माझें प्राथमिक शिक्षण
घूळपाटी : मी ५ किंवा ६ वर्षांचा झालों असतां माझे आजोबा बसवंतराव वारले. तेव्हांपासून ११ वर्षांचा होईपर्यंतचीं, म्हणजे इ.स. १८७९ पासून १८८४ पर्यंतचीं ५ वर्षे हीं माझ्या प्राथमिक शिक्षणाचीं होतीं. मला प्रथम एका गांवठी शाळेंत घालण्यांत आलें होतें. हल्लीं जमखंडीस ज्या घरांत रा. सदाशिवराव पेंडसे वकील राहात आहेत, तेथें ही खाजगी शाळा होती. पंतोजीचें नांव हरिपंत फडके किंवा असेंच कांहींसें होतें. ह्या शाळेंत फक्त लिहिणें, वाचणें, मोडी अक्षर वळविणें, हस्तलिखितें वाचणें, हिशोब करणें वगैरे केवळ व्यावहारिक साधे विषय होते. त्या वेळीं संस्थानांत सरकारी शाळा होत्या कीं नव्हत्या हें माहीत नाहीं. असल्याच तर मला या गांवठी शाळेंत कां ठेवलें तें कळत नाहीं. निदान इंग्रजी शाळा तरी त्या पूर्वकाळीं नसावी. शाळा खात्याची घटना त्या वेळीं नुकतीच चालली असावी. या गांवठी शाळेंत मी प्रथम माझी धुळाक्षरें कशीं शिकलों तें आठवतें. एक लाकडी फळी सुमारे दीड हात लांब व एक वीत रूंद असे. तिला आम्ही पाटी म्हणत असूं. वेळूची एक बारीक लेखणी असे, तिनें या पसरलेल्या धुळींत आम्ही धुळाक्षरें कोरीत असूं. म्हणूनच मुळाक्षरांना धुळाक्षरें हें नांव पडलें आहे. ह्या वेळीं दगडी स्लेटींचा प्रचार जमखंडीस दिसत नव्हता. मला शाळेंत घालण्याचा मुहूर्तसमारंभ झाला. चैत्री पाडवा, दसरा, पंचमी आणि अक्षय्यतृतीया हे साडेतीन शुभमुहूर्त गणले जातात. कोणत्याही गोष्टीस सुरुवात करावयाची ती ह्या मुहूर्तावर करतात. रा. बाळा काणे या नांवाचा एक ब्राह्मण खाजगी शिक्षकाचा धंदा करीत असे. माझ्या वडिलांनीं त्याला घरीं बोलावून आणून माझ्या शिक्षणाच्या आरंभाचा एक लहानसा विधि करविला. सोप्यांत दोन पाट मांडून मला व काणेमास्तरांना समोरासमोर बसवून मध्यंतरीं ही धूळपाटी ठेवून तिची पूजा करण्यांत आली. नंतर शिक्षकांनीं माझा हात धरून पहिला धडा 'श्रीगणेशाय नमः' माझ्याकडून गिरविला. माझ्या वडील भावाचा हा विधि मला आठवत नाहीं. माझ्या पाठीवर ८।१० मुलें जरी झालीं तरी तीं बाळपणींच वारलीं. जनाक्का व तान्याक्का ह्या मुली होत्या व एकनाथ हा शाळेंत जाण्याइतका मोठा होईपर्यंत युगांतरच झालें होतें. म्हणून हा विधि पुन्हां कधीं आमचे घरीं झाला नाहीं.
मौजीबंधन : बाबांना धार्मिक विधि-समारंभाची श्रद्धा होती व आपल्या घरीं पुरोहितास आणवून सर्व संस्कार यथासांग करावेत, असें त्यांना पूर्वीपासूनच वळण लागलेलें होतें. आमची लग्नें होण्यापूर्वी माझ्या भावाची व माझी विधिपूर्वक मुंज करण्यांत आली. ह्यावरून आमचें घराणें क्षत्रिय होतें, अशी भावना आमच्या बाबांमध्यें विशेष होती असें दिसतें. वरील दोन्ही उपनयनसमारंभांच्या वेळीं आजोबा जिवंत नव्हते. मुंजीच्या वेळीं आजीही जिवंत नसावी. आमचे लग्नानंतरही एकदोनदां श्रावणीचे दिवशीं स्वतः बाबा व आम्ही दोघे मुलगे, ह्यांचा पुरोहिताला आणून विधिपूर्वक होमहवन करून नवीन यज्ञोपवीत घेण्याच्या थाटाचा समारंभ होत असे, असें मला आठवतें, पुढें दारिद्र्यानें गांठल्यामुळें बाबा उदासीन झाले. त्यामुळें श्रावणीचे वार्षिक समारंभ बंद पडले. जमखंडी गांवांत इतर कोणी मराठे अशी श्रावणी करीत नसत. मी १८९८ इ. सनांत पुणें येथील प्रार्थनासमाजांत सभासद हाईपर्यंत माझ्या अंगावर जानवें हें होतेंच व त्याचा विधि इतर हिंदूंप्रमाणें मी तोपर्यंत थोडाबहुत पाळीत असें. आमची श्रावणी चालली असतांना होमाचे वेळीं आमचे पुरोहित जे मंत्र म्हणत ते वैदिक असत किंवा पौराणिक असत हें मला माहीत नाहीं. पण नवरात्रांत रोज आमच्या घरीं नऊ दिवस महापूजा होत असे, त्या वेळीं मंत्र-पुष्पाच्या वेळीं पुरोहित वेदमंत्र म्हणत असत, हें आतां मला आठवतें. हा मंत्र क्षत्रियांच्या घरीं म्हणण्यासाठीं रचला असावा. इतक्या जुन्या काळीं जमखंडीसारख्या ब्रह्मणी रिसायतींत आमच्या घरीं क्षत्रिय-ब्राह्मणांचा इतका सलोखा असतांना पुढें पुढें ब्राह्मणब्राह्मणेतर वाद कसा माजला हें आश्चर्य आहे.
प्राथमिक शाळेंत माझा अभ्यास बरा होता. पण अभ्यासाकडे त्या वयांत लक्ष फारसें न लागणेंच साहजिक होतें. चौथ्या इयत्तेपासून माझें गणित व भाषा बरीं आहेत, हें शिक्षकाच्या नजरेस आलें. मोडी अक्षर म्हणण्यासारखें वळणदार नव्हतें. बाबांनीं आमच्या शाळेंतील अभ्यासाकडे विशेष लक्ष दिलेलें मला आढळलें नाहीं. मराठी चौथी इयत्ता संपल्यावरही एकदम इंग्रजी हायस्कुलांत जाण्यास हरकत नव्हती. पण मला मराठी पांचव्या इयत्तेंत एक वर्ष घालवावें लागलें. मराठी शाळेचे हेडमास्तर विष्णुपंत गवंडे ह्यांनीं मला मुद्दाम पांचव्या इयत्तेंत घेतलें. त्यामुळें मला फायदाच झाला. मराठी कवितेंत आणि गणितांत त्या वेळच्या मानानें माझी बरीच प्रगति झाली. पांचव्या पुस्तकांतील कुशलवाख्यान आणि मोरोपंतांच्या धेनुहरणाच्या आर्या ह्यांचा अर्थ व व्याकरण मला चांगलें कळत असे. कविताही चांगल्या सुरावर मी ऐटींत म्हणत असें. कोणी शाळा पाहावयास आल्यास माझ्या कविता म्हणून घेत असत. अशा प्रकारें पंतोजींचा मी लाडका असें. मोरोपंतांच्या कठीण व संस्कृतमिश्र आर्यांचा अर्थ मी घरींदेखील कोणाला तरी मोठ्या आढ्यतेनें करून दाखवीत असे. त्यामुळें मी बाबांचाही लाडका झालों. आपले प्रतिष्ठित मित्र घरीं आल्यास ते मला कविता म्हणून अर्थ करण्यास सांगत.
आक्काची माया : माझ्या आईबाबांशिवाय माझ्या आत्येचा मी लाडका होतों. वडील भावापेक्षांही मजवरच अक्काचें (आमची आई आपल्या नणंदेला अक्का म्हणे, म्हणून आम्हीही तिला अक्काच म्हणत असूं.) प्रेम कां गुंतावें हा एक प्रश्न आहे. माझ्या भावापेक्षां मी जरी देखणा नसलों तरी अधिक चुणचणीत असें. माझ्या भावाला द्यावयाला त्याला अनुरूप अशी मुलगी माझ्या आत्येला नव्हती. आमच्या घराण्यांत आपली एक तरी मुलगी खुपसण्याची तिची बळकत इच्छा होती. कांहीं झालें तरी अक्काचें मजवर अकृत्रिम प्रेम होतें ह्यांत संशय नाहीं. अशांत माझी मराठी शाळेंतली तिसरी इयत्ता पास होऊन मी चौथींत गेलों, तेव्हां अक्काच्या आनंदाला आणि गर्वाला सीमाच नाहींशी झाली. तिनें लागलीच छोटुसिंगास साखर वाटली. बिचारी अक्का ! पुढें मी बी.ए.झालों, विलायतेला जाऊन आलों, हें पाहण्यास ती राहाती तर तिनें काय केलें असतें !
अक्काचें मजवर इतकें प्रेम होतें, तरी मी कांहीं फारसा तिचेकडे जात नसें. कारण मी तिकडे गेलों कीं, ''धोंडीचा नवरा आला'' असा गलबला त्या आळींतील पोरें आणि थोरेंही करीत. तें ऐकणें मला आवडत नसे. तरी मुख्य सणाचे प्रसंगीं जावें लागत असे. दसर्याचे दिवशीं सोनें वांटावयाला. संक्रांतीचे दिवशीं तिळगूळ द्यावयाला जाणें भागच होतें. दसर्याचे दिवशीं गेलों म्हणजे अक्काच्या देव्हार्यावरच्या सार्या कडाकण्या मी खाऊन फस्त करीत असें. ती तर मी केव्हां येऊन त्या खाईन ह्याची वाटच पाहात बसे.
माझा हट्ट : एकदां अक्का कोंकटणूरच्या यल्लामाच्या यात्रेला निघाली होती. त्या वेळीं मी फार तर ४।५ वर्षांचा असेन. अक्का आमचे घरीं निरोप घ्यावयाला आली होती. ती जाऊं लागली तेव्हां तिचेबरोबर यात्रेला जाण्याचा मीं हट्ट घेतला. कांहीं केल्या हा हट्ट मी सोडीना. बाहेर रस्त्यापर्यंत मी रडत तिचे मागें लागलों. तिनें मला उचलून खांद्यावर घेतलें व परत घरीं आणून ती मला सोडूं लागली. त्या वेळीं मी इतका अनावर झालों कीं, खांद्यावर बसल्या बसल्या मीं मोठ्या आवेशानें पाय झाडला, तो तिच्या पुढच्या दांतांला लागून वरचे दोन्ही दांत तात्काळ पडले आणि अक्काचें तोंड रक्तबंबाळ झालें. तरी बिचारीला राग आला नाहीं. उलट ही गोष्ट बाबांना न कळूं देण्याची खबरदारी घेण्याविषयीं तिनें आईची गयावया केली.