इंटरमिजिएटचें वर्ष
उलटा प्रकार : माझ्या हायस्कूलच्या काळापेक्षां कॉलेजचा काळ फार निराळा गेला. हायस्कुलांत गेल्यापासून आमच्या घरच्या सांपत्तिक परिस्थितीमुळें मला मोठी आपत्ति कशी भोगावी लागली ह्याचें वर्णन मीं केलेंच आहे; पण ही आपत्ति मी अजून लहान व मुग्ध असल्यामुळें मला तितकी जाणवली नाहीं. ती माझ्या आई-बाबांस जाणविली. मी त्यांच्या आश्रययाखालीं सुखांत (चैनींत) नाहीं तरी समाधानांत होतों. जमखंडीसारख्या मागासलेल्या ठिकाणच्या मानानें माझा अभ्यास व हुषारी फार चांगली असल्यामुळें व मला स्कॉलरशिप मिळत असल्यामुळें मी आनंदांत असें. आईबाबांच्या सहवासाशिवाय माझ्या भोंवतालच्या मित्रमंडळीच्या सहवासामुळें माझा हायस्कूलचा सर्व काळ अगदीं मजेचा गेला; पण कॉलेजचा सर्व प्रकार ह्याच्या उलट घडला.
गाढवी सवाष्णी : प्रीव्हियस परीक्षेंत मी पास झालों असें मला जमखंडीसच कळलें. कॉलेजची परीक्षा पास झालेला पहिलाच विद्यार्थी ह्या नात्यानें जमखंडी गांवांत माझी ख्याति अधिकच पसरली. पुण्यास परत येऊन मुंबई इलाख्यांतील प्रीव्हियसला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांमध्यें माझा नंबर कितवा आला आहे हें जेव्हां मला कळलें तेव्हां माझी मोठी निराशा झाली. माझा नंबर पहिल्या वर्गांत किंवा दुसर्या वर्गांत तर आलाच नव्हता, पण तिसर्या वर्गांतही फारसा वर नव्हता, हें पाहून जमखंडींतील माझी हुषारी म्हणजे खेडेगांवांत गाढवी सवाष्णी ही. म्हण प्रत्ययास आणून देणारीच एक चीज झाली. जमखंडी हायस्कूल म्हणजे एक क्षुद्र उंबराचें फळ. त्यांत भरार्या मारणारा मी एक किडा. मुंबई विश्वविद्यालयाच्या विस्तीर्ण उघड्यां अंगणांत आल्यावर माझें अल्पबळ मला कळून आलें !
ह्याशिवाय कॉलेजशिक्षणांत मी निस्तेज होण्याचीं दुसरींही अनेक कारणें होतीं. माझ्या घरच्या गरिबीची जाणीव जी मला हायस्कुलांत घडली नाहीं ती पुण्यास मी एकटाच आईबापांपासून दर राहूं लागल्यामुळें मोठ्या तीव्रपणानें भासूं लागली. शिवाय माझ्या लाजाळू स्वभावामुळें जमखंडींतलेच जे काय १।२ ओळखीचे सोबती होते, त्यांपलीकडे पुणेंकर विद्यार्थ्यांपैकीं कोणाशीं माझी मैत्री जमली नाहीं. जनार्दनपंत करंदीकर, विश्वनाथ पोंक्षे आणि मी ह्या तिघां जमखंडीच्या विद्यार्थ्यांपैकीं करंदीकर आणि मी दोघेच पास झालों.
कंगाल स्थिति : फर्ग्युसन कॉलेजची त्या वेळेची स्थितीही माझ्या स्वतःच्या स्थितीप्रमाणें कंगालच होती. वसतिगृह, क्रीडांगण वगैरे इतर उपकरणांचा व विद्यार्थ्यांनीं वरचेवर एकत्र जमण्याच्या प्रसंगांचा अभाव असल्यामुळें त्या वेळची आमची - निदान माझी तरी - स्थिति जंगलांत चुकलेल्या कोंकराप्रमाणें असह्य भासत होती. अनेक कारणांमुळें कॉलेजच्या शिक्षणावर माझें प्रेम बसेना. हायस्कुलांतली मनाची तरतरी, गुलहौस ही झपाट्यानें मावळूं लागली. अशांत घरगुती संकटांनीं एकदम उचल खाल्ली आणि माझ्या सत्त्वाची चहूंकडून ह्या काळांत पारख चालली. त्यांतून मी कसा निभावलों ह्याचें मला अद्यापि नुसतें आश्चर्य वाटतें; पण नीट मीमांसा कांहीं होत नाहीं.
जमखंडीचे यजमान श्री. आप्पासाहेब रामचंद्रराव यांनीं माझ्या वडिलांनाही नोकरीवरून कमी केलें. त्यामुळें चहूंकडूनच आकाश फाटल्यासारखी स्थिति झाली. पुण्यास माझा व जमखंडीस माझ्या घरचा योगक्षेम कसा चालला हें मला आतां कांहींच सांगतां येत नाहीं !
जनाक्काचा छळ : अशा कठीण स्थितींत आणखी एक संकट उद्भवलें. माझ्या दोन लहान बहिणींपैकीं मोठी बहीण जनाक्का हिचा सासरी फार छळ होत होता. तिची सासू मोठी खाष्ट बाई होती आणि नवरा फार अविचारी व उर्मट होता. ह्या सासूचा व नवर्याचा छळ जनाक्काच्या सासर्याला प्रत्यक्ष आवडत नव्हता, पण त्याचें घरीं अशा बाबतींत चालत नसे. जनाक्का चार इयत्तेपर्यंत लिहावयाला-वाचावयाला शिकली होती आणि तिचा नवरा केवळ अक्षरशत्रु होता, एवढेंच ह्या छळाचें कारण होतें. घरीं पडेल तें सर्व काम एखाद्या मोलकरणीप्रमाणें जरी जनाक्का आपल्या लहान वयांत बिनबोभाट करीत असे, तरी तिच्या सासूला तें खपत नसे. शेवटीं जनाक्काच्या नवर्याला बाहेरचा नाद लागून त्यानें घरीं एक द्वितीय संबंधाची बायको आणिली आणि जनाक्काच्या जिवाला अपाय घडण्याचे प्रसंग वरचेवर येऊं लागले.
गोष्ट येथवर आल्यानें मला ह्या प्रकरणांत हात घालावा लागला. घरची गरिबी, माझ्या कॉलेजच्या खर्चाची ओढाताण, अशा स्थितींत जनाक्काची मी काय व्यवस्था करणार ? पण त्या वेळीं माझ्या सुधारणेच्या मताला आणि सामान्यतः स्त्रीजातीसंबंधीं कारुण्यालाही पूर येत होता. अशा वेळीं प्रत्यक्ष माझ्या बहिणीवर, तिची वागणूक इतकी पवित्र व स्वभाव सहनशील असूनही, असा प्रसंग आलेला पाहून मी बेफाम झालों. मी त्या वेळीं मे महिन्याच्या सुटींत जमखंडीस आलों असेन. माझ्या कानांवर जनाक्काच्या छळाची वार्ता पडल्याबरोबर मीं माझ्या आईबाबांना तिला एकदम आमचें घरीं आणावयाचा आग्रह केला. आमचे बाबाही मानीच होते. आम्हीं कोणींच ह्यापेक्षां मागचा पुढचा जास्त विचार न करतां, आमच्या आलगूरच्या मामांना माझ्या बहिणीला आसंगीहून आमचे घरीं आणण्याला पाठवून दिलें. त्यामुळें जनाक्काच्या सासूला व नवर्याला आयतेंच फावलें. त्यांनीं जनाक्काचे सर्व दागिने काढून घेऊन नेसलेल्या एका फाटक्या लुगड्यांनिशीं तिला मामांबरोबर तात्काळ पाठविली. त्यावर आम्हीं जनाक्काला अखेरपर्यंत आसंगीला कधींच पाठविलें नाहीं. अगदीं लहानपणींच जनाक्का अशी आपल्या सासरला कायमचीच अंतरली आणि ती केवळ अविवाहित अशी आमचे घरीं राहिली.
ह्यापुढें कांहीं दिवसांनीं जनाक्काचा सासरा गोपाळराव हा तिला न्यावयाला आला; पण तिला सासरीं कोणत्याही प्रकारें सुख लागण्याची आशाच नव्हती. उलट तिच्या जिवालाच अपाय घडण्याची भीति होती, म्हणून आम्हीं तिला पाठविली नाहीं. गोपाळरावालाही विशेष आशा वाटत नव्हती; म्हणून तो बिचाराही जास्त आग्रह न करतां निमूटपणानें आल्या पावलींच परत गेला. ह्या सर्व प्रकरणाला मीच कारण होतों, म्हणून जनाक्काच्या पुढच्या सर्व आयुष्याची जबाबदारी माझ्या कोवळ्या शिरावर पडली. हें किती प्रचंड ओझें मीं शिरावर घेतलें ह्याची मला त्या वेळीं कांहींच कल्पना नव्हती ! ह्या वेळीं माझी इंटरमिजिएट क्लासांतली एक टर्म संपली असावी; पण मला हा काळ नक्की कोणता हें आतां आठवत नाहीं.
बाळमित्र : प्रीव्हियस परीक्षा पास होऊन मी पुण्यास आल्यावर प्रथम नारायण पेठेंत मुंजाबाचे बोळासमोरील केळकरांचे वाड्यांत खोली घेतली होती. एक खोली माझी आणि दुसरी कोल्हापूरचे रा. गोविंदराव शासने यांची असें जोडखोलीचें तें एक दालन होतें. दुसरें विजापूरचे रा. गोविंदराव कलकेरी आणि कोल्हापूरचे रा. तळाशीकर ह्यांचे एक जोडखोलीचें दालन, अशा चार खोल्या आम्हां चौघांमध्यें होत्या. अर्थात् मी ह्या वेळीं खोलीचें भाडें भरीत होतों; पण कसें तें मला सांगतां येत नाहीं. रा.शासने ह्यांची ओळख नक्की कोठें व कशी झालीं हें मला आतां निश्चितपणें आठवत नाहीं; पण आरंभापासून अगदीं आतांपर्यंत टिकलेल्या अगदीं थोड्यां मित्रांपैकीं, म्हणजे चौघां मित्रांपैकीं ते एक आहेत. तेरदाळचे विष्णुपंत देशपांडे हे इंग्रजी ५।६ व्या इयत्तेपासून म्हणजे इ.स. १८९० पासून, प्रिन्सिपॉल केशव रामचंद्र कानिटकर हे प्रीव्हियस वर्गापासून म्हणजे इ.स. १८९३ पासून आणि गोविंदराव शासने इंटरमिजिएट वर्षापासून म्हणजे सन १८९४ पासूनच माझे मित्र आहेत. पहिले देशस्थ, दुसरे कोकणस्थ ब्राह्मण आणि तिसरे मराठा जातीचे आहेत. चौथे जनार्दनपंत करंदीकर हे तर माझ्या गांवचेच बाळमित्र आहेत. ह्यांपेक्षां जास्त लहानपणापासूनचे मित्र किंवा अलीकडचेही कोणी विशेष म्हणण्यासारखे समान वयाचे मित्र मला नाहींत.
रा. शासने : शासने ह्या वेळीं पुणें नेटिव्ह इन्स्टिट्यूशन नांवाच्या हायस्कुलांतील ७ व्या इयत्तेंतील विद्यार्थी होते. ते वयानें माझेपेक्षा सुमारें वर्ष-सहा महिन्यांनीं मोठे असावेत. हे दिलदार मनाचे मराठा मित्र लवकरच माझ्या घरांतल्या माणसाप्रमाणें मला जवळचे भासूं लागले. 'समानशीले व्यसनेषु सख्यम' ह्या न्यायानें आम्हा दोघांचा सहज जो स्नेहसंबंध जडला तो कायमचाच जडला. माझा स्वभाव तापट तर त्यांचा किरकिर्या ! ह्या प्रकृतिदोषामुळें आमच्यांत नेहमीं कमीअधिक गोष्टींवरून वाद माजे व तो विकोपासही जाई; पण त्या मतभेदामुळें आमच्या स्नेहांत लवमात्रही बाधा येत नसे. गोविंदरावांची घरगुती स्थिति माझ्याप्रमाणें तंग नव्हती. त्यांचे वडील कोल्हापुरांतील एक घरंदाज फौजदार होते. खाऊनपिऊन सुखी असें तें घराणें होतें. माझीं उदार मतें व मोकळा स्वभाव यांवर लुब्ध होऊन गोविंदराव मजबरोबर राहूं लागले. ते आणि आम्ही घरी अभ्यासांत भिन्न वर्गातले होतें, तरी परस्परांचा स्वाभाविक चांगुलपणा ओळखून होतों.
स्वयंपाकव्रत : ह्या वेळीं साहजिकपणें मला खर्चाचा फारच तुटवडा पडत असावा. कारण खाणावळींत न जातां मी घरींच माझा स्वयंपाक कांहीं दिवस करून जेवत होतों आणि केवळ माझ्यासाठीं म्हणून गोविंदरावही माझेप्रमाणें स्वयंपाकी बनले असतील असें वाटतें; पण दुसर्या टर्ममध्यें परीक्षेचे दिवस जवळ येऊन अभ्यासाचा मारा जास्त पडल्यावर आम्हांला हें स्वयंपाकव्रत नाइलाजानें सोडावें लागलें. मी किंवा गोविंदराव या कलेंत कधींच प्रवीण होण्यालायक नव्हतों. भात आम्ही चांगला करीत असूं; पण गव्हाची पोळी मात्र खाण्यापेक्षां प्रदर्शनांत पाठविण्याच्या अधिक लायक होत असे. त्यामुळें प्रकृतीवरही परिणाम होऊन हा नाद आम्हीं सोडला.
चैतन्यशून्यता : माझ्या हायस्कूलच्या काळच्या आठवणी लिहितांना माझे मित्र, खेळ, इतर छंद वगैरेंसंबंधीं मला बरेंच लिहितां आलें, तसें मला कॉलेजच्या काळासंबंधीं लिहितां येत नाहीं. ह्याचें कारण हेंच कीं, दारिद्र्यामुळें व आईबापांच्या आश्रयापासून दूरच्या रहिवासामुळें माझ्या स्वभावांतला सहज आनंद बराच कमी झाला. किंबहुना मला अकालीं पोक्तपणा व विचारीपणाही आला. त्यामुळें माझा खेळकरपणा तर पार मावळलाच; पण मला इतरांशीं मैत्री जोडण्याची हौसही नाहींशी झाली. फार काय पण कॉलेजच्या वर्गांतील ठरीव अभ्यासावरील मनही उडूं लागलें. अभ्यास जुलमाच्या रामरामाप्रमाणें मला दुःसह झाला. त्यामुळें फर्ग्युसन कॉलेजबद्दलच नव्हे, तर एकंदरींत तत्कालीन विश्वविद्यालयीन चैतन्यशून्य शिक्षणपद्धतीसंबंधीं विरक्ति आणि विमनस्कता माझ्यामध्यें वाढूं लागली. जमखंडी हायस्कुलांत पहिला नंबर म्हणून मिरविलेला मी फर्ग्युसन कॉलेजमध्यें कोठल्या कोनाकोपर्यांत बेपत्ता विद्यार्थी होऊन राहिल्याची मला मनांत टोंचणी लागली. अभ्यासाची हयगय चाललेली माझ्या लक्षांतच येईना !
बौद्धिक विकास : ठराविक अभ्यासाची वर सांगितल्याप्रमाणें अवस्था झाली तरी माझ्या मनाचा व बुद्धीचा विकास थांबला अशांतला मुळींच प्रकार नव्हता. तें कधीं शक्यच नव्हतें. ह्याहीपेक्षां भयंकर आपत्ति मजवर पुढील आयुष्यांत किती तरी कोसळल्या, तरी माझ्या मनाची अंतर्वाढ थांबणें शक्यच नव्हतें. सहज आनंद हा माझ्या मनोरचनेचा पायाच आहे, असें आतां मला दिसूं लागलें आहे. माझ्या आनंदाला, शांतीला, समाधानाला-अतएव अंतर्विकासाला बाह्य उपाधीची मदत झाली नाहीं किंबहुना विरोधही झाला नाहीं.
सोबती, खेळ, बाह्य सुखसोयी वगैरेंची बाजू लंगडी पडली, तरी माझें खासगी वाचन त्या काळच्या मानानें बरेंच चाललें होतें. जमखंडीसारख्या गांवढ्या गांवांतल्या हायस्कुलांत पुस्तकालयाची उणीव होती तितकी व तशी फर्ग्युसनसारख्या नवीन चालू झालेल्या का होईना, पण कॉलेजांत असणें शक्य नव्हतें. प्रीव्हियस वर्गांत असतांनाच मला जॉन स्टुअर्ट मिल्लसारख्या तत्त्वज्ञान्याचा आणि मेकॉलेसारख्या ऐतिहासिक निबंधकाराचा परिचय घडला. Liberty (स्वातंत्र्य), Utilitarianism (उपयोगवाद, बहुजनहितवाद), Subjection of Women (स्त्रियांची गुलामगिरी) वगैरे मिल्लचे प्रासादिक ग्रंथ मूळ इंग्रजींत वाचून कानांत वारें शिरलेल्या वासराप्रमाणें माझी स्थिति प्रीव्हियसमध्येंच झाली होती ! इंटरमिजिएटमध्यें आल्यावर हर्बर्ट स्पेन्सरच्या Education (शिक्षण), Introduction of the Study of Sociology (समाजशास्त्राच्या अध्ययनाचा परिचय) ह्या इंग्रजींतील मूळ ग्रंथांचे वाचन झाले. त्या वेळीं स्पेन्सरची चलती युरोप-अमेरिकेंतच नवहे तर हिंदुस्थान व जपान ह्या पौर्वात्य देशांतही फार वैभवशाली आणि विजयी झाली होती. त्या काळचे कॉलेजांतले बहुतेक शिक्षक स्पेन्सरच्या अज्ञेयवादानें जवळजवळ झ्पाटल्याप्रमाणेंच झाले होते. दाभोळकर नांवाच्या एका गृहस्थांनीं तत्कालीन तरुण विद्वान् गृहस्थांकडून स्पेन्सरच्या बर्याच ग्रंथांची भाषांतरमाला प्रसिद्ध करण्याचें काम नेटानें चालविलें होतें. त्यांपैकीं बरींच पुस्तकें मी हावर्यासारखीं वाचीत असें.
नास्तिकपणा : जेथें आमचे गुरुच त्या नवीन विचारानें असे हैराण झालेले, मग माझ्यासारख्या उतावळ्या विद्यार्थ्याची अत्यवस्था झाली, असें म्हणावयाला काय हरकत आहे ? पुस्तकें जरी मीं म्हणण्यासारखीं पुष्कळशीं वाचलीं नसलीं तरी जीं तात्त्वि महत्त्वाची वाचलीं त्यांचा माझ्यामध्यें फार जोराचा अभिनिवेश घडला. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे जमखंडींतल्या आमच्या वाड्यांतल्या अंधेर्या देवघरांत बसून श्रीशिवलीलामृताचें पारायण करीत शिवलिंगावर श्रावणी सोमवारीं सहस्त्रदळें वाहिल्याशिवाय तोंडांत पाणी न घेणारा मी पुण्यांत आल्यावर आगरकरांचे लेख आणि मिल्ल-स्पेन्सरचे प्रत्यक्ष ग्रंथ वाचून पुण्यांतल्या विद्यार्थ्यांत एक पठ्ठया नास्तिक बनलों !
चर्चामंडळ : मी नुसतें वाचून स्वस्थ बसणारा युवक नव्हतों. जें आपल्या मनांत आलें तें दुसर्याजवळ बोलून त्यावर चर्चा करावयाची प्रवृत्ति किंबहुना खोड माझ्यामध्यें आनुवंशिकच होती. माझ्या वडिलांप्रमाणेंच मलाही बोलावयाला फार आवडतें. मात्र लाजाळूपणाचा दाब असल्यामुळें अपरिचिताजवळ किंवा अप्रासंगिकपणें वाकतांडव करण्याचें मात्र मला कधीं धैय होत नसे. तथापि पोटांत घटकाभर विष आवरेल, पण नवीन विचार अगर एखादा सुंदर अनुभव मनाला घडला, कीं कोणा तरी सहानुभूतीच्या मित्राजवळ किंवा आताजवळ ओकून टाकल्याशिवाय मला चैनच पडत नसे. ह्यामुळें केळकरांच्या वाड्यांत असतांना माझ्या नेतृत्वाखालीं आमच्या खोलींत एक छोटेखानी Debating Union (चर्चामंडळ) स्थापन करण्यांत आलें होतें. त्यांत माझाच सुळसुळाट जास्त असावयाचा. ह्या लहानशा मंडळांत नवीन भेटलेल्या मिल्ल-स्पेन्सरच्या विचारांची पुनरावृत्ति करण्यांत मी मोठें वक्तृत्व पाजळीत असें. ह्या वत्तृफ्त्वाची संवय आमच्या जमखंडींतील वसंत व्याख्यानमालेंतल्या माझ्या ढुढ्ढाचार्यपणावरून मला लागत चालली होती. विचारस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, विकासवाद, स्त्रीदाक्षिण्य इ. मोठमोठ्या अवजड विषयांवर लहान तोंडीं मोठा घास घेण्याचें मला जमखंडींतल्या वसंत व्याख्यानमालेंतच अगवळणीं पडलें होतें. मग पुण्यासारख्या वाचाळ आणि मुंबईसारख्या चवचाल शहरांचा संपर्क घडल्यावर आणि विशेषतः मिल्ल-स्पेन्सरच्या तत्कालीन वेदतुल्य नवीन विचारांच्या ज्ञानलवांनीं दुर्विदग्ध झाल्यावर माझें डोकें ताळ्यावर राहणें कठीण झालें. मंडळांतील सभांतून नव्हे तर विद्यार्थ्यांशीं खासगी संभाषणांत मी त्यांना माझा नवीन तुटपुंजा नास्तिकपणा शिकवूं लागलों. त्या वेळीं मीं एक लहानसा निबंध इंग्रजींत लिहिला होता. त्यांत 'देवानें माणसाला निर्माण केलें नसून उलट माणसानेंच देवाला निर्माण केलें' हें अर्धवट सत्य मीं मोठ्या उत्साहानें प्रतिपादिलें होतें, हें पण आतां नीट आठवतें ! तें कसेंही असो, कोणीं कोणाला निर्माण केलें हा वाद जगाच्या अंतापर्यंत चालणारा आहे; पण इतर अनेक कारणांत माझ्या विक्षिप्त खाजगी वाचनाची आणि वादविवादांची भर पडून ठराविक अभ्यासाची आबाळ झाली. अर्थात् मला इंटरमिजिएट परीक्षेंत अपयश आलें ! जमखंडी हायसकुलांतील पहिला नंबर विश्वविद्यालयांत बराच खालीं घसरतो; इतकेंच नव्हे तर उगीच घमेंड मारील तर चांगली आपटीही कसा खातो, हें माझ्या प्रत्यक्ष अनुभवास आलें. विशेष हा कीं, ज्या (Logic) तर्कशास्त्र ह्या विषयांत माझा विशेष तोरा चालत असे त्यांतच मी नापास झालों हें पाहून 'ज्वर इव मदो मे व्यपगतः' हा भर्तृहरीचा टोमणा मला चांगलाच जाणवला !
पशुपणा : परीक्षेंत नापास होण्याचा अनुभव मला आतांपर्यंत मुळींच नव्हता. तो आला हें एका परीनें बरेंच झालें. वाईट वाटणें साहजिकच होतें; पण अगदीं धक्का असा बसला नाहीं. मात्र विश्वविद्यालयीन परीक्षांविषयीं आदर कमी कमी होऊं लागला. ह्या परीक्षेच्या चरकांत तरुण विद्यार्थ्याचें रक्त कसें पिळून निघतें आणि इतक्या रक्ताच्या आहुत्या ओतूनही शेवटीं अवयशाचा टिळा लागला म्हणजे विद्यार्थ्याचें कंबरडेंच कसें मोडतें हें कळलें ! कंबरडें मोडल्यावरही पुन्हां जो कॉलेजची वाट धरितो तो ''स वै मुक्तोऽथवा पशुः'' ह्या वचनाप्रमाणें मुक्त किंवा पशु असावा. मी मुक्त नसल्यामुळें पशुपणा पदरीं घेऊन इ.स. १८९५ चे जानेवारींत हातांत नाक धरून जमखंडीहून पुन्हां कॉलेजच्या अभ्यासासाठीं पुण्याला निघालों !
कडेवाला त्रिम : इ.स. १८९४ सालीं आम्ही नारायण पेठेंत केळकरांच्या वाड्यांत असतांना सदाशिव पेठेंतील प्रसिद्ध हौदावर रोज सकाळीं स्नानास जात असूं. त्याच हौदाला लागून पूर्वेस करमरकरांचा (नांव पक्कें आठवत नाहीं) वाडा आहे. त्यांत एक ब्राह्मणाची खाणावळ होती. तेथें मी आणि गोविंदराव जेवावयास जात असूं. इ.स. १८९५ च्या वर्षारंभीं मी पुन्हां पुण्यास आल्यावर पहिल्या टर्ममध्यें ह्याच वाड्यांतील दुसर्या मजल्यावर आम्हीं बिर्हाडासाठीं एक खोली भाड्यांनें घेतलीं. तिच्यांत गोविंदराव, त्यांचे कोल्हापुराकडचे कुलकर्णी नांवाचे एक स्नेही, जनुभाऊ करंदीकर आणि मी इतकेजण मिळून राहात होतों. तेथें देखील कांहीं दिवस आमच्या चर्चामंडळाच्या कांहीं सभा झाल्या. रा. कुलकर्णी आणि जनुभाऊ हे दोघे अगदीं जुन्या मताचे आणि गोविंदराव व मी तितकेच नव्या मताचे असल्यामुळें ह्या पहिल्या टर्मभर अभ्यासापेक्षां आमचा वादविवादच फार झाला आणि तो अगदीं जोरजारानें पुष्कळ वेळ चालत असे. कुलकर्णी हे घरचे श्रीमंत होते. नेसावयाला रेशीमकांठी धोतर आणि डाव्या हातांत एक भलें मोठें सोन्याचें कडें ते नेहमीं घालीत असत. त्यांच्या जुन्या राहटीचीं हीं झगझगीत चिन्हेंच होतीं. आम्ही त्यांना नेहमीं कडेवाला कुलकर्णी म्हणत असूं. ते बोलतांना किंचित् तोतरे बोलत असत आणि वादांत चिडत असल्यामुळें त्यांच्या तोतरेपणाला मोठी बहारीची लज्जत येत असे ! स्नानसंध्या, सूर्याला नमस्कार, धोतराच्या चापून निर्या, सुंदर चेहरा, पाणीदार डोळे, गोरा रंग आणि हातांतलें बावनकशी सोन्याचें भव्य कडें - एकंदरींत नमुना कांहीं औरच होता. अभ्यासाची प्रगति मात्र ह्या सर्वांच्या उलट दिशेनें धांव घेत होती ! ह्यांच्या सहवासांत ही पहिली टर्म हसतखेळत मजेंत गेली. डेक्कन मराठा असोसिएशनची माझी दरमहा १० रु. ची स्कॉलरशिप चालूच होती, हें निराळें सांगणें नकोच.
खाद्यक्रम : गोविंदरावांची मॅट्रिक्युलेशनची परीक्षा पास झाली कीं नाहीं हें आठवत नाहीं. कुलकर्णी आणि ते पुन्हां नेटिव्ह इन्स्टिट्यूटमध्यें गेले असावेत. ह्या टर्ममध्ये माझी प्रकृति थोडी बिघडावयाला एक चमत्कारिक कारण घडलें. दिवस उन्हाळ्याचे होते. चतुःशृंगीचे माळावर आणि आंबराईंतून आम्ही लांब फिरावयाला जात असूं. फर्ग्युसन कॉलेजची नवी इमारत बांधावयाचें काम त्या माळावर चाललेलें असे. जणूं काय आम्ही सुपरवायझरच, असें समजून तें काम रोज कोठवर आलें तें पाहून येत असूं. आमचें कॉलेज म्हणून मोठा अभिमान वाटत असे ! परत येतांना कच्च्या कैर्या आणि लकडी पुलावरच्या पश्चिम टोकावर बसत असलेल्या एक भडभुंज्याच्या दुकानांतले डाळेकुरमुरे आणि गुडदाणी ही सपाटून खावयाची आणि वरतीं बेसुमार पाणी प्यावयाचें, हा आमचा मेनू (खाद्यक्रम) असे.
व्यायामाची ईर्षा : अशा स्थितींत कडेवाल्या कुलकर्ण्यानें दुसरीच एक शक्कल काढली. ते नमस्कार बरेच घालीत. त्यांचें पाहून आम्हीही व्यायाम करीत असूं; पण व्यायामाप्रमाणें खाणें कांहीं तरी पोष्टिक असलें पाहिजे, म्हणून भिजलेली डाळ, वाळलेलें खोबरें आणि खारका ह्यांचा खुराक आम्हीं सर्वांनीं चालू केला. मग काय विचारतां ? झटपट पैलवान बनण्यास आतुर झालेले आम्ही जातां-येतां डाळीचे फक्के मारणें, खोबर्याचे चावे घेणें आणि खारका कुरतडणें ह्यांत एकमेकांवर चढाओढ करूं लागलों. जो जास्त खाऊन पचवील तो शूर वीर ही व्याख्या ठरली. अशांत पाडव्याचा कीं कसलासा सण आला. खानावळवाल्या बाईनें केळांचे शिकरण केलें होतें. अर्थात केळापेक्षां शिकरणांत पाण्याचेंच प्रमाण बेफाम जास्त झालें होतें. मी मागें पुढें न पाहतां त्याचा समाचार घेतला. तिसरे प्रहरीं पुन्हां कच्ची डाळ, खोबरें, खारका आणि कैर्या ह्यांचा तोबरा चालू झाला. ह्याचा काय परिणाम झाला, हें निराळें सांगण्याची आतां जरुरीच उरली नाहीं.
आजार : त्या रात्रीं इतर मंडळी निजली; पण मला कांहीं झोंप येईना. पोटांत घडघड करूं लागलें; कळा येऊं लागल्या आणि वादळ झाल्यावर ज्याप्रमाणें वळवाच्या पावसाच्या सरीवर सरी याव्यात त्याप्रमाणें जोरजोराचे जुलाब मला होऊं लागले. चारपांच जुलाबानंतर मला जिना उतरून खालीं पायखान्यापर्यंत जाण्याची शक्ति उरली नाहीं. खोलींतल्या न्हाणींतच विधि उरकावा लागला. असे १०।१२ जुलाब झाल्यावर बसावयाचेंही त्राण उरलें नाहीं. पोटांतल्या तिडिकांना कसली उपमा द्यावी हें समजत नव्हतें. कोणी तरी दोघांनीं मिळून एखादें धोतर जोरानें पिळून त्यांतल्या पाण्याचा थेंबन् थेंब बाहेर काढावा तशी माझ्या आंतड्यांची अवस्था झाली. ही उपमा तरी हल्लीं माझ्या आंतड्यांला पीळ पडला नाहीं म्हणूनच सुचत आहे. त्या वेळेला ही सुंदर उपमा सुचणें शक्यच नव्हतें !
दुःखानंद : कादंबरीकार आपल्या स्वकपोलकल्पित कथानकांतील नायक-नायिकेच्या दुःखाच्या वेदनांचें रसभरीत वर्णन करीत असतो, ह्याचें कारण तो स्वतः त्या वेदनांच्या चटक्यांपासून सुरक्षित असतो म्हणूनच. एरवीं हें काव्य शक्यच नाहीं. संगीत नाटकांतील पात्रें रंगभूमीवर उभीं असतांना त्यांच्यावर घोर संकट ओढवलें असतां मोठमोठ्यानें आलाप काढून आपल्या दुःखाचें वर्णन प्रेक्षकांपुढें करीत असतात. फांसावर जाणारा चारुदत्त इतका सुंदर गातो कीं गाऊन गाऊन मरावयाला पडद्याआड जाऊं लागला म्हणजे लोक त्याला ''वन्स मोअर'' करून पुन्हां फासावर आणतात आणि चारुदत्त लोकाग्रहास्तव पुन्हां त्याच वेदनांचा आनंदानें उपभोग घेतो. हा प्रकार पाहून मला तर माझें हंसेंच आवरत नाहीं ! अरे पण मी कोणीकडे भरकटत चाललों ? मीही त्या नटाप्रमाणेंच माझ्या जुलाबांचें वर्णन चालू करतों; कारण पोटांत हल्लीं दुखत नसल्यानें वर्णन करण्यास कोणती हरकत आहे ?
***********************************
मुक्तता : उजाडल्यावर उतार पडला; पण तेव्हां माझ्या तोंडावर निव्वळ प्रेताची कळा आली होती. आदले दिवशीं सायंकाळीं ज्यांनीं पाहिलें होतें त्यांना दुसर्याच दिवशीं पहाटे माझी ओळख लागेना. अशी भयंकर पालट केवळ सहा तासांत घडली ! सकाळीं कोणत्याशा डॉक्टराला बोलावून आणिलें. त्यानें तत्काळ थोडासा हिंग आणि तूप खावयास दिलें; पण औषधापूर्वीच व्याधीचा अस्त झाला असल्याकारणानें हें नाटक शोकपर्यावसायी झालें नाहीं. मात्र डाळ, खोबरें आणि खारका ह्यांच्यावर हद्दपारीची शिक्षा ताबडतोब समरीपॉवरनें बजावण्यांत आली. झटपट पहिलवान होण्याची ईर्षा बाळगणार्या मला घरीं नुसतें पत्र लिहिण्याचें सामर्थ्य यावयालाही बरेच दिवस वाट पाहावी लागली. बिचार्या गोविंदरावांना तें पत्र लिहावें लागलें. आजार औट घटकेचा असल्यामुळें ज्यांना आजार झाल्याची बातमी नव्हती त्या माझ्या घरच्या मंडळींना मी आजारांतून बरा झालों हें पत्र वाचून दुःख झालें कीं सुख झालें हें ठरविण्याचें मी वाचकांवरच सोंपवितों !
सुधारकी हेतु : सन १८९५ च्या मे महिन्याच्या सुट्टींत मी जमखंडीला होतों. ह्या वेळीं गोविंदराव व मी आपापल्या कुटुंबांतील कोणास तरी पुण्यास आणून कायमचें घर करून राहाण्याचा विचार करीत होतों. आम्हांला खाणावळीच्या जेवणाचा कंटाळा आला होता. त्या वेळीं दरमहा ५ रुपये खाणावळीचा दर होता. केवळ काटकसरीनें व स्वतःचे घरचें जेवण हेंच एक साधें कारण नसून घरांतील स्त्रीनातलगांना स्त्रीशिक्षण व प्रवासाचा लाभ देण्याचा सुधारकी हेतुही आमच्या तरुण मनांत सळसळत होता. ह्याला कारण हंरी नारायण आपटे ह्यांच्या कांदबर्या ! अशा संधीस माझ्या बहिणीवर प्रसंग ओढवून ती कायमची माहेरीं आली. गोविंदराव आणि माझ्यामधील पत्रव्यवहाराचें पर्यवसान असें झालें कीं, मी पुढील टर्ममध्यें पुण्यास गेलों तो बरोबर माझ्या बहिणीस व मातोश्रीस घेऊनच ! कोल्हापुराहून गोविंदरावही आपल्या पत्नीस व लहान मुलीस घेऊन आले. सदाशिव पेठेंत नागनाथाच्या पाराजवळ पालकरांचा एक मोडकळीला आलेला जुना वाडा होता. त्यांत बरीच स्वस्त जागा दुसर्या मजल्यावर मिळाली. तो वाडा माझे जमखंडीचे मित्र रा. श्रीनिवास नारायण करकंबकर देशपांडे ह्यांच्या मामांच्या मालकीचा होता. त्यांत माझें व गोविंदरावांचें कुटुंब, जनुभाऊ करंदीकर, माझे एक मित्र रामचंद्र नारायण सावंत असे राहूं लागलों. खर्चाचा बोजा गोविंदरावानेंच बर्याच अंशीं आपल्या अंगावर घेतला होता.
सन १८९५-९६ ही वर्षे मुंबई-पुण्यास हिंदु-मुसलमान दंग्याचीं गेलीं. तशांत पुण्यास प्लेग व जमखंडीस दुष्काळ आला. ह्याच वेळीं जमखंडीच्या यजमानांनीं आमच्या बाबांना नोकरीवरून कमी केलें. अशांत मी, बहीण व आई यांना घेऊन पुण्यास शिकावयाला आलों. ह्याला म्हणावी सुधारणेची तळमळ ! मला शिकवण्या धरून प्रपंच व अभ्यास चालवावा लागत असे; पण चि. जनाक्काला कोणत्या शाळेंत घालावी हा विचार चालला. मला पुण्याची माहिती व तेथील शिक्षणाची व्यवस्था अद्यापि चांगली नव्हती. सदाशिव पेठेंत चिमण्या गणपतीजवळ ख्रिस्ती मिशनची मुलींची प्राथमिक शाळा होती. तिची हेडमास्तरीण श्रीमती सांगले नांवाची बाई होती. त्या शाळेंत मीं जनाक्काला घातलें. आनंद झाला. ही प्रत्यक्ष सुधारणेची पहिली पायरी ! आपट्यांच्या कादंबर्या आम्ही भावंडें अधिक आवडीनें वाचूं लागलों.
पंडिता रमाबाई : ह्या वेळीं पंडिता रमाबाई व त्यांचा ख्रिस्ती धर्म बराच गाजत होता. त्यांची पुणें लष्करांत 'शारदा सदन' नांवाची एक मुलींच्या बोर्डिंग शाळेची संस्था होती. माझ्या बहिणीची कांहीं सोय लागते कीं काय हें पाहण्यासाठीं मी ह्या मोठ्या धेंडाला भेटावयाला गेलों. बाई शांत व गंभीर दिसल्या; पण त्यांचा ख्रिस्ती कावा बरेंच बोलणें झाल्याशिवाय दिसण्यासारखा नव्हता. बाई माझ्या बहिणीस आपल्या पंखाखालीं घेण्यास तयार होत्या. त्यांनीं माझ्यासारख्या बाहेरगांवाहून नुकत्याच आलेल्या बावळटाला पाहिलें व माझ्या बहिणीच्या निराधारपणाची कहाणी ऐकली, तेव्हां त्या एकेक अटी घालून आपलें जाळें विणूं लागल्या. त्या म्हणाल्या कीं, मुलगी त्यांच्या स्वाधीन केल्यावर पांच वर्षे तिला सुट्टी वगैरे मिळणार नाहीं. तिला आमचे घरीं पाठवणार नाहीं. आम्ही मुलीच्या शिक्षणक्रमांत अडथळे आणूं. ह्याचा सरळ अर्थ मला तरुण हिंदूला कळेना. मुलीच्या हिताच्या दृष्टीनें ही अट अवश्य होती, असें बाईंचें मत पडलें. पण ज्या नवमताचें पाणी ही पंडिता प्याली होती त्याचे चार थेंब माझ्याही पोटांत गेले होते. मीं उत्तर दिलें, ''बाई, शिक्षणांत अडथळे आणण्यासाठीं मीं बहिणीस तुमच्याकडे पाठवण्याचें नाकारीन हें खरें कारण नाहीं. तिनें ख्रिस्ती होण्यास आम्ही अडथळे आणूं ही भीति तुम्हांस असणें साहजिक आहे. मुलीस नियमाप्रमाणें (विद्याखात्याच्या) सर्व सुट्या तुम्हांला देणें अवश्य आहे. मुलीच्या हिताची काळजी निदान तुमच्या इतकी तरी मला व मुलीच्या आईबापांना आहेच, हा विश्वास तुम्हांला असावा. तुमच्या शिक्षणानें मुलगी आपखुशीनें व अक्कलहुशारीनें ख्रिस्ती होऊं लागल्यास निदान मी तरी अडथळा आणणार नाहीं. तिच्यावर तिला न कळत जबरी तर राहोच, पण भुल-भुलावणी होऊं लागली तरी तें मी सहन करणार नाहीं. बेहतर आहे अशी तुमची अटीतटीची मदत न मिळाली तरी !''
पंडिता रमाबाईंना मी तरुण असून दिसतों तसा बावळट नाहीं, हें कळून चुकलें. त्यांनीं माझ्याविषयीं अधिक चौकशी केली. मी फर्ग्युसन कॉलेजचा विद्यार्थी आहें असें ऐकल्यावर, ह्या कॉलेजचे प्रोफेसर नास्तिक आहेत, असा शेरा त्यांनीं मारला. जखडलेल्या धर्मापेक्षां मोकळा नास्तिकपणा बरा, असें मीं माझें मत सांगितलें.
प्रो. कर्वे : ह्या सुमारास प्रो. आण्णासाहेब कर्वे यांनीं हिंगणें येथें अनाथ बालिकाश्रमाची स्थापना नुकतीच केली होती. त्यांच्याकडे मी माझ्या बहिणीसाठीं भेटावयास गेलों होतों. शेणमातीनें सारवलेल्या कुडाच्या भिंतीच्या एका खोपटांत प्रो. आण्णासाहेब जमिनीवर बसले होते. त्यांचे आश्रमांत ब्राह्मण जातीच्याच १०।१५ विधवा मुली होत्या. माझे बहिणीला आपल्या आश्रमांत घेतां काय ह्या माझ्या प्रश्नाला, ''ब्राह्मणेतरांच्या मुलींना घेण्याचा हा काळ नाहीं'' असें प्रोफेसर आण्णासाहेबांनीं सांगितलें व माझ्या बहिणीला आश्रमांत घेण्याचें साफ नाकारलें. त्यामुळें माझी फार निराशा झाली. तत्कालीन महाराष्ट्रांत एक सुधारणा करतांना दुसर्या सुधारणेला कसा अडथळा येई ह्याचें हें उदाहरणच आहे.
मिस् मेरी भोर : पुढें माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठीं मला पुष्कळ धडपड करावी लागली. तिला मीं शेवटीं पुणें येथील प्रसिद्ध (हुजूरपागेंतील) मुलींच्या हायस्कुलांत घातलें. जमखंडीस तिच्या ३।४ मराठी इयत्ता झाल्याच होत्या. इंग्रजी पहिल्या इयत्तेंत तिचें नांव घालण्यास कोणतीच हरकत नव्हती. पण हिंदू विवाहित स्त्री म्हणजे कोणत्या भयंकर तुरुंगांत असते, ह्याची कल्पना मला नव्हती. शाळेचे अधिकारी चि. जनाक्काच्या नवर्याची तिच्या शिकण्यास परवानगी मागूं लागले. तिचें येथवर शिक्षण झालें हेंच तर तिच्यावर नवरा जिवंत असून वैधव्याचा असला प्रसंग गुदरायचें कारण झालें वगैरे माहिती मला कष्टानें सांगावी लागली. नवर्याच्या हरकतीची जबाबदारी मीं घेतली. तिला शाळेंत प्रवेश मिळाला, पण मला तिला कोठून तरी स्कॉलरशिप मिळवावयाची होती. माझा वशिला तर कोठेंच नव्हता. त्या वेळीं हुजूरपागेंत मिस् मेरी भोर नांवाची हुशार ख्रिस्ती बाई शिक्षकीण होती आणि मिस् हरफर्ड नांवाची एक युरोपियन बाई मुख्याध्यापिका होती. त्या दोघींना जनाक्काचा कळवळा आला. उच्चवर्णीय हिंदु लोकांत घटस्फोटाचा कायदा नाहीं आणि कांहीं झालें तरी घटस्फोटाची नुसती कल्पनाही चि. जनाक्काजवळ काढण्याची माझी छाती नव्हती; इतका तिच्या तेजाचा व पवित्रतेचा परिणाम घरांत आम्हां सर्वांवर घडत असे. ही सर्व परिस्थिति तिच्या शाळेंतील मुख्य अधिकार्यांना कळली. मिस् भोरकडे माझें जाणें-येणें होऊं लागलें. माझीं सुधारणेचीं मतें व वागण्याचा बाणेदारपणा पाहून तिचा आम्हां भावंडांविषयीं फार अनुकूल ग्रह झाला. ह्यामुळें आमच्या सर्व अडचणींतून सुटका होऊन पुढें जनाक्काला संस्थान मुधोळच्या राजेसाहेबांची मराठा मुलीकरितां दहा रुपये दरमहाची एक स्कॉलरशिप होती ती मिळाली. त्यामुळें माझी अंशतः तरी सोय झाली. एरवीं प्रसंग फारच कठीण होता.
कावेबाजपणा : सन १८९५ सालीं आमच्या फर्ग्युसन कॉलेजची नवीन इमारत चतुःश्रृंगीचे माळावर उघडण्यांत आली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कोल्हापूरचे महाराज श्रीछत्रपति शाहूमहाराज होते. त्यांच्या हातून हा उद्घाटनसमारंभ उरकून घेण्यांत आला. माझें वय त्या वेळीं सुमारें २२ वर्षांचें होतें; पण ह्या छत्रपतींचें वय माझ्याहूनही २-४ वर्षांनीं लहान असावें. महाराष्ट्राचे छत्रपति ह्या नात्यानें महाराज अध्यक्षपदाला सर्वस्वीं लायक होते, तरी वयोमानानें ते अद्याप अननुभवी होते. मी नेहमीं म्हणत आलों आहें कीं, महाराष्ट्रांतील चितपावन जात युरोपांतील इंग्रजांप्रमाणें धोरणी व कावेबाज आहे. ही गोष्ट ह्या जातीला मोठी भूषणावह आहे. ह्या कावेबाजीचें उदाहरण म्हणजे छत्रपतींचा अध्यक्षपणा होय. कोवळ्या वयाचा हा क्षत्रिय छावा चितपावनांचा हा सोहळा साजरा करावयाला आला होता. ह्याचें इंगित त्या वेळींही मला समजून आल्याशिवाय राहिलें नाहीं. पुढें हे शाहूमहाराज ब्राह्मणेतर पक्षाची मुहूर्तमेढ रोवणारे ह्या नात्यानें चितपावन ब्राह्मणांच्या डोळ्यांवर आले व दृष्टीसमोर नकोसे झाले. इतके, कीं, हे निधन पावल्यावर नागपुराकडे मवाळांची एक मजलस भरली असतां, उमरावती जिल्ह्याचे श्री. गणेश अक्काजी गवई नांवाच्या एका महार जातीच्या गृहस्थांनीं मृत महाराजांविषयीं दुखवट्याचा ठराव मांडला; पण तो श्रीनिवासशास्त्रांसारखा थोर पुरुष अध्यक्षपदावर झळकत होता तरी पास झाला नाहीं. तथापि त्या महाराजांचे औरस पुत्र छत्रपति राजाराममहाराज यांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपदाचा वारसा चितपावनांनीं पुन्हां दिलाच व छत्रपतीनेंही तो वारसा मुकाट्यानें स्वीकारला. ते कसेंही असो. तरुण शाहूमहाराज सन १८९५ च्या ह्या समारंभांत फार शोभायमान दिसले !
१८९५ सालाच्या अखेरीस पुण्यास अखिल भारतीय राष्ट्रीय सभेचें अधिवेशन थाटानें भरलें. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे बंगाली वाचस्पति अध्यक्ष होते. त्या वेळीं मी स्वयंसेवक होतों. तेव्हांपासून देशाभिमानाचें वारें समाजसुधारणेच्या वार्याप्रमाणें माझ्या डोक्यांत शिरलें आणि मी राष्ट्रीय पक्षाचा झालों.
रे. डॉ. संडरलंड : ह्याच वर्षी आणखी एक महत्त्वाची गोष्ट विशेषतः माझ्या चरित्रावर परिणाम घडविणारी घडली. अमेरिकन युनिटेरियन असोसिएशननें आपला प्रतिनिधि म्हणून रेव्हरंड डॉ. जे. टी. संडरलंड ह्या नामांकित मिशनरी गृहस्थाला हिंदुस्थानांत पाठविलें. राष्ट्रीय सभेंत यांचें खणखणीत भाषण मीं ऐकलें. हिंदुस्थानांतील ब्राह्मसमाज किंवा महाराष्ट्रांतील प्रार्थनासमाज यांच्यापूर्वी माझ्या ग्रहणशील मनावर ह्या परदेशीय उदार धर्मपंथाचा संसर्ग आधीं घडला ही गोष्ट पाश्चात्यांच्या व्यावहारिक प्रसरणशीलतेची साक्ष आहे. डॉ. संडरलंडसाहेबांची मीं समक्ष गांठ घेऊन विचारविनिमय केला. युनिटेरियन पंथाच्या बर्याच लहान लहान चोपड्यां मीं वाचल्या. Larger meaning of Uniterianism हें चोपडें मला फार बोधपर वाटलें. त्याच वर्षी पुणें येथील प्रार्थनासमाजांत एक लहानशी एकेश्वरी पंथाची परिषद भरली होती, असें मला पुढें किती तरी वर्षांनीं कळलें. आमच्या लोकांची काम करण्याची पद्धत किती टाळाटाळीची व पाश्चात्यांची विशेषतः अमेरिकनांची किती आकर्षक हें कळलें. डॉ. संडरलंडसाहेबांनीं हिंदुस्थानांतील आपल्या कामाचा अहवाल आपल्या देशांतील युनिटेरिअन सभेपुढें मांडला व विशेष सूचना केली कीं, हिंदुस्थानांतील एकेश्वरी पंथाचा (ब्राह्म व प्रार्थनासमाजाचा) एक तरुण होतकरु विद्यार्थी अमेरिका, इंग्लंड येथील धर्माला वाहिलेल्या कॉलेजांत स्कॉलरशिप देऊन बोलविण्यांत यावा. ह्या सूचनेप्रमाणें १।२ वर्षांत कलकत्त्याहून ब्राह्मसमाजानें दर दोन वर्षांनीं एक असे तीन विद्यार्थी पाठविल्यानंतर इ.स. १९०१ सालीं पुढें स्वतः माझीच ह्या कामीं योजना झाली.
प्रपंचाची काळजी : पण हा योग १८९५ सालीं मला कळण्यासारखा नव्हता. मला पुन्हां इंटरमिजिएटमध्यें बसावें लागलें. पुण्यास मी व माझी बहीण. शिवाय. १८९६ मध्यें माझ्या पत्नीलाही बहिणीबरोबर शाळेंत घालून ह्या तिघांचा पुण्याचा खर्चच नव्हे तर जमखंडीस माझे आईबाप व इतर ३ भावंडें ह्यांच्याही खर्चाचा भार माझेवरच पडला. मला १० रु. आणि जनाक्का हिला १० रु. अशी दरमहा वीस रुपयांचीच काय ती जमा असे. शिकवणीचे ५।७ रु. मिळालेच तर भर पडे. बाकीच्या खर्चाचें कर्जच होऊं लागलें ! मोठी काळजी पडली. माझ्या तीन सख्ख्या बहिणी; पण प्रपंचाची काळजी ही चौथी एक जन्माची सख्खी बहीण होती. तिनेंच मला शहाणें केलें. तितकें शहाणपण मला मुंबई विश्वविद्यालयानें किंबहुना ऑक्सफर्ड विद्यालयानेंही दिलें नाहीं.
जादा मदत : पण नुसत्या काळजीनें उपासमारीचा लांडगा कांहीं दारांतून निघत नाहीं. शेवटीं मला बडोदा नरेश श्रीमंत सयाजीरावमहाराज यांची आठवण झाली. डेक्कर मराठा असोसिएशनकडून मला दोन किंवा तीन वर्षे दरमहा १० रु. प्रमाणें फार तर ३६० रु. स्कॉलरशिप मिळाली व मी १८९६ सालीं इंटरमिजिएट मध्यें पास झालों. पण पुढें बी.ए.ची दोन वर्षे कशीं जावींत ही विवंचना श्रीमंत गायकवाडमहाराजांपुढें समक्ष ठेवण्यास मी बडोद्यास सुमारें १८९६ मध्यें गेलों. श्री. लक्ष्मणराव माने ह्या नांवाचे एक थोर मनाचे मराठा गृहस्थ बडोदें येथें शहाबाग ह्या भागांत होते. त्यांची व माझी कशी ओळख झाली व त्यांचेहून एक बडे गृहस्थ श्री. खासेराव जाधव ह्यांचा व माझा कसा संबंध जडला हें मला कांहींच आठवत नाहीं. तरी ह्या सदगृहस्थांच्या शिफारशीनें महाराजांनीं माझ्यासारख्या निराधार तरुण विद्यार्थ्याची गांठ घेतली. त्यांनीं मला दरमहा २५ रु. स्कॉलरशिप दिली. ही रक्कम मला डेक्कन मराठा असोसिएशनचे द्वारेंच मिळावयाची होती. ही मदत मिळते म्हणून ह्या संस्थेनें आपली १० रु. ची मदत बंद केली. खरें पाहतां मला १५ रु.च अधिक मिळूं लागले. तेवढ्यालाच पाहून भुकेचा लांडगा आमचें दार सोडून दूर गेला. ही स्कॉलरशिप देतांना माझ्याकडून स्टँपवर एक कायदेशीर बाँड लिहून घेण्यांत आला. त्यांत माझें शिक्षण संपल्यावर मीं बडोदा संस्थानांत नोकरीस राहावें, नाहीं तर घेतलेल्या स्कॉलरशिपची रक्कम परत करावी असा स्पष्ट करार होता; पण ईश्वरी घटनेमुळें ह्यांतील एकही अट पुरी करणें झालें नाहीं. कसें तें पुढें ओघानें कळेल.