इमारतींची योजना
याच सुमारास युरोपांतील महायुद्ध नुकतेंच संपलें होतें. सर्व जगाला हायसें वाटलें. ह्याच वेळीं आमच्या मिशनच्या विस्ताराचें कामही तूर्त पूर्ण झालें होतें. सबंध दक्षिण हिंदुस्थान व उत्तरेकडे काठेवाडपर्यंत पश्चिम हिंदुस्थानाइतक्या प्रदेशांत मिशनच्या मध्यवर्ती मातृसंस्थेच्या नजरेखालीं घटनेची तयारी पूर्ण झाली होती. पूर्वेकडील बंगाल्यांत ब्राह्म समाजाच्या सत्तेखालीं आणि मध्यसंयुक्त प्रांतीं व पश्चिमेकडे आर्यसमाजाच्या नजरेखालीं या वर्गाच्या कल्याणासाठीं ठिकठिकाणीं कामें चालू होतीं. १९०८ सालीं मी कलकत्त्याला गेलों असतां साधारण ब्राह्म समाजाचे पुढारी पं. शिवनाथशास्त्री यांनीं साधारण ब्राह्म समाजाच्या मुख्य मंदिरांत अस्पृश्यतेच्या प्रश्नावर माझें एक खास व्याख्यान करविलें. त्यांत मीं बंगाल्यांत ब्राह्म समाजानें हें काम सुरू करावें अशी निकराची सूचना केली. तिचा स्वीकार करून १९०९ सालीं बंगाल डिप्रेस्ड क्लासेस मिशनची संस्थापना वरील शास्त्रीमहाशयांनीं केली. ह्यापुढें मोर्ले-मिंटो सुधारणेचें प्रस्थान हिंदुस्थानांत सुरू झालें. त्या धुमश्चक्रींत हिंदुस्थानांतील लहानमोठ्या सर्व जातींतून राजकारणाचा धुमाकूळ माजला. त्याचा शेक ह्या मिशनलाही बसला. पुणें येथील अहल्याश्रमाच्या इमारतीच्या कामांतून ह्या राजकारणी वादाचा आरंभ कसा झाला तें सांगण्याचें क्लेशकारक काम माझ्या भागास कसें आलें तें आतां सांगतों.
मद्रासहून पुण्यास परत आल्यावर महायुद्धामुळें तहकूब झालेलें इमारतीचें दगदगीचें काम मीं पुन्हां हातीं घेतलें. या इमारतीचा नकाशा मुंबईंतील पाटकर, शहा आणि कंपनीकडून आणि खर्चाचें अंदाजपत्रक अमृतलाल व्ही. ठक्कर या मित्राकडून मोफत करून घेण्यांत आलें. एकंदर खर्चाचा अंदाज एक लाख रुपयांवर गेला. खालील ६ इमारतींचे नकाशे तयार झाले.
गट १ ला : (१) सुपरिंटेंडिंग मिशनरींची राहण्याची जागा, (२) विद्यार्थी वसतिगृहें, (३) स्नानगृहें वगैरे.
गट २ रा : (१) मध्यवर्ती इंग्रजी मराठी शाळा, (२) उद्योगशाळा, (३) स्नानगृहें वगैरे.
एवढ्या इमारतींसाठीं वर सांगितलेल्या ४० हजार रुपयांचें जें आश्वासन मिळालें होतें तें अगदीं अपुरें होतें. म्हणून विद्याखात्याला अधिक मागणीचा दुसरा अर्ज पुन्हां करण्यांत आला. त्या वेळीं लॉर्ड विलिंग्डन गव्हर्नर होते. त्यांच्याच सहानुभूतीमुळें विद्याखात्यानें आणखी ६५,००० रु. ची ग्रँट, वरील २०,००० रु. शिवाय मंजूर केली. परंतु नुकतेंच महायुद्ध झालें असल्यामुळें सरकारला चोहोंकडेच काटकसरीची कातर लावावी लागली. त्यामुळें रोख मदत मिळण्याला अडचण येऊन इमारतीचें काम कांहीं दिवस तहकूब ठेवावें लागलें. मध्यंतरी नवीनच एक आपत्ति आली. होळकर सरकारनें दिलेली २०,००० रु. ची मदत सरकारी प्रॉमिसरीच्या नोटांत गुंतून पडली होती. महायुद्धामुळें या नोटांची किंमत भयंकर खालीं आली होती. ह्या नोटा लवकर विकून रोख पैसे न घेतल्यास नोटांची किंमत अधिक उतरेल अशी धास्ती पडली. नोटा विकून रोख रु. २०,००० चे ऐवजीं १३,००० रु. च हातीं आले. येणेंप्रमाणें ७,००० रु. ची खोट मिशनला बसली. ही गोष्ट सरकारच्या नजरेस आणण्यांत आली. ह्यांतील थोडीबहुत तरी रक्कम मिळावी म्हणून पुन्हां अर्ज करण्यांत आला. तेव्हां अधिक २००० रु. चें आश्वासन मिळालें. सुधारलेल्या कौन्सिलांत मिशनचे मित्र डॉ. र. पु. परांजपे हे शिक्षणमंत्री झाल्यावर वरील सुमारें ८०००० रु. रोख मिळाले आणि जवळजवळ १० वर्षे खोळंबून राहिलेलें हें इमारतीचें काम १९२२ च्या सुमारास संपूर्ण झालें. इमारती बांधण्याचे कामीं सुपरिंटेंडिंग इंजिनियर रा. ब. वर्तक ह्यांच्या अनुभवाचा फायदा मिळाला. रा. ब. वर्तक, नामदार बी. एस. कामत, रा. दादासाहेब ठकार वकील, प्रो. डी. एल. सहस्त्रबुद्धे, खजीनदार व वि. रा. शिंदे, सेक्रेटरी यांची स्वतंत्र इमारत-कमिटी नेमण्यांत आली. इमारतीचें काँट्रेक्ट रा. पंढरीनाथ नाईक यांचेकडे देण्यांत आलें. पाया खणण्याच्या कामीं वगैरे पुणें प्रा. समाजाचे सभासद रा. टी. डी. नाईक इंजिनियर आणि इतर बर्याच मित्रांची बरीच मदत झाली. रा. गोडबोले ह्यांस वेतन देऊन सुपरवायझिंग इंजिनियर नेमलें. पहिल्या गटाच्या तीन इमारतीचें काम मिशनच्या जागेंतील पूर्व भागामध्यें आंखल्याप्रमाणें १९२० मार्चमध्यें संपूर्ण झालें !
मिशनची शाळा प्रथम लष्करांतील कनॉट मार्केटसमोर २००८ नं. च्या बंगल्यांत व नंतर साचापीर स्ट्रीटमध्यें व त्यानंतर लष्करमधील ताबूत स्ट्रीटमध्यें अशी वेळोवेळीं बदलावी लागली होती. जागा अपुरी झाल्यामुळें कामांत फारच व्यत्यय येत होता. म्हणून पहिल्या गटाचा प्रवेशसमारंभ वेळ नसल्यानें न करतां घाईघाईनें चैत्री प्रतिपदेच्या मुहूर्तावर भोकरवाडीजवळील मिशनच्या स्वतःच्या इमारतींत पुणें शाखेच्या मध्यवर्ती शाळा नेण्यांत आल्या. इमारत बांधण्याचें काम तसेंच चालू होतें. काँट्रॅक्टरचें सामानसुमान अस्ताव्यस्त पडलें होतें. संभोवतालच्या पटांगणांत भोकरवाडीची घाण पसलेली तशीच होती. अशा घाईंत माझ्या घरीं दोन कौटुंबिक आपत्ति घडून आल्या.
तान्याक्काचा मृत्यु : याच सुमारास माझी धाकटी बहीण चि. तान्याक्का तापानें फार अत्यवस्थ होती. आम्ही या वेळीं ताबूत स्ट्रीटमध्यें मिशनच्या शाळेंत राहात होतों. शेवटीं ता. ३ जाने. १९२० रोजीं पहाटे चि. तान्याक्का वारल्या. गांवांत आणि लष्करांत ही बातमी पसरल्यावर स्मशानयात्रेस सर्व जातींच्या लहानथोर माणसांचे थवेच्या थवे जमू लागले. ब्राह्मण, मराठे, ख्रिस्ती, मुसलमान व ओळखीचे पारशी देखील आले. अस्पृश्यांची तर गर्दीच लोटली. भजनी मंडळ्यांचें भजन सुरू झालें. प्रेतास खांदा कुणीं द्यावा हा प्रश्न निघाला. मीं स्पष्ट सांगितलें कीं, ''ही बहीण माझीच नव्हे तर सर्वांची आहे. हिनें अखेरपर्यंत महारामांगांची सेवा केली आहे. म्हणून आपण कृतज्ञपणानें इतके जमले आहांत. ज्याच्या मनांत असेल त्यानें निःशंकपणें प्रेतास खांदा द्यावा.'' लोक भराभर आळीपाळीनें खांदा देऊं लागले. लष्करांतून बुधवा पेठेंत येईपर्यंत रस्त्यांतून अनावर गर्दी जमली. बुधवार चौकांत प्रेत आल्यावर शेठ त्रिकमदास यांना माझी बहीण वारल्याचें कळलें. हे गृहस्थ राष्ट्रीय वृत्तीचे, पण सामाजिक बाबतींत फार जुन्या मताचे होते. म्युनिसिपालिटींत अस्पृश्यवर्गाची नेमणूक झाल्यानें ते माझ्यावर फार नाराज होते. म्युनिसिपालिटीचे मेंबर असूनही ते कित्येक महिने हजर राहात नसत. माझ्या राष्ट्रीयत्वाबद्दल त्यांना मोठा अभिमान वाटत असे. माझी बहीण वारल्याचें कळतांच त्रिमकदास शेठजी आपल्या गाडींत बसून प्रेत स्मशानांत पोंचण्यापूर्वी तेथें जाऊन उभे राहिले. प्रेताला ते सामोरे आलेले पाहून मला शंका वाटूं लागली कीं, लकडी पुलावरील स्मशानांत प्रेत जाण्याला ते मनाई करतील. कारण ते स्मशानभूमीचे एक प्रमुख ट्रस्टी होते. माझ्या समोर येऊन ते म्हणाले, ''श्री. शिंदे यांची बहीण ती माझी बहीण. तिचें प्रेत जाळण्यास कोणी कदचित् हरकत घेतील; पण तसें न व्हावें. सर्व विधि यथास्थित झालेला पाहावा, म्हणून मी येथें मुद्दाम आलों आहें.'' शेठजींची ही दिलदार सहानुभूति पाहून सर्वांना आश्चर्य वाटलें. माझी चिंता दूर झाली.
चिमुकला बळी : पुढें लवकरच मिशनच्या शाळा भोकरवाडींतील नवीन इमारतींत गेल्या. मिशनर्यांची राहण्याची जागा आणि वसतिगृह या इमारती कशाबशा पूर्ण झाल्या होत्या. पण भिंती आणि गिलावा नीट सुकलेला नव्हता. फरसबंदीचें काम, दारेंखिडक्या लावण्याचें काम घाईनें चाललें होतें. नाइलाजानें अशा ओल्या स्थितींतच जाऊन रहावें लागलें. भोंवतालीं साफसफाई अद्याप व्हावयाची होती. माझी ४ वर्षांची एकुलती एक धाकटी मुलगी होती. ती दिसण्यांत सुंदर असून माझी फार लाडकी होती. दिवसभर उन्हांत इकडे तिकडे हिंडून, ओल्या इमारतींत राहून तिची प्रकृति बिघडली. तिला मेनिनजायटिस् नांवाचा मेंदूचा विकास जडल्याचें आढळून आलें. सतत एक महिना मांडीवर घेऊन मला तिची अहोरात्र शुश्रूषा करावी लागली. वास्तुशांति न करतां आम्ही येऊन राहिलों, म्हणून ही बाधा झाली, असें भेटीला आलेल्या कांहीं अशिक्षित बायका म्हणूं लागल्या. कांहीं उतारे सुचवूं लागल्या. अर्थात् अशा गोष्टींवर आमचा विश्वास बसेना. भोंवतालच्या दूषित स्थितीवरूनच आजार आला होता हेंच खरें कारण. शेवटीं ६ जून १९२० रोजीं हा चिमुकला जीव कालवश झाला. अशा रीतीनें घरचा बळी देऊन वास्तुशांति झाली, म्हणून माझी जुन्या वळणाची पत्नी शोक करूं लागली. ही लहान मुलगी इमारतीचें बांधकाम करणार्या अस्पृश्य मजुरांमध्यें खेळीमेळीनें हिंडत असल्यानें त्या सर्वांना फाय प्रिय असे. कोणी मिशन पाहण्यास आल्यास ती त्यांचेशीं चुरुचुरु बोले. सुपरिंटेंडेंट जनाक्काची तर ती फार लाडकी होती.