महात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य)

(१) दोघेहि जन्मतः ब्राह्मणेतर होते. पण ह्या मुद्यास आतांप्रमाणें त्यांच्या काळीं महत्त्व आलें नव्हतें. दोघेहि ब्राह्मण कुळांत जन्मले असते तरी त्यांनीं आपलें कार्य तसेंच बजावलें असतें व दोघांनाहि कांहीं उदारमतवादी ब्राह्मण गृहस्थांचें साह्य होतें; इतकेंच नव्हे तर तेव्हांप्रमाणेंच हल्लींहि पुष्कळ अनुदार ब्राह्मणेतरांचा विरोधहि चालूं आहे. ह्यावरून दोघांची दृष्टि जातीच्या उपाधीपासून मुक्त असून, त्यांची कृति भावी इतिहासांत चिरकाल जागा व्यापील, ह्यांत संशय नाहीं. केशवाविषयीं तर प्रश्नच नाहीं, पण जोतीबांनींहि आपल्या “सार्वजनिक सत्यधर्म” पुस्तकांत पान १२ वर “अन्नदान” ह्या प्रकरणांत स्पष्ट म्हटलें आहे कीं, “एकंदर सर्व मानवांपैकीं जो कोणी आपल्या कुटुंबाचें पोषण करून जगाच्या कल्याणासाठीं सतत झटत आहे तो आर्य भट भिक्षुक असो अथवा अमेरिकेंतील इंडियन असो, अथवा ज्याला तुम्ही नीच मानितां असा एकादा मृतप असो तो मात्र अन्नदान घेण्यास पात्र आहे; आणि तशालाच अन्नदान केल्यानें निर्मिकास अर्पिलें जाणार आहे.”
(२) दोघेहि भ्रष्ट हिंदु धर्मावर व अन्यायी हिंदु वरिष्ठ वर्गावर रुसलेले जबरदस्त बंडखोर होते. त्यांच्यामध्यें इतर सर्व धर्मांसंबंधीं पूर्ण सहानुभूति व योग्य आदर होता; तरी त्याला बळी न पडून दोघांनींहि कधींच धर्मांतर न करतां केवळ सार्वत्रिक सत्य धर्माची ध्वजा उभारून तिच्याखालीं येण्यास सर्व धर्मियांस सारखेंच व सतत आवाहन केलें.
(३) परकीय मिशन-यांशीं जसा, तसाच ब्रिटिश सरकारशीं व नोकरशाहीशींहि दोघांचा बहाणा आदराचा पण उदात्त स्वातंत्र्याचा होता. केशवाच्या भेटीचे व सल्ल्याचे व्हाइसरॉय व गव्हर्नरहि नेहमीं भुकेलेले असत. त्यांच्या कलकत्यांतील (टाउन हॉल मध्यें होणा-या) एका वार्षिक व्याख्यानाच्या गर्दींत शिरून एक तत्कालीन गव्हर्नर साधारण माणसाप्रमाणें त्यांचें भाषण एकदां ऐकून गेले !  मुंबई सरकारनें जोतीबांचाहि एक मौल्यवान शालजोडी देऊन सत्कार केला. पण दोघांना केव्हांहि सरकारी नोकरीचा किंवा किताबाचा, किंबहुना चालू भाडोत्री राजकारणाचा मोह पडला नाहीं. दोघेहि मिशनरी व सरकारी कावे ओळखून होते.
(४) तरी आपल्या देशोद्धाराच्या कठीण संग्रामांत त्यांनीं निष्कपटी ख्रिस्ती मिशन-यांचें व उदारधि सरकारी सत्ताधा-यांचें साह्य घेण्याचें नाकारण्याचा तोरा दोघांनींहि कधीं मिरविला नाहीं.
(५) दोघेहि स्त्री-शूद्रांचे कर्ते, यशस्वी व कनवाळू कैवारी होते. ब्राह्म धर्मासारख्या उदार चळवळींत स्त्रियांचा प्रवेश केवळ केशवाच्याच कर्तृत्वामुळें प्रथम झाला. राममोहन रॉय यांनीं जरी सतीची चाल बंद केली तरी ब्रह्मोपासनेंत पुरुषांबरोबर स्त्रियांना आणून बसविण्याचें धैर्य त्याला किंवा त्याच्यामागून आलेल्या महर्षि देवेंद्रनाथ ठाकूर ह्यालाहि झालें नाहीं. तें कार्य बंगाल्यांत केशवानें स्वतःची पत्नी खानदानी अभेद्य पडद्यांत अगदीं कोवळ्या वयांत असतांहि तिच्या माहेराची कडेकोट बंदोबस्ताची कोंडी बेगुमान आत्मविश्वासानें फोडून साधिलें आणि ब्रह्मोपासनाच नव्हे तर अखिल ब्राह्मिक जीवन सार्वत्रिक व संपूर्ण केलें. इकडे महाराष्ट्रांत तर जोतिबांनीं केशवाच्या पूर्वीं ८|१० वर्षें म्हणजे इ. स. १८५२ सालीं अस्पृश्यांच्या मुलांसाठींच नव्हे तर मुलींसाठींदेखील पहिली हिंदी शाळा स्वतःच्या खर्चानें व हिमतीनें उघडली. शिक्षक मिळेनात म्हणून स्वतःच्या आज्ञांकित साध्वी पत्नीस स्वतः शिकवून चांभारांच्या मुलींस शिकवावयास बसविलें. ह्या भ्रष्टाकाराबद्दल ह्या दोघांहि सत्पुरुषांना त्यांच्या ज्ञातीनेंच नव्हे तर आप्तांनीं व प्रत्यक्ष आईबापांनीं बाहेर घातलें. सारांश, बहुजनाच्या हिताचें एकहि कार्य दोघांच्या प्रयत्नक्षेत्रांत आल्यावांचून उरलें नाहीं.
(६) पुढें जो देशांत राजकारणाचा व स्वदेशाभिमानाचा अश्वमेध पेटणार होता, त्याची पूर्वभूमिका तयार करण्याचें कठीण आणि अपूर्व काम करण्यांत दोघांचीं आयुष्यें खर्चीं पडलीं. धार्मिक व सामाजिक सुधारणेचा बळकट पाया दोघांनीं घातला म्हणूनच पुढें निरनिराळ्या देशहिताच्या विशिष्ट चळवळी करण्याचें काम त्यांच्या मागून येणा-यांना सोपें किंबहुना शक्य झालें.
(७) दोघे भावनामय, उदार, निष्कपटी, सरळ, सडेतोड, धोपटमार्गी, दाक्षिण्यपूर्ण व प्रतिपक्षाला क्षमा करणारे होते. दोघेहि ईश्वरानें झपाटलेले, अनुयायांना ओढून घेणारे, त्यांच्यावर छाप बसविणारे, नवीन समाज किंबहुना नवयुग संस्थापणारे आणि भविष्यवादी प्रवक्ते होते.
(८) दोघांमध्यें कांहीं समान दोषहि होते. पण ते अपरिहार्य व क्षम्य होते. दोघेहि हुल्लडखोर, केव्हां केव्हां स्वतःच्या उलट निष्कारण वैरी उत्पन्न करणारे व अतिकांक्षी होते. त्यामुळें त्यांचे अनुयायांनाहि ते प्रसंगविशेषीं असह्य झाले. सर्व धर्मांची सांगड घालून कांहीं नवीन विधि व व्रतें प्रचारांत आणण्याचा जालीम प्रयत्न केशवानें ‘नवविधान’ ह्या नांवानें केला. जोतिबानेंहि आपली परिस्थिति, सामर्थ्य, उपकरणें ह्याच्यापलीकडची कांहीं कार्यसिद्धि करावी, असा हव्यास धरिला. पण ह्या दोषांमुळें दोघांच्या मनाच्या मोठेपणाचीच साक्ष पटते.
(९) दोघांनाहि ह्या सात्त्विक महत्त्वाकांक्षेमुळें प्रतिपक्षाचा व स्वकीयांचा तीव्र छळ सोसावा लागला व त्यांचे अंतकाळीं फार हाल झाले.
(१०) दोघेहि मरेपर्यंत निकरानें लढले म्हणून दोघेहि अपूर्व धर्मवीर होते, ह्यांत शंका नाहीं.
वर साम्य दाखविलें. त्याप्रमाणेंच ह्या दोघांमध्यें भेदहि आहेत.