माझी आजी
संताबाई : जमखंडीचे आग्नेयीस मुधोळचे बाजूला निंगनूर (लिंगन + ऊर = लिंगाचें गांव) नांवाचें देसायांचें एक खेडें आहे. ही माझ्या आजीची व तिचा भाऊ व्यंकप्पा ह्यांची जन्मभूमि. आमच्या घराण्याची म्हणजे बसवंतरावांची कुलदेवता तुळजापूरची अंबाबाई. तेथील भोपे भाऊराव कदम हे आमचे आश्रित. त्यांच्या वहींत आजोबांचें नांव बसवंतराव आणि आजीचें संताबाई असें आहे, असें मला स्वतः भाऊराव कदम ह्यांनी सांगितलें. पण ह्या कानडी मुलखांत आमच्या आजाआजीला लोक बसप्पा व सत्यव्वा असें म्हणत. माझ्या आजीचा स्वभाव करारी व कांहीं अंशी तामसी होता. तिची माहेराकडील कुलदेवता सौंदत्तीची यल्लमा होती. हा संबंध सौंदत्तीच्या शिंदे घराण्याकडे जातो. तुळजापूरची अंबाबाई ही खरी अस्सल मराठ्यांची देवता. आमच्या देव्हार्यावर ह्या दोन्ही देवता असत; पण आजी धार्मिक व आग्रही असल्यामुळें घरीं यल्लामाचें प्रस्थच फार असे. तरी भाऊराव कदम आपला हक्क गाजविण्यास वरचेवर येतच.
आजी वर्णानें काळी, रूपानें राकट, पण संसारांत शहाणी, फार उद्योगी व कर्तृत्ववान् होती. तिचें माहेर फार गरीब दिसतें. एरव्हीं तिचा भाऊ आमचे घरीं का राहाता ? इतकेंच नव्हें तर त्याचा एकुलता एक मुलगा शिद्दु आमच्याच घरीं लहानाचा मोठा झाला. शिद्दु हें नांव कर्नाटकी मराठ्यांत असतें. एकंदरींत बसवंतरावांचा विवाह त्यांच्या आपत्कालीं झालेला दिसतो. त्यांचा स्वभाव विनोदी व सहिष्णु असल्यामुळें घरगुती बाबी त्यांनीं बहुतेक आजीकडेच सोपविल्या होत्या. आजी कष्टाळू व कर्तृत्ववान् असल्यामुळें शेतवाडी, घर, देवधर्म वगैरे सर्वच कारभार स्वतः पाहात असे. आमचे आजोबा फारसे धार्मिक दिसले नाहींत. एकंदरींत आजोबांत मराठ्यांचीं व आजींत कर्नाटक्यांची लक्षणें भरपूर दिसत. आजी खेडवळ व राकट कुणबाऊ, तर आजोबा नागरिक, दरबारी व गुलहौशी दिसत. पोरकेपणामुळें व जमखंडी संस्थान ब्राह्मणी पडल्यामुळें बिचार्या बसवंतरावांचा खानदानीपणा बराच खालीं उतरला.
पुढें त्यांचे एकुलते एक चिरंजीव, माझे वडील रामजीबाबा ह्यांनीं आपल्या सुशिक्षणानें आणि आपल्या खंबीर लेखणीच्या जोरावर आमचा खानदानीपणा पुन्हां वर उचलला. तथापि पुढें तलवारीचे दिवस अजिबात गेल्यामुळें आमच्या घराण्यांतल्या जुन्या मराठमोळ्याला ब्राह्मणी तर्हा व कारकुनी वळण लागलें.
आजोबांचे मागून १।२ वर्षांनीं आजी वारली. पण तिच्या फारशा गोष्टी मला आठवत नाहींत. ह्यांचे कारण तिचा मला फार लळा नव्हता व ती नेहमीं शेताच्या व घरच्या कामांत गुंतलेली असे. तिचा स्वभावहि प्रेमळ नव्हता. ती घरीं शेताचा कापूस आल्यावर तो वटून त्याचें सूत स्वतः कांतून तें कोष्ट्याला देऊन लुगडीं विणवून घेत असे. पुढें आम्हांला गरिबी आल्यावर माझी आईही सूत कांतून प्रपंच कसा तरी भागवीत असे.
पोरकट चोरी : दूधदुभतें करण्यांत आजी फार वाकब असे. घरच्या दुभत्याचें लोणी कढवून एक गाडगें भरून सुंदर साजूक तूप फडताळांत आजीनें एकदां ठेविलें होतें. माझ्या बाबांची एकुलती एक बहीण अंबाबाई तेव्हां आमचे घरींच दुष्काळामुळें राहात असे. भागूबाई नांवाची तिची मुलगी, माझा वडील बंधु भाऊराव आणि मी खेळगडी असूं. लहानपणीं मी मोठा गोडघाशा, खादाड व चोरटा होतों. घरीं गोडधड झालें की आजीनें व आईनें कांहीं जपून व कोठें तरी दूर ठेविलें असलें, तरी त्यांच्यामागें तें हुडकून चोरून खाण्यांत माझा हातखंडा होता. एकदां आई, आजी व आत्या (तिला आम्ही अक्का म्हणत असूं.) ह्या तिघी पाणी आणावयास विहिरीवर गेल्या होत्या. त्या येण्याचे आंत आम्हीं तिघांनीं ताज्या तुपाच्या मडक्यावर हल्ला केला. मडक्यांत तूप भरलेलें वरवर थिजलें होतें, पण खालीं अद्याप पातळ होतें. तें आम्हां चोरांना कळलें नाहीं. आम्ही घाईंत मडकें ताटांत पालथें केलें.
तेव्हां भसकन सगळेंच तूप पडून उष्टें झालें. आजी तर इकडे येण्याची वेळ झाली. ताटांतील तूप कांहीं आम्हां तिघांनाही संपेना. ओठावर, पोटावर, हातावर, कोपरापर्यंत तुपाचे ओघळ पडलेले असा आमचा देखावा पाहाण्यासारखा होता. आजी, आई व आत्या तिघी आंत आल्या, तेव्हां ताज्या तुपाचा घमघमाट सुटला होता. त्यांनीं आमचें ध्यान पाहिल्याबरोबर आम्हांला मुद्देमालासकट पकडलें. मग काय ? आम्ही एकमेकांवर चोरीचा आरोप ठेवूं लागलों. एकानें हुडकून काढलें, दुसर्यानें खिडकी उघडली व तिसर्यानें मडकें पालथें केलें. अशा प्रकारें खरें पाहतां सगळेच गुन्हेगार व सगळ्यांचेच हात व तोंडें तुपानें बरबटलेलीं त्या तिघांनीं पाहिली. एकंदरींत ह्या जिवंत चित्रांचें जें त्यांना दृश्य दिसलें त्यांतच त्या तिघी गुंग झाल्यामुळें आम्ही सुटून पळालों.
यल्लमाची यात्रा : सौंदत्तीची यल्लमा ही आमच्या आजीची कुलदेवता. ह्या देवीची भक्ति आजी मोठ्या निष्ठेनें करी. तिनें ह्या देवीची ताळी देव्हार्यांत ठेविली होती. पंढरपूरची जशी माळ तशी ही सौंदत्तीची ताळी - एक सोन्याची सॉव्हरीनसारखी ताळी (पुतळी). नंतर तांबड्या पोवळ्याचे व पांढरे मणी ओंवलेली ही ताळी असे. उपास करणें, लिंब नेसणें, दंडवत घेणें, सौंदत्तीच्या डोंगरांतील प्रसिद्ध क्षेत्राची यात्रा करणें वगैरे गोष्टींत आजीचा करारी स्वभाव दिसे. मार्गशीर्ष पौर्णिमेला दरवर्षी ह्या यात्रेला जमखंडी येथील यल्लमाची मूर्ति तिचे पुजारी सौंदत्तीला घेऊन जात. हिला जगाची यल्लमा म्हणत. जग म्हणजे एक मोठी ३।४ फूट व्यासाची, वाटोळी, १॥-२ फूट खोल अशी बांबूची परडी असे. तिच्यांत यल्लमाचा रुप्याचा भव्य मुखवटा ठेवून तिला खालीं मोठें लुगडें नेसवून सजावट करीत. ह्या यात्रेबरोबर जमखंडीच्या आजूबाजूचे २००।४०० स्त्रीपुरुष कोणी गाड्यांतून, कोणी बैल-घोड्यांवरून तर कोणीं पायीं चालत जात. ही यात्रा आटोपून परत आल्यावर एकदम देवळांत न जातां जमखंडी गांवाबाहेर दक्षिणेकडे कट्टेगिरी म्हणून एक तलाव आहे, त्याच्याजवळ ही सर्व यात्रा उतरत असे. गांवातील सर्व भक्तमंडळीनें देवीस नैवद्य न्यावयाचा असतो. मग रात्रीं मिरवणूक काढून थाटानें मूर्ति देवळांत आणीत. गोड खावयास व मौज पाहावयाला मिळे, म्हणून मला लहानपणीं यल्लमाच नव्हे तर आजीदेखील तेवढ्या वेळेपुरती फार आवडे. धर्माचे पहिले संस्कार माझ्या कोमल मेंदूवर आजीच्या त्या द्राविडी देवतेनें उठवलेले. आठवण माझ्यावर मला ते अजून रमणीय वाटतात. इतकेंच नव्हें तर आजी वारल्यावर बर्याच वर्षांनीं मी इंग्रजी पांचव्या इयत्तेंत असतांना मला खरूज झाली; तेव्हां मीं ह्या यल्लमाला नवस केला. खरूज बरी झाल्यावर यल्लमाची यात्रा करून यावें, म्हणून मीं माझ्या वडिलांजवळ आग्रह धरला. कौतुकानें त्यांनी तो पुरविला. आम्ही घरची सर्व मंडळी सौंदत्तीची यात्रा करून आलों. ही गोष्ट इ.स. १८८९ च्या डिसेंबरच्या महिन्यांत घडली असावी.
अंबाबाईची यात्रा : ह्यापूर्वी सुमारें ९।१० वर्षांमागें आम्ही तुळजापूरची यात्रा केली होती. ती मला फार आवडली होती. ती मला चांगली आठवते. अंबाबाई आमची कुलदेवता. तिचें नांव माझ्या आतेला ठेवलें होतें. आजोबा वारल्यानंतर एकदोन वर्षांत आजी वारण्याचे पूर्वी - सुमारें १८७९।८० इ.स. सालीं -- ही यात्रा घडली असावी. घरची बैलगाडी होती. राम्या व मदार्या ही दोन मोठ्या बैलांची जोडी होती. काडाप्पा हें गड्याचें नांव होतें. हा गडी मोठा विश्वासू व फार दिवस आमच्या घरीं काम करीत असलेला होता. तो आमच्या आजीच्या निंगनूर ह्या खेड्यांतला होता. आई, बाबा, आजी, मी, माझा मोठा बंधु (नांव भाऊराव), धाकटी बहीण (तान्हें बाळ जनाक्का फार तर एक वर्षाची असेल) आणि गाडी हांकणारा काडाप्पा गडी असे आम्ही सातजण गाडींत होतों. त्या वेळीं मी फार तर सहा-सात वर्षांचा असेन व भाऊ अकरा बारा वर्षांचा असेल. वाटेंत विजापूर, सोलापूर, हीं शहरें आणि कृष्णा, भीमा व सीना ह्या नद्या लागल्या. सीना नदीवरील वाळवंटांत आम्हीं उपाहार केला. तेव्हों प्रथम लांब सोलापुरी पांढर्या साखरकाकड्या खाल्या हें आठवतें. विजापुरास गोलघुमट व जुन्या मशिदी आणि सोलापुरास जुनें सिध्देश्वराचें देऊन पाहिल्याचे ठसे मला अद्यापि आठवतात. पुढें मोठेपणीं विलायतच्या प्रवासांत माझ्यामध्यें जी निरीक्षणशक्ति आढळली तिचीं हीं पूर्वबीजें होत. त्या वेळीं आगगाडी म्हणजे मोठें नवल ! सोलापुराजवळ आगगाडीच्या रस्त्यालगत धावती गाडी पाहावी म्हणून बाबांनीं आम्हां सर्व मंडळींना कुठल्या तरी एका लेव्हल क्रॉसिंग जवळ अडवून ठेविलें. दोन प्रहर झाले, तरी गाडी आली नाहीं. भूक लागल्यानें मला त्या आगगाडीचा मोठा कंटाळा व राग आला आणि तिचेविषयीं कल्पनाच नसल्यानें ती पाहाण्याची मला हौसही वाटली नाहीं.
तुळजापुरांत जें पाहिलें त्यांपैकीं कांहीं देखावे अद्यापि आठवतात. देवीचा निजावयाचा पलंग व त्यावरील अतिशय उंच गादी आठवते. रात्रीं आराध्ये लोक जळती पोत अंगाभोंवतीं कशी पाजळीत, त्यांच्या कवड्यांच्या माळा, तेलानें माखलेला पायघोळ पोषाख वगैरे सर्व आठवतें.
कठीण नवस : तुळजापूरची अंबाबाई व सौंदत्तीची यल्लमा यांशिवाय इतर कांहीं देवींची व देवर्षींची भक्ति आमची आजी करीत असे. जमखंडीच्या पूर्वेस चार मैलांवर कुंभारहाळ व त्याच्याही पूर्वेस कुंचतूर म्हणून एक गांव आहे. कुंचनुरास महादेवाचें (महादप्पा) देवस्थान आहे. तेथें आमच्या घरची सर्व मंडळी दरवर्षी चैत्री प्रतिपदेस नैवेद्य घेऊन जात व तेथें एक दिवस राहून परत येत असत.
सन १८५७ चे नंतर जमखंडीच्या संस्थानिकावर बंडांत सामील झाल्याचा वहीम आला होता. तो खोटा ठरावा, म्हणून ह्याच देवतेला आजीनें सात मैल दंडवत घालण्याचा नवस करून तो पार पाडला. सुदैवानें जमखंडीकरांचा प्रत्यक्ष संबंध शाबीत झाला नाहीं. म्हणून काहीं दिवस बेळगांवच्या किल्ल्यांत ठेवून, त्यांना परत गादीवर आणून बसविण्यांत आलें. त्यांचा विश्वासू मसलतदार छोटुसिंग या एका बाणेदार रजपुतानें सर्व कारभार आपल्या अंगावर घेतल्यानें त्याला मात्र जमखंडी येथें इंग्रज सरकारनें फांशी दिलें. जमखंडी शहराचे उत्तरेस कृष्णा नदीचे वाटेवर छोटुसिंगाचें थडगें आहे. हा नवसास पावतो, अशी भोळ्या लोकांची समजूत आहे.
कुंभारहाळ येथें लक्ष्मण नांवाचा एक धनगराच्या जातीचा देवर्षि राहात असे. त्याच्या दर्शनाला आमची वडील मंडळी जात असत.
शिवाय ताईबाई नांवाची एक देवता कर्नाटकांत पुजली जाते. ही कदाचित् शितळामाता असावी. हिला ''येळ मक्कळ ताई'' (सात मुलांची माता) असें कानडींत म्हणत. आमच्या वाड्यांतील गोठ्यांत, एका कोनाड्यांत ह्या देवीचे नांवानें एक तिकोनी धोंडा शेंदूर फासून बसविला होता. आमच्या वडिलांना देवी आल्या होत्या. त्यांतून ते वांचले, म्हणून आमच्या आजीनें ही स्थापिली असल्यास न कळे. आमचे बाबा एकुलते एक पुत्र म्हणून हें शक्य आहे. ह्या ताईबाईला दरवर्षी एक आठखुरी मेंढीचा बळी लागत असे. आठखुरी मेंढी दिल्यानें आपलीं मुलें सुखी राहतात, अशी समजूत दिसते. त्या दिवशीं आमचे घरीं मांसाचे जेवणाची मोठी समाराधना होत असे. ही प्रथा मला समजूं लागल्यावर माझ्या सांगण्यावरून बंद करण्यांत आली.
ह्याशिवाय आमच्या आजाआजींच्यादेवता दुसर्या विशेष दिसल्या नाहींत. हें सर्व धर्माचरण आमच्या आजीचेंच होतें. आजोबा आपले तिचे लाड पुरवीत असत. आजीनंतर ह्या सर्व देवीदेवतांची श्रध्दा आमच्या घराण्यांतून लवकरच नामशेष झाली.
बाबा त्या काळचे सुशिक्षित असल्यानें असल्या देवतांवर त्यांची धार्मिक वृत्ति तृप्त होणें शक्य नव्हतें. त्यांनीं पुढें पंढरपूरचा संप्रदाय पत्करला. ते पंढरपूरच्या वारीला जात होते, पण त्यांनीं माळ मात्र घातली नाहीं. जमखंडीच्या यजमानाजवळ त्यांचें वजन असल्यानें त्यांच्या वजनानें आपल्या वाड्याजवळ त्यांनीं विठोबाचें एक लहानसें देऊळ बांधविलें. त्याला विठोबाचा मठ म्हणत.
शाकाहार : आमची आजी शाकाहारी होती. यल्लमा देवीला मांसाचा नैवेद्य चालत नाहीं. ही तेलंगणांतल्या रड्डी लोकांची देवता. कर्नाटकांतले रड्डी व दक्षिण महाराष्ट्रांतील मराठे हे एकाच जातीचे असावेत, असें माझें मत मीं शास्त्रदृष्ट्या सिद्ध केलें आहे. हे तेलंगी रड्डी वैष्णवही आहेत. त्यामुळें ते शाकाहारी बनले. ते व्यंकटेशाचेही उपासक आहेत. आजीच्या भावाचें नांव व्यंकप्पा होतें. ह्यावरूनही हाच समज दुणावतो. आमच्या आईच्या माहेरचीं माणसेंही शाकाहारी होतीं. पंढरपूरच्या वारकरी संप्रदायामुळें आणि आमच्या बाबांची वहिवाट ब्राह्मणमंडळींत फार असल्यामुळें, केवळ आमच्या आजोबांशिवाय आमचे घरीं मांसाहारी कोणीच नव्हतें. अशा परिस्थितींत ताईबाईचा आठखुरी मेंढीचा नैवेद्य आमचे घरीं कसा आला, हें एक कोडेंच आहे. तो एक प्रकार सोडला, तर आमचा इतरांचा शाकाहार इतका कडक होता कीं, आजोबांना मांस खावयाचें झाल्यास गोठ्यांत स्वयंपाक करून सर्व भांडीं घासून घरीं यावें लागे.
अंतकालचें वेड : तुळजापुराहून परत आल्यावर बहुतेक दुसरेच वर्षी - इ.स. १८८०।८१ सालीं- आमच्या आजीचा अंत झाला. मरतांना तिला वेड लागलें. जमखंडीस बाबा वैद्य म्हणून एक प्रसिद्ध आयुर्वेदी वैद्य होते. त्यांनीं वेडावर उपाय म्हणून आजीच्या डोईवर एक मोठी सळई लाल तापवून मोठा डाग दिला. डाग देतांना आजीला त्याचें कांहींच वाटलें नाहीं. ती आपली भोंवतालीं पडलेले दाणे टिपत बसली होती. तें पाहून आम्हां सर्वांना फार वाईट वाटलें. त्या स्थितींत ती दोन-चार महिने होती. आजीला वेड लागल्यावर वेडाचे भरांत ती घरांतील सोन्याचे दागिने घेऊन आपल्या मुलीस देण्यास जाई. ते वाटेंत गळून पडले, तरी तिला कळत नसे. ओळखीचे लोक ते आमचे घरीं आणून देत. काय त्या वेळची ही दानत व आमच्या घराण्यावरची जमखंडीच्या लोकांची श्रध्दा !