कर्नाटकाची दुर्दशा

(७) कानडी भाषा ज्या देशांत बोलली जाते त्या कर्नाटकाची जितकी दुर्दशा हल्लींच्या काळीं झाली आहे तितकी हिंदुस्थानांत काय किंवा बाहेर काय, दुस-या कोणत्याहि देशाची किंवा राष्ट्राची झालेली नसेल. हा देश अथवा राष्ट्र आज हैद्राबाद आणि म्हैसूर ह्या दोन संस्थानांतून आणि मुंबई व मद्रास ह्या दोन इंग्रजी इलाख्यांतून विभागून ह्याचे चात तुकडे पडले आहेत. वरील राजकीय भेदच नसून ह्या भागांत हिंदु, मुसलमान, लिंगायत, जैन, इ. धार्मिक भेद आणि ब्राह्मण ब्राह्मणेतर इ. नवीन तटहि फार माजले आहेत. ह्यामुळें म्हैसूरची स्वतंत्र युनिव्हर्सिटी आणि एका स्वतंत्र हिंदु संस्थानाची सत्ता आणि संपत्ति ह्या स्वतंत्र युनिव्हर्सिटीस मिळूनहि कानडी भाषेच्या ख-या उत्कर्षाचीं चिन्हें दिसत नाहींत, अशी रड त्या युनिव्हर्सिटीच्या अहवालांतून ऐकूं येत आहे. जर पुणें पीठानें केवळ युनिटरी (एकमुखी) होण्याचा नाद निदान आरंभींचीं कांहीं वर्षें तरी सोडून कर्नाटकाला आपल्या पंखाखालीं घेतलें तर महाराष्ट्रानें कर्नाटकाचें जुनें भाषाऋण फेडण्याचा निदान प्रयत्न केल्याचें तरी श्रेय मिळविल्यासारखें होईल. मुंबई इलाख्यांतल्या कर्नाटकांतले विद्यार्थी म्हैसूर विद्यापीठांत शिकावयास जाण्याचा जसा संभव नाहीं, तसाच तूर्त कर्नाटकास पुण्याप्रमाणें स्वतंत्र पीठ उभारण्याची संधि व सामर्थ्य येण्याचाहि संभव नाहीं. हिंदु-मुसलमानांची एकी दूरच आहे. उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्राची तरी एकी करण्याचें श्रेय पुण्यानें संपादावें.
(८) मीं केवळ कानडी आणि मराठी ह्यांचा भाषाविषयक संबंध आणि त्यांचें उच्च आणि शास्त्रीय अध्ययन ह्याच दृष्टीनें हा लेख लिहिला आहे. राजकारण, प्रांताभिमान, दरबारांतील शिरकाव, सरकारी नोक-या मिळण्याचा संभव वगैरे ख-या विद्येशीं संबंध नसलेल्या अवांतर गोष्टींकडे - जरा ह्यांचाच हिंदी विद्यापीठांतून सुळसुळाट फार आहे तरी - ह्या लेखांत मीं पूर्ण दुर्लक्ष केलें आहे. ह्यामुळें ह्याची व्यावहारीक बाजूनें किंमत आणि प्रासंगिकताहि फार कमी ठरणार आहे. फार तर काय, पण कर्नाटकांतील नमूद केलेलीं कॉलेजें आणि कदाचित् पोटाच्या मागें लागलेला पांढरपेशा वर्गहि पुणें पीठापेक्षां मुंबई पीठाकडेच येतीं बरींच वर्षें धांव घेत राहिल हेंही मी जाणून आहें. तरी पुण्यानें हें धाडस करून आणि एकमुखी होण्याचा नाद सोडून एक प्रकारें स्वार्थत्याग करून दाखविल्यास, मला अशी आशा वाटते कीं, महाराष्ट्राची आणि कर्नाटकाची कांहीं वेळ तरी एकी झाल्यानें, पुण्यानें खरोखर कोणत्याही स्वार्थाचा त्याग केला नसून आपला उत्तम प्रकारें स्वार्थच संपादिला असें त्याला परिणामीं दिसून येईल.