प्रस्तावना
माझ्या आठवणी व अनुभव
भाग १, २ व ३
लेखक :
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे
प्रस्तावना
महर्षि अण्णासाहेब शिंदे यांना मी प्रथम पाहिले ते इ. स. १९३३ मध्ये. उमरावतीला आले असताना तेथील ब्रह्मविद्या-मंदिरात त्यांचे एक व्याख्यान झाले. त्या व्याख्यानाला मी हजर होतो. त्या वेळी त्यांच्या व्यक्तित्वाचा जो परिणाम माझ्यावर झाला तो विसरणे मला शक्य नाही. त्यांच्या नावाचा व कार्याचा परिचय पूर्वी झालेलाच होता. तशात, मला वाटते, त्यांचे ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हे पुस्तक त्या वेळी नुकतेच प्रसिद्ध झालेले होते. ते वाचून त्यांच्या तीव्र तळमळीचा, व्यापक अवलोकनाचा व सूक्ष्म संशोधनाचा ठसा अंतःकरणावर आधीच उमटलेला होता. त्यामुळे त्यांना पाहण्याची व त्यांचे भाषण ऐकण्याची उत्कट इच्छा होती. ब्रह्मविद्या-मंदिरात व्याख्यानासाठी उभी असलेली त्यांची ती मूर्ति पाहून जणु एखादा प्राचीन महर्षि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे असे वाटले. एकंदर देहयष्टि धिप्पाड, वर्ण काळा, चेहर्यावरील भाव शांत, जणु शून्य संशोधन करीत असलेले डोळे, या सर्वांना भव्यता प्राप्त करून देणारे मानेवर रुळणारे पांढरे शुभ्र केस व दाढी यामुळे अंतःकरणाला समाधान वाटले. त्यांच्या भाषणाच्या शांत लयीमुळे आणि विशेषतः त्यातील उन्नत विचारांमुळे ते अधिक वाढले. त्यांचे भाषण शेवटपर्यंत मी अत्यंत शांतपणे ऐकले. व्याख्यानानंतर, त्यांची ओळख करून घ्यावी म्हणून विनीत भावाने मी त्यांच्या जवळपास जाऊन उभाहि राहिलो. तथापि त्यांच्याबरोबर इतर काही सज्जन बोलत राहिल्यामुळे मला त्यांची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची संधी त्या दिवशी मिळाली नाही.... आणि माझ्या दुर्दैवाने, पुढेहि कधी तो योग जुळून आला नाही याची मला आता राहून राहून खंत वाटते.
महर्षि शिंदे यांचे नांव निघाले की आणखी एका प्रसंगाचे स्मरण होऊन मला वारंवार खंत वाटते - तोहि प्रसंग उमरावती येथे आणि ब्रह्मविद्या-मंदिरातच घडून आला. ता. २ जानेवारी १९४४ रोजी अण्णासाहेबांनी आपली इहलोकची यात्रा संपवली, ही बातमी प्रसिद्ध होताच मनाला फार दुःख झाले. त्यांना श्रद्धांजलि अर्पण करण्यासाठी एखादी शोकसभा भरवली जाणे आवश्यक होते. उमरावती येथील प्रतिष्ठित पुढा-याकडून या बाबतीत काही हालचाल होईल अशी अपेक्षा मी करीत होतो. पण दोन तीन दिवस उलटून गेले तरी तसा योग जुळून येण्याची कांही लक्षणे दिसेनात. जणु शिंदे यांना उमरावतीतील हे पुढारी पूर्णपणे विसरून गेले होते. एके दिवशी श्री. गवइ यांची गाठ पडली. भेट होता क्षणीच त्यांनीहि माझ्या मनातील विचार बोलून दाखविले. त्यानंतर त्यांनीच पुढाकार घेऊन ब्रह्मविद्या-मंदिरात (या वेळी त्याला जोशी सभागृह हे नाव देण्यात आले होते) एक शोकसभा घेतली. पण त्या सभेला पुरते वीस-पंचवीसहि लोक नव्हते. अर्थात् शोकसभेचा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला हे खरे; तथापि ते एकंदर दृश्य पाहून मनाला वाईट वाटल्याखेरीज राहिले नाही.
या उपेक्षेची मीमांसा अनेक दृष्टींनी करता येईल, याची मला जाणीव आहे. तसे पाहिले तर खुद्द अण्णासाहेबांनीच म्हटल्याप्रमाणे त्यांची धडाडीची सार्वजनिक कामगिरी सुमारे १९३३ च्या अखेरीसच संपली. त्यानंतरची ११ वर्षे जवळजवळ शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्याप्रमाणे त्यांची स्थिति होती. या कालावधीत सामान्य लोक त्यांचे नाव आणि कामगिरीहि विसरले असल्यास ते कित्येकांना स्वाभाविक वाटेल. एखादा कार्यकर्ता आपल्या सार्वजनिक कर्तृत्वाने जोपर्यंत जनतेसमोर एकसारखा चमकत असतो तोपर्यंत लोकहि त्याची वाहवा करीत असतात; आणि कर्तव्याच्या क्षेत्रातून थोडा काळ का असेना तो दूर होताच त्याला ते विसरतात हि लौकर. काळाच्या हातातील विस्मृतीच्या कुंचल्याने मोठमोठ्यांच्या जीवनचित्रावर हात फिरवले जात असल्याचे आपण एरवी पाहात नाही काय ? तशात अण्णासाहेबांनी उभी हयात ज्या कार्यात घालविली ते अस्पृश्योद्धाराचे कार्य स्पृश्य आणि त्यातूनहि वरिष्ठ वर्णांना मनापासून रुचण्यासारखे होते असे नाही. ज्या अस्पृश्यांसाठी त्यांनी जिवाचे रान केले, खुद्द त्यांच्यातच राजकारणाचे नवीन वारे शिरले आणि म्हणून तेहि जिथे अण्णासाहेबांची उपेक्षा करू लागले होते तेथे इतरांच्याकडून अधिक सहानुभूतीची अपेक्षा कशी करता येईल ? तशात त्यांच्या मुख्य कार्यक्षेत्रापासून उमरावती किती तरी दूर ! अण्णांच्या भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची शाखा उमरावतीस होती ही खरे, पण अस्पृश्यवर्गातील नवीन राजकारणाच्या झंझावातामुळे ती जवळजवळ मोडून पडल्यासारखीच होती. अशा स्थितीत उमरावती येथे भरविलेल्या शोकसभेचे करुणास्पद दृश्य पाहून खरे म्हटले तर कुणीहि एवढे काही मनाला लावून घेता कामा नये !
ही स्थिति फक्त उमरावती-नागपूरकडचीच आहे असे नाही, मुंबई-पुण्याकडचीहि हीच स्थिति आहे. पुण्या-मुंबईला कदाचित् त्या वेळी मोठमोठ्या शोकसभा झाल्या असतील आणि त्या दिवशी अनेकांनी अण्णासाहेबांवर स्तुतिसुमने उधळली असतील - पण त्यानंतर ? सर्वत्र सामसूम ! ज्या मराठा समाजात ते जन्मले तो त्यांच्याविषयी उदासीन आहे, ज्या दलित समाजासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले त्याला त्यांचे आज महत्त्व कळत नाही, आणि राजकारणात ब्राह्मणेतर पक्षाशी सूत न ठेवता ज्या राष्ट्रीय पक्षाला ते मिळाले त्याच्या महाराष्ट्रीय वारसदारांनी सोयीस्कर रीतीने त्यांची उपेक्षा चालविली आहे. वाङ्मयाच्या क्षेत्रात अण्णासाहेबांची कामगिरी अगदीच उपेक्षणीय आहे असे नाही; पण खास पुण्यात भरणार्या साहित्य-संमेलनांच्या व्यासपीठावरून जेथे अति सामान्य व्यक्तींच्या चोपड्यांचा आवर्जून गौरव केला जातो तेथे अण्णासाहेबांचा किंवा त्यांच्या वाङ्मयीन कामगिरीचा नुसता उल्लेखहि होत नाही असा प्रत्यक्ष अनुभव आहे. इतक्या थोड्यां कालावधीत अण्णासाहेबांना महाराष्ट्राच्या उपेक्षित मानक-यात जाऊन बसण्याचे भाग्य लाभलेले पाहून आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. तथापि उपेक्षेचे हे वातावरण अगदी सर्वत्र पसरलेले आहे असे नाही. व्यापक सहानुभूतीच्या काही दूरदर्शी पुरुषांनी हीं उणीव भरून काढलेली आहे यात शंका नाही. महाराष्ट्र-राष्ट्रभाषा-सभेच्या दिनदर्शिकेत २ जानेवारीचा दिवस ‘महर्षि शिंदे स्मृतिदिन’ म्हणून निर्देशिलेला आहे. प्रा. श्री. ना. बनहट्टी यांनी त्यांना १९४८ मध्ये आपली आदरांजलि वाहिली आहे. महाराष्ट्राने श्री. शिंदे यांच्या केलेल्या उपेक्षेसंबंधीचे त्यांचे विवेचन येथे उद्धृत करण्यास हरकत नाही. ते म्हणतात-
“विठ्ठल रामची ऊर्फ अण्णासाहेब शिंदे हे महाराष्ट्राचे एक उपेक्षित मानकरीच म्हटले पाहिजेत. पुण्याचे एक व्यासंगी प्राध्यापक गं. बा. सरदार यांनी ‘महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी’ म्हणून एक पुस्तक लिहिले आहे, त्यात त्यांनी चिपळूणकरांपूर्वी होऊन गेलेल्या भाऊ महाजन, विष्णुबुवा ब्रह्मचारी इत्यादि थोर कार्यकर्त्यांची माहिती देऊन महाराष्ट्र या कार्यकर्त्यांना बहुतांशी कसा विसरला आहे, हे दाखवून दिले आहे. ही विसरण्याची क्रिया चिपळूणकरांपूर्वीच्या लोकांनीच फक्त आचरून दाखविली आणि त्यानंतर मात्र आपण जागृत आणि स्मरणशील बनलो, अशातली गोष्ट नाही. आपणा महाराष्ट्रीयांचा तोच स्वभाव कायम आहे. आपण गुणांचे पूजक नाही; व्यक्तीचे पूजक आहो. एकाद्या व्यक्तीच्या मागे आम्ही लागलो म्हणून तिला आभाळापर्यंत उंच चढवतो, तिच्या पायावर लोटांगणे घेतो, तिला जयजयकाराने गुदमरवून सोडतो, तिच्या मूर्ति स्थापून तिची विटंबना करतो, आणि ज्यांचे गुण आपणाला खरोखरी अनुसरण्यासारखे असतात अशा इतर अनेक थोर कार्यकर्त्यांना आपण विसरतो; इतके की त्यांचे नामोनिशाण देखील शिल्लक ठेवीत नाही. आमच्या राष्ट्रीय मूर्खपणाची ही एक खूण आहे…..”
अशा स्थितीत प्रा. बनहट्टी यांनी अण्णासाहेबांचे पुण्यस्मरण करण्यात मनाचे मोठेपण दाखविले हे केव्हाहि त्यांना भूषणावह होय. गेल्या जोनवारीत ‘महाराष्ट्राचा एक कर्मवीर’ म्हणून अग्रलेख लिहून ‘मराठ्या'चे संपादक आचार्य अत्रे यांनीहि त्यांचे पुण्य-स्मरण महाराष्ट्राला करून दिले. अशी चिन्हे तुरळक असली तरी अनास्थेचे व उपेक्षेचे जौळ दूर सारण्याला त्यांची मदत होते हे खरे आहे. असा एक मोठा हृद्य प्रसंग माझ्या अनुभवाला आला होता, तो येथे सांगणे अप्रासंगिक होणार नाही. दोन तीन वर्षापूर्वी एक तरुण गृहस्थ माझ्या भेटीला आले. कै. शिंदे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यासंबंधी त्यांनी माझ्याजवळ गोष्ट काढताच मला सानंद आश्चर्य वाटले. मी आस्थापूर्वक चौकशी केल्यावर मला कळले की, हे तरुण गृहस्थ म्हणजे नागपूर येथील प्रसिद्ध अस्पृश्य पुढारी कै. किसन फागूजी बंदसोडे यांचे चिरंजीव होत. कै. बंदसोडे हे नागपूर येथील भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचे एक अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते होते. १९४४ मध्ये नागपूरला मी बदलून आल्यावर त्यांच्याशी माझा परिचय झाला. त्यांच्या भाषणातून आण्णासाहेबांच्या विषयी जो नितांत आदर व्यक्त होत होता त्यामुळे माझे अंतःकरण भरून आले होते !
कोणी म्हणतील की, “अण्णासाहेबाविषयीच्या उपेक्षेची इतक्या विस्ताराने चर्चा करण्याचे कारणहि नाही. स्वतः अण्णासाहेब यशापयशाच्या कल्पनांच्या पलीकडे गेलेले कर्मवीर होते. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदा च न’ या वृत्तीने ते आचरण करीत. ‘माझ्या कामात यश मिळाले नाही..... यशाची मला आकांक्षाच नव्हती. यशाची मला नीट व्याख्याच करता येत नाही, तर मी त्याची इच्छा तरी कशी करू ?’ असे त्यांनीच म्हटलेले आहे. त्यांच्या स्थितप्रज्ञतेचा हा पुरावाच नाही काय ?” हे म्हणणे किंचित् खरे असले तरी या उद्गारातून त्यांचे हळुवार मानवी अंतःकरण व्यक्त होत आहे असे मला वाटते. आपल्याला आलेल्या अनुभवांचे सार सांगतांना ते म्हणतात, “माझ्या कामात माझ्या साथीदारांचा, इतरांचा, फार काय ज्यांच्यासाठी मी घरदारहि कमी समजून ती ती कामे करीत होतो त्यांचाहि माझ्यासंबंधी गैरसमज, दुराग्रह, नव्हे उघड विरोधहि झाला. हाच माझ्या अनुभवाचा कठीणपणा किंवा दारुणपणा होय. ह्यामुळे माझ्या मनाची शांति ढासळली आणि अकाली बहुतेक स्वीकृत कामातून मी विराम पावलो.” हे निराश झालेल्या अंतःकरणाचे उद्गार आहेत यात शंकाच नाही. उद्गारांची थोडी मीमांसा या ठिकाणी करणे अप्रासंगिक होणार नाही.
अण्णासाहेबांच्या जीवितातील सर्वातिशायित्वाने उठून दिसणारे महत्त्वाचे कार्य कोणते हा प्रश्न सामान्य जनतेला विचारला तर ‘अस्पृश्यांची उन्नति’ असेच उत्तर बहुतेक देतील. पण खुद्द अण्णांना हा प्रश्न घातला तर ते काय म्हणतील ? त्यांचेच उद्गार पाहा : “...... मात्र धर्माचा प्रचार ह्या माझ्या अस्सल कामातून मी विराम पावणे शक्यच नाही; कारण मी धर्माचा स्वीकार केला हे खरे नसून, धर्मानेच माझा स्वीकार केला अशी माझी समजूत असल्यामुळे ह्या शरीरातून विराम पावेपर्यंत तरी धर्माने मला पछाडले आहेच व पुढेहि तो मला अंतरणार नाही ही मला आशा आहे.” या उद्गारावरून अण्णासाहेब ‘धर्माचा प्रचार’ हे आपले ‘अस्सल काम' मानत होते असे दिसून येईल. त्या मानाने त्यांची इतर कार्ये दुय्यम ठरतात. या दृष्टीने पाहता त्यांनी अंगीकारलेले अस्पृश्योद्धाराचे कार्यहि दुय्यम ठरते. पण लौकिक दृष्टीने तर तेच त्यांचे जीवितकार्य होय. तेव्हा याचा समन्वय कसा करावयाचा ? मला वाटते, याचे उत्तर असे देता येईल की, अण्णासाहेबांनी चालविलेले अस्पृश्योद्धाराचे कार्य त्यांच्या अंतःकरणातील धार्मिक वृत्तीतून निर्माण झाले होते. धर्मभावना हा मूळ पाया आणि अस्पृश्योद्धाराचे कार्य ही त्यावर उभारलेली इमारत होय. माझे हे म्हणणे सत्याला अगदीच सोडून नाही. १९१२ मध्ये त्यांच्या मित्राने त्यांचे जे एक त्रोटक चरित्र लिहिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, “हीन मानलेले लोक हे आपले बंधु आहेत, ही भावना अंतःकरणात दृढ करून घेऊन ते जे काम करीत आहेत त्याचा पाया धर्म हाच आहे. त्यांच्या शाळातून धर्मशिक्षण देण्यात येते, भजन होते, उपासना होतात व सद्धर्माची गोडी लावण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न होत असतात.१” “'मिशनचे कार्य धर्माच्या पायावरच चालावयाचे होते२” असे खुद्द अण्णासाहेबांनीहि स्पष्ट केले आहे. हा धार्मिक पाया ब्राह्मधर्माचा होता अशी काहींनी समजूत करून घेतलेली दिसते, पण ते बरोबर नाही. अण्णासाहेबांनी प्रार्थना-समाजात सामील होऊन ब्राह्मधर्माचा प्रचार चालविला होता हे खरे आहे. तथापि अस्पृश्योद्धाराचे कार्य करताना या अस्पृश्यांना ब्राह्मधर्मात ओढण्याचा त्यांचा मुळी सुद्धा हेतु नव्हता. “मिशनचे कार्य धर्माच्या पायावरच चालवावयाचे होते” असे सांगून अण्णासाहेब लागलीच स्पष्ट करतात “मात्र, अस्पृश्यवर्गातून समाजाला सभासद मिळावे असा हेतु समाजाने कधीच बाळगला नाही आणि अशी तक्रारहि कधी कोणी बाहेरच्यांनी केली नाही.” असे असले तरी त्यांच्या कार्याविषयी असे गैरसमज होत होते असे दिसून येते. अण्णासाहेब शिंदे यांच्याप्रमाणे अस्पृश्योद्धाराचे कार्य करणारे कै. प्रा. माटे हे आपल्या चित्रपटा’त लिहितात. “विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कामाची काय पद्धति आहे, याचे मी बारकाईने अवलोकन केले.... इतक्या दिवसानंतर सुद्धा लिहिताना मला कसेचेच वाटते; पण लिहावयास हवे म्हणून लिहितो की, शिंदे यांचे ब्रह्मसमाजी धोरण व त्यास अनुसरून त्यांनी घातलेली कामाची पद्धति मला आवडेना. जनसेवा करावयास किंवा विचाराला औदार्य प्राप्त करून घेण्याला आपल्या जुन्या धर्माच्या पोटात पुरेसा वाव आहे, असे मला वाटे व जर ही अस्पृश्य प्रजा हिंदु धर्माची, तर आपण चळवळ सुद्धा पूर्वकालीन विचारधनाच्या ऐपतीवरच चालवावी असे वाटे. मूर्तिपूजेला ब्रह्मसमाजात कोठेहि स्थान नाही म्हणून अस्पृश्यांच्या प्रश्नातील देवालय-प्रवेश हा जो भाग त्या बाबतीत आपल्या तत्त्वाशी बेइमान न होता शिंदे यांना चळवळ करता येण्यासारखी नाही, असे मला वाटे.” पा. २५८) प्रा. माटे यांच्या या मतांचा समाचार घेण्याचे हे स्थल नाही. पण शिंदे यांच्या कार्याविषयी सूक्ष्म गैरसमज कसे करून घेण्यात येत होते याचे उदाहरण म्हणून ही वाक्ये उद्धृत केली आहेत. मला वाटते अशा प्रकारच्या गैरसमजांमुळेच, आपले कार्य अयशस्वी झाले असे अण्णासाहेबांना वाटत असावे.
१. विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्याने आणि उपदेश.
२. माझ्या आठवणी व अनुभव, पा.२६४.
वस्तुतः अण्णांचे कार्य अयशस्वी झाले असे मला वाटत नाही. यासंबंधी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती अशी की, अशा सुधारणांच्या कार्याकडे ऐतिहासिक दृष्टीने पाहावयास पाहिजे. समाजिक किंवा धार्मिक सुधारणा ही अशी गोष्ट आहे की, जी पूर्णतेला कधीच पोचणे शक्य नाही. जग नेहमी बदलत असते आणि या बदलत्या जगात नवीन नवीन विचारांचे वारे सदैव खेळत असते. ज्या सुधारणा आज आपण मोठ्या हिरिरीने करू पाहतो त्यांना कालांतराने फारसा अर्थ राहात नाही. कारण त्या बाबतीतली समाजाची विचारसरणीच बदललेली असते. उदाहरण म्हणून हेच पाहा ना की, ज्या देवालय-प्रवेशाच्या प्रश्नाच्या अभिनिवेशाने आपल्या कार्याचा नवीन मांड मांडणे मोटे यांना आवश्यक वाटले त्या प्रश्नाकडे आजचे अस्पृश्य पुढारी ढुंकूनंहि पाहायला तयार नाहीत. पण म्हणून अस्पृश्यांना देवालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी ज्या सुधारकांनी पूर्वी जीवापाड श्रम केले त्यांच्या कार्याचे महत्त्व कमी होत नाही. त्यांच्या प्रयत्नामुळे समाजाचे किंचित् हृदयपरिवर्तन झालेले असले तरी त्यांना पुष्कळच यश आले असेच समजले पाहिजे. या दृष्टीने पाहता अण्णासाहेबांचे कार्य सफल झाले असेच म्हणावे लागेल. अस्पृश्योद्धाराचे कार्य हा अण्णांच्या कार्याचा मेरुमणि आहे. त्यांनी हे कार्य केवळ पुण्यामुंबईत किंवा महाराष्ट्रातच नाही तर भारतभर पसरवले. या प्रश्नाकडे भारताच्या सर्व प्रांतातील विचारवंतांचे लक्ष वेधले आणि शक्य त्या रीतीने त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष कार्याला सुरुवातहि केली. अण्णासाहेबांचे हे यश मला वाटते वादातीत आहे. त्यांच्या मागून आलेल्या व्यक्तींनी हे कार्य कदाचित् अधिक चांगल्या रीतीने केले असेल; पण त्यांच्या कार्याची भूमिका अण्णांनी तयार करून ठेवली होती हे विसरता येत नाही. अण्णाच्या पूर्वी निरनिराळ्या प्रांतात या कार्याला सुरुवात झालेली होती. त्या प्रयत्नांचा इतिहास त्यांनी स्वतःच या पुस्तकाच्या १० व्या प्रकरणात सांगितला आहे. या कार्याला अखिल भारतीय स्वरूप प्राप्त करून देण्याचे कार्य अण्णासाहेबांचे आहे. भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी (The Depressed Classes Mission Society, India) ही मंडळी स्थापन करून तिच्या द्वारा महाराष्ट्र, कर्नाटक, गुजराथ, मद्रास इत्यादि प्रांतात त्यांनी केलेले कार्य ऐतिहासिक महत्त्वाचे होय. पण माझ्या दृष्टीने अण्णासाहेबांच्या कार्याचे महत्त्व आणखी एका गोष्टीत आहे. ती गोष्ट म्हणजे त्यांनी अस्पृश्योद्धाराच्या प्रश्नाला प्राप्त करून दिलेले राष्ट्रीय स्वरूप ही होय. या कार्याला सुरुवात केल्यानंतर लौकरच त्यांच्या लक्षात आले की, राष्ट्रीय सभेसारख्या संस्थेने हे कार्य हाती घेतल्यावाचून ते तडीस जाणे शक्य नाही. त्या दृष्टीने त्यांनी वारंवार प्रयत्नहि केले. पण हा धार्मिक प्रश्न असल्यामुळे राष्ट्रसभेला तो आपल्या कार्यक्रमांत स्वीकारावासा वाटेना. शेवटी कलकत्ता येथे राष्ट्रसभेचे अधिवेशन भरले असताना अध्यक्ष ऍनी बेझंटच्या सहानुभूतीमुळे अण्णासाहेबांच्या प्रयत्नांना यश आले. त्यांच्या आग्रहावरून अस्पृश्यता-निवारणाचा ठराव काँग्रेसच्या कार्यक्रमात घेण्यात आला व पासहि झाला. नंतर नागपूर येथील अधिवेशनात तर महात्मा गांधींनी त्या विषयाची कड घेऊन त्याला राष्ट्रीय प्रश्न करून सोडण्याचे श्रेय घेतले. अर्थात् त्यांच्या या यशामागे अण्णासाहेबांच्या तपश्चर्येची पुण्याई होती हे विसरता कामा नये. यानंतर लवकरच अण्णासाहेबांनी भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची धुरा अस्पृश्यातूनच निर्माण झालेल्या पुढा-याच्या खांद्यावर सोपवली. मला वाटते की, अस्पृश्यतेच्या प्रश्नाला राष्ट्रीय स्वरूप देण्याच्या कार्याप्रमाणेच अण्णासाहेबांचे हेहि कार्य फार महत्त्वाचे आहे. ज्यांच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्न करायचे तेच लोक स्वतःची उन्नति करून घेण्यासाठी पुढे आलेले पाहण्यापेक्षा अधिक मोठे यश कोणते असणार ? पण असे असूनहि आपल्या अंगीकृत कार्यातच आपणाला यश मिळाले नाही असे अण्णासाहेबांना वाटत होते याचे कारण अस्पृश्योद्धाराचा प्रश्न केवळ राष्ट्रीय करून सोडण्याने किंवा तो अस्पृश्यांच्या हाती सोपविल्याने कायमचा सुटला असे होत नाही. शिवाय ज्या धार्मिक पायावरून त्यांनी या प्रश्नाला हात घातला होता त्यासंबंधी मोठ्यामोठ्यांनीहि गैरसमज करून घेतल्यामुळे व संस्था-संचालनात नेहमी अनुभवाला येणार्या मतभेद, पूर्वग्रह, विरोध इत्यादिकांमुळे आण्णाला यश आले नाही असे अण्णासाहेबांना वाटत असले पाहिजे हे स्पष्ट दिसते. या एकंदर कार्यात आपणाला आलेले अनुभव आपल्या मनःशांतीसाठी अण्णासाहेबांनी या ग्रंथात लिहिले आहेत. केशवसुतांनी म्हटले आहे की -
अमुचा पेला दुःखाचा
डोळे मिटुनी प्यायाचा
पिता बुडाशी गाळ दिसे
त्या अनुभव हे नांव असे !
फेकून द्या तो जगावरी
अमृत होउ तो कुणा तरी !
या उक्तीप्रमाणे जणु पुढच्यांना अमृत प्राप्त करून देण्यासाठी अण्णासाहेबांनी आपल्या आयुष्यातील दुःखाच्या पेल्यातील बुडाशी असलेला हा अनुभवाचा गाळ एकत्रित करून तो जनतेच्या हाती दिला आहे.
त्यांनी स्वतः मात्र अशी इतरांना अमृत प्राप्त करून देण्याची भूमिका घेतलेली नाही. प्रस्तुत आठवणी त्यांनी स्वतःच्या करमणुकीसाठी लिहिल्या आहेत, इतरांच्या करमणुकीसाठी नाहीत; आणि बोधासाठी तर नाहीतच नाहीत. अनेक थोर पुरुषांनी तुरुंगात असताना आत्मचरित्रे किंवा आठवणी लिहून काढलेल्या आढळतात. तसेच अण्णांच्याहि बाबतीत घडले आहे. एकांतवासाला आणि चिंतनाला अनेक कार्यकर्त्यांना दुसरी जागा आढळत नाही. कारण, बाहेर असतांना प्रत्यक्ष कार्यात ते गढून गेलेले असतात, आणि तुरुंगातील एकांतवासात आपल्या गतायुष्यातील सुखदुःखांच्या आठवणीहून अधिक हृद्य ते काय असणार ? स्मृति नसती तर जगातील अर्धी अधिक दुःखे नाहीशी झाली असती असे गडक-याच्या एका पात्राने म्हटले आहे. हे एका दृष्टीने खरे असले तरी स्मृति आहे, म्हणूनच आयुष्याला गोडी आलेली आहे हेहि खरे आहे. जुन्या आठवणी काढून मनुष्य स्वतःची करमणूक करून घेऊ शकतो. तुरुंगातील दुःसह जीवन सुसह्य करण्यासाठी कार्यकर्त्यांचा हा एक विरंगुळा आहे. अण्णासाहेबांनीहि याच हेतूने ह्या आठवणी लिहिल्या आहेत. आपल्या गत-आयुष्यातील आठवणी तुरुंगात लिहून काढल्या म्हणजे त्याला आत्मचरित्राचे स्वरूप येते. पण आत्मचरित्रे व आठवणी यांची स्वरूपे काही बाबतीत भिन्न असतात. आत्मचरित्राचा संबंध सर्वस्वी लेखकाच्या जीवनाशी असतो, आठवणी अथवा स्मृतिचित्रे ही लेखकाची स्वतःची त्याप्रमाणे इतरांचीहि असू शकतात. आत्मचरित्राचा नायक लेखक स्वतःच असतो, आठवणीत लेखकाप्रमाणे इतरांनाहि तितकेच महत्त्वाचे स्थान असते. यामुळेच रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई टिळक, रमाबाई केदार इत्यादींनी लिहिलेल्या आठवणीत त्यांच्या स्वतःपेक्षाहि क्वचित् त्यांच्या पतींना अधिक महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. दुसरे असे की, आत्मचरित्रात ज्याप्रमाणे काल आणि कलादृष्ट्या सुसंगति राखावी लागते तशी ती आठवणीत राखावी लागत नाही, किंवा राखलीच पाहिजे असे नाही. आठवणींचे स्वरूप सुटे असूं शकते. आत्मचरित्रकार हा आपल्या आयुष्यातील घटना सुसूत्र रीतीने सांगतांना त्या घटनांच्या मागची आपली मानसिक पार्श्वभूमि मांडून दाखवितो. त्यामुळे आत्मचरित्रात आत्मविश्लेषण भरपूर झालेले आढळते. आठवणी लिहितांना अशा आत्मविश्लेषणाला वाव नसतो असे नाही; तथापि त्यांच्या सुटेपणामुळे ते नेहमी शक्य होतेच असे नाही.
अण्णासाहेब शिंदे यांनी आत्मचरित्रलेखनाचा प्रयत्न केलेला नाही तर आपल्या आठवणी व अनुभव नमुद केलेले आहेत; आणि याची त्यांना चांगली जाणीव आहे. आठवणी सांगताना मनुष्य आपल्या पूर्वायुष्यात अधिक रंगून जातो. उलट आत्मचरित्रकार बहुधा आपल्या निकटतम उत्तरायुष्यातील घडामोडी अधिक समरसतेने आणि खुलासेवार सांगतो. अण्णासाहेबांच्या या आठवणीत त्यांच्या आयुष्याचा पूर्वकाल जसा चित्रित झालेला आहे तसा उत्तरकाल नाही. किंबहुना भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीतून त्यांनी आपले अंग काढून घेतल्यानंतरचा त्यांच्या जीवनाचा फारच थोडा वृत्तांत या आठवणीत आलेला आहे. त्या मानाने त्यांचे बालपण, शिक्षण, आरंभीची धर्मसेवा आणि भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचा वृत्तांत यांना सविस्तर स्थान मिळालेले आहे. त्यातहि आपल्या बाळपणाचा वृत्तांत अण्णासाहेबांनी विशेष खुलासेवार - इतकेच नाही तर समरसतेने व सहृदयतेने - लिहिलेला आहे. आपल्या मातुश्रींच्या आठवणी सांगताना, ‘या सर्व करुण रसाने भरलेल्या नाटकात मुख्य नायिकेचे पात्र माझी आई साध्वी यमुनाबाई ही होय’ (पृ.१८) असे जेव्हा ते सांगतात तेव्हा या सहृदयतेचा चटका लावणारा प्रत्यय येतो. जुन्या आठवणी काढीत असताना त्या सर्व जशाच्या तशा आठवतात असे नाही, आणि त्यामुळे ‘हे आता मला आठवत नाही’ असे लिहिण्याची पाळी लेखकावर येते. अण्णासाहेबांच्या बाबतीतहि अनेकदा असे झालेले आढळते (पृ. ९३, ९६, ९७, १४० इत्यादि). सत्यकथनाच्या दृष्टीने यात त्यांचा प्रांजलपणा दिसून येतो. सत्यकथन हा चरित्रवाङ्मयाचा आत्मा होय. याविषयी लेखकाला जितकी काळजी व सावधानता बाळगणे शक्य होईल तेवढी थोडीच असते. अशा स्थितीत विस्मृत प्रसंग कल्पनेने रचून आत्मचरित्राची किंवा आठवणींची कादंबरी करण्यापेक्षा आपल्या विस्मरणाची नोंद करण्यातच अधिक औचित्य असते. अण्णासाहेबांनी ते पाळण्याचा कसोशीने प्रयत्न केलेला दिसतो आणि त्यामुळे त्यांच्या या लेखनाला प्रामाणिकपणा आलेला आहे. आपल्या आठवणी लिहून काढीत असताना क्वचित् लेखकाच्या ठिकाणी गर्व किंवा आढ्यता येणे स्वाभाविक ठरेल ! तथापि या दोषाचा स्पर्श या ग्रंथाला झालेला आढळत नाही. याला कारण अण्णासाहेबांची शालीन आणि नम्र वृत्ति. लहानपणची संस्मरणे देताना खेळातील आणि अभ्यासातील आपली हुषारी नुसती नमूद करणे निराळे आणि ती आढ्यतेने सांगणे निराळे. ही आढ्यता अण्णांच्या स्वभावातच नसल्यामुळे त्यांच्या निवेदनातहि आलेली नाही. क्वचित् आपल्याविषयीची इतरांची मते त्यांनी नमूद केली आहेत हे खरे, पण ती जशी गौरवाची आहेत तशी निंदेचीहि आहेत. मँचेस्टर कॉलेजातील विद्यार्थ्यांनी त्यांच्याविषयी लिहिलेली दोन पद्ये किंवा तेथील अधिका-यानी त्यांना दिलेले दोन दाखले उद्धृत करण्यात केवळ वस्तुस्थितीचे निवेदन आहे; आत्मस्तुतीचा अहंकार किंवा आनंद नाही. ‘लोकमताचे हेलकावे’ या प्रकरणात आपणाला मिळालेल्या मानपत्रांची यादी दिली हेहि खरे. पण त्यातील आपल्या स्तुतीचा मजकूर त्यांनी उद्धृत केला नाही. उलट आपल्यावर वेळोवेळी होणार्या प्रतिकूल टीकेतील दोन पत्रे व एक उतारा त्यांनी विस्ताराने दिला आहे. यावरून त्यांच्या वृत्तीवर चांगला प्रकाश पडतो. किंबहुना ह्या सगळ्या आठवणी वाचीत असतांना एका सात्त्विक सत्पुरुषाचे विनम्र निवेदन आपण वाचीत असल्याचा प्रत्यय पदोपदी येतो.
तसेच पाहिले तर खुद्द अण्णासाहेबांनीच लिहिल्याप्रमाणे आपल्या अस्पृश्योद्धाराच्या कार्यात पुढे पुढे त्यांना आपल्या साथीदारांपासून, इतकेच नव्हे तर ज्यांच्यासाठी घरदारहि कमी समजून' ते ती कार्ये करीत होते, त्या अस्पृश्यबंधूंपासूनहि बराच त्रास सोसावा लागला. इतका की त्यामुळे त्यांची मनःशांति ढळली व त्यामुळे त्या कार्यातून ते अकाली निवृत्त झाले. एखाद्या आत्मकेंद्रित लेखकाने ‘गैरसमज, दुराग्रह व विरोध' यांचे हे प्रसंग घोळून घोळून सांगितले असते व त्यातील आपल्या भूमिकेचे समर्थनहि केले असते. अण्णासाहेबांनी असे काहीहि केलेले नाही, यात त्यांच्या स्वभावाचे सार आलेले आहे. यामुळे या आठवणींना एका दृष्टीने वैगुण्य आलेले आहे असेहि म्हणता येईल. आपल्या सामाजिक कार्यामध्ये आलेले सगळ्या प्रकारचे बरेवाईट अनुभव आत्मचरित्रपर आठवणी सांगणार्या लेखकाने अवश्य नमूद करून ठेवायला पाहिजेत. त्यावरून समाजसेवकांना मार्गदर्शन तर लाभतेच, पण शिवाय मानवी स्वभावाचे सूक्ष्म ज्ञान करून घेण्याला मदत होते. अण्णासाहेबासारख्या स्वभावतःच सात्त्विक पुरुषाची मनःशांति ढळण्याला कारणीभूत झालेले हे प्रसंग तितकेच दुःखदायक असले पाजिहेत; आणि मनात आणले असते तर त्यांना ते सरसतेने रंगवून वाचकांची सहानुभूति आपल्याकडे सहज खेचून घेता आली असती. पण अण्णासाहेब या मोहाला बळी पडले नाहीत. त्यांनी आपली लेखणी त्यापासून अत्यंत संयमाने अलिप्त ठेवली आहे ! याच्या उलट दृश्य पाहावयाचे असेल तर वाचकांनी कोल्हटकरांचे ‘आत्मवृत्त’ वाचावे. आपल्या सान्निध्यात आलेल्या व्यक्तीवर खवचटपणाने व कुत्सितपणाने केलेल्या आरोपांनी बरबटलेले दुसरे आत्मचरित्र मराठीत क्वचितच सापडेल. तथापि यातहि आत्मचरित्रकाराच्या मनोवृत्तीवर व स्वभावविशेषावर अप्रत्यक्षपणे प्रकाश पडतो हे नाकारता येणार नाही. अण्णासाहेबांचा प्रकृतिधर्म अगदी निराळा असल्यामुळे ते आत्मसमर्थनाच्या भानगडीत फारसे पडले नाहीत, मग इतरांवर दोषारोपण करीत सुटणे तर दूरच राहिले. वादांच्या बाबतीतील आपण कितीहि तिर्हाइतपणे निकाल दिला तरी तो दोन्ही पक्षांस मान्य होणार नाही म्हणून तो त्यांनी देण्याचेहि टाळले आहे. क्वचित् त्या त्या व्यक्तीशी असलेले आपले मतभेद त्यांनी नमूद केलेले आहेत हे खरे; पण ते अत्यंत सौम्यपणाने आणि प्रांजळ वृत्तीने. त्यामुळे त्यांच्या या आठवणीत प्रसन्नतेचे वातावरण सर्वत्र पसरलेले आढळते.
प्रार्थनासमाजाच्या द्वारे ब्राह्मधर्माचा प्रचार आणि अस्पृश्यतानिवारण ही अण्णासाहेबांच्या कार्याची दोन महत्त्वाची अंगे होत. पहिल्या कार्याच्या निमित्तानेच त्यांना परदेशात जाऊन अध्ययनाची संधी मिळाली आणि नंतरहि त्याचसाठी त्यांनी भरतखंडभर प्रवास केला. या परिभ्रमणात त्यांना आलेल्या अनुभवांनी धर्ममूलक समतेचा त्यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला आणि त्यांच्या सहानुभूतीचे क्षेत्र विस्तारले. त्यातच त्यांच्या अस्पृश्योद्धाराच्या कार्याचे बीजारोपण होऊन त्याचे रोपटे वाढीस लागले व ते भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीच्या वृक्षात परिणत झाले. त्यांच्या या संस्थेचा इतिहास हा या आठवणींचा महत्त्वाचा भाग होय. हा इतिहास सध्याच्या नवीन पिढीस माहीत होणे आवश्यक होते. विशेषतः अस्पृश्यवर्गातील तरुणांनी तो वाचणे जरूर आहे. आता या वर्गाने आपल्या उन्नतीचे कार्य स्वतःच हाती घेतलेले आहे ही संतोषाची गोष्ट असली तरी ते करीत असतांना त्यांच्या समोर पूर्वीच्या प्रयत्नांचा इतिहास असणे आवश्यक आहे. म्हणजे आपण आणि आपले पुढारी कुणाच्या खांद्यावर उभे आहोत याची त्यांना कल्पना येईल व त्यामुळे स्पृश्यवर्गातील जुन्या कार्यकर्त्यांविषयी या तरुण पिढीच्या बोलण्यातून क्वचित् जी अवहेलनेची भाषा ऐकू येते ती कमी होण्याला मदत होईल. स्पृश्य वर्गातील अस्पृश्योद्धारकांचे कार्य हे स्थूलमानाने धार्मिक समतेच्या पायावर आधारलेले मुख्यतः शैक्षणिक व सामाजिक स्वरूपाचे होते. नंतर हळूहळू त्याला राजकारणाचा व अर्थकारणाचा रंग चढू लागला. हा रंग देण्यासाठी अस्पृश्यवर्गातूनच नवीन पुढारी पुढे येऊ लागले व त्यांनी या कार्याची धुरा आपल्या खांद्यावर उचलली. हे खरे असले तरी त्यांच्यात शैक्षणिक जागृति करण्याला पूर्वीच्या स्पृश्य पुढा-यानी आपल्या जिवाचे रान केलेले आहे हे आजच्या अस्पृश्य तरुणांनी विसरता कामा नये. शैक्षणिक जागृति हा आर्थिक व राजकीय जागृतीचा पाया होय. तो ज्यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून भरला अशा व्यक्तीत अण्णासाहेबांचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रथम अस्पृश्यांच्या घरात शिक्षणाची ज्योत पेटवली. ती आपल्या हातात घेऊन केवळ महाराष्ट्रातच नाही तर भरतवर्षभर अण्णासाहेबांनी ज्ञानाचे असंख्य दिवे लावले. हे अण्णासाहेबांचे कार्य राष्ट्रीय स्वरूपाचे होते. ते करण्यासाठी ते स्वतःच नाही तर त्यांचे सर्व कुटुंब अविश्रांत खपले. त्यांचे आईवडील व भाऊबहिणी या सर्वांना त्यांनी या कामी लावले. त्यांच्या वृद्ध मातापितरांप्रमाणेच त्यांच्या भगिनी जनाक्का यांची या बाबतीतली कामगिरी केवळ अद्वितीय आहे. एक स्त्री, तशात विधवा झालेली, शिक्षणाचा फारसा गंध नाही, पण आपल्या वडील बंधूने स्वीकारलेल्या या सेवाकार्यात तिने आपले संपूर्ण जीवन ओतले हे या ग्रंथातून पाहिले म्हणजे या त्यागमूर्तीसमोर ज्याला नम्र व्हावेसे वाटणार नाही असा वाचक विरळाच आढळेल ! आपल्या आईवडिलांची अण्णासाहेबांनी काढलेली चित्रे अत्यंत चित्तवेधक आहेत. ती पाहून जुन्या पिढीतील असूनहि अत्यंत प्रगतिपर विचारांच्या या पतिपत्नीविषयी मनात नितांत आदर निर्माण होतो. अण्णासाहेबांच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये त्यांनी आपल्या आईवडिलांच्या स्वभावातून कशी उचलली याचेहि त्यावरून सम्यक्-दर्शन होते.
धर्मभावनेचे, उदारतेचे व समाजसेवेचे धडे त्यांना आपल्या मातापित्याकडूनच अप्रत्यक्षपणे मिळालेले होते. त्यांचाच विकास त्यांच्या जीवनात झालेला आढळतो. लहानपणी अंगी बाणलेल्या कणखरपणामुळे नंतरच्या आयुष्यातील अनेक आपत्तींना आणि विरोधांना ते यशस्वीपणे तोंड देऊ शकले. अण्णासाहेब हे हाडाचे सुधारक होते. हिंदुधर्मावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी त्यांनी जसे अविश्रांत श्रम केले तसेच इतर अन्याय्य रूढींच्या निर्दलनासाठीहि केले. जातिभेद, क्षुद्र दैवतांची उपासना, स्त्रियांची होणारी विटंबना, होळीतील बीभत्स प्रकार - धर्माच्या नावाखाली चालू असलेल्या या अन्यायांच्या विरुद्ध अण्णासाहेबांनी सुधारणेचे शस्त्र उपसले होते. देवदासी, मुरळी या संस्था म्हणजे धार्मिक वेश्यागारे होत. ती नष्ट करून या दुर्दैवी स्त्रियांना सभ्य समाजात आणून सोडण्याचे कार्य कितीहि उदारपणाचे असले तरी धर्माची अफू प्यालेल्यांच्या डोळ्यांवर ते न येणे अशक्य होते. अण्णासाहेबांवर मारेकरी घालण्यालाहि या लोकांनी कमी केले नाही. ‘शिंद्यांची सर्कस’ म्हणून व्यंगचित्र काढून आणि ‘आधुनिक काळातील महान् कलिपुरुष’ म्हणून त्यांचा निषेध करून त्यांची अवहेलना करण्याचाहि प्रयत्न काही समाजपुंगवांनी आणि धर्ममार्तंडांनी केला. पण निंदा, अवहेलना, प्राणांतिक आपत्ति इत्यादींना तोंड देऊन आपले कार्य अण्णांनी पुढे चालू ठेवले. त्यांच्या अंगी लहानपणापासून असलेल्या कणखरपणाचा व स्पार्टन सहिष्णुतेचा हा परिणाम होय. या बाबतीत विधायक कार्य करण्यावरच त्यांचा भर विशेष होता. मुलांप्रमाणे मुलींनाहि सक्तीचे शिक्षण चालू करण्याविषयी त्यांनी केलेली चळवळ त्यांच्या विधायक कार्यकर्तृत्वाचीच द्योतक होय. या कामात लो. टिळकांसारख्या राष्ट्रपुरुषाकडून त्यांना विरोध व्हावा हे दुर्दैव होय. त्यांच्या विरोधाला तोंड देऊनहि अण्णासाहेबांनी आपले कार्य चालूच ठेवले.
ही सर्व कार्ये अण्णासाहेबांनी निरपेक्ष वृत्तीने केली ही महत्त्वाची गोष्ट होय. त्यांचे जीवित जणु अर्पित जीवित होते. आपल्या कार्यासाठी त्यांनी आपणहून गरिबी पत्करली होती. प्रार्थनासमाजात काम करीत असतांना काय किंवा भारतीय निराश्रित साहाय्यक मंडळाचे काम करीत असतांना काय त्यांचा दारिद्र्य-मित्र यांच्या सोबतीला नेहमी असे. त्यामुळे प्रपंचाची काळजी ही जी त्यांची चौथी सख्खी बहीण, तिने त्यांना कधीच सोडले नाही. ते व त्यांचे सहकारी यांना कित्येकदा आपल्या भुकेच्या वेदना कशा तरी शमवाव्या लागत. ज्या दारिद्र्याशी झगडत त्यांना उच्च शिक्षण घ्यावे लागले त्याच्याशीच झगडत झगडत त्यांना आपली सेवाकार्ये पार पाडावी लागली. वस्तुतः बडोदेसरकारचा त्यांना केव्हाहि आश्रय मिळण्यासारखा होता. अनेकदा महाराजांनी त्यांना बोलावले होते, पण त्यांनी त्यांना विनम्रपणे नकार दिला. यातच त्यांच्या तळमळीच्या समाजसेवेचे सार आले !
अण्णासाहेब हे सुधारक असले तरी राष्ट्रीय वृत्तीचे होते हा त्यांचा आणखी एक महत्त्वाचा विशेष होय. रानडे-भांडारकर-चंदावरकर यांच्यासारख्यांच्या सान्निध्यांत राहूनहि त्यांनी आपली ही राष्ट्रीय वृत्ति कधी लुप्त होऊ दिली नाही. लोकमान्य टिळकांना १९०७ मध्ये कारावासाची जबर शिक्षा झाल्यानंतर आपल्या साप्ताहिक उपासनेत त्यांच्याबद्दल प्रार्थना करण्यात तर अण्णासाहेबांची ही राजकीय वृत्ति दिसून येते, पण त्याबद्दल स्पष्टीकरण विचारणार्या गुरुजनांना त्यांनी दिलेल्या उत्तरातहि ती दिसून येते. मी केवळ मराठ्यांसाठी नाही सर्वांसाठी आहे असें म्हणणार्या अण्णासाहेबांनी १९२० च्या निवडणुकीच्या वेळी ब्राह्मणेतर पक्षात सामील न होता स्वतंत्र बहुजन पक्ष स्थापन केला याचेहि कारण तेच आहे. १९३० मध्ये तर महात्मा गांधींच्या सत्याग्रह-संग्रमात उडी घेऊन त्यांनी ६ महिन्यांचा कारावासहि सोसला. जेधे-बंधूंना राष्ट्रीय सभेकडे वळविण्याला अप्रत्यक्षपणे अण्णासाहेब कारणीभूत झालेले आहेत, ही गोष्ट आजच्या राजकारणाच्या दृष्टीने लक्षात घेतली म्हणजे त्यांच्या राष्ट्रीय वृत्तीचे व दूरदृष्टीचे कौतुक करावे तितके थोडेच होईल असे वाटते !
हा सर्व चित्रपट अण्णासाहेबांनी आपल्या आठवणीत रेखाटला आहे. त्यातील रंग अत्यंत सौम्य आहेत. अहंकाराचा किंवा दर्पाचा भडक रंग त्यात कुठेहि आढळणार नाही. सर्व चित्रपट पाहून मन कसे प्रसन्न होते. अण्णासाहेबांच्या लेखणीतून उतरलेल्या ह्या आठवणी त्यांच्या स्वभावातील सात्त्विकतेचा रस घेऊन जशा उतरल्या आहेत, तशाच त्यांच्या अध्ययनाचा, संशोधनाचा व संस्कृतीचा परिपाक घेऊनहि उतरल्या आहेत. अण्णासाहेबांचे संस्कृत, मराठी व इंग्रजी भाषेचे आणि वाङ्मयाचे ज्ञान फार चांगले होते याचा प्रत्यय या ग्रंथांत पदोपदी येतो. विशेषतः मराठी व संस्कृत कवींच्या काव्यातील प्रसंगोचित वचने विवेचनाच्या ओघात आलेली वाचताच त्यांच्या लेखनाच्या अभिजात शैलीचा प्रत्यय येतो. मधूनमधून त्यांनी केलेली वर्णनेहि त्यांच्या काव्यात्मक वृत्तीची साक्ष देतात. डुभी येथील ब्रह्मपुत्रेच्या विराट् दर्शनाने हेलावलेल्या त्याच्या अंतःकरणातून बाहेर पडलेले धन्यतेचे उद्गार वाचले म्हणजे याची कल्पना येईल. भारतीय आर्य भाषांप्रमाणेच द्राविड भाषांशीहि त्यांचा चांगला परिचय होता. कानडी ही तर जवळजवळ त्यांची मातृभाषाच. तिचा त्यांच्या लेखणीला झालेला संस्कार अधून-मधून या ग्रंथात आढळतो. अण्णासाहेबांचे एकंदर लिहिणे सुबोध असूनहि सफाईदार आहे. वाक्यरचनेच्या साधेपणाचे सौंदर्य तीत सर्वत्र पसरलेले आढळते. प्रत्यक्ष विधायक कार्याने जशी त्यांनी जनतेची सेवा केली आहे तशी वाणीने आणि लेखणीनेहि केलेली आहे. इंग्लंडमधून शिक्षण घेऊन परत आल्यापासून ब्राह्मधर्माच्या प्रचारासाठी आणि समाजसुधारणेच्या कार्यासाठी भारतभर प्रवास करून त्यांनी हजारो व्याख्याने देऊन श्रोत्यांची मने जिंकली आहेत आणि त्यांना विचारप्रवृत्त केले आहे. प्रार्थनासमाजाच्या आणि अन्य व्यासपीठावरून चालविलेल्या उपासनांच्या प्रसंगी धीर-गंभीर वाणीने उपदेशामृताचे सिंचन करून अनेकांच्या अंतःकरणात सात्त्विक भावनांचे अंकुर त्यांनी निर्माण केले आहेत. या आध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यात आपली लेखणीहि त्यांनी सतत चालवली आहे. श्री. बी. बी. केसकर यांना संपादिलेले त्यांचे ‘लेख, व्याख्याने आणि उपदेश’ वाचले म्हणजे त्याची चांगली कल्पना येईल. त्यातील प्रवासवृत्तातून त्यांच्या रमणीय लेखन-शैलीचे सौंदर्य जसे पाहावयास मिळते तसेच त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचे व जागृत सामाजिक मनाचेहि ज्ञान होते. त्यांचे हे ‘सर्व लेख व व्याख्याने .... वाचनीय असून त्यातील कित्येक व्याख्याने विवेकास जागृत करणारी आहेत. मन त्रस्त झाले असेल तेव्हा अगर विश्रांतीच्या वेळी ह्या पुस्तकात प्रसिद्ध झालेली रा. शिंदे यांची केवळ विलायतेहून लिहिलेली पत्रे जे कोणी वाचतील त्यांस रा. शिंदे यांचे निरीक्षणसामर्थ्य, कल्पकता, भाषेतील काव्य व रस अवलोकून समाधान वाटल्यावाचून राहणार नाही’ असे श्री. द्वा. गो. वैद्य यांनी आपल्या प्रार्थनासमाजाच्या इतिहासात म्हटले आहे ते अगदी यथार्थ वाटते. यातील ‘बहिष्कृत भारत’ या अण्णासाहेबांच्या लेखाने त्या काळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यातील विवेचनाच्या बीजातूनच ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ ह्या ग्रंथाचा वृक्ष निर्माण झाला आहे. हा ग्रंथ म्हणजे अण्णासाहेबांच्या एतद्विषयक सूक्ष्म व सखोल अध्ययनाचा, संशोधनाचा व चिंतनाचा उत्कृष्ट परिपाक होय. अस्पृश्यतेच्या प्रश्नाचा त्यांनी किती मूलगामी आणि शास्त्रशुद्ध विचार केला होता याची या ग्रंथावरून उत्तम कल्पना येते. अस्पृश्यतेची संस्था केवळ भारतीय आहे असे नाही तर भारताबाहेर ब्रह्मदेशादि राष्ट्रातहि तिचा व्याप आहे. तिच्या निर्मितीचा आणि विकासाचा इतिहास प्रथम खंडात देऊन दुसर्या खंडात अस्पृश्यतेच्या प्रश्नाच्या अंगोपांगांचा त्यांनी विचार केलेला आहे. अस्पृश्य म्हणून समजल्या जाणार्या भिन्नप्रांतीय जातींच्या नावांचा भाषाशास्त्राच्या साह्याने त्यांनी जो इतिहास शोधला आहे तो त्यांच्या कुशाग्र बुद्धीचा द्योतक आहे. तौलनिक भाषाशास्त्राची अण्णासाहेबांना विशेष आवड होती. या विषयावर त्यांनी कांही ठिकाणी व्याख्याने दिल्याचा उल्लेख या आठवणीतच आलेला आहे. ‘कानडी-मराठी संबंध’ ‘कोकणी व मराठी संबंध’ इत्यादि विषयांवरील त्यांचे निबंध त्यांच्या या तौलनिक अध्ययनातूनच बाहेर पडलेले स्पष्ट दिसतात. मराठी भाषा ही महाराष्ट्रीपासून निर्माण झालेली नसून ती मगध देशातून बंगाल, ओरिसा, तेलंगण, वर्हाड व कर्नाटक या प्रांतातून प्रवास करीत असलेली एक निराळीच भाषा आहे, हा त्यांचा विचार भाषाशास्त्रज्ञांनी सूक्ष्मपणे तपासून पाहण्याच्या योग्यतेचा आहे. मराठ्यांच्या पूर्वपीठिकेचाहि त्यांनी भाषाशास्त्राच्या दृष्टीने ‘रत्नाकर’ त विचार केलेला होता. या सर्व लेखात भाषाशास्त्राच्या आधाराने अण्णासाहेबांनी मांडलेले कांही ऐतिहासिक प्रश्न पाहिले म्हणजे आश्चर्य वाटते. याच पद्धतीने अस्पृश्य जातींच्या नावांची मीमांसा करून हा वर्ग मुळात बराच उन्नत, सुसंस्कृत आणि पराक्रमी असला पाहिजे असा निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे, तो इतिहासाच्या आणि अस्पृश्योद्धारविषयक चळवळीच्या दृष्टीने फार महत्त्वाचा वाटतो. अस्पृश्यांच्या पूर्वपीठिकेविषयी मनुस्मृतीने केलेली मीमांसा निराधार आणि अनैतिहासिक असल्याचेहि त्यांनी साधार व सडेतोड रीतीने प्रतिपादन केलेले आहे. इतिहास, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, राजकारण इत्यादि अनेक दृष्टींनी या प्रश्नाकडे इतक्या सूक्ष्मपणे पाहणारे विचारवंत भारतात अण्णासाहेबांव्यतिरिक्त दुसरे क्वचितच आढळतील. सर्व अस्पृश्य बंधूंनी अभ्यासण्याच्या योग्यतेचा असा हा मौलिक ग्रंथ आहे. सर्व भारतीय भाषातून त्याची भाषांतरे झाली पाहिजेत असे मला वाटते. प्रस्तुत ग्रंथ म्हणजे या विषयाचा पूर्वार्ध होय. अण्णासाहेब याचा उत्तरार्ध लिहिणार होते. त्यात दलित समाजाच्या उद्धाराचा व अस्पृश्यतानिवारणाचा इतिहास व उपाय यांचा अंतर्भाव व्हावयाचा होता. अण्णासाहेबांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील आपल्या लेखात हा भाग संक्षिप्त रूपाने दिला आहे, हे खरे; पण तो सर्व वृत्तांत त्यांच्या अनुभवी लेखणीतून सविस्तर बाहेर पडणे अवश्य होते. तसे होऊं शकले नाही याबद्दल आता हळहळ वाटणे स्वाभाविक आहे. पण त्याला इलाज काय ?
अण्णासाहेबांच्या चरित्राची आणि चारित्र्याची, स्वभावाची आणि कार्याची माहिती करून देणार्या या आठवणी त्यांनी स्वतःच्या विरंगुळ्यासाठी लिहिल्या असल्या तरी त्यापासून आपणा सर्वांना उत्तम मार्गदर्शन लाभणार आहे. तेव्हा आता अधिक न लिहिता या आठवणी वाचण्याची वाचकांना विनंती करतो.
वि. भि. कोलते