माझे बाबा
[ जन्म ( अदमासें ) १८३५ : मृत्यु २७ जून १९१० ]
आजे बसवंतराव यांना दोनच अपत्यें. वडील मुलगा माझे बाबा रामजीबाबा आणि धाकटी बहीण, माझी आत्या (आम्ही तिला अक्का म्हणत असूं) अंबाबाई. माझ्या बाबांचें रूप व स्वभाव बहुतेक माझ्या आजीचे वळणावर गेलें होतें. शेतकर्याचें पोर. निसर्गाचे मांडीवरच खेळून वाढलेलें. लहानपणीं ते खोडकर होते. तथापि पुढें कोणा एका शास्त्रीबुवांच्या जवळ ते लिहावयाला व हिशेब ठेवायला त्या वेळच्या मानानें फारच उत्तम प्रकारें शिकले. ह्याचें श्रेय आजोबाला, बाबांच्या तैलबुध्दीला किंवा त्या शास्त्रीबुवांच्या चांगुलपणाला द्यावे हें ठरविण्याला आतां मार्ग नाहीं. कारकुनीं शिक्षणांत तर बाबांचा जमखंडींत नंबर पहिला होता ! त्यांचें मोडी अक्षर म्हणजे मोत्यांचे दाणे ! माझ्या वेळेला बाबा तर मुलांना कित्ते घालून देत. जमाखर्चांत जमखंडी दरबारांत त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. मामुली शिक्षण संपल्यावर संस्थानांत बिद्री नांवाचा एक पेट्याचा गांव आहे तेथें त्यांना प्रथम शिक्षकाची नोकरी लागली. त्या वेळीं ब्राह्मणी संस्थानांत ह्या मराठ्याच्या मुलाला शिक्षकाची नोकरी मिळाली ही सामान्य गोष्ट नव्हती. ही शाळा सरकारीच असली पाहिजे. एरवीं हा खाऊनपिऊन सुखी अशा मराठ्याचा एकुलता एक लाडका मुलगा, खासगी शाळा काढावयाला जमखंडी हा राजधानीचा गांव सोडून बिद्रीसारख्या पेट्यांत कां गेला असता ? ह्या सर्व गोष्टींत त्या शास्त्रीबुवांचें कांही अंग आहे. त्या ब्राह्मणाचें लक्ष ओढून घेण्यासारखें कांहीं विशेष पाणी बाबांत असलें पाहिजे. हें पाणी आमच्या आजोबांकडून आलें असावें. तें मजमध्यें किती आलें, हें ठरविणें माझें काम नव्हें.
पांढरपेशी शिक्षण : नुसतें कारकुनी शिक्षणच नव्हे, तर धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वैद्यकशास्त्र वगैरे सांस्कृतिक विषयांची तांत्रिक माहिती बाबांना बरीच होती, हें मला समजूं लागल्यापासून माझे नजरेस येऊं लागलें. त्यांना संस्कृत येत नव्हतें, तरी मराठींतील संस्कृत तत्सम शब्दांचे कठीण अथ त्यांना समजत असत. इतकें त्यांचें प्राकृत पोथ्यांचें वाचन झालें होतें. त्या काळच्या प्राकृत पौराणिक सर्व पोथ्यांचा व मूलस्तंभ पंचांगें वगैरे शास्त्रीय वाङ्मयाचाही संग्रह त्यांनीं चांगला केला होता. ह्यावरून त्यांची वाङ्मयभक्ति दिसते. माण्या लहानपणीं एक शास्त्री पुराण सांगावयाला आमचे घरीं नेहमीं येत. ह्यावरून गुणी माणसांची संभावना करून खानदानी लौकिक राखण्याची बाबांची प्रवृत्ति चांगली दिसते. त्यांचा हात सढळ होता. किंबहुना ते बेहिशेबी मराठा होते असें म्हटलें तरी चालेल. कारकुनी हिशेबांत ते कोणालाही हार न जाणारे असतां संसारांतील काटकसरींत ते फार मागासलेले होते हें मोठें आश्चर्य ! सर्व जातींतील संभावित माणसांचा त्यांना स्नेह व लळा होता. पण ब्राह्मणी बहुश्रुत राहणीचेंच वळण त्यांना जास्त कां लागलें ह्याचें कारण त्यांचे गुरुजी शास्त्रीबावाच असावेत. पण ह्या बाबतींत मला निश्चित असें कांहींच सांगतां येत नाहीं. इतिहास-शोधनाची आवड उत्पन्न होण्यापूर्वीच माझ्या घराण्यांतील सर्व वडील माणसांचा, वस्तूंचा, मौल्यवान् कागदपत्रांचा व दप्तराचा नाश व्हावा ही मला आतां मोठी खेदाची गोष्ट वाटते ! इतिहास हा माझा कॉलेजांतील आवडीचा विषय असून असें कां झालें याचें कारण माझी फकिरी वृत्ति.
ब्राह्मणी वळण : बैठ्या शिक्षणाचें ब्राह्मणी वळण बाबांच्या अंगांत इतके भिनलें कीं, अजोबांचा शेतकीचा अगर शिलेदारीचा बाणा त्यांच्यांत मुळींच उरला नाहीं. फार काय पण त्यांच्या पोषाखांतही ब्राह्मणी झांक दिसे. माझ्या आजोबांची पांढरी बिन-पिळाची बत्ती किंवा पायांतली फार तंग नसलेली पण रुबाबदार विजार मीं बाबांचे अंगांत कधींच पाहिली नाहीं. इतकेंच नव्हे तर ब्राह्मणाप्रमाणें ते दहा हात लांब धोतर नेसत असत व तें थोडें जुनें झालें म्हणजे, तेंच दुमडून पांघरण्याचें उपरणें करीत.
ही चाल जमखंडीस सभ्य ब्राह्मणमंडळींत अद्यापि असावी. आमचे इंग्रजी शाळेचे हेडमास्तर त्रिंबकराव खांडेकरही असेंच जोडउपरणें पांघरीत. बाबांचा अंगरखा मात्र मराठा बाण्याचा असे. तो गुडघ्याच्या खालपर्यंत घोळदार असून छातीवर बंद असत. अस्तन्यांवर बर्याच चुण्या असून शेवटीं त्यांना कान असत. ते मणगटाच्यापुढें हाताच्या पंजावर अगदीं बोटांपर्यंत पसरलेले असत. रुमाल कनार्टकी तऱ्हेचा मोठा असून तो बांधण्याची ढब ठरलेली असे. पायांत जोडाही मराठी तऱ्हेचा असे. एकंदर पोशाख शुभ्र आणि साधा असून रुबाबदार असे. ॠतुमानाप्रमाणें ह्यांत कधीं फरक होत नसे. अर्ध्याच पोषाखानें ते कधीं बाहेर पडत नसत.
कडक स्वभाव : बाबांचा स्वभाव फार बोलका होता. ते आपल्या मित्राजवळ बोलत बसले म्हणजे मला लहानपणीं ऐकण्याची फार मौज वाटे. त्यांच्या बोलण्यांत म्हणी फार असत. मराठी, कानडी व मुसलमानी ते सफाईनें बोलत. ऐकणार्यावर त्यांची छाप तेव्हांच बसे. ते स्वभावानें किंचित् शीघ्रकोपी, पण खुल्या दिलाचे व मृदु अंतःकरणाचे असत. आम्हांला ते लहानपणीं रागानें एकदां मारीत सुटले म्हणजे बेतालपणानें फारच मारीत व मग राग ओसरल्यावर आपणच अश्रु ढाळीत. बिद्रीचे शाळेंत असतांना ते मुलांना फार मारीत, म्हणून त्यांना त्या नोकरीवरून श्रीमंतांनी आपल्या खासगींत जवळ घेतलें, असें मी एकदां ऐकलेलें स्मरतें. ते विशेषतः माझ्या मोठ्या भावाला फार मारीत. त्यांना आम्ही लहानमोठे सर्वजण फारच भीत असूं. इतकेंच नव्हे तर गांवांतही त्यांची जरब फार असे. गांवच्या पोलीस शिपायांनीं एखादी कांहीं चूक केली तर आपल्या पोटच्या पोराप्रमाणेंच बाबांनीं त्यांना कित्येक वेळां मारलेलीं उदाहरणें घडलीं आहेत ! व्यवहारांत मात्र ते फार भोळसट असत. कांहीं विक्री-सौदा करावयास ते गेले तर व्यापार्यांच्या डोईवर देवाचा प्रसार ठेवून त्यांना धमकावून खरी किंमत सांगावयास लावीत. मग त्यांनीं सांगितलेलीच किंमत ते देत ! पण त्यांनीं बिनव्याजी दिलेलें कर्जही कधीं कोणीं परत फेडलेलें मला आठवत नाहीं. फार काय, पण श्रीमंतांशीं भांडून सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन जेव्हां ते घरीं बसले, तेव्हां त्यांनीं कांहीं प्रकरणीं स्वतःची तसलमात २५८९ रुपये (पंचवीसशें एकूणनव्वद) सरकारांत खर्ची घातले होते. तेही त्यांनीं १५।१६ वर्षे मागितले नाहींत. पुढें आमच्या घरीं आम्ही दारिद्य्राच्या भयंकर यातना सोशीत असतांना ही तसलमात परत मागण्याच्या याद्या कितीदां तरी श्रीमंत आप्पासाहेबांकडे केलेल्या मीं पाहिल्या; पण एक कवडीही परत मिळाली नाहीं.
तरुणपणीं बाबांच्या हातांत चार पैसे खेळत, म्हणून त्यांनीं प्रथम प्रथम ऐष-आराम केला. पण त्यांच्या धर्माकडे स्वाभाविक असलेला ओढा बळावला. विशेषतः पंढरपूरच्या वारकारी पंथाचा त्यांना फारच नाद लागला. प्रथमपासून त्यांचा स्वभाव प्रेमळ, श्रध्दाळू, उदार आणि करारी असे. त्यांच्या प्रामाणिकपणाचा किंबहुना सर्वच आमच्या घराण्याच्या प्रामाणिकपणाचा लौकिक जमखंडी संस्थानांत गाजत होता.
बाबांची रसवंती : मी अगदीं लहान असतांना बाबांच्या मित्रांपैकीं म्हातारबा सुतार, बसाप्पा अथणी (लिंगायत) आणि बापू जामदार (मराठे) हे वरचेवर घरीं येत. नंतर मी थोडा मोठा झाल्यावर सटवप्पा सुतार आणि पांडाप्पा टर्की (ब्राह्मण वारकरी) हे येत असत. पण बाबा कांहीं फारसे कोणाचे घरीं जात नसत. आमच्या वाड्यांत सोप्याच्या उजव्या बाजूस एक चारपांच फूट लांबरुंद, स्वच्छ व प्रशव्स्त चुनेगच्ची कट्टा असे. ह्याला आम्ही तुळशीकट्टा म्हणत असूं. कारण पूर्वी तेथें तुळशीवृंदावन होतें. ह्या कट्टयावर बाबा आपल्या मित्रांशीं बोलत बसत. मी आपला तेथें घुटमळत असावयाचा. कारण बाबांचें संभाषण मला आवडत असे. मला वाटतें माझे अंगीं जर कांहीं वक्तृत्व आलें असेल तर त्याचें प्रथम बीजारोपण बाबांच्या अकृत्रिम, साध्या व जोमदार रसवंतीनें केलें असावे. रूपानें, रंगानें व स्वभावानें मी अगदीं बाबांचे वळणावरचा आहें, असें मला लोक म्हणत असत.
जमखंडीस पंढरपूरचा भजनी संप्रदाय वाढविण्याच्या कामी बाबांचा पुढाकार होता. बसप्पा नांवाचे एक रजपूत गृहस्थ फार सात्त्विक होते. मीं त्यांना कधीं पाहिलें नाहीं. ते जमखंडीस हा पंथ काढण्यांत मुख्य होते, असें मीं ऐकलें होतें.
विठोबाचा सप्ताह : आमचे घराजवळ 'आप्पासाहेबांची विहीर' म्हणून एक पिण्याच्या पाण्याची मोठी विस्तीर्ण व खोल विहीर आहे. तिचे कांठीं सटवाप्पा सुताराचें घर व सुतारीचा कारखाना आहे आणि त्याचे समोर रस्त्याच्या दुसर्या बाजूस विठाबाचा मठ आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेपासून (ही श्रीतुकारामबोवांची पुण्यतिथि) तों पुढच्या षष्ठीअखेर (ही श्रीएकनाथस्वामींची पुण्यतिथि) पांच दिवस आणि त्यापूर्वी व नंतरचे दोन दिवस असा दरवर्षी त्या मठांत भजनाचा मोठा सप्ताह साजरा केला जात असे. सात दिवस वीणा रात्रंदिवस खालीं ठेवायचाच नसतो. दररोज काकडआरती, शेजारती सकाळसंध्याळ होई. त्या वेळीं मोठी गर्दी जमे. ३०।४० नियमित टाळकरी लंबगोलांत उभे राहात. मध्यें वीणेकरी उभे राहात. दोहों बाजूंस या गोलाचे शेवटीं दोन मृदुंग्ये उभे असत. आरतीचे वेळीं भजनाच्या सोहळ्याला फार रंग येई. बीजेच्या व षष्ठीच्या आरतीचा थाट मोठा होई. कुरमुरे, नारळ व बत्तासे ह्यांनीं भरलेलीं खिरापतीचीं ताटें ऐकणारे स्त्रीपुरुष आणीत. आरतीचे वेळीं गुलाल उधळला जाई. बुक्का, उदकाड्या, कापूर यांचा घमघमाट सुटे. टाळकर्यांत मुलें उभी राहात. त्यांत मी व माझा मोठा भाऊही असूं. वीणेकरी हरीबा कर्जगार नांवाचे जिनगर (वारकरी) असत. आरती धरण्याचा मान बाबांचा असे. तो देखावा माझ्या डोळ्यांपुढें चित्रासारखा आहे. माझ्या धार्मिक विकासांत या भजनाचा फार मोठा परिणाम झालेला आहे. आरती संपल्यावर सायंकाळीं ६ वाजतां प्रसाद म्हणजे जेवणाच्या पंक्ति बसत. शंभर-दोनशें पात्रें तरी दररोज होत. त्यांत वाणी, मराठी, ब्राह्मण, सुतार, सोनार, जिनगर, शिंपी वगैरे जाति असत. जातिभेदाचे नियम कडक पाळण्यांत येत नसत. शेवटचे दिवशीं मोठी आरती व महाप्रसाद होऊन रात्रीं १० वाजतां दिंडीचा छबिना निघे. तो सर्व रात्रभर गांवांतून व पेठेंतून ब्राह्मणआळींत एक जुनें विठोबाचें देऊळ आहे, तेथें जाऊन सकाळीं ८।९ वाजतां परत मठांत येई.
बबलादीचे स्वामी : बाबांची मानमान्यता सर्व जातींत असे. त्यामुळें आमचे घरीं जातिभेद विशेषतः पाळण्यांत येत नसे. बाबा मराठे जातीचे सरपंच असूनही आमचे घरीं जातिभेदाची इतकी ढिलाई होती. फार काय पण ब्राह्मण लिंगायतसुध्दां आमचेकडे येऊन जेवत. मात्र तें फार उघडपणें नसे. इतकेंच नव्हे तर पुढेंपुढें बबलादीच्या लिंगायत स्वामींचे आमचेकडे येणें-जाणे फार झालें. तेव्हां तर उघडपणें आमच्या घरीं सर्व जातींच्या पंक्ति बसत. त्या वेळीं मी इंग्रजी ५।६ इयत्तेंत होतों. ह्या स्वामींच्यापुढें एक शिंग वाजविणारा महार असे. तोही आमचेकडे जेवत असे. बबलादीचे स्वामी एक प्रसिद्ध सिद्ध गणले जात. हे उघडपणें दारू पीत व मांसही खात. धर्माच्या नांवावर हें सगळेंच उघड चालत असे. आमचें अठरा विश्वे दारिद्र्य असूनही ही टोळधाम आमचे घरीं आठ-आठ दिवस उतरत असे. खर्च कसा चाले ह्याचें मला आश्चर्य वाटतें. त्या वेळीं मला नुसती मौज वाटत असे. पुढें मॅट्रिकची परीक्षा होऊन मी पुण्यास कॉलेजांत शिकुं लागलों, तेव्हां माझें वजन घरी भासूं लागलें. प्रत्यक्ष बाबाही मला पाहून दबत असत. पुढें या स्वामीमंडळाचें प्रस्थ कमी होऊन नंतर त्यांचें येणें अजिबात बंद झालें.
तुळजापूरची अंबाबाई, सौदत्तीची यल्लमा, पंढरपूरचा विठोबा, नरसोबाचे वाडीचा दत्तात्रय, कोल्हापूरची महालक्ष्मी ह्या मोठमोठ्या क्षेत्रांतल्या प्रसिद्ध दैवतांचे संप्रदाय तर असतच, पण शिवाय वरील बबलादीचे स्वामी, रामदासी पंथ, गोसावी-बैरागी, अतिथि-अभ्यागत वगैरे अनेक खुळांचा सुळसुळाट आमचे घरीं सारखा चाललेला असे. मिळकत मुळींच नाहीं, उलट खर्चालाही ताळ नाहीं. ह्याचा परिणाम ठरलेला झाला. तो हाच कीं, शेतें गेलीं, गुरें गेलीं, घर गेलें, दागिने गेले. सर्व सावकाराचे हातीं गेलें आणि एक दिवशीं पांघरलेल्या कपड्यानिशीं आम्ही आमच्या मोठ्या वडिलोपार्जित वाड्यांतून बाहेर पडलों व भाड्याच्या घरांत जाऊन राहिलों. त्या वेळेला मला चांगलें कळत होतें. माझी मॅट्रिकची परीक्षा होऊन मी पुण्यास शिकत असेन. या सर्व करुण रसानें भरलेल्या नाटकांत मुख्य नायिकेचें पात्र माझी आई साध्वी यमुनाबाई ही होय. आतां तिच्या आठवणीस सुरुवात करतों.