ब्राह्मधर्मसूचि ग्रंथ

या विषयाची रजा घेण्यापूर्वी या परिषदेच्या कामांतूनच निघालेल्या Theistic Directory ऊर्फ ब्राह्मधर्मसूचि ग्रंथ ह्याविषयीं थोडी माहिती देऊन हा भाग पुरा करूं.  भारतांतील निरनिराळ्या ब्राह्मसमाजांच्या कार्याची आणि प्रगतीची माहिती जमा करून सालोसाल प्रसिद्ध करण्याचें काम कलकत्त्याचे भाई प्रतापचंद मुझुमदार यांनीं प्रथम १८७२ च्या सुमारास सुरू केलें आणि Theistic Annual या नांवाखालीं १८७९ पर्यंत चालू ठेवलें.  पुढील वर्षी एका त्रैमासिकाच्या रूपानें त्यांनीं हेंच काम चालविलें.  पुढें मिस् एस. डी. कॉलेट ह्या उत्साही इंग्रज स्त्रीनें १८७६-८७ पर्यंत Bramho Year Book या नांवानें हेंच काम अधिक पद्धतशीर चालविलें.

प्रकाशन  :  त्यापुढें १८८८ सालीं ब्राह्मपरिषदेचें काम सुरू झालें.  १९०५ सालीं काशीच्या परिषदेंत या सुचिग्रंथाच्या कामासाठी मीं पुन्हां उचल केली.  परिषदेकडून मीं एकमतानें ठराव पास करून घेतला व समक्ष माहिती करून घेण्यास बंगालची सफर काढली.  जाहीर सर्क्युलरें काढून व खासगी पत्रव्यवहार करून कित्येक वर्षे प्रयत्‍न करूनही समाधानकारक माहिती मिळेना, म्हणून हा प्रयत्‍न मला दोनदां सोडून द्यावा लागला.  शेवटीं १९१२ सालं मीं हा प्रयत्‍न पुन्हां केला.  ज्या अर्थी निरनिराळ्या स्थानिक ब्राह्मसमाजांच्या इतिहासाची मनोवेधक माहिती मला आधींच मिळाली होती व ती मीं छापूनही काढली होती त्या अर्थी हें काम असें अर्धवट टाकणें मला पसंत पडलें नाहीं.  भारताच्या दूरदूरच्या कानाकोपर्‍यांतील कार्यवाहकांना मिळालेलें अपयश देखील उद्‍बोधक होतें.  ही माहिती ठिकठिकाणच्या प्रत्यक्ष कार्य करणार्‍यांनीं आणि डोळ्यांपुढें घडलेल्या गोष्टींची साक्ष देणारांनीं लिहून पाठविली होती.  समुद्रापलीकडील इतर देशांतील उदारधर्माची चळवळ करणारांनीं आपापल्या माहितीची आणि संदेशांचीही यांत भर टाकली.  म्हणून मीं हें अत्यंत परिश्रमानें तयार केलेलें सुमारें ३७५ पानांचें इंग्रजी पुस्तक १९१२ च्या डिसेंबर महिन्यांत प्रसिद्ध केलें.  ह्याला सर नारायण चंदावरकरांनीं आपली सुंदर प्रस्तावना जोडली आहे.  त्यांत त्यांनीं म्हटलें आहे कीं, ''भरतखंडांत ब्राह्म आणि प्रार्थनासमाजांनीं चालविलेल्या एकेश्वरी धर्माची एकचित्र माहिती ह्या समाजाच्या सभासदांनां व हितचिंतकांनाच नवहे तर ज्या कोणाला ह्या चळवळीकडे चिकित्सक दृष्टीनें पाहावयाचें असेल तर अशा बाहेरच्यांना देखील ही माहिती अत्यंत उपयोगी ठरेल.  आधुनिक सुशिक्षित हिंदुलोक धर्माचे बाबतींत अत्यंत उदासीन आहेत, असा आक्षेप वरचेवर करण्यांत येतो; पण तो सर्वांशीं खरा नाहीं.  हिंदुमहामंडळ, आर्यसमाज, थिऑसफी आणि इतर धर्मांच्या चळवळी यांचें कोणीं निरीक्षण केल्यास नवीन चैतन्याची साक्ष सहज पटण्यासारखी आहे.  आधुनिक विचारी जगांत दोन भिन्न प्रमुख शक्तींचें कार्य चालू आहे.  एक धर्मकारण व दुसरें अर्थकारण.  ह्या दोन शक्ति सर्व सुधारलेल्या जगास हालवून सोडीत आहेत.  नुसत्या अर्थाच्या मागें लागलेला मनुष्य अथवा संस्था असणें शक्य नाहीं.  जसजशी श्रीमंती वाढते तसतसा कंगालपणाही त्याचबरोबर वाढतो आणि त्याच्या मागोमाग युद्ध हें ठेवलेलेंच !  दुसरें सत्य हें कीं, मतमतांतरांचा गलबला चालला असतां त्यांतूनच एक मूलभूत सामान्य तत्त्व बाहेर डोकावतें.  बंगाल्याकडील राममोहन राय, महर्षि देवेंद्रनाथ, ब्रह्मानंद केशवचंद्र आणि आमचेकडील सर रामकृष्णपंत भांडारकर यांनीं या सामान्य तत्त्वाचा स्वीकार केला असून त्याचा पुकारा ते आधुनिक जगास करीत आहेत.  त्यांची जबाबदारी किती मोठी आहे हें हा सूचिग्रंथ दाखवीत आहे.  ह्या ग्रंथांत वर्णिलेली परिस्थिति वाचून नेहमीं आनंदच होईल असें नाहीं.  तथापि ब्राह्मधर्माचा प्रचार अधिक नेटानें करणें कसें अवश्य आहे हें पटतें आणि ब्राह्मधर्मानुयायी होणें हें सुखांतलें मोठें सुख आणि भाग्यांतलें मोठें भाग्य आहे याची खात्री पटते.''

माझे मित्र द्वा. गा. वैद्य व वामनराव सोहनी यांनीं या पुस्तकप्रकाशनाच्या कामीं फार मदत केली.  या पुस्तकाचे दोन निराळे भाग असून पहिल्या भागांत जगांतील उदारधर्माच्या निरनिराळ्या पंथांचें कार्य, परोपकारी प्रयत्‍न व त्या त्या चालकांकडून लिहून आलेल्या निबंधांचा समावेश करण्यांत आला आहे.  अशा चालकांकडून जी माहिती मिळाली नाहीं अशीं प्रकरणें मीं स्वतःच लिहून काढलीं आहेत.  पश्चिम हिंदुस्थानांतील प्रार्थनासमाजाची चळवळ, एकेश्वरी धर्मपरिषद, भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी, इराणांतील बहाई धर्माची चळवळ, युरोपांतील व अमेरिकेंतील युनिटेरियन आणि युनिव्हर्स्यालिस्ट समाज हीं प्रकरणें माझींच आहेत.  बंगाल्यांतील ब्राह्मसमाज ह्यावरील लेख प्रसिद्ध पं. शिवनाथशास्त्रीं यांनीं स्वतः लिहिला आहे.  मँचेस्टर कॉलेजांतील माझे सहाध्याची झेनो सूके टोया साकी यांनीं जपानमधील उदारधर्म हें प्रकरण तयार केलें आहे.  दुसर्‍या भागांत बंगाल, बिहार आणि ओरिसा ह्या प्रांतांतील १०१ ब्राह्मसमाज, मद्रास प्रांतांतील ३२ ब्राह्मसमाज, मुंबई प्रांतांतील १६ प्रार्थनासमाज, पंजाब आणि संयुक्त प्रांतांतील १८ ब्राह्मसमाज आणि लंडन येथील रे. चार्ल्स व्हायसे यांचें   अशा एकूण १६८ संस्थांची तपशीलवार माहिती आणि सविस्तर इतिहास आला आहे.  सेक्रेटरीचें नांव आणि पत्ता, सभासदांची संख्या, अनुष्ठानिक किती व इतर किती यांचा निर्देश, हितचिंतकांची संख्या, आठवड्यांतून सभा किती वेळां भरते, पोटसंस्थांचा तपशील, स्वतंत्र मंदिर आहे कीं नाहीं, वर्तमानपत्रें, मासिकें कोणतीं आहेत, प्रचाराची तजवीज काय वगैरे सर्व माहिती अत्यंत कसोशीनें गोळा केलेली आहे.  एकंदरींत हें पुस्तक प्रचाराचें काम करणारासच नव्हे तर इतर जिज्ञासूंना देखील एक अमोलिक ठेवाच वाटण्यासारखें आहे.

पुस्तकाचा छपाईखर्च, माझ्या प्रवासाचा आणि पत्रव्यवहाराचा खर्च अनुक्रमें ब्राह्मो पोस्टल मिशन व बनारस येथील परिषदेच्या शिलकेंतून भागविण्यांत आला.  कोणत्याही स्थानिक समाजावर ह्याचा बोजा पडलेला नाहीं.  नुसती माहिती पुरविण्यास ज्यांनीं विलंब केला किंवा मुळींच दिली नाहीं अशांकडून पैशाची मदत कोण अपेक्षील ?  हीं पुस्तकें ब्राह्मधर्मप्रचारकांना फुकट वांटण्यांत येतील, टपालहंशील देखील पडणार नाहीं, फक्त त्यांनीं मागणी करावी, असें वेळोवेळीं जाहीर करूनही कोणा एकाकडून मागणी देखील आली नाहीं.  हा अव्यवहारीपणा पाहून आश्चर्याचा मोठा धक्का बसला !  पाश्चात्य कार्यकर्त्यांना मात्र ह्या प्रयत्‍नाचें महत्त्व फार वाटलें व त्यांनीं त्याची वेळोवेळीं मुक्तकंठानें प्रशंसा केली.  अशी माहिती वेळोवेळीं प्रसिद्ध करण्याची इष्टता होती; पण ती आशा आजवर समाधानकारक रीतीनें पूर्ण झालेली नाहीं, हें निराळें सांगावयास नकोच.  शेंकडों प्रती धूळ खात पडलेल्या असून त्या ठेवण्यास जागा नाहीं.  ब्राह्मधर्म ही प्रार्थना करणारी संस्था आहे, प्रयत्‍न करणारी नव्हे, असें केव्हां केव्हां विनोदानें सांगण्यांत येतें.  त्यांत सत्याचा अंश बराच आहे, असें हा ग्रंथ जोरानें पुकारीत आहे.