माझे खेळ
जमखंडी गांव हा खेडेवजा. इंग्रजी शाळा नुकतीच झालेली. तेथें अलीकडच्या हायस्कुलांप्रमाणें क्रीडांगणें, व्यायामाचे प्रकार, ड्रिलमास्तर हे काठून असणार ? आम्ही कोठें तरी गांवाबाहेर जाऊन खेळत असूं.
सोंगट्यांचा खेळ : माझा वडील भाऊ असतांना आमच्या घरीं बैठा खेळ म्हणजे सोंगट्यांचा. गंजिफा, बुद्धिबळें, सोंगट्यांचे हस्तिदंती फांसे वगैरे खेळांचीं सर्व साधनें आमच्या बाबांनीं घरीं करून ठेविलीं होतीं; पण त्यांना कधीं खेळतांना आम्हीं पाहिलें नाहीं. हें सामान मात्र घरीं भरपूर होतें. हा एक बाबांच्या रसिकपणाचा मासलाच म्हणावयाचा. दिवाळीच्या सणांत आमच्या घरीं सोंगट्यांची मजलसच भरें. नरकचतुर्दशीच्या आदले रात्रीपासून तों भाऊबिजेची रात्र उजाडेपर्यंत कवड्यांचा खळखळाट अष्टौप्रहर चालत असे. हा खेळ मोठ्या इरेचा. मनुष्य कितीही शांत असला तरी तो चिडून भांडल्याशिवाय ह्या खेळाची समाप्ति म्हणून व्हावयाची नाहीं. एका एका बाजूला दहा-दहा बारा-बारा गडी बसलेले. संध्याकाळीं खेळ सुरू होऊन उजाडेपर्यंत आम्ही त्यांत गढून जात असूं. भांडण केव्हां केव्हां हातघाईवरही यावयाचें.
एक मल्लयुद्ध : माझा स्वभाव विशेष तापट असे. एकदां अलगूरचे आमचे मामा (हे वयानें माझ्या वडील भावाहून फर तर १।२ वर्षांनीं मोठे असतील) एकीकडे आणि मी व माझा भाऊ एकीकडे असे सोंगट्या खेळत होतों. मामा फार विनोदी, रडी खेळणारे, चिडखोरांना अधिक चिडवून मजा बघणारे. खेळ बाजूस राहून आमचें भांडण जुंपलें. शब्दयुद्ध संपून मल्लयुद्ध सुरू झालें. मामा म्हणजे पट्टीचा पहिलवान ! आम्ही दोघेच काय, पण दहा असलों तरी ते कसची दाद देतात ! दुसर्याला चिडवून ते स्वतः कधींच चिडत नसत. शेवटीं प्रकरण अगदीं निकरावर जाऊन स्वयंपाकघरांतून आईला आमचेकडे यावें लागलें. गलिव्हरच्या अंगावरील लिलिपुटांप्रमाणें आम्ही दोघे बंधु मामांच्या पाठीवर चढून लाथांचा व बुक्क्यांचा मारा चालविला होता. मामा खालीं तसाच वांकून हांसून आम्हांला अधिकच खिजवीत होते. हा प्रकार पाहून आई म्हणाली, ''अरे, हा कसला नवीनच डाव आज काढला आहे रे !'' तीही आपल्या भावाचें पाठबळ न घेतां आमचीच बाजू घेऊन मामांना म्हणाली, ''तूं मोठा असून तुला लहान मुलांशीं असले प्रसंग करायला कळत नाहीं काय ?'' खरें पाहतां चूक आम्हांकडेच असावयाची. पुढें मी हायस्कुलांत गेल्यावर अगदीं मॅट्रिक होईपर्यंत आमचे घरीं ह्या खेळाचा अड्डा जमत असे.
पटाईत वृत्ति : दिपवाळी आली कीं माझ्या अभ्यासाच्या खोलीला चुना, रंग वगैरे मी स्वतः व माझे सोबती लावीत असूं. वर छात, झालर आणि रोषणाई आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणें करीत असूं, दुसर्यांच्या घरींही असे अड्डे होत, तेव्हां अरसपरस जावें यावें लागे. रात्रीं किती भांडणें झालीं, बोलाचाली केली, तरी उजाडल्यावर रात्रीचा प्रकार जणुं काय स्वप्नांत झाल्याप्रमाणें आम्ही सर्व विसरून जात असूं ! सहाव्या-सातव्या इयत्तेंत असतांना तेरदाळचे विष्णु देशपांडे, रामू पाटील, अंतू हनगंडी, मळलीचे हणमंत कुलकर्णी, त्याचा भाऊ रामू, जमखंडीचे भिमू निवर्गी, व्यंकू कुलकर्णी, सिनू करकंबकर, रामू जासूद वगैरे १५।२० जण ह्या खेळांत जमत असत. मी व तेरदाळचे देशपांडे नेहमीं विरुद्ध पक्षाला असूं. दोघेही सारखेच चिडखोर आणि हेकेखोर. खेळापेक्षां भांडणांतच वेळ आणि शक्ति यांचा जास्त खर्च. शेवटीं शेवटीं जुळवून कवड्यां टाकण्याची पद्धत निघाली. व्यंकू कुलकर्णी म्हणजे प्रत्यक्ष शकुनीमामाच. कवड्यां जुळवून वाटेल तो फांसा हमखास टाकण्यांत त्याचा हातखंडा. त्याच्या खालोखाल मीही जुळवण्यास शिकलों. दहा, पंचवीस, सहा, बाराच काय, पण साधे तीन आणि चार हेही आम्ही जुळवून नेमके पाडीत असूं. केव्हां केव्हां बाहेरचे लोक डाव पाहावयाला बसत असत. रंग बहारीचा चढे. पत्ते, गंजीफा आम्ही क्वचित् खेळत असूं. बुद्धिबळाला तर हातच लागत नसे. तो गर्दीचा खेळ नव्हे. तितकी गंभीरताही आमच्यांत नव्हती.
'किर्र' खेळ : आट्यापाट्या, हुतूतू, खोखो वगैरे मैदानी खेळ आम्ही खेळत असूं. शिवाय किर्र म्हणून एक खेळ विशेष चुरशीचा असे. यांत हारलेल्या बाजूचे गडी एकामागें एक कंबरेला धरून वांकून उभे राहात आणि विजयी बाजूचे गडी लांवून धांवत येऊन त्यांच्यावर स्वार होत. ते बराच वेळ बसले आणि भार सहन होईनासा झाला, म्हणजे खालच्यापैकीं कोणी तरी 'किर्र' म्हटलें कीं खालीं उतरून पुन्हां उडी घेत. पण जर का वर बसलेल्यांपैकीं एकाचा जमिनीला पाय लागला कीं, त्याच्यावर डाव येऊन त्याच्या पक्षाला खालीं वाकावें लागे. ब्राह्मणांचीं मुलें हा खेळ खेळावयाला कचरत असत.
सूरपारंब्या : झाडावरचा सूर हा खेळ फार मौजेचा वाटे. जमखंडी गांवाभोंवतीं डोंगराच्या दरींतून व तळ्यांच्या कांठीं बर्याच रम्य आंबराया असत. येथें सायंकाळच्या वेळीं निवांत असे. आमची वानरसेना हा खेळ खेळावयास एखादें विस्तीर्ण शाळेचें ठेंगणें आंब्याचें झाड गांठीत असे. सर्वांनीं झाडावर चढावयाचें. एकानें खालीं उतरून, एक दांडकें आपल्या उजव्या तंगडीखालून दूर फेंकावयाचें. ज्याच्यावर डाव आलेला असे तो तें आणीपर्यंत टाकणारा झाडावर चढे. तें दांडकें ठरलेल्या कोंडाळ्यांत ठेवून डाव आलेला गडी झाडावरच्यांना शिवण्याचा प्रयत्न करी. त्याची नजर चुकवून कोणी तरी दांडक्यावर नेमकी उडी टाकून तें दांडकें पुन्हां पूर्वीप्रमाणें फेकून तो झाडावर चढे. कोणी तरी एकाला शिवेपर्यंत त्याच्यावरचा डाव जात नसे. हा खेळ मुख्यतः गुराखी मुलांचा असे. ह्याला वडाचें झाड चांगलें. त्याच्या फांद्या लांबवर गेलेल्या असतात व लाकूड चिवट असल्यानें मोडण्याची भीति नसते. आंब्याचें झाड पोकळ असतें. शिवाय आंब्याच्या मोसमांत आंबराईंत राखण बसे. वडाला नेहमीं मुक्तद्वार. शिवाय पारंब्या खालीं लोंबत असल्यामुळें त्या धरून खालीं उड्यां घेण्यास किंवा खालूनच उलटें झाडावर चढण्यास हेंच झाड फार सोयीचें. मात्र घरीं येईपर्यंत अंगावरचे कपडेच काय, पण कातडेंही जागजागीं फाटलेलें असल्यामुळें घरच्या मंडळींपासून फाटका आणि ओरखडलेला भाग लपवून ठेवण्याचा दुसरा एक खेळच खेळावा लागत असे. हातपाय मुरगळलेला, डोकीला खोंक पडलेली, पाठ खरचटलेली, शिरा ताणलेल्या व हाडेंन् हाडें खिळखिळीं झालेलीं, अशा स्थितींत घरीं आलेल्या गड्यांला पुन्हां एक आठवडा तरी आंबराईकडे जाण्याची इच्छा होते कशाला ! पण दुसर्या आठवड्यांत पुन्हां हीं माकडें झाडावर आहेतच तयार ! जित्याची खोड मरेतोंपर्यंत जात नाहीं; पण आमची खोड मॅट्रिक झाल्यावर पार गेली. कॉलेजांत जाणें म्हणजे बालपणालाच नव्हे तर जन्मभूमीलाही मुकणें होय !
सूरपाट्या : सूरपाट्या हा एक अगदीं राजमान्य राष्ट्रीय खेळ. तो आम्हां खेडवळांचा क्रिकेटच. जमखंडीच्या पूर्वेस नंदिकेश्वराचें एक जुनें देऊळ आहे आणि वायव्येस सुमारें एक मैलावर अबूबकरांचा दर्गा आहे. ह्या दोन ठिकाणच्या प्रशस्त पटांगणांत आमची टोळी सूरपाट्या खेळण्यास जात असे. एकदां जाण्याची घडी पडली म्हणजे तीन तीन महिने ती मोडत नसे. त्या अंगणांत खेळून खेळून पाटीचे आडवे आणि सुराचा एक लांब उभा असे खाचरच पडत. ह्या दोन जागा म्हणजे आमच्या वतनाच्या झाल्या होत्या. तेथें दुसरें कोणीं फिरकावयाचें नाहीं. इंग्लंडमध्यें ज्याप्रमाणें ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा वचक व दबदबा असतो, तसें जमखंडीस आम्हां विद्यार्थ्यांच्या कळपाचें वजन असे. ह्या टोळीचा मी नायक म्हणून प्रसिद्ध असे. गांवचे लोक-विशेषतः आमची शिक्षकमंडळी-आमच्या खेळाचें कौतुक करीत असत. एकदां जमखंडीचे आम्हां विद्यार्थ्यांच्या कळपाचें वजन असे. ह्या टोळीचा मी नायक म्हणून प्रसिद्ध असे. गांवचे लोक-विशेषतः आमची शिक्षकमंडळी-आमच्या खेळाचें कौतुक करीत असत. एकदां जमखंडीचे वृद्ध यजमान श्रीमंत अप्पासाहेब यांनीं उन्हाळ्यांत साखरपाणी करून मोठ्या आवडीनें आम्हां विद्यार्थ्यांना साखरपाण्याचे पेले पाजले !
आमचा कंपू : आमचा कंपू घेऊन मी दरसाल उन्हाळ्यांत आणि पावसाळ्यांत कोठें तरी नदीच्या कांठीं किंवा डोंगराच्या दरींत वनमोजनाला जात असें. आमच्यांत लिंगायत, मराठे, ब्राह्मण, मुसलमान वगैरे सर्व जातींचे विद्यार्थी असत. जातिभेद कसला तो आमच्या गांवींही नव्हता. तसलीं सोंवळीं पोरें आमच्या वार्यालाही उभीं राहात नसत आणि आम्ही त्यांना आमच्यांत घेतही नसूं. जनुभाऊ करंदीकर असल्या सोंवळ्याचा होता. तो आमच्यांत फारसा मिसळत नसे. आमचा सर्व कंपू नेहमीं आमच्या वाड्यांत रात्रंदिवस पडलेला असे. बाहेरच्या मोठ्या अंगणापासून आंत स्वयंपाकघरापर्यंत व देवघरापर्यंत ह्या टोळ्यांचा धुडकूस चाले. बाबांना मात्र सर्व भीत. त्यांचेसमोर आम्ही पुस्तकांत नाक खुपसून बसत असूं. ते बाहेर गेले कीं घेतलाच सर्व वाडा डोक्यावर. माझ्या दोन बहिणी जनाक्का व तान्याक्का ह्या लहान, अल्लड असत. त्याही आमच्या धांगडधिंग्यात सामील होत. माझ्या आईला कोणीच भीत नसत. तिला सर्व आपलींच पिलें वाटत. तिला स्वतःस वीस झालीं. हीं बाहेरचीं वीस ! कित्येक वेळां स्वयंपाकघरांतील खाण्याच्या पदार्थांवर हल्ला होई. आमच्या गरिबींतले शिळे तुकडे तेरदाळचा विष्णु आणि जमखंडीचा सीनु हीं श्रीमंतांची मुलें मिटक्या मारीत खात. मग आईला मायेचें भरतें कां येऊं नये ? हे माझ्या भावी सामाजिक सुधारणेचे पाळण्यांतले पाय बरें ! भावी चारित्र्याचे नमुने पुस्तकांतील रेखीव धड्यांत अगर वर्गांतल्या निर्जीव बाकावर बनत नसून, ते अंगणांतल्या जिवंत धांगडधिंग्यांत आणि समानशील सवंगड्यांच्या धसमस्करीच्या जिव्हाळ्यांत जन्म पावत असतात.
चित्रकला : आमचा सर्व वेळ अभ्यासांत किंवा खेळांतच जाई, असें नव्हे. नित्य कांहीं तरी नवीन कल्पना निघे आणि आम्ही सर्वच त्यांत रमत असूं. चित्र काढण्यांत आमच्यांतला रामू रानडे याचा हात चांगला चाले. आमच्या टोळीला लागला चित्रें काढण्याचा नाद ! आमच्या सोप्यांत आणि तुळशीकट्टयावरच्या भिंतीवर चमकावयाला लागलीं रामाचीं, मारुतीचीं, देवदेवींचीं चित्रें. तुळशीकट्टयावरची भिंत चुन्याची होती. तिचेवर मीं लाईफ साईझ रामपंचायतन रंगीत काढलें होतें. तें बरींच वर्षे राहिलें होतें. घरांत आलेल्यांना तें दर्शनी भागीं असल्यामुळें दिसे. आतां आठवल्यावर मला त्याची लाज वाटते. (कारण त्याच दर्जाची ती आमची कला होती !) पण त्या वेळीं मला त्या चित्राचा पोरकट गर्व वाटत होता. ह्यावरून मी लहानपणीं किंचित् बढाईखोर असेन, असें वाटतें.
कारागिरी : गणेशचतुर्थी आली आणि आमच्या टाळक्यानें घेतलें कीं, प्रत्येकानें गणपति स्वतः करावयाचा ! मग चाललें हें माकडमंडळ जमखंडीच्या पुर्वेस २-२॥ मैलांवर एक डोंगर आहे, तेथून शाडूची माती आणावयाला. बरीच शाडू आणून जो तो चढाओढीनें गणपति करूं लागला. 'विनायकं प्रकुर्वाणो रचयामास वानरम' असाही प्रकार पुष्कळांचा झाला. तरी प्रत्येकाला आपलीच कृति पसंत पडून प्रत्येकानें आपापली पाठ आपणच थोपटून घेतली. खरें पाहातां रामू रानड्यांचा गणपति मात्र त्यांतल्या त्यांत गणपतीसारखा दिसत होता. कांहीं असो. त्या गणेशचतुर्थी सर्वांनीं स्वकृत गणपतीचीच पूजा केली, ही कांहीं थोडी गोष्ट नव्हे !
आमचे कारखाने : एकदां साबण करण्याची टूम निघाली. जो तो चुना आणि तेल ह्यांत हात घालून बसला. वड्यां तयार झाल्या, पण त्या वाळेचनात ! वाळल्या तर पुन्हां ओल्याच होईनात. कपड्यांला लावूं गेलों तर कपडा फाटे, पण डाग कांहीं जाईना. साबणाचे नवे डाग कपड्यांला पडूं लागले. चहूंकडे छीःथू झाली आणि आमच्या पियर्स सोप कंपनीचें दिवाळें निघालें. ह्याचप्रमाणें शिसपेन्सिली, दगडी पेना ह्यांचे आमचे कारखाने जसे निघाले तसेच बुडाले. भागीदार आमचे आम्हीच असल्यानें कोण कोणावर फिर्याद करतो ? केली तरी पुन्हां हसेंच होणार ना ! तरी एका गोष्टींत आमचा हातखंडा असे. आमची शाई आम्हीच करीत असूं. बाभळीच्या शेंगा शिजवून त्यांत हिरडा व हिराकस घालून आम्ही शाईच्या बाटल्या भरून ठेवीत असूं. मग वाटेल तितक्या दौती लवंडल्या तरी भरलेल्या बाटल्या कोनाड्यांत शिल्लक असतच. मात्र ह्या शाईच्या कारखान्याच्या भरभराटीमुळें, शाई वेळोवेळीं घरभर सांडे आणि त्यामुळें बिचार्या आमच्या आईला सारवणाचा नवीनच त्रास उद्भवे. ह्या गालबोटामुळें आमच्या यशाची शुभ्रता जास्त उठावदार दिसूं लागली. मग आईच्या त्रासाला कोण जुमानतो ?