आयुष्यांतील परिवर्तनें
माझ्या आयुष्याचें साकल्येंकरून निरीक्षण केल्यास त्यांत खालील चमत्कारिक योगायोग येऊन प्रत्येक दहा वर्षांनीं एक निश्चित परिवर्तन घडून आल्याचें दिसून येत आहे. मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलेला नाहीं. पण निश्चितकालीं झालेलीं हीं परिवर्तनें पाहून त्यांच्या मुळाशीं कांहीं ग्रहलाघव बाहे असा एखादा ज्योतिषशास्त्रज्ञ सांगूं शकेल. माझ्या जन्मकाळींच म्हणजे ता. २३ एप्रिल १८७३ रोजीं आमच्या गृहपुरोहिताने माझी सशास्त्र जन्मपत्रिका वर्तवली. ती मी खालीं जशीच्या तशीच देत आहें.
जन्मपत्रिका :- स्वस्ति श्रीनृपशालिवाहन शके १७९५ प्रवर्तमाने श्रीमुखनाम संवत्सरे ॥ चैत्र वद्य ११ बुधवार घटी १५ पळ १ शततारानक्षत्र घटी ० पळ ५८ ॥ ब्रह्मनामयोग घटी ९ पळ ४८ नराकर्ण घटी १५ पळ २८ एवं पंचांगशुध्दौ ॥ अस्मिन् शुभदिवसे रामबसप्पा तस्य भार्या कुंकुमोक्तसौभाग्यवती यमुनाबाई तृतीय (पंचम संतानं अथवा चतुर्थ पुत्रः V. R. Shinde) मजीजतन् ॥ अवकहडाचक्रानुसारेण जननकाल घटी सूयौदयानंतर १४ घटिका प्रसूतकालाः ॥ पूर्वाभाद्रपदा नक्षत्र प्रथम चरण ॥ जन्मनामशंक्रप्पाइति ॥ शेशिगिरीइतिप्रतिष्टितं ॥ कुंभराशीमहानक्षत्रमुखं पतति । उत्तमं । मुखेअन्नसुखंचैवशीर्षोराजंश्चमेवच । मनुष्यगण । हारणी जाति ॥ आजायोनी ॥ जन्मकालेशिंहलग्न ॥ जनकाले गुरू महर्दश ॥ ..... जन्मापासून सोळा वर्षापर्यंत सर्व गोष्टी उत्तम प्रकार होईल ॥ १२, १७, २१, ३२, ४२, ४३ येतेषुशुभगृहावलोकिते ॥ आयुष्य ८० ॥ मातापितृसेवकः ॥ विद्यावंतः ॥ बहुजनप्रियः ॥ देवब्राह्मणद्विजपूजिकः ॥ श्रीमंगलमाहेश्वरी शुभं भवतु । तदेव लग्नं ॥ शुभमस्तु ॥ कल्याणमस्तु ॥
जन्मकुंडली (PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
वरील अशुद्ध लेखनावरून पुरोहितबुवा फारसे मोठे भाषापंडित होते असें दिसत नाहीं. त्यांचें ज्योतिषशास्त्रपांडित्य किती होतें हें सांगण्याचा मला अधिकार नाहीं. कुंडलीमध्येंही कांहीं दोषस्थळें आहेत असें माझ्या तज्ज्ञ मित्रांनीं सांगितलें. फलश्रुतीच ताडून पहावयाची तर वर जीं माझ्या आयुष्यांतलीं वर्षे शुभग्रहाचीं म्हणून सांगितलीं आहेत त्यांचा मला तरी तसा अनुभव आला नाहीं. कांहीं वर्षे तर मला उलट अनुभव आला आहे. तें कसेंही असो. माझ्या आयुष्यांत निश्चितपणें प्रत्येक १० वे वर्षी जीं ठळक स्थित्यंतरें आढळून आलीं त्यांवरून पुढील परिवर्तनकाल मीं ठरविला आहे. तो असा :-
ता. २३ एप्रिल १८७३ जन्मकाल
परिवर्तन १ लें :- १८८२-८३ माझा विवाह. वडिलोपार्जित घर गहाण ठेवून विवाहाप्रीत्यर्थ कर्ज. त्यापायीं सर्व मिळकत जाऊन भयंकर दारिद्र्यप्राप्ति. वडील बंधूचा मृत्यु. प्राथमिक शिक्षण संपलें.
परिवर्तन २ रें :- १८९२-९३ दुय्यम शिक्षण संपलें. पहिली नोकरी सुटली. कॉलेजशिक्षणार्थ पुण्यास आलों.
परिवर्तन ३ रें :- १९०३ विलायतेंतील शिक्षण संपवून मुंबईस परत आलों. सार्वजनिक सेवेची सुरुवात.
परिवर्तन ४ थें :- १९१२-१४ अंतर्बाह्य खळबळ, प्रार्थनासमाजाचा संबंध सुटला. भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचें पहिल्या सहा वर्षांचें अर्धे तप संपलें. मुंबई शहरची वस्ती सोडून पुणें शाखेची व्यवस्था प्रत्यक्ष ताब्यांत घेतली. मग त्यासाठीं पुण्यास येऊन राहिलों.
परिवर्तन ५ वें :- १९२३-२४ निराश्रित साह्यकारी मंडळीचा (डी. सी. मिशनच्या प्रत्यक्ष चालकत्वाचा) संबंध सुटला. कलकत्त्यास गेलों. ब्राह्मसमाजाचा पुन्हां प्रचारक झालों. हिंदुस्थानच्या नैर्ॠत्य किनार्यावरील मंगळूर येथील ब्राह्मसमाजाचा आचार्य झालों.
परिवर्तन ६ वें :- १९३३-३४ राममोहन रॉय शतसांवत्सरिक तिथीप्रीत्यर्थ महाराष्ट्रांत व बृहन्महाराष्ट्रांत थेट नागपूरपर्यंत जिल्हा-जिल्ह्यांतून व कांहीं तालुक्यांतूनही व्याख्यानांचा मोठा दौरा काढला. शीण इतका आला कीं मधुमेहाची तीव्र व्यथा झालेली आढळली. हल्लीं वार्धक्य आणि आजार यांच्या ताब्यांत गेलों आहें.
परिवर्तन ७ वें :- १९४३ ह्या सालीं किंवा त्या अगोदर काय होणार हें अस्पष्ट दिसतच आहे.
वरील जीं परिवर्तनें झालीं त्यांत स्थानांतर आणि स्थित्यंतर हीं मुख्य लक्षणें होतीं.
१९०९-१० सालीं जी अंतर्बाह्य खळबळ म्हणून वर्णन केलें आहे, ती १९१२-१३ चें जें ४ थें परिवर्तन घडलें त्याची पूर्वतयारी होती. आई-बाप वारले, योगक्षेमाचें साधन नाहींसें झालें, घरांतील मंडळी रोगग्रस्त झाली, मी फार कंटाळून गेलों; तरीदेखील आणखी दोन वर्षे मिशनच्या कामासाठीं मुंबईंतच काढावीं लागलीं. मुंबई आणि पुणें येथें मिशनला स्वतःच्या इमारतींची फार जरुरी भासूं लागली. पण पुरेशी स्वतःची जागा मुंबईसारख्या दाट शहरांत मिशनला मिळणें अशक्य होतें. सरकारलाच स्वतःच्या कचेर्यांसाठीं जागा मिळेना. मुंबई शहरांतील लंबरेषेंत वस्ती पसरूं लागली. मग आमच्या गरीब मिशनची दाद कोण घेणार ? मुंबई शहराचा अवाढव्य खर्चिकपणाही मिशनला नडूं लागला. ह्या कामासाठीं महाराष्ट्राची राजधानी आणि चळवळीचें केंद्र पुणें शहर ह्याकडे मला नजर वळवावी लागली. याच वेळीं पुणें शाखेंत एक अचानक कारण घडलें.
ए. के. मुदलियार : ह्या शाखेचे सन्मान्य सेक्रेटरी रा. ए. के. मुदलियार ह्यांनीं पहिलीं ६ वर्षे अत्यंत जोमानें आणि दक्षतेनें कांहीं एक वेतन न घेतां बाजू संभाळली होती. त्यांची पत्नी सौ. सीताबाई ही एकाएकीं निवर्तल्यामुळें मुदलियार यांवर मोठी आपत्ति आली. त्यांना घरीं कोणीच जोडीदार नव्हता. ते पुणें येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्यें शिक्षक होते. कांहीं कारणानें ती जागाही सुटली. मुदलियार यांच्या कामांत त्यांच्या पत्नीची मोठी मदत होती. यापुढें श्री. मुदलियार यांना मिशनच्या कामाचा राजिनामा देणें भाग पडलें आणि ऑगस्ट १९१२ मध्यें पुणें शाखेचा ठराव होऊन मीं जरूर ती तजवीज करावी व ती होईतोंपर्यंत मीं स्वतः पुण्यास राहून कामाचा सर्व ताबा घ्यावा असें तांतडीचें पत्र आलें. मी तेथें गेल्यावर असें आढळून आलें कीं, मुंबईप्रमाणें पुण्याला एक वसतिगृह असावें आणि त्यासाठीं मिशनला स्वतःची इमारत असावी. ही सर्व परिस्थिति जनतेपुढें ठेवून एक मोठी परिषद भरवून जनताजनार्दनापुढें एक जाहीर विनंती ठेवावी. ऑक्टोबर महिन्यांत जी महाराष्ट्रीय परिषद भरली तिचें सविस्तर वर्णन मागें आलेंच आहे.
कार्यवाहकांची फेरव्यवस्था : निराश्रित सेवासदन बंद पडल्यावर त्यांत तयार झालेले प्रचारक-भगिनी जनाबाई-यांची दुसर्या कामावर रवानगी झाली. वर्हाडची आणि मध्यप्रांताची परिस्थिति अजमावून पाहण्याकरितां जनाबाई तिकडे गेल्या आणि यवतमाळ येथें लहानसें वसतिगृह काढून तें चालवूं लागल्या. हुबळी येथें याच वेळीं कर्नाटक शाखा उघडण्यांत येऊन तिचें चालकत्व रा. सय्यद अबदुल कादर यांस देण्यांत आलें. त्यांत त्यांची पत्नी कल्याणीबाई यांचें पूर्ण साहाय्य मिळालें. इकडे मुंबईला मध्यवर्ती मातृसंस्थेस रा. वामनराव सोहोनी हे नवीन वाहून घेतलेले कार्यवाहक मिळाले. भगिनी जनाबाई आणि सय्यद अबदुल कादर यांचें उदाहरण पाहून रा. सोहनींना आत्मसमर्पणाची प्रेरणा (१९१० चे सुमारास) झाली होती. दोन वर्षे त्यांनीं कामही केलें आणि पूर्ण व स्वतंत्र जबाबदारीची तयारी केली. याच सालीं औद्योगिक शिक्षणाप्रीत्यर्थ वाडिया ट्रस्टीची दरसाल ६००० रु. ची ग्रँट मिळून मुंबई येथील वसतिगृहांत ४० मुलांची खाण्यापिण्याची वगैरे आणि शाळांतील मुलांची सर्वतोंपरी सोय झाली. ह्या सर्व कामाचें केन्द्रस्थान परळ येथील पोयबावडीचे नाक्यासमोर घडियाळी हॉल नांवाचा एक प्रशस्त जुना बंगला होता, तेथें करण्यांत आली. बंगला दोन मजली असून भोंवतालीं उपगृहें आणि समोर उंच वृक्षांची विस्तीर्ण बाग आणि त्याभोंवती उंच तटबंदी होती. इंप्रुव्हमेंट ट्रस्टच्या मेहेरबानीनें हा बंगला अगदीं सवलतीच्या भाड्यांनें मिळाला. मिशनच्या दंडकाप्रमाणें रा. सोहोनी हे आपल्या सर्व कुटुंबाला घेऊन मुंबई शाखेचे कुलगुय म्हणून वरील आश्रमांत कायमचे येऊन राहिले. ते लवकरच ह्या कामाशीं इतके समरस झाले कीं, मध्यवर्ती कामाची माझी सर्व काळजी दूर झाली आणि मी १९१३ च्या आरंभीं पुणें शाखेच्या पुनर्घटनेसाठीं पुण्यास सहकुटुंब येऊन राहिलों. त्या शाखेचे हेडमास्तर रा. दा. ना. पटवर्धन ह्यांनीं महाराष्ट्र परिषदेची जुळवाजुळव करण्याचे कामीं फार दक्षता दाखवली. त्यांच्या साहाय्यानें मीं ह्या शाखेचा, माझें जनरल सेक्रेटरीचें काम संभाळून, ताबा घेतला. येथें माझ्या आयुष्यांतलें चौथें परिवर्तन आणि मिशनच्या ६ वर्षांचें पहिलें अर्धे तप संपलें !