कार्यवाहकांची निवेदनें
माझ्या स्वीकृत पवित्र राष्ट्रकार्याचें श्रेय ज्यांनीं ज्यांनीं मजबरोबर वाहून घेऊन स्वार्थत्याग केला, ज्यांनीं सन्मान्य सेवा केली, ज्यांनीं मधून मधून मदत केली, अशांचें थोडेंबहुत तरी स्मरण मीं येथें केलें पाहिजे. कांहींजणांनीं आपल्या आठवणी स्वतंत्रपणें पाठवल्या आहेत. कांहींच्या आठवणी माझे मित्र बी. बी. केसकर ह्यांनीं लिहून पाठवल्या आहेत. कांहींजण वृद्ध झालेले आहेत, तर कांहींजण कालवश झालेले आहेत. त्यांच्याविषयीं पुढें दिल्याप्रमाणें हकीकत आहे.
(१) रा, सय्यद अबदुल कादर लिहितात -
माझ जन्म १० ऑक्टो. १८८९ मध्यें जमखंडी येथें झाला. माझे वडील जमखंडींत बुकबाइंडर होते. ते धार्मिक वृत्तीचे असून तेथील एका जमातीचे पुढारी होते. ते आपल्या नोकरीबाहेरचा वेळ धर्मप्रचारार्थ घालवीत. इस्लामी संस्कृतीला अनुसरून आपल्या समाजांत सामाजिक सुधारणा करण्याकडे त्यांचें लक्ष असे. मुसलमानांत लग्न लावण्याचा हक्क काजींचा व त्याबद्दल त्याला स्थानिक रिवाजाप्रमाणें फी द्याव लागे. 'शरीयत' प्रमाणें लग्न लावण्याचें काम कोणालाही करतां येतें व त्याबद्दल फी देण्याची जरुरी नाहीं अशी चळवळ माझ्या वडिलांनीं सुरू केली. हें प्रकरण पुष्कळ ठिकाणीं कोर्टांत जाऊन त्यांत त्यांना यश आलें. ह्याच वेळीं माझ्या वडिलांची व गुरुवर्य अण्णासाहेब शिंदे यांच्या वडिलांची ओळख झाली. गुरुवर्य अण्णासाहेब त्यावेळीं जमखंडी हायस्कूलमध्यें शिकत होते. लग्नाच्या प्रकरणासंबंधीं लॉ रिपोर्टरमधून कांहीं उतारे मराठीमधून करून देण्यांत गुरुवर्य अण्णासाहेबांची फार मदत होत होती. तेव्हांपासून गु. अण्णासाहेबांकडे माझें जाणें-येणें सुरू झालें. पुढें गु. अण्णासाहेब प्रार्थनासमाजांत गेल्यानंतर जमखंडीस जेव्हां जेव्हां येत तेव्हां तेव्हां त्यांच्या घरीं उपासना होत. त्या मला फार आवडूं लागल्या. पुढें अण्णासाहेब विलायतेला गेल्यावर त्यांच्या घरच्या मंडळींशीं माझा स्नेह जडला. त्यांच्या मातोश्री फारच प्रेमळ असल्यानें त्यांच्याविषयींचें पूज्य प्रेम अद्याप माझ्या मनामध्यें जागृत आहे. १९०३ सालीं गु. अण्णासाहेब विलायतेहून परत आल्यावर दौर्यावर ते जमखंडीस आले. त्या वेळीं त्यांच्याबरोबर शिवरामपंत गोखले या नांवाचे प्रचारक होते. त्या वेळीं गुंडांनीं त्यांचा जो छळ केला त्याचा परिणाम माझ्यावर उत्तम व्याख्यानापेक्षांही अधिक झाला. धर्मविषयक उदार विचार मनांत येऊं लागले. १९०४ चे सुमारास कलकत्त्याचे पं. शिवनाथशास्त्री मुंबईस आले तेव्हां मी प्रा. समाजाचा सभासद झालों. त्याच वेळीं संयुक्त प्रांतांत एक मुसलमान गृहस्थ आर्य समाजांत गेले. दुसरे एक मुसलमान उत्तर हिंदुस्थानांत ख्रिस्ती झाले होते. मी मुंबई येथील अंजुमान इस्लाम हायस्कूलमधून मॅट्रिक झालों होतों. तेथेंच मी हंगामी मास्तर होतों. तेथील अधिकार्यांच्या ऐकण्यांत वरील दोन मुसलमानांचीं धर्मांतरें आल्यावरून व मी प्रार्थनासमाजिस्ट झाल्याचें नजरेस आल्यावरून वरील अधिकार्यांनीं मला राजीनामा देण्यास सांगितलें. ह्या प्रकरणीं त्या शाळेंतील दोन हिंदु मास्तरांस विनाकारण त्रास झाला. मला धमकीही देण्यांत आली. १९०७ मध्यें मी पोर्टट्रस्टमध्यें नोकरीला लागलों. १९०६ मध्यें डि.क्ला. मिशनची स्थापना झाली. त्या वेळीं मी व माझी बहीण हजराबाई अण्णासाहेबांकडेच राहात होतो. मिशनच्या कामाला माणसें मिळत नव्हतीं. पोर्टट्रस्टचें काम सोडून मीं मिशनच्या कामाला वाहून घेतलें. १९०९ मध्यें प्रार्थनासमाज पद्धतीनें माझा विवाह समाजमंदिरांत झाला. माझी पत्नी सौ. कल्याणीबाई सारस्वत समाजांतील होती. ह्या विवाहामुळें दोन्ही समाजांत बरीच खळबळ उडाली. माझ्या पत्नीची माझ्या स्वीकृत कायाअ बरीच मोठी मदत झाली. आम्ही १९१२ मध्यें कर्नाटक शाखा उघडण्यास हुबळीस गेलों. तेथें १९१६ पर्यंत काम केलें. नंतर नागपूरची शाखा १ वर्ष चालवली. पुढें १९२० पर्यंत गु. अण्णासाहेबांचे हाताखालीं असिस्टंट म्हणून काम करीत होतों. ह्या सर्व क्रांतिकारक व आनंदकारक गोष्टींस कारण कोण असा कधीं कधीं मनांत विचार येतो तेव्हां गु. अण्णासाहेबांची मूर्ति डोळ्यांपुढें उभी राहते.
ए. एम. सय्यद.
लॅमिंग्टन रोड, मुंबई
ता. २२।३।४१
(२) रा. वामनराव सदाशिव सोहोनी लिहितात :-
रा. विठ्ठलरावांचा व माझा परिचय ते विलायतेस धर्माचा तुलनात्मक अभ्यास करण्यास जाण्यापूर्वीच्या त्यांच्या मुंबईच्या वास्तव्यांत झाला. विलायतेहून परत आल्यावर ते प्रा. समाजाचें काम करणार अशी आमची खात्री असल्यामुळें आम्ही त्यांच्या विलायतेहून परत येण्याची चातकाप्रमाणें वाट पाहात होतों. त्यांनीं सुबोध-पत्रिकेसाठीं धाडलेलीं अनेक पत्रें त्यांच्याविषयींचा आदरभाव वृद्धिंगत करण्यास कारणीभूत झालीं. प्रा. समाजाचे प्रचारक झाल्यावर त्यांनीं समाजांतील व समाजाबाहेरील अनेक तरुणांना एकत्रित करून प्रा. समाजाच्या जीवनांत नवचैतन्य उत्पन्न केलें. त्यांच्यासारख्या कर्तबगार माणसाला गिरगांवांतील समाजजीवन हें कार्य करण्यास पुरेसें वाटलें नाहीं ह्यांत आश्चर्य नाहीं. विलायतेंत असतांना त्यांनीं समाजसेवेच्या भिन्नभिन्न कार्याचें निरीक्षण केलें होतें. साहजिकपणेंच त्यांचें लक्ष अस्पृश्यांच्या दुःस्थितीकडे वळलें.
१९०६ सालीं होळीच्या दिवशीं आम्ही दोघेजण मुंबईच्या परळ भागांतील अस्पृश्यांची स्थिति अवलोकन करण्यासाठीं गेलों असतां आमच्या नजरेस जे करुणामय देखावे पडले त्यांची विस्मृति होणें शक्य नाहीं. रा. विठ्ठलरावांनीं भा. नि. साह्यकारी मंडळी स्थापली. संस्थेतील मुहूर्तमेढ सर नारायण चंदावरकर यांचे हस्तें करण्यांत आली. मी त्या वेळेस विल्सन हायस्कूलमध्यें शिक्षक होतों. पण माझें अंतःकरण निराश्रित साह्यकारी मंडळींत होते. रा. विठ्ठलरावांच्या आग्रहावरून १९०८ मध्यें मीं मंडळीचें मुंबई शाखेचें काम अंगावर घेतलें. १९०८ ते १९२१ पर्यंत १३ वर्षे मी मुंबई शाखेचें व कांहीं वर्षे मंडळीच्या असि. सेक्रेटरीचें काम केलें. मंडळीचा श्रेष्ठ उद्देश नजरेपुढें ठेवून तपशिलांत कोणालाही ढवळाढवळ करूं न देतां कार्य करण्याचा माझा प्रयत्न होता. मुंबईच्या कार्याला अनपेक्षित यश आलें. रा. विठ्ठलराव येथील काम मजवर सोंपवून अस्पृश्यतेच्या कार्याची जागृति करण्यासाठीं देशभर दौरे काढीत. ऊन, पाऊस, थंडी, वारा, ह्यांना न जुमानतां सांपडेल तेथें वस्ती करावी, मिळेल तें जाडेंभरडें जेवण जेवावें, तिसर्या वर्गांतून कधीं कधीं चौथ्या वर्गांतून (काठेवाडांत) प्रवास करावा, अशा प्रकारचें त्यांचें दगदगीचें जीवन होतें. त्यांची शरीरयष्टि बळकट व काटक म्हणूनच ते इतक्या प्रचंड गैरसोयी साहूं शकले !
अस्पृश्यतानिवारणाला रा. विठ्ठलरावांच्या आधीं महात्मा ज्योतिबा फुले यांनीं सुरुवात केली. मुंबईच्या प्रा. समाजानेंही अस्पृश्यांच्या शिक्षणाला अल्प प्रमाणावर सुरुवात केली होती. परंतु मोठ्या प्रमाणावर व्यवस्थित प्रयत्न रा. विठ्ठलरावांनींच केले. त्यांच्या कुटुंबांतील सर्व मंडळींनीं अस्पृश्यतेचा प्रश्न आपलास केला होता. त्यांना अनेक उच्चवर्णीय तरुणांचें साहाय्य मिळालें. पण कार्याची धडाडी रा. विठ्ठलरावांची. अस्पृश्यांनीं स्वावलंबी बनावें, उच्चवर्णीयांच्या तोंडाकडे न पाहतां आपली सुधारणा आपणच करावी, पण ती करतांना दुसर्याशीं अकारण वितुष्ट वाढवूं नये अशी त्यांची दृढ भावना होती व तिला अनुसरून त्यांचें कार्य होई. त्यांनीं अस्पृश्य बालकांची स्वतःच्या बालकांप्रमाणें केलेली सेवा मीं प्रत्यक्षपणें पाहिलेली आहे. मुंबईच्या विद्यार्थीगृहांत अस्पृश्यांच्या सर्व जातींचीं मुलें एकत्र राहात व कोणताही भेदाभेद न करतां खाणेंपिणें होई. त्यांची टापटीप, त्यांची स्वच्छता, त्यांच ज्ञानलालसा, त्यांची वागणूक व त्यांचें परस्पर साहाय्य अवलोकून विठ्ठलरावांना अत्यंत आनंद होई.
मुंबई शाखेनें ८ शाळा चालवल्या होत्या. त्या शाळांची कार्यक्षमता आजूबाजूच्या स्पृश्य रहिवाश्यांच्या नजरेस आल्यामुळें स्पृश्यांचीं मुलेंही विशेषतः परळ येथील मुलांमुलींच्या शाळांत प्रविष्ट होऊं लागलीं. त्यांच्या संख्येला आळा घातला नसता तर ह्या शाळा स्पृश्यांच्याच झाल्या असत्या. स्पृश्य मुलांच्या भरतीनें संस्थेचा हेतु शेवटास जाण्यास बरीच मदत झाली.
माझ्या मतें रा. विठ्ठलरावांनीं दोन मोठ्या चुका केल्या. त्यामुळें संस्थेची कार्यक्षमता कमी झाली असा माझा समज आहे. पहिली गोष्ट म्हणजे पुणें हें संस्थेच्या कार्याचें मुख्य ठिकाण केलें. इतर कोणत्याही कारणांनीं हें योग्य झालें असतें; पण द्रव्यसाहाय्य मिळवण्याच्या दृष्टीने तें निरुपयोगी होतें. दानशूर मंडळी विशेषतः मुंबईस असल्यामुळें मुंबईंत संस्थेच्या मालकीची इमारत असणें आवश्यक होतें व तीमुळें (ह्या शहरांत १ लक्षांवर अस्पृश्य आहेत.) त्या शहरांतील कार्याला स्थायिकता आली असती. दुसरी चूक म्हणजे- संस्थेच्या कार्यकारी मंडळांत केवळ एकाच राजकीय मतांच्या लोकांचा शिरकाव करणें ही होय. ह्या मंडळीचे हातून बरेंच काम होईल असा त्यांचा विश्वास असावा. पण तो केवळ भ्रम ठरला.
मला राहून राहून एका गोष्टीविषयीं दुःख होतें. अस्पृश्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला हात घातला रा. विठ्ठलरावांनीं. त्या कामीं कमालीचा स्वार्थत्याग करून त्यांनीं व त्यांच्या कुटुंबियांनीं देशभर जागृति घडवून आणली. ह्या प्रश्नाला राष्ट्राची मान्यता मिळवण्याचे यशस्वी श्रमही त्यांचेच. पण अलीकडे अस्पृश्यांच्या उन्नतीच्या प्रश्नाचा जेव्हां जेव्हां उल्लेख करण्याचा प्रसंग येतो तेव्हां तेव्हां ज्यांनीं ह्या बाबतींत केवळ वाचिक कार्य केलें आहे अशांनाच झालेल्या जागृतीचें श्रेय अर्पण करण्यांत येतें व भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी व विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्यावर पद्धतशील बहिष्कार घालून त्यांचा चुकूनही नामनिर्देश केला जात नाहीं. रा. विठ्ठलराव श्रेयाला हपापलेले आहेत असा प्रकार नाहीं. पण अशा संघटित बहिष्कारानें सत्त्याचा अपलाप होतो. आपल्या अखिल जीवनानें व सेवाव्रतानें रा. विठ्ठलरावांनीं आपली केवढी उन्नति केली आहे ह्याची साक्ष देण्याला हजारों अस्पृश्य मंडळी आजही हयात आहे.
वामनराव सदाशिव सोहोनी, मुंबई
(३) रा. दामोदर नारायण पटवर्णन लिहितात :- १९०९ ते १९१२ पर्यंत बरेच वेळां सहवासाचे प्रसंग आल्यामुळें रा. शिंदे ह्यांच्या कार्यांत शिक्षक म्हणून नुसतें वरवरचें काम न करतां प्रत्यक्ष प्रचारक म्हणून वाहून घ्यावें असा निश्चय होऊं लागला. त्यामुळें हायकोर्ट वकिली किंवा सरकारी ट्रेनिंगकडे न जातां मी बराच वेळ ह्या संस्थेंतच घालवूं लागलों. १९१२ पासून १९२१ पर्यंत रा. शिंदे ह्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखालींच मीं काम केलें. ह्यामुळें विविध प्रसंगीं त्यांच्या स्वभावविशेषांचें जें दर्शन झालें त्याचा सारांश खालीं देत आहें.
सर्वांशीं समानतेची वागणूक :- रा. शिंदे मराठा समाजांतील प्रख्यात विद्वान् असल्यामुळें त्यांच्याकडे श्रीमंत, सरदार, नामांकित विद्वान् हे भेटीस येत. त्याचप्रमाणें पत्करलेल्या कामामुळें अस्पृश्यांतील अविद्वान् व दरिद्री माणसेंसुद्धा येत. अशा वेळीं आपणांकडून करतां येईल ती त्यांची कामगिरी करून त्यांना संतोषित करून वाटेला लावणें हें मोठें कौशल्याचें काम आहे. पण हें काम रा. शिंदे आपल्या गोड व सुविनीत वाणीनें उत्तम प्रकारें पार पाडीत. अशिक्षितांच्या सभा असोत कीं सुशिक्षितांच्या परिषदा असोत. प्रत्येक प्रसंगीं त्या त्या उपस्थित समाजास योग्य असा शब्दसमूह वापरून त्यांचीं व्याख्यानें होत. आलेल्यांचें आदरातिथ्य आपल्या पदरास खार लावून व घरच्या मंडळींस कष्टवूनही ते करीत. आपल्या प्रोफेसर व श्रीमंत मित्रांप्रमाणेंच अस्पृश्यांनाही ते वागवीत. यामुळेंच श्रीमंत व गरीब यांमधील संबंध जुळवणारा हा परोपकारी दुवा माझ्यासारख्यांना फार आवडे. त्यांचा हा वागणुकीचा कित्ता मीं आपल्यापुढें ठेंवला आहे.
राष्ट्रीय कार्याची तळमळ : रा. शिंदे प्रत्येक पक्षाच्या लहानथोर कार्यकर्त्यास आपला काय्रक्रम नीटपणें समजावून देत व आपल्या कार्यास सर्व पक्षांची जरुरी आहे व हें सर्व पक्षांनीं करावयाचें राष्ट्रीय कार्य आहे अशी त्यांची खात्री करून देता. त्यामुळें त्यांचे पक्षातील धोरण संस्थेला फायदेशीरच झालें. आपण पत्करलेलें काम सामाजिक व शिक्षणविषयक असलें तरी वेळोवेळीं होणार्या राजकीय व सामाजिक कामांतून इतर पक्षांबरोबर सहकार्य न भितां करीत. कामाची राष्ट्रीयता ओळखण्याची पात्रता व तळमळ ही मीं बरेच प्रसंगी अनुभवलेली असल्यामुळें व मला तेंच तत्त्व पटल्यामुळें माझी रा. शिंदे यांजवरील निष्ठा वाढली. राष्ट्रीय चळवळींत सर्व पंथ, धर्म, वर्ग व पक्ष एकजीव होऊन झटले तरच यश मिळतें. पण कधीं कधीं रा. शिंदे यांच्या या धोरणामुळें आमच्या संस्थेंतील अधिकारी म्हणजे कै. डॉ. भांडारकर, न्यायमूर्ति चंदावरकर इत्यादि सभासदांचा रोषही त्यांना सोसावा लागला.
(३) सहकार्यांशीं बंधुत्वाचें वर्तन : वयानें मी लहान असल्यामुळें माझ्याशीं ते धाकट्या भावाप्रमाणें वागत व माझ्या कुटुंबांतील मंडळींशींहि तसेच वागत. त्यांच्या कुटुंबांतील मंडळींशीं म्हणजे सौ. वहिनीसाहेब व भगिनी जनाबाई ह्या आम्हाला वहिनी-भगिनीप्रमाणेंच वाटत व वाटतात. डी. सी. एम. सोडतांना आमचा मतभेद व वादविवाद चांगलाच झाला, पण त्याचें कार्य झाल्यानंतर आतां माझ्या मनांत मागील स्नेहाचीच आठवण येते व पुण्यास मी जातों तेव्हां एकदां तरी त्यांचे भेटीस जाऊन येतों. अस्पृश्यतानिवारकांचे रा. शिंदे गुरु असल्यामुळें थोड्यांशा मतभेदामुळें त्यांच्या गुणांची योग्यता कमी करणें कधींही अयोग्यच ठरेल.
दा. ना. पटवर्धन
(४) रा. गणेश हरी टंकसाळे यांच्याविषयीं खालील मजकूर आला आहे.
ता. १ ऑक्टोबर १९२० रोजी पुणें शाखेंत दाखल झाले. पहिलीं दोन वर्षें त्यांनीं शिक्षकाचें काम केलें. नंतर रा. शिंदे यांनीं त्यांची अस्पृश्यांविषयींची कळकळ पाहून त्यांना पुणें शाखेच्या असि. सुपरिंटेंडेंटच्या जागीं नेमलें. संस्थेकरितां वर्गणी जमवणें, सभा भरवून त्या पार पाडणें, गरिबांना डोल वांटणें वगैरे कामें ते आपुलकीनें व मेहनतीनें करीत. १९२९ च्या सुमाराला त्यांनीं मिशनचें काम सोडलें. त्या वेळीं त्यांच्या सत्कारार्थ सभा भरवून पानसुपारी करण्यांत आली. गुरुवर्य शिंदे ह्यांच्याविषयीं त्यांच्या मनांत किती आदर वसत होता हें त्यांनीं त्यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त केलेल्याकाव्यावरून दिसून येण्यासारखें आहे.
(५) प. वा. कृष्णराव गोविंदराव पाताडे :-
हे मूळचे मूरबाडचे राहणारे. हे मराठा जातीचे होते. लहान असतांना गिरण्यांतून वगैरे काम करून स्वावलंबनानें मॅट्रिकपर्यंत अभ्यास केला. पुणें, बंगलोर, मुंबई वगैरे शाखांतून यांनीं मोठ्या धडाडीनें कामगिरी केली. अस्पृश्यवर्गावर विशेषतः मद्रासकडील अस्पृश्यांवर ह्यांचें फार वजन असे. हे राष्ट्रीय वृत्तीचे होते. पर्वती सत्याग्रहाच्या कामीं यांनीं निकराचा भाग घेतला होता.
ह्यांचें विशेष धडाडीचें काम म्हणजे हिंदुस्थानचे व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांनीं भोकरवाडीला दिलेली भेट होय. लॉर्ड आयर्विन हे हिंदुस्थानांत प्रथम आले. तेव्हां त्यांनीं एके ठिकाणीं उद्गार काढले कीं, ''गरिबांची स्थिति प्रत्यक्ष डोळ्यांनीं पाहण्याची माझी फार इच्छा आहे.'' लॉर्ड आयर्विन यांना वेळ मुळींच नव्हता, म्हणून सर्व सार्वजनिक कार्यक्रम त्यांनीं बंद ठेवले होते. पण रा. शिंदे ह्यांनीं व्हाइसरॉयसाहेबांना एक खाजगी चिठ्ठी लिहून ती रा. पाताड्यांना दिली. रा. पाताडे हे बालवीर चळवळींत मोठा भाग घेत. शनिवारवाड्यांपुढें बालवीरांची मोठी रॅली (मेळा) जमली होती. रा. पाताडे यांनीं बालवीराचा गणवेश चढवला आणि गर्दीत ज्या ठिकाणीं मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन् आणि व्हायरॉय लॉर्ड आयर्विन् उभे होते तेथें शिरकाव करून प्रायव्हेट सेक्रेटरीच्या हातीं श्री. शिंद्यांची चिठ्ठी दिली. सर लेस्ली विल्सन् यांनीं नुकतीच मिशनला भेट देऊन भोकरवाडी पाहिली होती. त्यांच्या शिफारशीवरून लॉर्ड आयर्विन् यांनीं ता. १ ऑगस्ट १९२६ रोजीं रविवारीं सकाळीं १० वाजतां अहल्याश्रमास भेट दिली. बरोबर सर लेस्ली विल्सनही होते. पोलिसांनीं कडक बंदोबस्त ठेवला होता. पाहुण्यांना मिशनच्या संस्था दाखवल्यावर भोकरवाडीच्या अरुंद आणि गलिच्छ चाळी त्यांना दाखविण्यांत आल्या. दोन एकरांहून कमी जागेंत दोन हजारांहून जास्त जिवंत माणसें कशीं गर्दीनें राहत होतीं, हें व्हाइसरॉयनीं समक्ष पाहिलें. एका बाईच्या कडेवर एक वर्षाचें उघडें-नागडें लहान मूल होतें ! तें व्हाइसरॉयनीं पाहिलें. रा. शिंदे म्हणाले, ''हिचें नांव हिंदुस्थानची गरिबी !'' पण मुलीच्या आईनें तोर्यानें सांगितलें, ''हिचें नांव लक्ष्मी !''
१९२० सालच्या सुमारास महात्मा गांधींनीं दांडीचा सत्याग्रह केला. त्या वेळीं पुणें शाखेचे सेक्रेटरी रा. पाताडे व सुभेदार घाडगे यांनीं दांडी येथें जाऊन त्यांस जोराचा विरोध केला होता. याचें कारण ते राष्ट्रीय सत्याग्रहाच्या उलट होते असें नव्हे, तर महात्माजींनीं मिठाचा सत्याग्रह करण्यापूर्वी अस्पृश्यतेच्या विरुद्ध अगोदर सत्याग्रह करावा. दांडी येथील गदाअत ह्या दोघांनीं शिरून तेथील मिठाचें मडकें आपल्या ताब्यांत विरोध दर्शविण्यासाठीं घेतलें होतें. मोठी दंगल माजली. गोष्ट गांधीजींच्या कानांवर गेली. दोघांनींच इतका विरोध चालवलेला पाहून त्यांना मोठें कौतुक वाटलें. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होऊं नये असा बंदोबस्त केला. आपल्या विरोधाची खूण म्हणून कित्येक दिवस रा. पाताडे यांनीं हें मडकें अहल्याश्रमांत जपून ठेवलें होतें. पुढें महात्माजींनीं तुरुंगांत उपोषण केलें. पूना पॅक्ट झाला. त्यांना भेटण्यासाठीं रा. शिंदे व पाताडे येरवड्यांच्या तुरुंगांत गेले. महात्माजींनीं रा. पाताडे यांस हंसत जवळ बोलावलें आणि ते म्हणाले, ''दांडी येथील तुमच्या विरोधाची किंमत मी ओळखतों. तुरुंगांतून सुटल्यावर एक वर्ष मी तुमच्या अस्पृश्यतेच्या कामाला वाहून घेईन. त्या सबंध वर्षांत अस्पृश्यतानिवारणाशिवाय दुसरें कांहीं काम मी करणार नाहीं.''
१९३३ सालीं रा. पाताडे यांची प्रकृति बरीच खालावत चालली. ता. २२ मार्च १९३३ रोजीं सर सयाजीराव गायकवाड ह्यांचें आगमन झालें. त्या वेळीं मोठा समारंभ झाला. त्या समारंभाच्या तयारींत रा. पाताडे यांस फार मानसिक व शारीरिक श्रम पडले. पुढें उन्हाळा आला व त्यांचा मानसिक बिघाड झाला. रामनवमीच्या दिवशीं तर त्यांना वेड लागलें. त्यांना मिळावें तसें गृहस्वास्थ्य न मिळाल्यानें त्यांच्या मेंदूवर विकृत परिणाम झाला. ह्या वेळीं त्यांचा सदतिसावा वाढदिवस होता. येरवड्यांच्या वेड्यांच्या इस्पितळांत त्यांना पाठवण्यांत आलें. तेथें त्यांना न्युमोनियाचा विकार होऊन शेवटीं ता. १४ एप्रिल १९३३ रोजीं त्यांचा अत्यंत दुःखद अंत झाला. ह्या सुमारास रा. शिंदे इंदोर, उज्जैनकडे प्रवासांत होते. रा. पाताडे यांच्या निधनाची तार त्यांना आगगाडींत पोंचली. त्यांना जबर धक्का बसला. रा. पाताडे त्यांना पोटच्या मुलांप्रमाणें प्रिय होते.
(६) ह्याशिवाय द. स. बर्वे, पाठक यांनींही पुणें शाखेंत बर्याच कळकळीनें काम केलें आहे. रा. बर्वे हे हुबळी शाखेंतही कांहीं वेळ होते. तेथून ते नागपूर शाखेंत गेलें. तेथेंच ते अद्यापि एकनिष्ठनें मिशनचें काम चालवीत आहेत.
साहाय्यकारी : याशिवाय खालील सदगृहस्थांनीं व भगिनींनीं मिशनच्या कमिटीवर बाहेर राहून मिशनला अमोलिक साहाय्य केलें आहे.
(१) अध्यक्ष सर नारायण गणेश चंदावरकर :- ह्यांचें चरित्र महशूरच आहे. सतत बारा वर्षांवर त्यांनीं केलेल्या कामाचा ठिकठिकाणीं उल्लेख आलेलाच आहे. मिशनचे ते अत्यंत आदर्श अध्यक्ष होते. दरसाल शंभर रुपयांची वर्गणी ते नियमानें पोंचवीत आणि यापेक्षां महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनीं कमिटीवर बहुमोल कामगिरी केली. ते नेहमीं कमिटीला अत्यंत वक्तशीर येत. त्यांच्या धाकामुळें इतर सभासदही वेळेवर येत. कामाच्या अडचणी ते जाणून असत. कित्येक वेळां मिशनच्या निरनिराळ्या शाखांच्या कमिट्या आणि तेथील स्थानिक मिशनरी यांच्यामध्यें मतभेद होऊन तक्रारीचीं प्रकरणें वेळोवेळीं जनरल सेक्रेटरीकडे येत. कामाला माणसें मिळत नसत आणि वेळोवेळीं त्यांच्याशीं वर्दळीला आल्यानें त्यांच्यावर अन्याय होत होता. अशा वेळीं जनरल सेक्रेटरीस फार सहनशीलता दाखवणें भाग पडे. बंगलोर शाखेहून असाच एक वादग्रस्त प्रश्न तेथील सन्माननीय सभासदांनीं सेक्रेटरीकडे पाठवला. सेक्रेटरी दाद घेत नाहींत असा त्यांचा समज होऊन त्या गृहस्थानें तक्रारीचें लिखाण अध्यक्षांकडे पाठवलें. अध्यक्षांनीं तें प्रकरण जनरल सेक्रेटरीकडे जसेंच्या तसेंच पाठवलें आणि पुढें त्याची विचारपूसही केली नाहीं. ह्याचा अर्थ अध्यक्षांनीं आपल्या कामाची हेळसांड केली असा नाहीं तर कारभाचा मुख्य अधिकार जनरल सेक्रेटरीकडेच असल्यानें विनाकारण त्यांच्या अधिकारांत ढवळाढवळ करणें बरें नव्हे असें शहाणपणाचें धोरण त्यांनीं नेहमीं ठेवलें होतें.
(२) उपाध्यक्ष शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला :- मृत्यु १३।११।१९१३. सन १८९८ त मुं. प्रा. चे सभासद झाले. स्वतःचा खर्च फार थोडा. पण बहुजनांच्या हितासाठीं धन पाहिजे हें डोळ्यांपुढें ठेवून ते रात्रंदिवस राबत असत. मिळालेल्या संपत्तीचा उपयोग सार्वजनिक कार्याकडे करीत. मुंबई फोर्टमध्यें पांच लक्ष रुपये खर्चून पीपल्स फ्री रीडिंग रूम हें वाचनालय स्थापन केलें. अशींच १०।१२ ठिकाणीं वाचनालयें काढलीं. गिरगांवांतील राममोहन आश्रम, ब्रिस्टल येथील राममोहन राय समाधीचा जीणोद्धार, कलकत्त्यांतील राममोहन राय लायब्ररी, मुंबईची पुअर बॉईज सेमिनरी, अखिल भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी, सदाशिव पांडुरंग केळकर स्मृतिफंउ इत्यादि संस्था स्थापन करण्याचें श्रेय त्यांच्या उदार देणगीकडेच येतें. इतकें करून ते फार शांत आणि निरपेक्ष वृत्तीचे असत. आपल्या उदार देणग्या प्रसिद्ध न करण्याविषयीं फार जपत. ते पुण्याची शाखा समक्ष येऊन पाहून गेले होते. मिशनला सुमारें ७००० रु. ची त्यांनीं देणगी दिली. १९०९ सालीं ते महाबळेश्वरीं गेले असतां रा. शिंदे आणि त्यांच्या कुटुंबांतील मंडळींना त्यांनीं बरोबर नेलें. तेथें एक महिना त्यांचा मुक्काम होता. त्या मुक्कामांत महाबळेश्वर येथें मिशनची शाखा निघाली.
(३) सौ. लक्ष्मीबाई रानडे :- मृत्यु ता. १७।६।१९१३. ह्या सुशिक्षित असून त्यांनीं सेवासदन व डी. सी. मिशनतर्फे उत्तम जनसेवा केली. साळुंब्रें येथील अग्निप्रळ्याचे वेळेस दुःखितांचे मदतीस धावून गेल्या. त्यांच्या अंगीं मोठा सभाधीटपणा होता. शास्त्रेक्त गायनाचा फार नाद असे. दिलरुबा उत्तम वाजवीत. डी. सी. एम. चे फंड गोळा करण्याचे कामीं फार मदत केली.
(४) गिरिजाशंकर त्रिवेदी :- मृत्यु ता. १०।१।१९३२ निरपेक्षपणें व एकनिष्ठपणें त्यांनीं प्रा. समाजाची सेवा केली. पंढरपूर ऑर्फनेजकरतां त्यांनीं मोठा द्रव्यनिधि जमवला. डी.सी. मिशनला मनोभावें मदत केली. पुढें थोडीं वर्षे ते जनरल सेक्रेटरी होते. राममोहन राय हायस्कूल काढण्याची मूळ कल्पना त्यांचीच. ह्या कल्पनेस मूर्त स्वरूप देण्यासाठीं त्यांनीं ५ हजार रु. ची देणगी दिली.
(५) डॉ. काशीबाई नवरंगे :- ह्यांची डी. सी. मिशनला बिनबोभट मदत होत असे. हल्लीं या मुंबई प्रा. समाजाच्या अध्यक्ष आहेत. नायगांव येथें गिरण्यांत काम करण्यासाठीं यांनीं संस्था काढून पुष्कळ चांगलें काम करीत आहेत.
(६) द्वा. गो. वैद्य:- हे प्रा. स. चे आजन्म सेवक होते. सु. पत्रिकेच्या द्वारें डि. सी. मिशनची बाजू निर्भीडपणें मांडीत असत. प्रा. स. चा इतिहास, रानडे, भांडारकर, चंदावरकर, यांचीं चरित्रें लिहून वाङ्मयांत अमूल्य भर टाकली आहे.
(७) डॉ. संतुजी रामजी लाड :- हे धनगर जातींतील एक जुने पुढारी. ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे मोठे अभिमानी होते. डॉ. संतुजी रामजी लाड ह्यांस नोव्हेंबर १९१६ या महिन्यांत पक्षाघाताचे विकारानें ठाणें येथें देवाज्ञा झाली. हे पेन्शन घेतल्यावर कित्येक वर्षे मुंबई येथील मराठा प्लेग हॉस्पिटलचे हाउस सर्जन होते. हे मोठे हुशार डॉक्टर व कनवाळू वृत्तीचे होते. यांनीं प्लेग हॉस्पिटलांत आलेल्या एका मुलाचें उत्तम रीतीनें संगापेन केलें व तो हल्लीं कॉलेजांत शिकत आहे. पंढरपूर ऑर्फनेजमधून ह्यांनीं दोन मुली समाजाकडून मागून घेतल्या व त्यांचें प्रतिपालन करून त्यांचीं लग्नें लावून दिलीं. नि. सा. मंडळीच्या ५ आद्य संस्थापक सभासदांपैकीं हे एक आहेत. ह्या मंडळींनीं चालवलेल्या परळ येथील दवाखान्यांत ते ठाण्याहून रोज येत. डॉ. लाड ह्यांनीं 'दीनबंधू' वर्तमानपत्र डबघाईस आलें असतां स्वतःच्या पैशाचे जोरावर त्या पत्राचा अकालमृत्यु टाळला; पण त्यासाठीं डॉ. लाड यांना आपली सर्व संचित संपत्ति खर्चावी लागली. कोणीहि संकटांत-सांपडला असें कळलें कीं, डॉ. संतुजी त्याच्या साहाय्यासाठीं धावत असत.
(८) रा. पांडुरंग भास्कर गोठोस्कर :- सावंतवाडी संस्थानांत ता. ६।८।१८७३ सालीं यांचा जन्म झाला. हायस्कूलचें शिक्षण त्यांचे मामा डॉ. भांडारकर यांचेकडे झालें. मुंबई येथें त्यांचे मामेभाऊ श्रीधरपंत भांडारकर यांचेजवळ राहून ते B.A. झाले. रॉयल एशिऍटिक सोसायटीमध्यें ते लायब्रेरियन् होते. १९३० सालांत त्यांनीं पेन्शन घेतलें. प्रकृति वरचेवर बिघडत असतांही त्यांनीं अनेक सार्वजनिक संस्थांत दगदगीचें काम केलें. डि. क्ला. मिशनमध्यें त्यांनीं फार कसोशीनें काम केलें. जनरल सेक्रेटरी कोंकणांत फिरतीवर गेले असतां सावंतवाडी येथील आपल्या नातलगांस परिचय पत्र देऊन त्या प्रांतीं मिशनचें काम करण्यास मोठी मदत केली. १९१३ सालीं त्यांनीं एका गतभर्तृकेशीं केलेला विवाह व अस्पृश्यांचे उन्नतीविषयीं त्यांची स्वक्रीय सहानुभूति वगैरे गुण पांडुरंगपंतांमध्यें आले, त्याचें श्रेय भांडारकरद्वयांच्या घरांतील उदार वातावरणालाच आहे.
(९) अमृतलाल व्ही. ठक्कर : मुंबई कॉर्पोरेशनमध्यें इंजिनियर होते. नि. सा. मंडळीच्या आरंभापासून हे मोठे सन्मान्य साह्यकारी होते. चेंबूर येथें महालक्ष्मी रोड, माजगांव येथें भंग्यांच्या चाळीजवळ वगैरे ठिकाणीं शाळा उघडून अस्पृश्यांचें काम करण्यास त्यांनीं मोठी मदत केली. काठेवाडांत आणि बांकीपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनांत जनरल सेक्रेटरीबरोबर प्रवास करून मिशनच्या मोठमोठ्या जाहीर सभा करण्याचे कामीं ह्यांनीं मोठी मदत केली. ह्यांचे धाकटे बंधु नारायणजी मिशनचे स्वयंसेवक या नात्यानें मोठ्या उत्साहानें काम करीत. भोकरवाडी येथील अहल्याश्रमाच्या इमारती बांधण्याचे कामीं नकाशे व अंदाजपत्रकें तयार करण्याचें मोठ्या दगदगीचें काम यांनीं मोठ्या दक्षतेनें केलें. पुढें भिल्लांच्या सुधारणेचें काम काढून ठक्करबाप्पा हें सार्थ नांव त्यांनीं मिळवलें. गोखले यांच्या भारत सेवक समाजांत हें एक नामांकित कार्यकर्ते आहेतं. महात्माजींनीं अस्पृश्यतानिवारणासाठीं शेट बिर्ला यांची मोठी मदत मिळवून मोठा फंड जमवला आणि शेवटीं दिल्लीस मध्यवर्ती हरिजन संघ काढून तो ठक्करबाप्पांचे स्वाधीन केला. गेल्या सालीं ठक्करबाप्पांचा ७१ वा वाढदिवस मुंबई येथें थाटानें झाला. त्यासाठीं ७० हजार रुपयांवर फंड जमवण्यांत आला. जाहीर सभेंत गोपाळराव देवधर आणि विठ्ठलराव शिंदे यांच्या जुन्या आठवणी मोठ्या आदरपूर्वक ठक्करबाप्पांनीं काढल्या आणि ते समक्ष रा. शिंदे यांना येऊन भेटले आणि त्यांनी आशीर्वाद मागितला.
(१०) लक्ष्मणराव बळवंतराव नायक, बी.ए. : ह्यांचा संबंध मिशनशीं मूळ आरंभापासून तों आतांपर्यंत टिकून राहिला. रुपी फंडाचे कॅप्टन, असि. जनरल सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी आणि शेवटीं ट्रस्टी या नात्यानें मिशनचीं मोठमोठ्या अधिकाराचीं कामें मनोभावानें मुकाट्यानें आणि दक्षतेनें केलीं आहेत. प्रथम प्रथम मिशनला दरसाल १०० रुपये वर्गणी त्यांच्याकडून मिळे. हल्लीं ते प्रकृतीनें फार अस्वस्थ आहेत. तथापि मिशनकडे त्यांचे सारखें लक्ष आहे.
(११) के. रंगराव : नि. सा. मंडळी निघण्यापूर्वी १० वर्षे ह्यांनीं मंगळूर येथें अस्पृश्यांकरितां संस्था काढली होती. म्हणून ह्यांना माझे साथीदार म्हणण्यापेक्षां मी त्यांचा साथीदार म्हणणेंच श्रेयस्कर. ब्राह्म समाज व अस्पृश्यसेवा यांकरतां ह्यांनीं स्वार्थावर पाणी सोडून आपला सर्व जन्म वेंचला, जीवापाड श्रम केले व अनन्वित छळ सोसला. हे उत्तम वकील होते. जीविताचे अखेरीस चतुर्थाश्रम पत्करून ईश्वरानंद हें नांव घेतलें. ता. २ फेब्रु. १९२८ रोजीं मरण पावले. ह्यांच्या तीन मुली पदवीधर असून मोठ्या जमीनदारांस दिल्या आहेत. पैकीं मधल्या सौ. राधाबाई मद्रासचे प्रसिद्ध जमीनदार पुढारी सुब्बरायन यांची पत्नी होय.