वरील तामिळ भगवद्भक्तांच्या प्रेरणेनें भागवतपुराण आणि रामानुजांचें श्रीभाष्य असे दोन काव्यमय आणि तत्वज्ञानमय ग्रंथ निर्माण झाले. त्यांचा परिणाम भरतखंडांतील विद्वानांवर आणि बहुजनसमाजावरहि पुढील पिढींत जितका झाला तितका इतर कशानेंहि झाला नाहीं. रामानुजानें ही तामिळ देशांतील लाट कर्नाटक देशाची तत्कालीन राजधानी जी हाळेबीड (म्हैसूर) येथें नेली. हाळेबीड ऊर्फ व्दारसमुद्र येथील पराक्रमी होयसळ घराण्याचा राजा बिट्टीवर्धन पूर्वीं जैनधर्मी होता. त्याला रामानुजानें वैष्णव केलें. तामिळ देशांतील चोळ राजे शैव धर्माचे अभिमानी होते. त्याच्या भीतीनें रामानुजाला बिट्टी (विष्णु) वर्धनाचा (इ.स. १०३९-१०५१) आश्रय घ्यावा लागला. विष्णुवर्धनानें स्वतः आपणच वैष्णवधर्म स्विकारून स्वस्थ न राहतां प्रजेमध्यें जुलमानें वैष्णव धर्माचा प्रसार करण्याचा सपाटा चालविला. ज्ञानसंबंधर नांवाच्या शैव पुराणिकानें ह्याचप्रमाणें दोन शतकांपूर्वीं पांड्य राजाला जैन धर्मांतून शैव धर्मांत घेतलें होतें. त्यामुळें पूर्वेकडे तामिळ देशांतील चोळ आणि पांड्य राजवटींतून शैव भागवत आणि पश्चिमेकडे कर्नाटकांतील होयसळ राजवटींत वैष्णव भागवत फार प्रबळ झाले. ह्या दोन्ही भागवतांचा उत्तरेकडे महाराष्ट्राच्या यादव राजवटींतील धर्मावर जोराचा परिणाम झाला असावा. रामदेवराव जाधवाचे आश्रयाखांली ज्ञानेश्वर महाराजांनीं आपली प्रसिद्ध ज्ञानेश्वरी इ. स. १२९० सालीं पूर्ण केली. ज्ञानेश्वर इ. स. १२७१ सालीं जन्मले. त्यापूर्वीं एक वर्ष म्हणजे १२७० सालीं श्रीनामदेव महाराज क-हाडजवळील नरसीब्राह्मणी ह्या खेड्यांत जन्मले. नामदेव आणि ज्ञानेश्वर ह्या जोडीनें या नवीन भागवतधर्माची प्रतिष्ठा आणि घटना महाराष्ट्रांत जोरानें केली. ती कशी केली, ह्यासंबंधाचे असावे तसे ऐतिहासिक पुरावे तूर्त उपलब्ध नाहींत, तरी धार्मिक वाङ्मयांतून जे अस्पष्ट पुरावे मिळतात, त्यांवरच अवलंबून ह्या दोघां थोर पुरुषांनीं ह्या कामाचा कसा पाया घातला व त्यावर पुढें एकनाथमहाराजांनी व इतर सर्व जातींच्या संतांनीं कशी इमारत बांधली आणि शेवटीं तुकाराममहाराजांनीं कसा कळस चढविला, हें अतिसंक्षिप्त रीतीनें आतां पाहणें आहे.