आदरांजलि

आदरांजलि

महर्षि विठ्ठल रामजी ऊर्फ अण्णासाहेब शिंदे यांचें पुनर्मुद्रित केलेले आत्मचरित्र ‘माझ्या आठवणी व अनुभव’ हें मीं वाचलें.  ज्यांनी आपलें सबंध आयुष्य सर्वस्वीं समाजसेवेसाठी व अस्पृश्योद्धारासाठी वाहिले अशा या थोर पुरुषाच्या आयुष्यांतील या पुस्तकांत ग्रथित केलेल्या आठवणी वाचल्यानंतर त्यांच्याविषयींचा आदर दुणावतो.  अत्यंत प्रतिकूल परिस्थितींतून मार्ग काढून आपलें कार्य आत्यंतिक निष्ठेनें व तळमळीनें सतत करीत राहणें हा गुण असामान्य व्यक्तींच्या चरित्रांत आपणांस प्रामुख्यानें आढळतो.  महर्षि शिंदे यांच्या चरित्रांत आपणांस याचें प्रत्यंतर येतें.  लहानपणची गरिबी, त्यांत अनेक कौंटुंबिक आपत्तींची भर असें असूनहि स्वाभिमान न दुखवतां जेवढी मदत मिळेल तिच्यावर त्यांनी आपलें शिक्षण पुरें केलें.  त्यांच्या दारुण परिस्थितीचा व प्रेमळ मातापित्यांच्या धार्मिक प्रवृत्तींचा त्यांच्यामनावर जो परिणाम झाला त्यामधूनच त्यांना धार्मिक शिक्षण घेण्याची प्रेरणा झाली व मँचेस्टर येथें हें शिक्षण घेऊन परत आल्यावर त्यांनीं धर्मप्रचाराचें काम हातीं घेतलें.  या का-यातूनच पुढें त्यांनीं केलेल्या अस्पृश्योद्धाराच्या महान् कार्याचा उदय झाला.
त्यांच्या सार्वजनिक आयुष्याचा परिपोष त्यांच्याच भाषेंत सांगावयाचें झाल्यास विश्वधर्मापासून सुरुवात होऊन समाजसुधारणा, समाजसेवा व राष्ट्रोद्धार अशा टप्प्यांनी झाला.

तत्कालीन महाराष्ट्रांत ज्या ज्या समाजसुधारणेच्या चळवळी झाल्या त्यांत महर्षि शिंद्यांचें प्रामुख्यानें अंग होतें.  परंतु त्यांच्या आयुष्यांतील अत्यंत मौलिक कार्य म्हणजे अस्पृश्यांची त्यांनी केलेली महान् सेवा.  आपलें सर्व जीवन त्यांनी या कार्यासाठी वेंचलें.  जातिनिरपेक्ष व धर्मनिरपेक्ष बुद्धीनें त्यांनीं हें कार्य सतत केलें.  तत्कालीन सरकारचीही या का-यात त्यांनीं सहानुभूति मिळविली.  एवढेंच नव्हे तर सतत प्रयत्न करून राष्ट्रीय सभेलाही हें कार्य हातीं घेण्यास त्यांनीं प्रवृत्त केलें.  या कार्याचा पुढें महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालीं प्रचंड वृक्ष फोफावला.

महर्षि शिंद्यांनीं आपल्या हयातींत केलेली धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय क्षेत्रांतील कामगिरी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासांत अद्वितीय गणली जाईल. इतक्या निरपेक्ष, निरलस व तळमळीनें काम करणार्या एका थोर समाजसेवकाच्या चरित्राचा आदर्श तरुण पिढीपुढें सतत राहावा व त्यापासून त्यांना शक्ति व स्फूर्ति मिळावी अशी इच्छा व्यक्त करून ह्या चरित्राच्या रूपानें मराठी वाङ्मयांतील बहुमोल ठेवा वाचकांच्या हातीं दिल्याबद्दल महर्षींच्या चिरंजिवांना मी धन्यवाद देतों.

यशवंतराव चव्हाण

‘माझ्या आठवणी’ संबंधीं

परमुलुखांत नोकरी करीत असतां मी १९३९ चे सुमारास रजेनिमित्त पुण्यास घरीं आलो असतां सहज माझ्या हातीं वडिलांच्या हस्ताक्षरांत लिहिलेली जाडजूड वही लागतांच मीं तीबद्दल कुतूहलानें त्यांना प्रश्न केला.  त्यावर त्यांनी स्वतः १९३० सालीं कायदेभंगाच्या चळवळींत तुरुंगांत असतांना लिहिलेल्या त्या स्वतःच्या आठवणी आहेत असें सांगितलें.  तीर्थरूप त्या वेळीं साठीच्या पलीकडे गेलेले, तशांत त्यांना मधुमेहाचा विकार आणि त्यामुळेंच त्यांच्या दोन्ही हातांना कंपवायूची बाधा झालेली.  अशा स्थितींत भर म्हणूनच कीं काय दृष्टि मंद होऊन त्यांना अजिबात वाचतां येत नव्हतें.  हें सर्व ठाऊक असतांही मीं त्यांना सहज विचारलें, “या आठवणींत तुम्ही भर घालून संपूर्ण आत्मचरित्रच कां लिहीत नाहीं ?” ती अण्णांनीं या माझ्या म्हणण्याला उत्तरच दिलें नाहीं; पण मी तेवढ्यानें कांहीं गप्प बसणार नव्हतों.  एकसारखा पाठपुरावा करून मीं त्यांना त्याबाबत बोलावयास लावलेंच.  परंतु वार्धक्यानें जर्जर झालेल्या निरुत्साही मनःस्थितींतलेंच तें निराशाजनक उत्तर होतें.  पण मीं आपला हेका न सोडतांच सुचविलें कीं, “आत्मचरित्रासंबंधींची जी कांही सामुग्री असेल ती मी मिळवितो, ती तुम्हांस वाचून दाखवितों.  आठवणींचे धागेदोरे जुळवून आपण आत्मचरित्राचें कथन तेवढें करावें.  म्हणजे लिहिण्याचें काम मी स्वतः करीन.”  या कामाला बराच कालावधि लागणार असल्याची वडिलांना खात्री होतीच.  तेव्हां त्यांनी मला प्रश्न केला, “हें सर्व काम कांही एक-दोन महिन्यांचे नाहीं.  त्याला किती तरी महिने लागतील !  तेव्हां तूं नोकरी संभाळून हें सारें कसें करणार ?  शिवाय माझें आत्मचरित्र लोकांसमोर पुस्तकरूपानें यावं असं मलाच मुळांतून वाटत नाहीं.  आणि आतां तर मी इतका थकलेलों आहें कीं, तूं सांगितलेली सूचना पाळून देखील कथन करण्याचे श्रम माझ्याच्यानें होतील असें वाटत नाहीं.  दुसरी गोष्ट अशी कीं, कथन कांही नियमितपणें होईल म्हणावें तर तेंही नाही.  माझी प्रकृति, माझी मनःस्थिति, मनाचा एक विशिष्ट कल या गोष्टी जमेस धरता हें काम सुतराम् कसें पार पडेल याची मोठीच वानवा आहे.  तेव्हां तूं आपला हेका सोडून नोकरीवर जा पाहूं कसा !”
मी ऐकलें नाहीं.  निमूटपणें मीं सामुग्री जमवली आणि वडिलांच्या इच्छेविरुद्ध बिनपगारी दीर्घकालाची सुटी घेऊन आत्मचरित्राचा पूर्वार्ध संपवला.  आत्मचरित्राचा पूर्वार्ध पुस्तकरूपानें प्रसिद्ध झालेला पाहतांच दुसर्या भागाची तयारी देखील अशाच परिस्थितींत मीं करून टाकली.  पूर्वार्ध छापून प्रसिद्ध करण्याचें काम माझे मित्र श्री. जयवंतराव जगताप यांनी आपल्या ‘वत्सला साहित्य प्रकाशन’ संस्थेतर्फे पुरें केलें; पण दुसर्या भागाचें हस्तलिखित तयार करून त्यांना १९४१ च्या आरंभीं दिलें असतांहि छपाईच्या कामांत त्यांच्याकडून कारणपरत्वें दिरंगाई झाली.  पुढें १९४४ सालीं वडिलांच्या निधनानंतर त्यांनी छपाईचें काम धूमधडाक्यानें सुरू केलें.  समग्र आत्मचरित्र वडिलांच्या हयातींत प्रसिद्ध होण्यासारखें असतांना जयवंतरावांनीं बुद्धिपुरस्सर चालढकल केली आणि त्यांच्या निधनाला अवघा आठवडा लोटतो न लोटतो तोंच पुस्तकप्रसिद्धीबाबत वर्तमानपत्रांतून अगाऊ जाहिरात करून धमाल उडवण्याचा जो उपक्रम आरंभला त्यावरून त्यांच्या व्यवहारी वृत्तीचें कौतुक करावें तेवढें कमीच आहे.  वडिलांनी आपल्या हयातींत, आपल्या डोळ्यांनीं समग्र चरित्राचें प्रकाशन पुस्तकरूपानें पाहावें हाच एक हेतु मनांत बाळगून मी आटाकोट प्रयत्न केले असतां त्यांच्या निधनानंतर पुस्तकाचें प्रकाशन होण्यांत मला तरी विशेष उत्साह वाटत नव्हता.  बरें, इतकं असतांहि पुस्तक हस्तलिखिताबरहुकूम तरी प्रसिद्ध करावयाचें, तें सोडून जयवंतरावांनीं त्यांत जी बेसुमार काटछाट चालवली त्यामुळें मी चकितच झालों.  हस्तलिखितांतील पॅरेच्या पॅरेच नव्हे, तर आठ-आठ दहा-दहा पानें अनावश्यक, नीरस आणि कंटाळवाणा मजकूर या सबबीखालीं काढून टाकण्यास जेव्हां जयवंतरावांनीं आरंभ केला, तेव्हां नाइलाजानें मला त्यांना विरोध करावा लागला.  परिणाम असा झाला कीं, जयवंतरावांनींच हस्तलिलिखातचे सर्व भाग माझ्यापुढें टाकून म्हटलें कीं, ‘हें बाड उचला अन् चालूं लागा.  माझ्याखेरीज दुसरा कोणीही हें काम करील किंवा कसें हें तुम्हांला कळून येईलच !”  एक शब्दहि न उच्चारतां मीं पुढ्यांत टाकलेलें बाड उचलून घरीं आणलें.  वडिलांच्या पश्चात् हस्तलिखितांत कसलीहि काटछाट करण्याचा अधिकार प्रकाशकाला बिलकूल नाहीं, हें परोपरीनें सांगूनही जेव्हां निरुपाय झाला तेव्हांच मला हा मार्ग पत्करावा लागला.  कांही का असेना, पुस्तकाचा पूर्वार्ध तरी वडिलांच्या नजरेस पडला यांतच मी समाधान मानून होतों.  परंतु वडिलांच्या कार्याच्या दृष्टीनें उत्तरार्ध अत्यंत महत्त्वाचा होता.  आणि तो प्रसिद्ध झालेला त्यांनीं पाहिला असता तर माझे घोडें गंगेंत न्हालें असतें.
तीर्थरूपांच्या तोंडून होत असलेल्या आत्मचरित्राचें कथन करतांना मीं दोनच गोष्टींवर त्यांचे विचार काय आहेत हें जाणून घेतलें.  त्या गोष्टी म्हणजे ब्राह्मण-ब्राह्मणेतरवाद आणि त्यांनीं केलेलें सामाजिक कार्य.  ब्राह्मण-ब्राह्मणेतरवाद हा इंग्रजांनीं आपल्या भेदनीतीला पूरक म्हणून उपस्थित केला असल्यानें तो सर्वस्वीं त्याज्य आहे असें वडिलांचें स्पष्ट मत होतें.  हिंदु-मुसलमान-वादाप्रमाणें हा वाद देखील देशाच्या एकजुटीला बाधक आहे असें त्यांचें ठाम मत होतें.  शिवाय जातिभेदावर आधारलेला पक्ष केव्हांहि चिरस्थायी असूं शकत नाहीं याची ग्वाही त्यांना मनोमन पटल्यानें त्यांनीं ह्या वादापासून स्वतःला सुरुवातीपासूनच अलिप्त ठेवलें होतें आणि केवळ या एकाच कारणामुळें ब्राह्मणेतरवादीय व्यक्ति त्यांची उपेक्षा करीत, तर सनातनी जातीयवादी उच्चवर्गीय त्यांच्याकडे साशंकतेनें पाहात, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी उघड होती.  एक मात्र खरें कीं विचारवंत व्यक्ति, मग ती कोठल्याहि जातीची असली तरी वडिलांच्या कार्याबद्दल कळकळ व आत्मीयता दर्शवल्यावांचून राहात नसे, ह्याची सत्यता खालील गोष्टीवरून दिसून येईल.  ती अण्णांच्या वाङ्मयीन गुणांचें चीज व त्यांच्या सामाजिक कार्याबद्दलचा सहानुभूतिपूर्वक विचार जसा उच्चवर्गीयांनीं केला तसाच ब्राह्मणेतर वर्गांतल्या श्रीमंत सयाजीराव किंवा कै. शाहुमहाराज यांनीं देखील केलेला आहे हें आत्मचरित्राचें वाचन करतांना आढळून येईल.

दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना स्वतःला स्वतःच्या कार्याबाबत म्हणावी तशी परिपूर्तता आली नसल्याचें वाटत होतें.  याचें कारण सांगतांना त्यांनीं मजजवळ उद्गार काढले ते असे: “या कामाला पैसा हें कांहीं कारण नव्हतें.  पैशापेक्षां आत्मीय जाणिवेनें काम करण्याची उणीव हेंच एक महत्त्वाचें कारण आहे.  डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेला माझ्या मनासारखी ऊर्जितावस्था आली नाहीं याला पैसा हें कारण बिलकूल नसून आंतरिक तळमळीनें, स्वार्थत्यागी वृत्तीनें काम करण्याची उणीव हेंच एक मोठें कारण आहे.”

सुशिक्षित व सुसंस्कृत वर्गीयांकडून जें कांहीं घेण्यासारखें आहे, तें अवश्य घ्यावें आणि आपला उद्धार करून घ्यावा, असें न करतां केवळ रूढ कल्पना उराशीं बाळगून त्यांच्याबद्दलचा मत्सरग्रस्त पूर्वग्रह मनांत उगाळीत बसून कांहीं आपला कार्यभाग होणार नाहीं, ही गोष्ट जशी मागासलेल्या वर्गीयांनीं अमलांत आणावयाची आहे तशीच उच्चवर्गीयांनीं देखील आपला अहंभाव विसरून मागासलेल्या वर्गीयांकडे तुच्छतेनें न पाहतां त्यांना आपल्यांत वागवूनच घ्यावें हें परिणामीं हितकर होणारें आहे असें ते नेहमींच म्हणत असत.

बर्याच काळानंतर आत्मचरित्राचें समग्र प्रकाशन करण्याचा जो योग आलेला आहे तो समाजाच्या दृष्टीनें अत्यंत उपयुक्त आहे.  हा योग घडवून आणण्याचें कार्य जयवंतराव जगतापांनंतर श्री. ग. ल. ठोकळ यांनीं ज्या धडाडींनें केलें आहे त्याबद्दल त्यांचें अभिनंदन मीच काय पण ती.  अण्णासाहेबांबद्दल आस्था बाळगणारी महाराष्ट्रांतली कोणतीहि विचारवंत व्यक्ति यथोचित केल्याविना राहणार नाहीं.

रवींद्र विठ्ठल शिंदे
पुणें, ता. २ फेब्रु. १९५८