाला ते तोंडच देईनात. रा. के. रंगराव यांना ह्या प्रकाराचा विषाद वाटून ते समाजाच्या अध्यक्षत्वाचा राजीरामा देऊन मद्रासला निघून गेले. पुढें तीन महिने वाट पाहून कलकत्त्याच्या साधारण ब्राह्म समाजाच्या कमिटीची अनुमती घेऊन मी पुण्यास कायमचा राहण्यास परत आलों. मी, भगिनी जनाबाई व धाकटा चिरंजीव रवींद्र यांना घेऊन नेहमींच्या जलमार्गानें किंवा आगगाडीनें परत न येतां सह्याद्रीच्या घाटांतून मोटारीनें शिमोगा येथें परत आलों. वाटेंत मूडबिद्री, कारिकळ, आगंबे हीं प्रेक्षणीय स्थळें पाहिलीं. कारिकळच्या टेकडीवरील जैन लोकांचा संतपुरुष 'गोमत्त राजा' याचा ५६ फूट उंचीचा भला मोठा पुतळा पाहिला. शिमोग्याहून एस. एम. रेल्वेंतून हरिहरला आलों. तेथील ऐतिहासिक देवळांचें निरीक्षण केल्यावर आम्ही पुण्यास आलों. ह्या सर्व चित्तवेधक प्रवासाचें वर्णन तत्कालीन मासिक मनोरंजनांत सविस्तर आलें आहे.