मागील व्याख्यानांत भागवत धर्माचा निरनिराळ्या स्वरूपानें कसा पाया पडला ह्याची विस्तारानें परिस्फुटता केली. कोणत्याहि धर्माचा आरंभ होतो. तो एका विशिष्ट जातीच्या अगर भाषेच्या राष्ट्रामध्यें स्थानिक स्वरूपानें प्रथम होतो. हिंदुस्थान देश तर अशा अनेकविध राष्ट्रांचा एक प्रचंड समुदाय होय. गौतम बुद्धानें जरी आपला सुधारलेला धर्म मुळांतच सार्वत्रिक रुपानें जाहिर केला आणि ज्यांनीं आपल्या सर्वस्वाचा त्याग केला होता अशा प्रतिभासंपन्न प्रचारकांना चारी बांजूनीं दूरवर पाठविलें आणि स्वत: आपण सतत ५१ वर्षें संचार केला, तरी त्याच्या भिक्षुसंघाप्रमाणें परिभ्रमण करणारे त्याच्या काळीं इतरहि पुष्कळ भिक्षुसंघ होते; त्या सर्वांवर वरचढ होऊन हिंदुस्थानाबाहेरहि प्रसार होण्यासारखी अनुकूल परिस्थिति प्राप्त होण्याला आणखी दोन शतकें लागलीं. भरतखंडाचा पश्चिम एशिया आणि पलीकडे ईजिप्त आणि ग्रीस इ. संस्कृतींशीं परिचय झाला. तो प्रथम अलेक्झांडराच्या हिंदुस्थानावरील इ. स. सव्वातीनशें वर्षांपूर्वी झालेल्या स्वारीमुळेंच, असें जें समजण्यांत येतें तें बरोबर नाहीं. इराणांत त्याच्याहि पूर्वीं २०० वर्षें सायरस आणि डायरियस वगैरे ऐश्वर्यवान् आर्य वीरांनीं बादशाही स्थापिली, सायरसनें बाबिलोनिया जिंकला, त्याचा मुलगा कॅबेसिसनें ईजिप्तवर आणि पुढें डारियसनें हिंदुस्थानावर स्वा-या करून नाईल नदीपासून तों सिंधू नदीच्या अलीकडेपर्यंत पर्शिंयाचें जगांतील जेव्हां पहिलें भाग्यशाली साम्राज्य स्थापिलें, तेव्हांच भरतखंडाचा पश्चिमेकडील संबंध जडला होता. अलेक्झांडरच्या टोळधाडीमुळें कायमचा अनिष्ट असा हिंदुस्थानावर कांहींच परिणाम घडला नाहीं. उलट त्यामुळें हिंदुस्थानांत जागृति होऊन पूर्वीं कधीं नव्हतें असें ह्या देशांत एकछत्री साम्राज्य मात्र उदयास आलें. अलेक्झांडरची पाठ वळली न वळली तोंच पंजाबांत दबा धरुन बसलेला आर्य छावा चंद्रगुप्त मौर्य आणि त्याचा पाताळयंत्री चाणक्यमंत्री ह्यांनीं उचल खाल्ली. त्यांनीं अस्ताव्यस्त पसरलेल्या आर्य वीरांमध्यें नवीन दम भरून त्यांच्या साह्यानें, पाटलीपुत्र येथें धुंदींत लोळणा-या नंद राजाला गारद करून, मगध देशाचें राज्य काबीज केलें. विंध्याद्रीच्या उत्तरेकडे हिमालयापर्यंत आणि आसामपासून सिंधूच्याहि पलिकडे आपली निरंकुश सत्ता स्थापन केली. चंद्रगुप्ताची तलवार आणि चाणक्याची लेखणी ह्या अद्धितीय जोडीनें ह्या नवीन बादशाहीची उत्तम घडी बसविली. पुढें चंद्रगुप्ताचा प्रतापी व पुण्यशील नातू महात्मा अशोक इ. स. पूर्वीं २६८ व्या वर्षीं गादीवर बसला. त्यानें दक्षिणेंतहि आपली सत्ता वाढवून आपला वचक आसेतुहिमालयापर्यंत बिनतोड बसविला, आणि सर्व भरतखंडाला एकजीव बनविलें; इतकेंच नव्हे तर बाहेर पूर्वेकडे व पश्चिमेकडे दूरवर पसरलेल्या दरबारांतूनहि आपलें प्रत्यक्ष दळणवळण आणि वजन वाढविलें !
एवढी जय्यत तयारी झाल्यावर अशोकानें एकदम बौद्ध धर्माचा स्वीकार केला व त्याचा सर्व जगांत प्रसार करण्याच्या कामीं आपली सर्व बादशाही सत्ता व संपत्ति अगदीं श्रद्धापूर्वक अर्पण केली. बुद्धाचा शुद्ध स्वार्थत्यागी, आणि उदार धर्म व त्याच्या प्रसारार्थ सज्ज असलेली अशोकाची निस्सीम भक्ति आणि अतुल शक्ति हा योगायोग नुसत्या भारताच्याच नव्हे तर अखिल जगाच्या इतिहासांत अश्रुतपूर्व क्रांति करणारा झाला ह्यांत संशय नाहीं ! स्वातंत्र, शांती आणि प्रगतीच्या ध्वजा खांद्यावर घेऊन पीतांबरधारी बुद्धभिक्षू पूर्वेकडे चीन, जपान, कोरिया, उत्तरेकडे तिबेट आणि मध्य आशिया, पश्चिमेकडे मेसापोटेमिया आणि ईजिप्त व दक्षिणेकडे सिंहलद्वीप इ. भागांत उतरले. मगध देशांत चंद्रगुप्ताचे वेळींच स्वतः चंद्रगुप्त आणि चाणक्य ह्यांनीं जैन धर्माचा स्वीकार केला होता. इतकेंच नव्हे तर म्हतारपणीं मुलावर राज्य सोपवून चंद्रगुप्त हा भद्रबाहू ह्या जैन संन्याशाबरोबर दक्षिणेंत धर्मप्रसारार्थ म्हैसूरजवळ श्रावणबेल्लगोळा येथें आमरण राहिला अशी दंतकथा प्रसिद्ध आहे. ह्याप्रकारें मौर्य घराणें ही एक पुण्यकीर्ति राजर्षींची खाणच होती. भागवत धर्माचे जे निरनिराळे प्रकार पूर्वीं राष्ट्रीय स्वरूपांत होते, त्यांना ह्या राजर्षींनीं अगदीं सार्वत्रिक स्वरूप दिलें व त्यांचा पाया स्वातंत्र्याच्या आणि लोकसत्तेच्या पायावर उभा करून आपण केवळ त्याचे नम्र सेवक बनले ! शेवटीं अशोकानें राज्यकारभाराची दगदग सोडून आपल्या आजाप्रमाणें संन्यासदिक्षा घेतली. त्याचा सख्खा भाऊ, बहीण आणि मुलांनीं तर हीच दीक्षा घेऊन ते सर्व स्वतः धर्मप्रसाराच्या कामाला लागले. सिंहलद्वीपांतील बौद्धमठ त्याचा भाऊ महेंद्र ह्याच्याच नांवानें प्रसिद्ध आहे.
ह्याप्रकारें बुद्धधर्माचा व जैनधर्माचा आणि पुढें त्यांच्याच चाको-यांतून शैव आणि वैष्णवधर्माचा जो देशोदेशीं प्रसार झाला त्याचा शिरकाव निरक्षर आणि अज्ञ अशा बहुजनसमाजांच्या कानाकोप-यांत कोणत्या बहुविध साधनांनीं झाला, त्याचा तपशिल आतां पाहूं.