भोर संस्थान प्रजापरिषदेच्या ह्या ८ व्या अधिवेशनाचा तुम्हीं मला अध्यक्ष निवडलें ह्याबद्दल मी आपले मनःपूर्वक प्रथम आभार मानणें हा आवश्यक उपचार आहे. ते मी मानतों. वस्तुतः अशा मामुली परिषदांवरून माझा विश्वास उडाला आहे. खरें हित थोड्याशा पडद्याआड राहून सतत झिजून काम करणा-या व्यक्तींच्या पुण्याईवरच अवलंबून असतें. वर्षभर ती पुण्याई घडत नसेल, तर अशा परिषदा व्यर्थ ठरतात; इतकेंच नव्हे तर त्या पुष्कळदां विचारवंतांस दुःसह वाटतात. माझ्या ह्या अनुभवामुळें मीं अध्यक्षस्थान स्वीकारण्याचें धाडस एकदम केलें नाहीं. पण ह्या संस्थानांतील गेल्या १० वर्षांच्या चळवळीचें मीं जेव्हां कारणापुरतें अध्ययन केलें, तेव्हां मला असें दिसून आलें कीं, ह्या परिषदरूपी दर्शनी पडद्यामागें एक चित्तवेधक आणि आदर्शपूर्ण दिव्य घडत आहे. शेट्ये पाटील, पोतनीस बंधु, गुप्ते, वाळिंबे, साने, आदिकरून संस्थानवाशी सद्गृहस्थांनीं हातीं कंकण बांधून जो हा प्रजापक्षाचा राजसूययज्ञ आरंभला आहे, त्याला आतां १० वर्षांनीं चांगलें दृश्य स्वरूप प्राप्त झालें आहे. इतर पुष्कळ परिषदांप्रमाणें आगीवांचून नुसता धुराचा डोंबाळा नसून ही परिषद म्हणजे सह्याद्रींतील एक ज्वालामुखी आहे, आणि तिच्या १० वर्षांच्या भूतकालाहूनहि भविष्यकाल नुसत्या भोर संस्थानालाच काय तर महाराष्ट्रालाहि चांगला हालवून जागें करील असें मला चिन्ह दिसत आहे. अशा मुहूर्ताला कोण मराठा स्वस्थ बसेल ? ह्या विचारानें मी आपल्या सेवेस येथें आभारपूर्वक हजर झालों आहें.