निधीची योजना
निधीची टंचाई : मिशनच्या सुरुवातीस निराश्रित सेवासदन चालू करण्यासाठीं दरमहा १०० रु. ची देणगी दयाराम गिडुमल यांनीं दिली हें मागें सांगितलेंच आहे. ही देणगी तीन वर्षांसाठींच होती. ह्या तीन वर्षांत मिशनची बरीच वाढ झाली; पण १९१० च्या जूनअखेर ही वर्गणी बंद झाली. काम वाढलें पण मदत नाहीं, अशी पंचाईत पडली. गरिबांचीं लग्नें करण्यांत लोक मोठा परोपकार समजतात; पण लग्नामुळें संसाराचा पसारा होऊन गरिबांचे फार हाल होतात. तसाच ह्या मिशनचा प्रकार झाला. निराश्रित सेवासदन बंद पडल्यामुळें त्यांतील कार्यकर्त्यांची इतर कामांकडे वांटणी करण्यांत आली. श्रीमती वेणूबाईस पुण्याच्या शाखेंत पाठविलें. भगिनी जनाबाईस प्रचारकार्यासाठीं बरोबर नेण्यांत आलें. भगिनी तान्याबाईस परळच्या शाळेंत शिक्षकीण म्हणून ठेवण्यांत आलें. सय्यद अबदुल कादर यांस बाहेरच्या शाखांची पूर्वतयारी करण्यांस पाठविण्यांत आलें. पण ह्या सर्व कामांस निधीची फार जरूर लागली. ती पुरेशी न मिळाल्यानें जनाबाईला जें अल्पवेतन होतें तेंही बंद करण्यांत आलें. शिक्षकिणीची कायमची नोकरी सोडून त्या मिशनमध्यें आल्या होत्या; पण आतां त्यांचें काम मात्र फार वाढलें होतें आणि अल्पवेतनही बंद झालें. त्यामुळें मोठी खाजगी आपत्ति ओढवली. सय्यद अबदुल कादर व इतर कार्यकर्ते ह्यांचीं वेतनें बंद करणें शक्य व इष्ट नव्हतें; म्हणून आम्ही रुपीफंड, तांदूळ फंड, कपडे फंड, पेटी फंड इत्यादि युक्तया काढून भुकेच्या वेदना कशाबशा शमवू लागलों. पुण्यास ना. गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क ह्यांच्या कन्येनें जलसा करून जी शिल्लक उरली त्यांत थोड्यां रकमेची भर घालून ५००० रु. ची रक्कम मुंबईतील ट्रस्टीकडे पाठविण्यांत आली. पण तो कायम निधि म्हणून राखून ठेवण्यांत आल्यानें चालू खर्चास त्याचा उपयोग करतां येईना.
संस्थापनेचा दिनसमारंभ : ता. १८ ऑक्टोबर १९०९ रोजीं मिशनच्या संस्थापनेचा दिवस साजरा करण्यासाठीं आणि शाळांतील मुलांचा बक्षीससमारंभ करण्यासाठीं मुंबईच्या टाऊन हॉलमध्यें एक अपूर्व जाहीर सभा भरविण्यांत आली. तिचें अध्यक्षस्थान श्रीमंत सर सयाजीराव यांनीं मंडित केलें. त्या वेळीं मिशनचे अध्यक्ष चंदावरकर, नामदार जी. के. गोखले, मि. विमा दलाल, बडोद्याचे पं. आत्माराम ह्यांचीं भाषणें झालीं. गांवांतील प्रमुख स्त्री-पुरुषांनीं प्रशस्त टाऊन हॉल चिक्कार भरला होता. महाराजांनीं आपलें अध्यक्षीय भाषण संपवून आपली २००० रु. ची देणगी देऊं केली. सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ति या नांवानें तिचा उल्लेख करण्यांत आला. मिशनचे उपाध्यक्ष शेठ दामोदरदास सुखडवाला ह्यांनीं ५००० रु. ची देणगी दिली. मिशनच्या घटनेच्या नियमाप्रमाणें त्यांना आश्रयदाते करण्यांत आलें. ह्याप्रमाणें त्या मोठ्या रकमा कायम निधीकडे गेल्यामुळें चालू खर्चाची हळहळ उरलीच. समारंभास महिला समाजाच्या सभासद व इतर प्रतिष्ठित स्त्रिया हजर होत्या. त्यांपैकीं कांहीं चालू संधीचा फायदा घेऊन निधि जमविण्यास पुढें आल्या. टाऊन हॉलचे पुढचे तीन दरवाजे त्यांनीं रोखले. एकेका दरवाज्यांत दोघां दोघां भगिनींनीं आपली शाल पसरून त्या प्रचंड समुदायांतील बाहेर जाणार्या प्रत्येकास कांहीं तरी देणगी टाकण्याचा त्या आग्रह करूं लागल्या. या बाबतींत सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्यांनी पुढाकार घेतला होता. सारा जमाव जणुं काय कैद झाल्यासारखा देखावा दिसत होता; पण कोणीही तक्रार न करतां उलट या बायांचें कौतुक करून आपखुशीनें शालींत देणग्या टाकुं लागले. ह्या कैदेंत मुंबईचे पोलीस कमिशनर सांपडले होते. खिसे चांचपडल्यावर आपल्या खिशांत कांहीं न सांपडल्यामुळें कमिशनरसाहेब गयावया करूं लागले. लक्ष्मीबाईंनीं एक शिसपेन्सिल आणि कागदाचा तुकडा त्यांच्या हातं देऊन; ''झोळींत आंकडा टाका म्हणजे सुटका होईल, एरव्हीं नाहीं;'' असें सांगितलें. कमिशनरसाहेबांनीं दुसरे दिवशीं देणगीची रोकड सेक्रेटरीकडे पाठविली. तेव्हां, 'ही माझी खंडणी घेऊन माझी मुक्तता करा,' अशी त्यांनीं विनंती केली होती. देणगीचा आंकडा अशा प्रकारें बराच मोठा झाला होता.
तक्ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ह्या मिशनचा बोलबाला लवकरच हिंदुस्थानचे व्हाइसराय लॉर्ड हार्डिज व त्यांची पत्नी लेडी हार्डिज यांचे कानीं गेली. न मागतां लेडी हार्डिज यांनीं मोठ्या उदारपणें २००० रु. रोख पाठविले.
रुपीफंड : खर्चांत येणारी तूट भरून काढण्यास वेळावेळीं धडपड करूनही तूट भरून येईना; म्हणून डी. सी. एम. रुपीफंड नांवाची एक नवीन योजना १९११ च्या जुलै महिन्यांत आंखण्यांत आली. त्या फंडाच्या उभारणीसाठीं सुमारें दहा स्वयंसेवक व त्यावर एक कॅप्टन व असे दहा कॅप्टन अशी योजना करण्यांत आली. प्रत्येक स्वयंसेवकानें १ रुपया वर्गणी गोळा करून वर्षअखेर १०० रुपये जमवावेत.
फंडाच्या बोर्डावर खालील ६ कॅप्टन्स मिळाले. (१) सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्यांच्या हाताखालीं १५ स्वयंसेवक, (२) पी. बी.गोठस्कर ह्यांचे हाताखालीं १६ स्वयंसेवक, (३) अमृतलाल व्ही. ठक्कर - ११ स्वयंसेवक, (४) वि. रा. शिंदे- ११ स्वयंसेवक (५) सय्यद अबदुल कादर - १७ स्वयंसेवक, (६) एल. बी. नायक - १० स्वयंसेवक.
येणेप्रमाणें ८० स्वयंसेवकांनीं ३१ डिसेंबर १९११ रोजीं संपणार्या सहामाहीच्या आंत प्रत्येकीं १०० रु. जमविण्याचें पत्करलें. पण ऑगस्ट १२ पासून ३१ डिसेंबर १९११ च्या आंत ह्या स्वयंसेवकांनीं १४७१ रु. जमविले. आकांक्षित ४००० रु. च्या मानानें हा आंकडा फारच कमी झाला. बोर्डाची एक साधारण सभा आणि दोन सामाजिक मेळे ह्या सहामाहींत भरविण्यांत आले. स्वयंसेवकांचा परस्पर परिचय होऊन स्नेहसंबंध वाढण्याला ह्या सभांचा फार उपयोग झाला. मिशनला चालू सालीं १३१६ रु. १५ आ. १ पै तूट आलेली आहे आणि उत्पन्नाच्या बाबी निश्चित नसल्यामुळें पुढील सालीं अधिक तूट येणार, हें स्वयंसेवकांना पटवून देण्यांत आलें.
१९१२ सालच्या अखेरीस १२ महिन्यांत एकंदर १०१६ रु. जमा झाले. आकांक्षित ५००० रु. पेक्षां ही रक्कम फारच कमी होती. स्वयंसेवकांची संख्या ६० होती. विशेष लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट ही कीं, जनरल सेक्रेटरींची पत्नी सौ. रुक्मिणीबाई शिंदे ह्यांनीं स्वयंसेविका म्हणून एकंदर ५६० रु. जमविले. त्यांच्या कॅप्टन भगिनी जनाबाईंनीं ह्या कामीं सौ. रुक्मिणीबाईंना बरीच मदत केली होती. एकच रुपया जमविण्याच्या उद्देशांत तो देणार्या व्यक्तीचें हृदय असतें हीच भावना हा फंड जमवितांना होती. अशा दृष्टीनें पाहतां फंड जरी कमी झाला तरी सहानुभूतीनें वलय वाढलें, ही गोष्ट समाधानकारक होता.
तांदूळ फंड : निराश्रित सेवासदन या संस्थेंतून मिशनचें परळ येथें विद्यार्थीवसतिगृह निघालें होतें. जेवून राहणार्या विद्यार्थ्यांची संख्या १९१२ मध्यें ४० होती. मुंबईसारख्या शहरामध्यें ह्या संस्थेचा खर्च फार येऊं लागला. रोखीनें निधि मिळविण्याचें काम पुरें पडेना. त्यामुळें तांदूळ फंड म्हणून एक युक्ति काढली. गृहिणीनें रोज मूठभर तांदूळ टाकण्यासाठीं घरोघरीं तांदूळ व इतर धान्याच्या पिशव्या ठेवण्यांत आल्या. दर आठवड्यांत स्वयंसेवकांमार्फत विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन हें धान्य वसतिगृहामध्यें आणण्यांत येई. १९१२ सालीं ३४ फरे तांदूळ, २॥ फरे गहूं आणि ८ फरे डाळ गोळा करण्यांत आली. किंमतीच्या दृष्टीनें मी मदत फार नसली तरी प्रत्येक मूठभर तांदळाच्या मागें एकेक स्त्रीचें मानवी हृदय होतें. ह्या दृष्टीनें पाहतां रुपी फंडापेक्षांही या फंडानें सहानुभूतीचें वलय किती तरी वाढविलें. अस्पृश्यता निवारण्याचे कामीं लोकमत तयार करण्याचें मिशनचें सर्वांत मुख्य काम अशा युक्तया-प्रयुक्तयांनीं बिनबोभाट चाललें होतें.
कापड फंड व पेटी फंड : विद्यार्थ्यांना जेवणाशिवा नवे जुने कपडे, बिछाने, भांडीं, साबण, औषधें, पुस्तकें वगैरे अनेक घरगुती वस्तूंची जरूरी लागे. ती गरज ह्या कापड फंडानें भागविली जात असे. सीलबंद केलेल्या लहान लहान लाकडी पेट्या, मुख्य मुख्य कचेर्या, खाजगी दवाखाने, वकिलांचीं घरें आणि इतर माणसांची जा-ये पुष्कळ आहे अशा ठिकाणीं ठेवण्यांत आल्या. त्या ठिकाणीं नेहमीं असणार्या मिशनच्या हितचिंतकाला ह्या पेटीची जबाबदारी देण्यांत आली. दर महिन्याच्या शेवटीं स्वयंसेवकानें जाऊन जबाबदार हितचिंतकाचे समोर ती उघडून आंतील रकमेची पावती देऊन स्वयंसेवक मिशनच्या खजिनदाराकडे हा हिशेब देई. खजिनदाराची पावती अखेरची समजली जाई.
ह्या निरनिराळ्या फंडांची योजना मिशनच्या निरनिराळ्या शाखांतून सुरू करण्यांत आली. तांदूळ आणि कापड फंड जमविण्याचे कामीं रुपी फंडाप्रमाणेंच सौ. रुक्मिणीबाई शिंदे यांनीं मोठें यश मिळविलें. त्या जेथें जात तेथें कनवाळू स्त्रिया मुठीनें तांदूळ न देतां सुपानें तांदूळ भरभरून इतके देत असत कीं, विद्यार्थ्यांना ते उचलून आणणें देखील जड जात असे.
औद्योगिक शिक्षण : विद्यार्थी वसतिगृहें आणि उद्योगशाळा हीं मिशनचीं स्वीकृत कामें फार खर्चाचीं आणि दगदगीचीं होतीं. मुंबईतील परळ शाळेंत बुक-बाइंडिंग व शिवण्याचें काम, मंगळूर येथें हातमागावर विणण्याचें काम, महाबळेश्वर येथें काथ्याचे दोरखंड आणि वेताच्या टोपल्या वगैरे करण्याचें काम, अशीं औद्योगिक कामें प्रथमपासून चाललीं होतींच. १९१२ सालीं मुंबईच्या परळ येथील शाळेला एक स्वतंत्र उद्योगशाळा जोडण्याची आवश्यकता भासूं लागली. औद्योगिक शिक्षणाची मुख्य कल्पना ही आहे कीं, विद्यार्थ्यांच्या हातांना आणि डोळ्यांना व्यावहारिक वळण लागावें आणि तद्द्वारां विद्यार्थ्यांला भावी आयुष्यामध्यें कोणता तरी हस्तकौशल्याचा धंदा करतां यावा. बहुतेक अस्पृश्यवर्ग असा कोणता ना कोणता धंदा करून आपलें पोट भरीत असतो. म्हणून अशा धंद्याची तयारी लहानपणापासूनच केली नाहीं, तर ते पुढें पोकळ पंडित बनून आईबापांच्या आणि स्वतःच्या निराशेला कारणीभूत होतील.
वाडिया ट्रस्टींची मदत : ह्या कामीं पुरेसा निधि मिळावा, म्हणून मुंबईच्या एन. एम. वाडिया ट्रस्टींकडे अर्ज करण्यांत आला. त्या फंडाचे प्रमुख ट्रस्टी सर जमशेटजी जीजीभाई आणि बॅ. एच. ए. वाडिया यांना मिशनची परळ येथील दुय्यम शाळा समक्ष दाखविण्यांत आली. सर्व कामें बारकाईनें पाहिल्यावर औद्योगिक शाळा चालविण्यास मिशन पात्र आहे, अशी या ट्रस्टींची खात्री झाली आणि दरसाल ६००० रु. ची देणगी याप्रमाणें तीन वर्षेपर्यंत एकूण १८,००० रु. देण्याचें तयांनीं कबूल केलें. त्याप्रमाणें हीं नवीन उद्योगशाळा निघाली. ह्या शाळेंत सुतारकाम, चित्रकला व रंगकाम, शिवणकाम, पुस्तकें बांधण्याचें काम असे चार निरनिराळे वर्ग योग्य शिक्षकांच्या नजरेखालीं उघडण्यांत आले. कोणत्या ना कोणत्या वर्गांत तरी शाळेंतील सर्व मुलांनीं - विशेषतः वसतिगृहांतल्या सर्व विद्यार्थ्यांनीं - दिवसांतून दोन तास हें औद्योगिक शिक्षण अवश्य घ्यावें, अशी योजना करण्यांत आली. पुणें शाखेंत विद्यार्थी वसतिगृहाची पूर्वतयारी १९१२ अखेर करण्यांत आल्यावर तेथेंही अशा शिक्षणाची तरतूद करण्यांत आली.