कांही संवयी आणि वागणूक
हा काळ संपविण्यापूर्वी माझ्या कांहीं संवयी व कांहीं विशिष्ट वागणूक यासंबंधीं आठवणी देणें बरें. माझ्या वयाच्या ६ व्या वर्षी मी प्राथमिक शाळेंत गेलों आणि १२ व्या वर्षी हायस्कुलांत गेलों. १९ वें वर्ष संपण्यापूर्वी माझें दुय्यम शिक्षण संपलें. ह्या तिन्ही टप्प्यांत माझ्या स्वभावांत निरनिराळे फरक पडून अधिकाधिक विकास घडत असलेला मला देखील कळून येत होता.
पेहरावा : प्राथमिक शाळेंत असतांना माझ्या पोषाखाचे बाबतींत मी फार गबाळ्या होतों. कर्नाटकांत प्राथमिक शाळेंत जाण्याच्या वयांतही लहान मुलें रुमालच बांधीत असतात. अजूनही खेड्यांत तेथें हाच प्रकार दिसतो. पुणेरी टोपी मीं सबंध हायस्कुलांत असतांना घातली नाहीं. पुण्यांत कॉलेजांत आल्यावर मोठमोठीं बी.ए.च्या वर्गांतलीं मुलें नेहमींच-आणि मोठे प्रोफेसरही केव्हां केव्हां-टोपी घातलेलीं पाहून आम्हां कर्नाटकीयांना मोठेंच आश्चर्य वाटे. आमच्या हायसकूलच्या काळांत पुणेरी टोप्या जमखंडी येथील दुकानांत विकत मिळणेंच संभवनीय नव्हतें. मग कोट आणि वास्कुटांचें नांवच घ्यावयाला नको. खादीच्या बंड्यां आणि वरतीं केव्हां तरी घालावयाला लांब झग्याचे व अस्तन्यांचे मांजरपाटी आंगरखे आणि नेसण्यास धोतरें असत. डोईला कर्नाटकी जाडाभरडा रुमाल. तो मला प्राथमिक शाळेंत असतांना तरी नीट बांधावयाला येत नसे ! ब्राह्मणांचीं मुलें लंगोटी घालीत; पण घरंदाज मराठ्यांचीं मुलें धोतरें किंवा विजारी घालावयाचीं. धोतरें मळलेलीं, आंगरख्यावर शाई सांडलेली आणि रुमालाच्या एकदोन फेरी गळ्यांत आलेल्या, कसें तरी अस्ताव्यस्त बांधलेलें खडर्यांचें दप्तर आणि पाटी सांवरीत १०-१०॥ वाजतां आमची स्वारी दुडद्रुड धांवत येई. भूक इतकी लागलेली असे कीं, आईला ओरबाडून खाण्याची तयारी ! आमच्या सोप्यांत समोरच्या भिंतींत एकावर एक असे दोन मोठे कोनाडे असत. वरच्या कोनाड्यांत दप्तर, पुस्तकें वगैरे आणि खालच्यांत कपडे ठेवावयाचे असत. पण मी हें सर्व उभ्याउभ्याच फेकून देत असें. तें सर्व नीट ठेवण्याचें काम माझ्या मोठ्या भावाचें किंवा आईचें. बाबांच्या दाबामुळें आंघोळ केल्याशिवाय गत्यंतरच नसे; पण ती आंघोळ त्याच मासल्याची, म्हणजे सगळें आंग कांहीं भिजावयाचें नाहीं. मात्र कपाळावर गंधाचा नाम मात्र मोठा ओढलेला. त्यामुळें बाबांचें लक्ष आंघोळीच्या व्यंगाकडे जात नसे !
साधी राहणी : पोषाख भपकेदार करणें किंवा दागदागिने घालून नटणें ह्याची मला लहानपणापासून कधींच आवड नव्हती. हायस्कुलांत गेल्यावर पोषाखांतला गैदीपणा कमी झाला. तरी माझें लक्ष अश गोष्टींकडे फारसें नसे. साधेपणा मला नेहमींच आवडे. बरेच दिवस अंगांत बाराबंदी बंडीच असे. अलीकडचा ज्याला (छातीवर गुंड्यां लावलेला) सदरा म्हणतात हा प्रथम मिळाला, तेव्हां मला मोठा आनंद झाला. तो अर्थात् खादीचा होता. तो दिवस श्रावणी सोमवार होता. हा नवीन कपडा घालून मी रामतीर्थास रामेश्वरास जाऊन आलों. एकटाच होतों. वाटेंत किती वेळां तरी माझ्या ह्या नवीन संपत्तीकडे पाहून मीं स्वतःचे अभिनंदन करून घेतलें म्हणून सांगूं ! ह्या वेळीं मी फार तर १२ वर्षांचा असेन.
प्राथमिक शाळेंत असतांना मला एक चमत्कारिक खोड होती. सहज उभा असतांना माझ्या दांतांतून जीभ बाहेर आलेली दिसे. तें मला कळतच नसे. बाबांनीं मला नेहमीं टोकावें, तरी मी आपला बावळटासारखा दांतांत जीभ काढून उभाच. माझी मलाच शरम वाटे; पण ही खोड कांहीं बराच काळ गेली नाहीं.
स्नान : हायस्कुलांत गेल्यावर माझ्यांत किंचित् व्यवस्थितपणा आला; पण त्याची केवळ लहर येऊन जाई. ती लहर आली कीं, मग सर्व वस्तु व्यवस्थित ठेवण्याच्याच नादांत मी गुंगत असें आणि ती ओसरून गेल्यावर पुन्हां येरे माझ्या मागल्या ! हायस्कुलांत गेल्यावर मी नेहमीं थंड पाण्यानें स्नान करावयाला विहिरीवर जात असें आणि जातांना माझे, बाबांचे व इतरांचेही पांढरे कपडे धुवावयास नेत असें. जमखंडीस पाण्याचा तुटवडा असे. चांगल्या स्वच्छ व मुबलक पाण्याच्या विहिरी १।-१॥ मैलावर असत. तितकें लांब जाऊन स्वच्छ स्नान करून, कपडे धुऊन, व्यवस्थित घड्यां घालून मी परत येत असें.
अखंड सहवास : घरांतली माझी मैत्रीण म्हणजे माझी धाकटी बहीण जनाक्का. ही आमची जोडी जन्मभर आहे. अगदीं लहानपणीं आमची गट्टी जमण्याचे आणि फू होण्याचे हेलकावे घड्यांळ्याच्या लंबकापेक्षांही वारंवार होत असत. दर सेकंदास भांडणारीं आम्ही भावंडे झोंपेंतच काय तीं अलग होत असूं. माझा वडील भाऊ आमचें भांडण मिटवीत असे; पण तो वारल्यावर जणूं मिटविणारा कोणी नाहीं म्हणून कीं काय आमचें भांडणच मिटलें ! खरें पाहतां माझा स्वभावच बदलला. माझ्या बहिणीवरच्या सात्त्विक प्रेमाचा वाढता प्रवाह संथपणानें अखंड वाहूं लागला. माझा शाळेंतला अभ्यास, माझें खासगी वाचनाचें व्यसन, माझ्याभोंवतालचा सततचा सोबत्यांचा गराडा ह्या सर्व विक्षेपाला न जुमानतां मी माझ्या बहिणीशीं खेळत असें. आतां मी आणि ती वृद्ध झालों आहों, तरी आमच्या सहवासांत खंड नाहीं.
गुळळव्वा : नवरात्र आलें कीं जनाक्काचा चिमुकला घट निराळा बसविणें, गणेशचतुर्थी आली कीं तिचा छोटा गणपति निराळा मांडणें, आषाढांतला मंगळवार आला कीं तिची गुळळव्वा सजविणें या नाना प्रकारचे खेळांची सजावट ती सासरीं जाईपर्यंत करण्यांत मी मोठा आनंद मानीत असें. आमच्या ह्या बालमैत्रीचें कौतुक करून आमची आई आम्हांला उत्तेजन देत असे. गुळळव्वा ही एक कर्नाटकी ब्राह्मणेतर मुलींची मंगळागौरच म्हणावयाची. देवळाच्या शिखराप्रमाणें एक चिखलमातीचें लहानसें देऊळ कुंभाराकडून दाणे घालून आम्ही विकत आणीत असूं. मग त्याला गुंजा, बटगुंजा व करडीचे पांढरे दाणे मी कलाकुसरीनें चिटकवीत असें. हिची पूजा मंगळवारीं रात्रीं होई. एका जेकावर (चिखलाचा ६ इंचांचा एक लहानसा खांब) एक आडवी चोय ठेवून तिला दोन्ही टोकांना चिखलाच्या पणत्यांतून दिवे लावून ते गरगर फिरवून आम्ही गुळळव्वापुढें खेळत असूं. चिखलाचा एक रेडा करावयाचा, त्याच्या पाठीला एक खळगा करून त्यांत कुंकवाचें पाणी भरावयाचें आणि चिखलाच्याच सुरीनें तो रेडा गुळळव्वापुढें कापावयाचा. ह्या कामांत माझा हातखंडा. दुसरे दिवशीं बुधवारीं गुळळव्वाचं विसर्जन करावयाला आम्ही जनाक्काच्या मैत्रिणी घेऊन डोंगरांत जाऊन संबंध दिवसभर खेळून येत असूं. तेव्हां शिदोर्या, लाह्या, खोबरें ह्यांची लयलूट ! हें एक बाळ वनभोजनच. खरें पाहतां हा खेळ मुलींचाच. मी गेलों म्हणजे मुली ''शेळ्यांत लांडगा आणि बायकांत हांडगा'' असें म्हणून माझी टिंगल करीत. तरी पण जनाक्कासाठीं तें सर्व सोसून तिच्या खेळाचें सुख मी भोगी. मी माझ्या वाचनांतल्या गोष्टी व सहलींतील अनुभवही जनाक्काला वेळोवेळीं सांगून तिला मी माझ्या ज्ञानाच्या व माहितीच्या पातळीवर ( Level ) ठेवण्याचा सतत प्रयत्न करी. जनाक्काचा प्रतियोगी सहकार असावयाचाच.
घरकामाची लहर : लहर आली म्हणजे मी आईच्या घरकामालाही हातभार लावीत असें. विशेषतः सणावारीं स्वयंपाकघरांत कांहीं गोडधड होऊं लागलें कीं, माझ्या मातृभक्तीला पूर यावयाचा ! नागपंचमीचे लाह्यापाठीचे लाडू, गणेशचतुर्थीचे मोदक, नवरात्रीच्या कडाकण्या, दिवाळीच्या करंज्या-कडबोळीं, मोहरमांतला मलीदा-चोंगे वगैरे खाण्याचे पदार्थ करण्याला माझीं पुस्तकें टाकून तिच्या पुढेंपुढें मी इतका सुळसुळत असें कीं, जणूं तिची मी एक सूनच ! आईनें पुरण घातलें कीं कणीत मऊ करण्याला मी काच्या मारून दुःशासनवधासाठीं जसा भीम असा सज्ज होई ! अशा वेळीं रामायण-भारतांतले वामनाचे श्लोक, मोरोपंतांच्या आर्या आईपुढें म्हणून दाखविण्याचा तोंडाचा पट्टा एकदां का सुरू झाला, कीं कणीक मऊ झाली तरी हें साग्रसंगीत दुःशासनवध चालूच राही. मग आई तिकडे न कां ऐकेना ! ''अरे विठ्या, लांकडांचें असतें तर हें तोंड केव्हांच झिजलें असतें कीं रे !'' असें आई कानडींत म्हणे. जनाक्का मात्र मोठी कामचुकार असे. खायला मी आणि कामाला माझा मोठा भाऊ, हा तिचा बाणा असे.
अव्यवहारीपणा : डोंगरांतून जळाऊ लाकडांचा भारा आणून आईला मदत करण्याचें एकदां अस्मादिकांनीं मनांत आणिलें. लागलीच एक कुर्हाड व एक मोठी दोरी मी घेऊन निघालों. पण शेवटीं ''जेनु काम तेनु थाय, बिजा करेसो गोते गाय'' असाच शेवटीं प्रकार घडला. जाळण्याला अगदीं निरुपयोगी अशा कांटेरी झुडुपांचा भारा मीं तयार केला. पण तो कांहीं केल्या मला घरापर्यंत आणतां येईना. रात्र पडावयाला झाली तरी हा गडी घरीं येईना, म्हणून आई अर्ध्या वाटेवर मला हुडकायला आलेली भेटली. भारा अर्ध्या वाटेवरच टाकून कसें यावें लागलें ही रडकथा आईस सांगण्याची पाळी आली. कसली लांकडें गोळा केलीं हें आईनें विचारतां त्या झुडुपाचा मासला दाखविला. तिनें कपाळाला हात मारून म्हटलें, ''हायस्कुलांत पहिला नंबर मिळाला तरी जळाऊ लाकूड कोणतें व त्यांचा भारा घरापर्यंत कसा आणावा हें व्यवहारज्ञान तुला नाहीं रे पोरा ! लाकडें नाहींत तीं नाहींत, पण दोरी मात्र डोंगरांत टाकून हात हालवीत आलास. काय तुझी तारीफ !'' ही गोष्ट मी मोठा झाल्यावर आई मला सांगून कितीदां तरी हिणवीत असे. मी किती जरी पंडित झालों, तरी प्रपंच चालविण्याचें शहाणपण माझ्यांत येईल कीं नाहीं ह्याविषयीं ती साशंकच असे. माझ्या भावी आयुष्यांत ही माझ्या आईची शंका खरी ठरली !
बाजारांत जाऊन एखादा जिन्नस खरेदी करून आणणें मला आवडत नसे. तें व्यवहारज्ञान माझेमध्यें शेवटपर्यंत आलें नाहीं. ह्यासंबंधींची एक मजेची गोष्ट मला आठवते ती अशी.
बाजारांतील शोभा : शाळेंत माझा अभ्यास उत्तम असे. विशेषतः गणितांत मी हुषार होतों. रामजीबावांचा विठू म्हणजे इंग्रजी शाळेंतला एक मोठा वाखाणण्यासारखा मुलगा, अशी गांवांत प्रसिद्धि झालेली होती. पण माझें शिक्षण सर्व नव्या तर्हेनें झालेलें असल्यानें जुन्या गांवठी शाळेंतल्याप्रमाणें मोडी अक्षर वळणदार काढणें, हस्तलिखित मोडी पत्रें वाचणें, तोंडचे हिशेब करणें हें उपयुक्त आणि व्यावहारिक शिक्षण मला मिळालें नव्हतें. त्यांत माझा लाजाळू स्वभाव ! त्यामुळें मी बाजारांत जाणें नेहमीं टाळीत असें. मोहदीनसाहेब नांवाच्या वाण्याचे दुकानांत आमच्या घरचें उधारी खातें होतें. त्या दुकानांत जाऊन जिन्नस आणावयाचें मी टाळीत असें. पण एकदां कांहीं सामान आणणें मला भागच पडलें, म्हणून मी गेलों. कधीं दुकानांत न येणारा शाळेंतला मोठा नांवाजलेला मुलगा आलेला पाहून, मोहदीनसाहेबांनीं तोंडचे हिशेब मला कसे काय येतात तें पाहण्याची कसोटी चालविली. मी जें चुकवीत होतों तेंच पुढें आलें. मला कांहीं त्यांच्या साध्या प्रश्नांस उत्तरें देतों येईनात. मग काय ? त्यांना माझीच नव्हे तर नवीन इंग्रजी शिक्षणाचीही टर उडविण्याची अमोलिक संधि आयतीच मिळाली. त्यांच्या दुकानांत नेहमीं बसणारा उठणारा त्यांचा एक अडाणटप्पू मित्रही जवळच बसला होता. मला कांहींच सांगतां येईना, तेव्हां माझ्या अंगाला दरदरून घाम आला ! खालीं घातलेली मान वर करवेना कीं उठून जाववेना ! जवळ बसलेल्या त्या टोळभैरवाचें नांव रामय्या असें होतें. माझी अशी भिरकंडी उडालेली पाहून रामय्यानें दांटगट कानडी भाषेंत म्हटलें, ''वजन करणार्या शेराचा दगड घाल त्याच्या कपाळांत; म्हणजे तरी कांहीं उत्तर सुचेल. काय म्हणे हा शाळेंत पहिला नंबर आहे ! आणि येवढा साधा हिशेब विचारला, तर बोबडी वळली, द्या ढकलून त्याला खालीं. बघतां काय !'' मोहदीनचें दुकान आमच्या शाळेसमोरील मारुतीचे देवळाला लागून भर चौकांत असलेलें. ही शोभा झाल्यावर कित्येक महिने त्या दुकानासमोर फिरकण्याचें देखील मला धैर्य होईना !