हिमाचल-निवास
कर्सिऑंग : दार्जिलिंगहून रा. ब. शरच्चंद्र दास मला घेण्यास स्टेशनवर आले होते. स्टेशनजवळच ब्राह्ममंदिरांत माझी उतरण्याची सोय केली होती. बाबू हेमचंद्र सरकार यांची पत्नी लावण्यप्रेमी बोस (माहेरचें नांव), ही (प्रसिद्ध शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांची बहीण) हिचें हें घर होतें. हें तिच्या मागें सुमारें रु. १४००० किंमतीचें घर बाबू हेमचंद्रांनीं कर्सिऑंग येथील ब्राह्म समाजास दिलें आहे. येथून खालीं खोल दरीचा देखावा फारच सुंदर दिसतो. टीस्टा नदीचा आणि आमच्या पायांखालील मेघांचा विलास चांगला दिसतो. तिसरे प्रहरीं बाबू हेमचंद्र व त्यांची मानसकन्या शकुंतला हीं आलीं. ता. १५ ऑक्टोबरला इंग्लंडचे पाहुणे डॉ. ड्रमंड दार्जिलिंगहून आले. त्यांच्या व्याख्यानास २०।२५ माणसेंच हजर होतीं. घरें लांब व वस्ती उपरी म्हणून ही अवस्था !
घूम : माझी गाडी सायंकाळीं ५ वाजतां घूम स्टेशनवर आली. हें जगांतील अतिशय उंचीवरचें म्हणजे ७४०७ फूट उंचीवरचें आगगाडीचें स्टेशन होय धुक्यानें दिशा धुंद झाल्या होत्या. कडाक्याची थंडी पडली होती. ५॥ वाजतां दार्जिलिंगला पोचलों. देवदाराच्या झिपर्या झाडांनीं भरलेला तो प्रशांत गंभीर देखावा मी कधीं विसरणार नाहीं !
दार्जिलिंग ब्राह्म समाज : ता. १६ ऑक्टोबर. काल संध्याकाळीं रा. सा. शरच्चंद्र दास ह्यांचे घरीं पाहुणा झालों. यजमानीण व मुलेंमुली फार अगत्यशील होती. रायसाहेब बाहेरगांवीं गेले होते. आज सकाळीं ब्राह्म समाजांत पहिली उपासना मीं चालवली.
दार्जिलिंग हा गांव बंगाली श्रीमंत आळशांचा व खुशालचंदांचा आहे. गव्हर्नराचें व इतर श्रीमंतांचे हें उन्हाळ्यांतील हवा खाण्याचें स्थळ आहे. अर्थात् श्रीमंत ब्राह्मो समाजिस्ट येथें ऐटदार घरें करून राहतात. ज्ञान, भक्ति व कर्म हीं तीन्हीं ब्राह्म समाजांत पाणी भरीत आहेत, हें सर्व खरें; पण मोक्षाची गोष्ट निराळी. मोक्षधर्म पाहावयाचा असल्यास तो कोठें तरी बाहेरच पाहावयास पाहिजे. निदान तो दार्जिलिंगमध्यें तरी दुर्मिळ ! पाश्चात्य आसुरी संस्कृतीनें येथें हिमालय विटाळलेला आहे. केरळकन्येनें मच्छिंद्रनाथांस योगभ्रष्ट केलें, मेनकेनें विश्वामित्रांस तपोभ्रष्ट केलें तसें येथें पाश्चात्य सुधारणेनें हिमालयास भ्रष्ट केल्याचा भास होत आहे.
ता. १८ स तिसरे प्रहरीं टाउन हॉलमध्यें सामाजिक संमेलन झालें. सुमारें १०० निवडक स्त्रीपुरुष जमले होते. बनारसहून आलेले बाबू दुर्गाप्रसाद, ऑनररी मॅजिस्ट्रेट ह्यांची व ह्यांच्या पत्नीची ओळख झाली. ह्या दंपतीनें मला बनारस शहरीं येण्याचा फार आग्रह केला. ता. १९ ला मी, हेमचंद्र व त्यांची कन्या शकुंतला पुन्हां कर्सिऑंगला आलों. येथें सुमारें एक आठवडा विश्रांति निरीक्षण व चिंतन यांत घालवला.
कांचनगंगा : २१ रविवारीं भल्या पहाटे उठून चिमनी नांवाच्या गांवाजवळील घांटशिळेवरून कांचनगंगा सूर्योदयाचे वेळीं पाहण्याचा माझा निश्चय होता. पण रात्रभर पाऊस आल्यानें निराशा झाली. दार्जिलिंगमध्येंही कांचनगंगेनें ढगाच्या मागें लपून माझी बरीच निराशा केली होती. माझे पंजाबी मित्र डॉ. बालमुकुंद ह्यांना बरोबर घेऊन टेकडीखालीं सुमारें १००० फूट खालीं उतरून बाबू सुशांत हलधर यांचे शेत व वाडी पाहण्यास गेलों. वाटेनें उतरणीवरचे चहाचे मळे अति सुंदर दिसले. बाजारचा दिवस असल्यामुळें नेपाळी व भूतानी स्त्रिया पाठीवर बांबूच्या टोपल्यांत आपलीं मुलें घेऊन येतांना दिसल्या. त्यांचा पोषाक दुर्गापूजेच्या (नवरात्र) सणानिमित्त नवा होता व अंगावर दागिनेही होते. बाबूंनीं आपल्या देशांत फिरून मलबेरी, आंबे, जांभूळ, पीच, पेरू, वांगीं, हीं झाडें व कोंबडीं, बदकें वगैरे प्राणी दाखवले.
ता. २२ रोजीं सकाळीं ३॥ वाजतां उठून मी व डॉ. बालमुकुंद चिमनी शिखराकडे सूर्योदयाचे वेळीं कांचनगंगेचें दर्शन घेण्यासाठीं निघालों. सूर्योदयाचे वेळचीं लाल किरणें कांचनगंगेच्या शुभ्र बर्फावर पडल्यानें त्या प्रकाशाचें परिवर्तन होऊन कांचेच्या झुंबरांतून पाहिल्याप्रमाणें लाल, निळा, हिरवा, वगैरे रंगांचीं बहार मोठी नयनमनोहर दिसते. हा देखावा क्वचितच पाहण्यास मिळतो म्हणून ह्यासाठीं पुष्कळ प्रयत्न करावा लागतो. पाहणारा आणि कांचनगंगा ह्यांच्यामध्यें ढग आल्यानें पुष्कळ वेळां निराशा होते. हें अपूर्व दर्शन घेण्यासाठीं उत्तम ठिकाण म्हणजे घूम ह्या उंच स्टेशन जवळील उंच शिखरावरचें. एकदां एक फ्रेंच रसिक ह्या शिखरावर गेला आणि त्याला एक अपूर्व लाभ घडला. त्याचा कॅमेरा होता; पण ह्या दर्शनामध्यें तो इतका तल्लीन होऊन गेला कीं, त्यानें हातांतील कॅमेरा खालीं फेकून दिला. कारण, अशा सुंदर दृश्याचा फोटो घेण्यांत वेळ दवडण्यापेक्षां त्याकडे पाहणेंच त्याला अधिक श्रेयस्कर वाटलें. डांवटेकडीचे शिखराजवळ चिमनी हें खेडें सुमारें ६५० फूट उंचीवर आहे. हें खेडें कर्सिऑंगपासून सुमारें पांच मैलांवर आहे. येथेंच महानदी उगम पावून खालील सुंदर दरींतून वाहात जाते. बरोबर सकाळीं सव्वासहा वाजतां टेकडीवर पोचलों. सूर्योदय होतांना आम्हीं नुकताच पाहिला. पण कांचनगंगेच्या बाजूनें पुष्कळ ढग दिसले. आम्हीं प्रथम प्रार्थना केली. नंतर उपाहार केला. थकवा मुळींच वाटला नाहीं. गुलाबी थंडी होती. टेकडीच्या शिखरावर २ इंच जाडीचा मऊ गवताचा रंगीबेरंगी गालिचा पसरलेला होता. दंवानें तो चिंब भिजला होता. मी प्रार्थना करीत असतां दोन तीन जळवा पायांवर चढून तेथेंच रक्तशोषण करीत होत्या.
केशवचंद्र सेनांची कन्या : ब्रह्मानंद केशवचंद्र सेन ह्यांची द्वितीय कन्या सुनीतादेवी कर्सिऑंग येथें राहात होती. हिचा पति कुमार गजेंद्रनारायण हा कुचबिहारच्या महाराजा (जो केशवचंद्र सेनांचा जांवई) चा भाऊ होता. सुमारें २३ वर्षांपूर्वी मी कुचबिहारला गेलों असतां माझी त्यांची चांगली ओळख झाली होती. ही बाई व तिची विधवा मुलगी मला आज १० वाजतां ब्राह्ममंदिरांत भेटावयास आल्या. बडोद्याच्या इंदिराराजा ह्यांनीं त्यांना छळून दोघींना कुचबिहारांतून बाहेर घातलें व ब्राह्म समाजाचीही धूळधाण उडवली अशी त्यांनीं माझ्यापुढें तक्रार केली. मायलेकींचा गंभीर चेहरा व शुभ्र पोषाख पाहून मला धन्यता वाटली. कन्येचा नवरा कॅप्टन मुकर्जी हा कुतुल अमायराच्या वेढ्यांत मारला गेला होता. तीही सुशिक्षित व बोलून चालून चांगली दिसली. मी मिशनरी म्हणून त्यांनीं जातांना फुलें देऊन माझा सत्कार केला. ता. २५ गुरुवारीं दोन प्रहरीं कर्सिऑंग सोडून, सिलिगुरी व पार्वतीपूर वगैरे करून ता. २६ सकाळीं बरौनी जंक्शनवर आलों. सोनापुराहून गंगा उतरून बांकीपुरास जाण्यास रात्र झाली म्हणून मोकामी घाटास पोचलों. दोन प्रहरीं मोकामीपासून पाटणा जंक्शन (बांकीपूर) कडे गेलों.
पाटणा : ई. आय. रेल्वेवरून गंगातटाचा देखावा फारच नयनमनोहर दिसला. गंगेचें महत्त्व भारतदेशास किती आहे हें तिच्या सुजल सुफल तटाकावरून फिरल्याशिवाय दिसत नाहीं. ज्वारी, बाजरीची लागवड येथें होऊं लागलेली पाहनू आश्चर्य वाटलें. ज्वारीचीं धाटें १५।१६ फूट उंच, तूर ७।८ फूट उंच पाहिली. बिहारांत तांदळाची व गव्हाची लागवड मिळूनच आहे. मिरची, तंबाखू, एरंड त्याचप्रमाणें शिसवी, आंबा, वड वगैरे झाडांवरून बंगालचा देखावा मागें पडला व बिहारचें साम्राज्य सुरू झाल्याचें दिसलें. सायंकाळीं ६ वाजतां बांकीपूर येथील राममोहन रायांच्या सेमिनरीमध्यें (शाळेंत) उतरलों.
बुद्ध गया : ता. २९ व ३० हे दोन दिवस गया येथें काढून ३१ ऑक्टोबरला सकाळीं बुद्ध गयेला गेलों. गयेच्या दक्षिणेस ७ मैलांवर प्रयांग आहे. उद्यां येथें गव्हर्नर येणार म्हणून कमानी-मंडपाची तयारी चालली होती. मागें २० वर्षांपूर्वी मीं पाहिला होता त्यापेखां बराच भाग उकरून पुष्कळच लहानमोठे स्तूप मोकळे केलेले दिसत आहेत. मुख्य मंदिर भव्य, भरभक्कम व पूर्वाभिमुखी आहे. पश्चिम भागीं एक सुंदर धर्मशाळेची प्राचीन दुमजली इमारत आहे. ती भिक्षु अनागरिक धर्मपालाच्या परिश्रमानें बांधली गेली आहे. तिबेट-चीनमधील बरेच भिक्षु वरच्या मजल्यांत असतात.
विष्णुपद : परत येतांना विष्णुपदमंदिर फल्गु नदीचे कांठावर, उंच टेकडीवर काळ्या दगडाचें आहे, तें पाहिलें. फल्गु नदी बुद्ध गयेहून येते. तिला समांतरच रस्ता आहे. विष्णुमंदिर इतर देवळांप्रमाणेंच बेशिस्त व घाणेरडें आहे. देऊळ पुष्कळसे पैसे खर्च करून बांधलें आहे तरी तें बेढब आहे. ओरिसांतील भुवनेश्वराच्या देवळाप्रमाणें येथें कलाकुसरी मुळींच नाहीं. पिंडदान व श्राद्धविधीचा गोंधळ व भिकार्यांची गर्दी बरीच दिसली.
काशी : १ नोव्हेंबरला सकाळीं गयेहून काशीकडे निघालों. १० वाजतां बनारस येथें बाबू दुर्गाप्रसाद ऑनररी मॅजिस्ट्रेट यांचेकडे उतरलों. ह्यांची ओळख दार्जिलिंगला झाली होती. त्यांनीं मोठ्या प्रेमळपणें स्वागत केलें.
बनारस हिंदु युनिव्हर्सिटी : ता. २ नाव्हेंबरला हिंदु युनिव्हर्सिटीची विस्तीर्ण जागा पाहिली. २ मैल लांब व १ मैल रुंद असें क्षेत्रफळ आहे. गंगा नदीच्या कांठीं ही बरीच मौल्यवान् जागा मिळाली आहे. सुमारें १॥ हजार विद्यार्थ्यांपैकीं ७५० वर विद्यार्थी येथें बोर्डिंगांत राहतात. सर्व हिंदुस्थानांतून व दक्षिण आफ्रिकेंतून विद्यार्थी व प्रोफेसर येतात. तरी पण पौरस्त्य लक्षणें येथें दिसत नसून सर्व आत्मा आधुनिक पाश्चात्य थाटावर आहे हें पाहून निराशा होते. इमारतीचा थाट हिंदु-जैन तर्हेचा आहे. विविधता किंवा कल्पकता दिसत नाहीं.
सायंकाळीं ६ वाजतां दुर्गाप्रसादांचे घरीं ब्रह्मोपासना झाली. थोडेच लोक हजर होते. ता.३ नोव्हेंबरला एक स्पेशल बोट दशाश्वमेध घाटावर करून दक्षिणेकडे हरिश्चंद्र घाट, अहिल्याबाईची घाट वगैरे प्रेक्षणीय स्थळें पाहिलीं. स्मशानाच्या घाटास हरिश्चंद्र घाट हें नांव आहे. पहारा करण्यास हरिश्चंद्र बसत होता ती देवडी अद्याप दाखवतात. जेथे ज्या डोंबाची नोकरी हरिश्चंद्र करीत होता त्याची मोठी हवेली व घाट इतर राजेरजवाड्यांच्या हवेलीसारखीच आहे, हें पाहून आश्चर्य वाटते. बोट सोडल्यावर विश्वेश्वराचे देवळांत गेलों. रसते फारच अरुंद. ४।५ फुटांचे. दोन्ही बाजूंनीं तीन चार मजली उंच हवेल्या. त्यांत माणसांची व गुरांची खेंचाखेंची ! त्यांतच बनारशी रेशमी वस्त्रांचीं व पितळी सामानाचीं दुकानें अशी गचडी लागून गेली होती. मोठमोठ्या अन्नछत्रांचे दारांत शेंकाडों अतिथि, अभ्यागत, बैरागी, अनाथ, विधवा, विद्यार्थी जेवणाची वाट पहात बसलेले दिसले. प्रत्येक छत्रांत ४।५ शें लोकांस १०॥ वाजतां अन्न मिळतें. महिन्यांतून तीन वेळांपेक्षां हें दान मिळत नाहीं. डाळ भात, भाज्या, दूध, दहीं भरपूर मिळतें. रस्त्यांत भिक्षेकरी, यात्रेकरी व गिन्हाईक यांची खेंचाखेंच होते. गंगास्नान करून, विश्वेश्वराचें दर्शन घेऊन परत चाललेली गोषांतील सुंदर स्त्री अथवा वृद्ध ब्राह्मण त्यांना धक्का देऊन जाणारी एखादी भंगीण, पूजेचें सामान घेऊन कोणी जातो तर त्याचे समोर एक बंगाली बाई एक भला मोठा मासा भाजीसाठीं घेऊन येते. मधूनच एखादा महारोगी शिरतो. पंजाबी, गुजराथी, तेलंगी, बंगाली, ह्यांचा रंगीबेरंगी देखावा व त्यांच्या भाषेचा हार्मोनियम नेत्रांना व कर्णांना सुखावह वाटतात.
ता.५ ला मी अलाहाबादला गेलों. तेथें ब्राह्म समाज नसल्यानें कांहीं काम झालें नाहीं. ता. ७ रोजीं मुंबईला आलों. आणि ता. ८ ला पुण्यास पोचलों. अशा प्रकारें हा तीन महिन्यांचा दगदगीचा प्रवास संपला. ता. १४ नोव्हेंबरला भाऊबीज होती. भगिनी जनाबईचा आज ५१ वा वाढदिवस होता. ह्यासाठीं मी माझ्या प्रवासाचा प्रांत सोडून घाईघाईनें पुण्यास आलों होतों. हा वाढदिवस घरांतच उपासना चालवून शांतपणें साजरा केला.
एक नमुनेदार विवाह : ता. २३ जून (ज्येष्ठ व॥१) १९२९ रोजीं माझे ज्येष्ठ चि. प्रतापराव ह्यांचे लग्न झालें. वधू बडोद्याच्या गायकवाड घराण्यांतील पदच्युत राजे मल्हारराव ह्यांचें पुत्र गणपतराव यांची कन्या कुमारी अनसूयाबाई (सासरचें नांव सौ. लक्ष्मीबाई) ही होती. ब्राह्म विवाहपद्धतीनें सर्व विधि श्रीशिवाजी हायस्कूलचे प्रिन्सिपॉल रा. बाबूराव जगताप यांनीं चालवला. सत्यशोधक समाजाचे पुरोहित डुंबरे ह्या बंधुद्वयानें श्री. बाबुराव जगताप यांची साथ केली. वडेकर लायब्ररी हॉलमध्यें ९ वाजतां वधूचें पुण्याहवाचन झालें. मुख्य इमारतींतील दुसर्या मजल्यावरील प्रशस्त ड्राईंग हॉलमध्यें मध्यभागीं शुभ्र जाईच्या फुलांचा सुंदर विवाहकुंभ तयार केला होता. अंतरपाटाचे पलीकडे वधू हातीं माला धरून उभी राहिल्याबरोबर सर्व प्रचंड प्रेक्षक समुदाय अक्षता घेऊन उभा राहिला. मंगलाष्टकांची अहमहमिका सुरू झाली. पाणिग्रहणानंतर सप्तपदी झाली. दोनप्रहरीं १२ पासून तिसरे प्रहरीं ४ पर्यंत भोजनाचा रमणा झाला. त्यांत स्पृश्यास्पृश्यतेचें कोणाला स्मरणही नव्हतें. हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती, स्पृश्य अस्पृश्य व इतर अशाच मानीव भेदांचा अभेद झाला होता. ह्या समारंभाचा समाजावर फार चांगला परिणाम झाला. पुढें कित्येक विवाह ह्याच नमुन्यावर घडून आले. ह्या समारंभांत माझे मित्र श्री. बाबूराव जेधे ह्यांनीं फार परिश्रम घेऊन आपलेपणानें मदत केली.