प्रस्तावना

माझ्या आठवणी व अनुभव

भाग १, २ व ३

लेखक :
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे

प्रस्तावना

महर्षि अण्णासाहेब शिंदे यांना मी प्रथम पाहिले ते इ. स. १९३३ मध्ये.  उमरावतीला आले असताना तेथील ब्रह्मविद्या-मंदिरात त्यांचे एक व्याख्यान झाले.  त्या व्याख्यानाला मी हजर होतो.  त्या वेळी त्यांच्या व्यक्तित्वाचा जो परिणाम माझ्यावर झाला तो विसरणे मला शक्य नाही.  त्यांच्या नावाचा व कार्याचा परिचय पूर्वी झालेलाच होता.  तशात, मला वाटते, त्यांचे ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हे पुस्तक त्या वेळी नुकतेच प्रसिद्ध झालेले होते.  ते वाचून त्यांच्या तीव्र तळमळीचा, व्यापक अवलोकनाचा व सूक्ष्म संशोधनाचा ठसा अंतःकरणावर आधीच उमटलेला होता.  त्यामुळे त्यांना पाहण्याची व त्यांचे भाषण ऐकण्याची उत्कट इच्छा होती.  ब्रह्मविद्या-मंदिरात व्याख्यानासाठी उभी असलेली त्यांची ती मूर्ति पाहून जणु एखादा प्राचीन महर्षि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे असे वाटले.  एकंदर देहयष्टि धिप्पाड, वर्ण काळा, चेहर्यावरील भाव शांत, जणु शून्य संशोधन करीत असलेले डोळे, या सर्वांना भव्यता प्राप्त करून देणारे मानेवर रुळणारे पांढरे शुभ्र केस व दाढी यामुळे अंतःकरणाला समाधान वाटले.  त्यांच्या भाषणाच्या शांत लयीमुळे आणि विशेषतः त्यातील उन्नत विचारांमुळे ते अधिक वाढले.  त्यांचे भाषण शेवटपर्यंत मी अत्यंत शांतपणे ऐकले.  व्याख्यानानंतर, त्यांची ओळख करून घ्यावी म्हणून विनीत भावाने मी त्यांच्या जवळपास जाऊन उभाहि राहिलो.  तथापि त्यांच्याबरोबर इतर काही सज्जन बोलत राहिल्यामुळे मला त्यांची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची संधी त्या दिवशी मिळाली नाही.... आणि माझ्या दुर्दैवाने, पुढेहि कधी तो योग जुळून आला नाही याची मला आता राहून राहून खंत वाटते.
महर्षि शिंदे यांचे नांव निघाले की आणखी एका प्रसंगाचे स्मरण होऊन मला वारंवार खंत वाटते - तोहि प्रसंग उमरावती येथे आणि ब्रह्मविद्या-मंदिरातच घडून आला.  ता. २ जानेवारी १९४४ रोजी अण्णासाहेबांनी आपली इहलोकची यात्रा संपवली, ही बातमी प्रसिद्ध होताच मनाला फार दुःख झाले.  त्यांना श्रद्धांजलि अर्पण करण्यासाठी एखादी शोकसभा भरवली जाणे आवश्यक होते.  उमरावती येथील प्रतिष्ठित पुढा-याकडून या बाबतीत काही हालचाल होईल अशी अपेक्षा मी करीत होतो.  पण दोन तीन दिवस उलटून गेले तरी तसा योग जुळून येण्याची कांही लक्षणे दिसेनात.  जणु शिंदे यांना उमरावतीतील हे पुढारी पूर्णपणे विसरून गेले होते.  एके दिवशी श्री. गवइ यांची गाठ पडली.  भेट होता क्षणीच त्यांनीहि माझ्या मनातील विचार बोलून दाखविले.  त्यानंतर त्यांनीच पुढाकार घेऊन ब्रह्मविद्या-मंदिरात (या वेळी त्याला जोशी सभागृह हे नाव देण्यात आले होते) एक शोकसभा घेतली.  पण त्या सभेला पुरते वीस-पंचवीसहि लोक नव्हते.  अर्थात् शोकसभेचा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला हे खरे; तथापि ते एकंदर दृश्य पाहून मनाला वाईट वाटल्याखेरीज राहिले नाही.

या उपेक्षेची मीमांसा अनेक दृष्टींनी करता येईल, याची मला जाणीव आहे.  तसे पाहिले तर खुद्द अण्णासाहेबांनीच म्हटल्याप्रमाणे त्यांची धडाडीची सार्वजनिक कामगिरी सुमारे १९३३ च्या अखेरीसच संपली.  त्यानंतरची ११ वर्षे जवळजवळ शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्याप्रमाणे त्यांची स्थिति होती.  या कालावधीत सामान्य लोक त्यांचे नाव आणि कामगिरीहि विसरले असल्यास ते कित्येकांना स्वाभाविक वाटेल.  एखादा कार्यकर्ता आपल्या सार्वजनिक कर्तृत्वाने जोपर्यंत जनतेसमोर एकसारखा चमकत असतो तोपर्यंत लोकहि त्याची वाहवा करीत असतात; आणि कर्तव्याच्या क्षेत्रातून थोडा काळ का असेना तो दूर होताच त्याला ते विसरतात हि लौकर.  काळाच्या हातातील विस्मृतीच्या कुंचल्याने मोठमोठ्यांच्या जीवनचित्रावर हात फिरवले जात असल्याचे आपण एरवी पाहात नाही काय ? तशात अण्णासाहेबांनी उभी हयात ज्या कार्यात घालविली ते अस्पृश्योद्धाराचे कार्य स्पृश्य आणि त्यातूनहि वरिष्ठ वर्णांना मनापासून रुचण्यासारखे होते असे नाही.  ज्या अस्पृश्यांसाठी त्यांनी जिवाचे रान केले, खुद्द त्यांच्यातच राजकारणाचे नवीन वारे शिरले आणि म्हणून तेहि जिथे अण्णासाहेबांची उपेक्षा करू लागले होते तेथे इतरांच्याकडून अधिक सहानुभूतीची अपेक्षा कशी करता येईल ?  तशात त्यांच्या मुख्य कार्यक्षेत्रापासून उमरावती किती तरी दूर !  अण्णांच्या भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची शाखा उमरावतीस होती ही खरे, पण अस्पृश्यवर्गातील नवीन राजकारणाच्या झंझावातामुळे ती जवळजवळ मोडून पडल्यासारखीच होती.  अशा स्थितीत उमरावती येथे भरविलेल्या शोकसभेचे करुणास्पद दृश्य पाहून खरे म्हटले तर कुणीहि एवढे काही मनाला लावून घेता कामा नये !

ही स्थिति फक्त उमरावती-नागपूरकडचीच आहे असे नाही, मुंबई-पुण्याकडचीहि हीच स्थिति आहे.  पुण्या-मुंबईला कदाचित् त्या वेळी मोठमोठ्या शोकसभा झाल्या असतील आणि त्या दिवशी अनेकांनी अण्णासाहेबांवर स्तुतिसुमने उधळली असतील - पण त्यानंतर ?  सर्वत्र सामसूम !  ज्या मराठा समाजात ते जन्मले तो त्यांच्याविषयी उदासीन आहे, ज्या दलित समाजासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले त्याला त्यांचे आज महत्त्व कळत नाही, आणि राजकारणात ब्राह्मणेतर पक्षाशी सूत न ठेवता ज्या राष्ट्रीय पक्षाला ते मिळाले त्याच्या महाराष्ट्रीय वारसदारांनी सोयीस्कर रीतीने त्यांची उपेक्षा चालविली आहे.  वाङ्मयाच्या क्षेत्रात अण्णासाहेबांची कामगिरी अगदीच उपेक्षणीय आहे असे नाही; पण खास पुण्यात भरणार्या साहित्य-संमेलनांच्या व्यासपीठावरून जेथे अति सामान्य व्यक्तींच्या चोपड्यांचा आवर्जून गौरव केला जातो तेथे अण्णासाहेबांचा किंवा त्यांच्या वाङ्मयीन कामगिरीचा नुसता उल्लेखहि होत नाही असा प्रत्यक्ष अनुभव आहे.  इतक्या थोड्यां कालावधीत अण्णासाहेबांना महाराष्ट्राच्या उपेक्षित मानक-यात जाऊन बसण्याचे भाग्य लाभलेले पाहून आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही.  तथापि उपेक्षेचे हे वातावरण अगदी सर्वत्र पसरलेले आहे असे नाही.  व्यापक सहानुभूतीच्या काही दूरदर्शी पुरुषांनी हीं उणीव भरून काढलेली आहे यात शंका नाही.  महाराष्ट्र-राष्ट्रभाषा-सभेच्या दिनदर्शिकेत २ जानेवारीचा दिवस ‘महर्षि शिंदे स्मृतिदिन’ म्हणून निर्देशिलेला आहे.  प्रा. श्री. ना. बनहट्टी यांनी त्यांना १९४८ मध्ये आपली आदरांजलि वाहिली आहे.  महाराष्ट्राने श्री. शिंदे यांच्या केलेल्या उपेक्षेसंबंधीचे त्यांचे विवेचन येथे उद्धृत करण्यास हरकत नाही.  ते म्हणतात-

“विठ्ठल रामची ऊर्फ अण्णासाहेब शिंदे हे महाराष्ट्राचे एक उपेक्षित मानकरीच म्हटले पाहिजेत.  पुण्याचे एक व्यासंगी प्राध्यापक गं. बा. सरदार यांनी ‘महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी’ म्हणून एक पुस्तक लिहिले आहे, त्यात त्यांनी चिपळूणकरांपूर्वी होऊन गेलेल्या भाऊ महाजन, विष्णुबुवा ब्रह्मचारी इत्यादि थोर कार्यकर्त्यांची माहिती देऊन महाराष्ट्र या कार्यकर्त्यांना बहुतांशी कसा विसरला आहे, हे दाखवून दिले आहे.  ही विसरण्याची क्रिया चिपळूणकरांपूर्वीच्या लोकांनीच फक्त आचरून दाखविली आणि त्यानंतर मात्र आपण जागृत आणि स्मरणशील बनलो, अशातली गोष्ट नाही.  आपणा महाराष्ट्रीयांचा तोच स्वभाव कायम आहे.  आपण गुणांचे पूजक नाही; व्यक्तीचे पूजक आहो.  एकाद्या व्यक्तीच्या मागे आम्ही लागलो म्हणून तिला आभाळापर्यंत उंच चढवतो, तिच्या पायावर लोटांगणे घेतो, तिला जयजयकाराने गुदमरवून सोडतो, तिच्या मूर्ति स्थापून तिची विटंबना करतो, आणि ज्यांचे गुण आपणाला खरोखरी अनुसरण्यासारखे असतात अशा इतर अनेक थोर कार्यकर्त्यांना आपण विसरतो; इतके की त्यांचे नामोनिशाण देखील शिल्लक ठेवीत नाही.  आमच्या राष्ट्रीय मूर्खपणाची ही एक खूण आहे…..”

अशा स्थितीत प्रा. बनहट्टी यांनी अण्णासाहेबांचे पुण्यस्मरण करण्यात मनाचे मोठेपण दाखविले हे केव्हाहि त्यांना भूषणावह होय.  गेल्या जोनवारीत ‘महाराष्ट्राचा एक कर्मवीर’ म्हणून अग्रलेख लिहून ‘मराठ्या'चे संपादक आचार्य अत्रे यांनीहि त्यांचे पुण्य-स्मरण महाराष्ट्राला करून दिले.  अशी चिन्हे तुरळक असली तरी अनास्थेचे व उपेक्षेचे जौळ दूर सारण्याला त्यांची मदत होते हे खरे आहे.  असा एक मोठा हृद्य प्रसंग माझ्या अनुभवाला आला होता, तो येथे सांगणे अप्रासंगिक होणार नाही.  दोन तीन वर्षापूर्वी एक तरुण गृहस्थ माझ्या भेटीला आले.  कै. शिंदे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यासंबंधी त्यांनी माझ्याजवळ गोष्ट काढताच मला सानंद आश्चर्य वाटले.  मी आस्थापूर्वक चौकशी केल्यावर मला कळले की, हे तरुण गृहस्थ म्हणजे नागपूर येथील प्रसिद्ध अस्पृश्य पुढारी कै. किसन फागूजी बंदसोडे यांचे चिरंजीव होत.  कै. बंदसोडे हे नागपूर येथील भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचे एक अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते होते.  १९४४ मध्ये नागपूरला मी बदलून आल्यावर त्यांच्याशी माझा परिचय झाला.  त्यांच्या भाषणातून आण्णासाहेबांच्या विषयी जो नितांत आदर व्यक्त होत होता त्यामुळे माझे अंतःकरण भरून आले होते !

कोणी म्हणतील की, “अण्णासाहेबाविषयीच्या उपेक्षेची इतक्या विस्ताराने चर्चा करण्याचे कारणहि नाही.  स्वतः अण्णासाहेब यशापयशाच्या कल्पनांच्या पलीकडे गेलेले कर्मवीर होते.  ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदा च न’ या वृत्तीने ते आचरण करीत. ‘माझ्या कामात यश मिळाले नाही..... यशाची मला आकांक्षाच नव्हती.  यशाची मला नीट व्याख्याच करता येत नाही,  तर मी त्याची इच्छा तरी कशी करू ?’  असे त्यांनीच म्हटलेले आहे.  त्यांच्या स्थितप्रज्ञतेचा हा पुरावाच नाही काय ?”  हे म्हणणे किंचित् खरे असले तरी या उद्गारातून त्यांचे हळुवार मानवी अंतःकरण व्यक्त होत आहे असे मला वाटते.  आपल्याला आलेल्या अनुभवांचे सार सांगतांना ते म्हणतात, “माझ्या कामात माझ्या साथीदारांचा, इतरांचा, फार काय ज्यांच्यासाठी मी घरदारहि कमी समजून ती ती कामे करीत होतो त्यांचाहि माझ्यासंबंधी गैरसमज, दुराग्रह, नव्हे उघड विरोधहि झाला.  हाच माझ्या अनुभवाचा कठीणपणा किंवा दारुणपणा होय.  ह्यामुळे माझ्या मनाची शांति ढासळली आणि अकाली बहुतेक स्वीकृत कामातून मी विराम पावलो.”  हे निराश झालेल्या अंतःकरणाचे उद्गार आहेत यात शंकाच नाही.  उद्गारांची थोडी मीमांसा या ठिकाणी करणे अप्रासंगिक होणार नाही.

अण्णासाहेबांच्या जीवितातील सर्वातिशायित्वाने उठून दिसणारे महत्त्वाचे कार्य कोणते हा प्रश्न सामान्य जनतेला विचारला तर ‘अस्पृश्यांची उन्नति’ असेच उत्तर बहुतेक देतील.  पण खुद्द अण्णांना हा प्रश्न घातला तर ते काय म्हणतील ?  त्यांचेच उद्गार पाहा : “...... मात्र धर्माचा प्रचार ह्या माझ्या अस्सल कामातून मी विराम पावणे शक्यच नाही; कारण मी धर्माचा स्वीकार केला हे खरे नसून, धर्मानेच माझा स्वीकार केला अशी माझी समजूत असल्यामुळे ह्या शरीरातून विराम पावेपर्यंत तरी धर्माने मला पछाडले आहेच व पुढेहि तो मला अंतरणार नाही ही मला आशा आहे.”  या उद्गारावरून अण्णासाहेब ‘धर्माचा प्रचार’ हे आपले ‘अस्सल काम' मानत होते असे दिसून येईल.  त्या मानाने त्यांची इतर कार्ये दुय्यम ठरतात.  या दृष्टीने पाहता त्यांनी अंगीकारलेले अस्पृश्योद्धाराचे कार्यहि दुय्यम ठरते.  पण लौकिक दृष्टीने तर तेच त्यांचे जीवितकार्य होय.  तेव्हा याचा समन्वय कसा करावयाचा ?  मला वाटते, याचे उत्तर असे देता येईल की, अण्णासाहेबांनी चालविलेले अस्पृश्योद्धाराचे कार्य त्यांच्या अंतःकरणातील धार्मिक वृत्तीतून निर्माण झाले होते.  धर्मभावना हा मूळ पाया आणि अस्पृश्योद्धाराचे कार्य ही त्यावर उभारलेली इमारत होय.  माझे हे म्हणणे सत्याला अगदीच सोडून नाही.  १९१२ मध्ये त्यांच्या मित्राने त्यांचे जे एक त्रोटक चरित्र लिहिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, “हीन मानलेले लोक हे आपले बंधु आहेत, ही भावना अंतःकरणात दृढ करून घेऊन ते जे काम करीत आहेत त्याचा पाया धर्म हाच आहे.  त्यांच्या शाळातून धर्मशिक्षण देण्यात येते, भजन होते, उपासना होतात व सद्धर्माची गोडी लावण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न होत असतात.१” “'मिशनचे कार्य धर्माच्या पायावरच चालावयाचे होते२” असे खुद्द अण्णासाहेबांनीहि स्पष्ट केले आहे.  हा धार्मिक पाया ब्राह्मधर्माचा होता अशी काहींनी समजूत करून घेतलेली दिसते, पण ते बरोबर नाही.  अण्णासाहेबांनी प्रार्थना-समाजात सामील होऊन ब्राह्मधर्माचा प्रचार चालविला होता हे खरे आहे.  तथापि अस्पृश्योद्धाराचे कार्य करताना या अस्पृश्यांना ब्राह्मधर्मात ओढण्याचा त्यांचा मुळी सुद्धा हेतु नव्हता.  “मिशनचे कार्य धर्माच्या पायावरच चालवावयाचे होते” असे सांगून अण्णासाहेब लागलीच स्पष्ट करतात “मात्र, अस्पृश्यवर्गातून समाजाला सभासद मिळावे असा हेतु समाजाने कधीच बाळगला नाही आणि अशी तक्रारहि कधी कोणी बाहेरच्यांनी केली नाही.”  असे असले तरी त्यांच्या कार्याविषयी असे गैरसमज होत होते असे दिसून येते.  अण्णासाहेब शिंदे यांच्याप्रमाणे अस्पृश्योद्धाराचे कार्य करणारे कै. प्रा. माटे हे आपल्या चित्रपटा’त लिहितात.  “विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कामाची काय पद्धति आहे, याचे मी बारकाईने अवलोकन केले.... इतक्या दिवसानंतर सुद्धा लिहिताना मला कसेचेच वाटते; पण लिहावयास हवे म्हणून लिहितो की, शिंदे यांचे ब्रह्मसमाजी धोरण व त्यास अनुसरून त्यांनी घातलेली कामाची पद्धति मला आवडेना.  जनसेवा करावयास किंवा विचाराला औदार्य प्राप्त करून घेण्याला आपल्या जुन्या धर्माच्या पोटात पुरेसा वाव आहे, असे मला वाटे व जर ही अस्पृश्य प्रजा हिंदु धर्माची, तर आपण चळवळ सुद्धा पूर्वकालीन विचारधनाच्या ऐपतीवरच चालवावी असे वाटे.  मूर्तिपूजेला ब्रह्मसमाजात कोठेहि स्थान नाही म्हणून अस्पृश्यांच्या प्रश्नातील देवालय-प्रवेश हा जो भाग त्या बाबतीत आपल्या तत्त्वाशी बेइमान न होता शिंदे यांना चळवळ करता येण्यासारखी नाही, असे मला वाटे.”  पा. २५८) प्रा. माटे यांच्या या मतांचा समाचार घेण्याचे हे स्थल नाही.  पण शिंदे यांच्या कार्याविषयी सूक्ष्म गैरसमज कसे करून घेण्यात येत होते याचे उदाहरण म्हणून ही वाक्ये उद्धृत केली आहेत.  मला वाटते अशा प्रकारच्या गैरसमजांमुळेच, आपले कार्य अयशस्वी झाले असे अण्णासाहेबांना वाटत असावे.