बंगलोर शाखा
मागासलेल्या लोकांत, विशेषतः अस्पृश्यवर्गांत त्यांच्या राजकीय हितसंबंधाची जागृति व्हावी म्हणून अस्पृश्यतानिवारक संघ ही स्वतंत्र सहकारी संस्था पुण्यांत १९१७ सालच्या अखेरीस स्थापण्यांत आली. या संस्थेची जरूरी विशेषतः मद्रास प्रांतीं फार भासली. पूर्व किनार्यावरील मद्रास शहरीं आणि पश्चिम किनार्यावर मंगळूर व मलबारांत मिशनच्या शिक्षणविषयक संस्था याच्या अगोदरच कित्यक वर्षे स्थापण्यांत येऊन त्यांचें काम बरें चाललें होतें. या दोन किनार्यांवरील परस्परांची माहिती होऊन त्यांचा संबंध मिशनच्या मातृसंस्थेशीं निकट यावा म्हणून मधोमध बंगलोर येथें आमच्या मिशनची एक नवीन प्रांतिक अंगभूत शाखा स्थापावी, असे विचार माझ्या मनांत १९१८ सालापासून घोळूं लागले. त्या सुमारास माझे मित्र आणि प्रा. समाजाचे एक जुने सभासद रा. काशीनाथ नारायण देवल यांच्या परिश्रमानें तेथील अस्पृश्यवर्गासाठीं बंगलोर लष्करांत, टॅनरी रोडवर एक दिवसाची शाळा स्थापण्यांत आली होती. ती मातृसंस्थेस जोडून घ्यावी अशी रा. देवलांनीं मागणी केली होती. म्हणून मी रा. कृष्णाजी गोविंदराव पाताडे यांस बरोबर येऊन बंगलोरला ऑगस्ट १९१९ मध्यें गेलों.
कृ. गो. पाताडे : रा. कृष्णाजी गो. पाताडे ह्या तरुण गृहस्थाची गांठ १९१७ मध्यें मुंबईस प्रथम पडली. हे राष्ट्रीय वृत्तीचे उत्साही तरुण होते. ता. ८ नोव्हेंबर १९१७ रोजीं शनिवारवाड्यांपुढें भरलेल्या सभेंत ह्यांनीं भाग घेतला होता. त्यानंतर त्यांचा पुणें शाखेत प्रवेश झाला. वर्षदीड वर्षांतच त्यांच्यामध्यें मिशनची स्वतंत्र शाखा चालविण्याइतपत तयारी झाली. लहानपणीं गिरणींत काम करून रात्रीच्या शाळेंत इंग्रजी सातव्या इयत्तेपर्यंत त्यांनीं अभ्यास केला होता. गृहस्थ फार हिंमतीचे असत..
तामिळ प्रांतांतील दौरा ; ह्या कामीं १९१५ सालीं मिशनचे अध्यक्ष सर नारायणराव चंदावरकर यांनीं जो दौरा काढला होता त्याचा उत्कृष्ट परिणाम ह्या प्रांतांत झालेला आढळून आला. आम्ही प्रथम बंगलोरहून सेलम ह्या जिल्ह्याच्या गांवीं गेलों. तेथें सुप्रसिद्ध राजगोपालाचारी ह्यांचा पुढाकार होता. त्यांचे मित्र प्रो. यज्ञनारायण ह्यांच्या घरीं उतरलों. हे मद्रासच्या पाछाप्पा कॉलेजचे प्रोफेसर होते. राजगोपालाचारी ह्यांनीं एका सार्वजनिक क्लबांत आम्हांला मोठी चहापार्टी देऊन व्याख्यान करविलें आणि पुढें अस्पृश्योद्धारासाठीं त्यांनीं एक स्वतंत्र आश्रम स्थापून प्रत्यक्ष कार्य केलें. ह्या ठिकाणीं आम्हांस अशी बातमी लागली कीं, तंजावर त्रिचनापल्लीकडे अस्पृश्य व जमीनदारवर्ग ह्यांमध्यें मोठा चुरशीचा लढा चालू आहे. आम्हीं तो पाहून घ्यावा. मद्रासला गेल्यावर तेथें चालू असलेलें आमच्या शाखेचें काम तपासलें. बंगलोरास असतांना सर व्ही. पी. माधवराव ह्या बड्यां गृहस्थानें (बडोद्याचे दिवाण) आमचा सन्मान एक थाटाची गार्डन पार्टी देऊन केला होता. मद्रासला गेल्यावर तेथील एका हायकोर्टचे न्यायाधिशांनीं एक मोठी गार्डन पार्टी करून आमचा सन्मान केला. प्रसिद्ध काँग्रेसचे पुढारी व समाजसुधारक श्रीनिवास अय्यंगार यांच्या अध्यक्षत्वाखालीं येथील यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशनच्या दिवाणखान्यांत माझें व्याख्यान झालें. त्या वेळीं मि. अय्यंगार यांनीं आमच्या कामाला मोठा हार्दिक पाठिंबा दिला. मद्रास येथील गोखले हॉलमध्यें माझें दुसरें व्याख्यान झालें. त्या वेळीं मिसेस् बेझंट या बाईनें अध्यक्षस्थान स्वीकारून आमच्या कार्याची मनःपूर्वक महती गायली. यानंतर त्रिचनापल्लीकडे अस्पृश्य व जमीनदार यांच्यांत चाललेल्या लढ्याविषयीं आम्ही कानोसा घेऊं लागलों. त्या प्रांतांतील बर्याच पडिक जमिनी मद्रास सरकारांनीं गरीब पारिया लोकांना फुकट अथवा सवलतीच्या दारानें लागवडीस दिल्या होत्या. ही गोष्ट तिकडील जमीनदारांना खपेना. आजवर अस्पृश्यवर्ग म्हणजे केवळ शेतीवरचे गुलाम होते. जनावरांइतकीसुद्धां त्यांना किंमत नसे. यामुळें जमीनदारांना मोठी किफायत होत असे. त्यांना कोणत्याही प्रकारचे कायदेशीर हक्क नसत. सरकार-दरबारांत कायदेशीर दाद लावून घेण्याची त्यांच्यांत जाणीव नसे. अशी पुरातन बेबंदशाही चालू असतां हे गरीब लोक ह्यापुढें जर स्वतंत्र शेतकरी म्हणून मिरवूं लागले तर त्या प्रांतींच्या जमीनदारांची धडगत नाही अशी धास्ती जमीनदारांनीं घेतली होती. प्रकरण मारामारीवर जाऊन रक्तपातही होऊं लागला होता. अशा वेळीं आम्ही तेथें जाण्याविषयीं सल्ला घेऊ लागलों असतां दुमत होऊं लागलें. कोणी म्हणत, आम्ही गेलों असतां थोडाबहुत इष्ट परिणाम होईल. निदान खरी परिस्थिति तरी कळेल; पण बहुतेकांचें मत असें पडलें कीं, ही वेळ बरी नव्हे. प्रकरण अधिक विकोपाला जाईल. आमची शारीरिक सुरक्षितताही राहणार नाहीं. मिशनला धोका पोंचेल. शेवटीं मी प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड पेटलंडसाहेब ह्यांची खासगी भेट घेऊन सल्ला घेतला. त्यांनीं प्रेमळपणें स्वागत केलें आणि म्हटलें कीं, ''सरकारनीं या बाबतींत अधिकारयुक्त असा कोणताही सल्ला देणें मुळींच इष्ट होणार नाहीं. कारण सरकारनेंच ही बाब अस्पृश्यवर्गाला जमिनी देऊन उपस्थित केली आहे. जुन्या मताच्या व धनिकवर्गीय लोकांत सरकार अप्रिय झालें आहे. सरकारनें तुमचा पुरस्कार केल्यानें तुम्हांला धोका पोंचेल. म्हणून काय करावयाचें तें तुम्हीच स्वतंत्रपणें पूर्ण विचार करून ठरवा. तुमच्या स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल पोलिसखात्यामार्फत सरकार पूर्ण बंदोबस्त राखील. तुमच्या कामीं यश येवो !'' आम्हांस मोठा पेंच पडला. दंग्याच्या जागीं प्रत्यक्ष जावें कीं नाहीं हें तेथें गेल्यावर ठरवितां येईल; निदान त्या प्रदेशांत जाऊन आजूबाजूचा प्रकार तरी पाहावा म्हणून आम्ही त्रिचनापल्लीकडे निघालों.
बॅ. जॉर्ज : ह्या भागांत मदुरा, तंजावर, त्रिचनापल्ली वगैरे प्राचीन ठिकाणीं सुप्रसिद्ध हिंदु देवालयांच्या अवाढव्य व सुंदर इमारती आहेत. त्या पाहून आम्हीं आमच्या डोळ्यांचीं पारणें फेडलीं. मदुरा येथें बॅ. जॉर्ज नांवाचे काँग्रेसचे कट्टे ख्रिस्ती भक्त यांचे घरीं आम्ही उतरलों. प्रत्येक प्रांतिक कार्याविषयीं यांचा उत्साह अलोट दिसला. तंजावर, त्रिचनापल्ली इकडे त्यांचीं पत्रें घेतलीं. या शहरांतील प्रसिद्ध काँग्रेसभक्तांनीं आमच्या मिशनला चांगली सहानुभूति दाखविली. जेव्हां जेव्हां आम्ही अस्पृश्य व जमीनदार ह्यांविषयीं प्रश्न पुढें काढला तेव्हां तेव्हां हे काँग्रेसभक्त मागें सरून कचरत असत. कारण ते स्वतःच जमीनदार असत. पोटापुढें कोणाची मजल जात नाहीं असें म्हणतात तेंच खरें. त्यांनीं दंग्याच्या जागीं जाण्याच्या निर्धारापासून आमचें मन पूर्णपणें वळविलें. आम्हांलाही कांहीं निकडीच्या कामासाठीं बंगलोरकडे व मुंबईकडे जाणें भाग होतें. नाइलाजानें आम्ही हुल्लडखोरीचा मार्ग सोडला.
ख्रिस्त्यांचा कावा : या सफरींत आणखी एक मोठा मजेदार अनुभव आम्हांस आला. रोमन कॅथॉलिक व प्रॉटेस्टंट पंथाच्या ख्रिस्ती लोकांनीं अस्पृश्यवर्गाच्या असंख्य प्राण्यांना आपल्या जाळ्यांत कोंडून ठेवलेलें आम्हीं प्रत्यक्ष पाहिलें. ह्या गरिबांचें धर्मांतर करून त्यांचा भौतिक, मानसिक व आध्यात्मिक असा कोणताच फायदा झालेला दिसला नाहीं. उलट त्या फायद्याच्या मार्गांत मूर्तिपूजक ख्रिस्ती धर्माच्या नांवानें सतिपूजा, रथोत्सव, यात्रा, जातिभेद यांचे भयंकर तट उभारलेले आम्हीं पाहिले. त्रिचनापल्ली या शहराच्या आसमंतात् ज्या पारिया लोकांच्या कंगाल वस्त्या पाहिल्या त्यांत झोंपड्यांतून क्षुद्र ख्रिस्ती देवस्थानें आम्हीं डोळ्यांनीं पाहिलीं. खेड्यांतील म्हसोबा, रवळनाथ, सटवाई, जाखाई-जोखाई अशा क्षुद्र हिंदु-दैवतांप्रमाणेंच मेरी, जोसेफ, ख्रिस्त व त्याचे बारा शिष्य यांच्या नांवानें शेंकडों दगड ठेवून त्यांना शेंदूर माखलेला आम्हीं पाहिला. ख्रिस्ती सणासुदीला हिंदूंप्रमाणेंच रथोत्सवही करीत असतात. प्रत्येक देवस्थानापुढें लांकडी रथ दिसले. या गरीब लोकांपेक्षां प्रत्यक्ष ख्रिस्ती धर्माची व स्वतः ख्रिस्ताची अशी हालअपेष्टा पाहून आम्हांला कींव आली. अशा उपायानें अस्पृश्यांनीं ख्रिस्ती अनुयायांचा भरणा केलेला आम्हीं पाहिला. इतर प्रांतांतील समजूतदार ख्रिस्ती मिशनर्यांना ह्या प्रकाराची गंधवार्ता तरी आहे कीं नाहीं, असल्यास ते मूग गिळून स्वस्थ कसे बसतात याचा उलगडा आम्हांस कांहीं केल्या होईना. हिंदु धर्माप्रमाणेंच ख्रिस्ती झालेल्यांत कडक जातिभेद आहेत. ब्राह्मण, मुदलियार, पिल्ले, रड्डी, शेट्टी वगैरे हिंदु जाती ख्रिस्ती धर्मानुयायांमध्यें अबाधित कशा राहतील ह्याचीच रोमन कॅथालिक पाद्र्यांना मोठी काळजी पडलेली असते. लहानमोठ्या ख्रिस्ती उपासनालयांतून ह्या निरनिराळ्या जातींचीं बांकें व दर्जे ठरवलेले असतात. अस्पृश्य ख्रिस्तांना तर या सर्वच मंदिरांतून शिरकाव नसतो. त्यांनीं बाहेरूनच रस्त्यांतून अगर अंगणांतून गुडघे टेकून प्रार्थना करावी आणि मोक्ष मिळवावा. मात्र हिंदु धर्मांत त्यांनीं पुन्हां जाऊं नये. ख्रिस्ती अनुयायांत त्या प्रांतीं स्वतंत्रतेची मोठी चळवळ चालली होती. ती दाबून टाकण्यासाठीं रोमहून एक मोठे धर्माधिकारी पोपसाहेब आले होते. ही शिस्तीची परंपरा सर्वांनीं मानावी असा अखेरचा फतवा मागें ठेवून हे आलेले बडे अधिकारी परत गेले असें माझ्या ऐकण्यांत आलें.
रेडा आणि माणूस : एके दिवशीं तिसरे प्रहरीं त्रिचनापल्लीच्या मोठ्या रस्त्यांतून जात असतां म्युनिसिपालिटीचा कचर्यानें भरलेला एक मोठा गाडा मोठ्या कष्टानें रखडत चाललेला आढळला. त्याला एका बाजूला एक रेडा व दुसर्या बाजूला एक माणूस जुंपलेला आढळला. हा काय चमत्कार म्हणून जवळ जाऊन शोध करतां माणसानें उत्तर दिलें कीं, ''मी जातीनें पारिया पण धर्मानें रोमन कॅथालिक आहे.'' जात व धर्म कोणताही असो, माणसानें रेड्यांची मजल गांठली हें पाहून आम्ही थक्क झालों ! रेड्यांचा तुटवडा पडतो म्हणून माणसांना असलीं कामें करावीं लागतात. धर्मांतर केलेल्या पारियांची ही भौतिक उन्नति ! असे आम्हीं अनुभवलेले अनेक प्रकार एका फूलस्केप कागदावर छापून त्याच्या अनेक प्रती आम्हीं चोहोंकडे वांटल्या; पण त्याला उत्तर म्हणून कोणाचेंच आलें नाहीं. आम्हीं पाहिलेला प्रकार कितीही कडू असो, तो खरा आहे असें मानून आम्ही स्वस्थ राहिलों आणि स्वदेशीं आलों. या सफरींत जागोजागीं जो आमचा गौरव झाला, तो आमचा नसून आमच्या कार्याचा होता. पुढें जे अप्रतिष्ठेचे प्रकार अनुभवास आले ते या गौरवापेक्षां आमच्या कार्याला अधिक प्रोत्साहक ठरले.