भागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे)

व्याख्यान दुसरें
‘सनातन भागवतधर्माचा विकास’ ह्यावर श्री. शिंदे ह्यांनीं इ. स. १९२५ च्या पावसाळ्यांत पुण्यांत एक व्याख्यानमालिका गुंफली, तिच्या उत्तरार्धाची प्रस्तावना म्हणून हीं दोन प्रवचनें झालीं. त्यांनीं सासवड येथें भागवत धर्माच्या चालू सहस्त्रकांतील हिंदुस्थानांतल्या इतिहासाचें अगदीं संक्षिप्त सिंहावलोकन केलें.
इ. स. च्या १२ व्या शतकांत व-हाडकडे महानुभाव व दक्षिण हैदराबादकडे लिंगायत पंथाची स्थापना झाल्यावर तेराव्या शतकांत पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाचा उदय झाला. त्यानंतर उत्तरेस वाराणशीस समानंदी, पंजाबांत नानक आणि बंगाल्यांत चैतन्य पंथाची प्रतिष्ठा झाली. वारकरी आणि महानुभाव पंथ लौकिक दृष्ट्या जितका अप्रिय तितकाच दुसरा म्हणजे वारकरी पंथ प्रिय आहे; हा एक मोठाच ऐतिहासिक चमत्कार कां व कसा आहे, तें रा. शिंदे ह्यांनीं स्पष्ट करून सांगितलें. मूर्तिपूजा, जातिभेद, कर्मठ सोवळें वगैरे अधार्मिक गोष्टी दोन्ही पंथांत प्रथम नव्हत्या, तरी पण मागाहून शिरल्या. इतकेंच नव्हे तर धार्मिक वाङ्मयाचा प्रसार मराठींत करण्याचा अग्रमान निःसंशय महानुभावांचा आहे. आणि त्या धर्माचा प्रसार बहुजनसमाजांत करण्याची अपूर्व कामगिरी तो पंथ आजहि करीत आहे, तरी तो अप्रिय आहे; ह्यावरून “जनपदहित” कर्ता ‘द्वेष्यते पार्थिवेंद्रैः’ ह्या म्हणीचा तात्पर्यार्थ म्हणजे डोईजडांचें राजकारण हेंच ह्या चमत्काराच्या तळाशीं असणें संभवनीय आहे, असें रा. शिंद्यांनीं अनुमान केलें.
तुकारामानंतर वारकरी पंथाची आत्मिक वाढ संपली. निळोबांनीं तुकोबाच्या कामगिरीला त्यांची इच्छा नसतां सांप्रदायिक स्वरूप दिलें. ह्यावरून ही वाढ खुंटलेली दिसते. पण ह्या सांप्रदायिकपणामुळेंच ह्या वारकरी पंथाचें व त्यांचें उत्तरेकडील व पूर्वींच्या महानुभावांशीं व्यापारी मात्सर्य वाढून ते एकमेकांचा उलट हेवादेवा करू लागले असावेत, असा शिंद्यांनीं तर्क केला.
महिपतीनें आपला भक्तिविजय ग्रंथ पानिपतच्या लढाईनंतर इ. स. १७६२ सालीं (शकें १६८४ वैशाख वद्य द्वादशीस) प्रवरेच्या दक्षिणेस ताहराबाद येथें प्रसिद्ध केला. महिपतीनें मूर्तिपूजा, वर्णाश्रमधर्म, कर्मठ सोवळेपणा, ब्राह्मण, संस्कृतचें बंड, धार्मिक मध्यस्थांचा जुलूम इत्यादि गोष्टींची उघडउघड निंदा हल्लींच्या सत्यशोधकांहूनहि किती तरी अधिक स्पष्ट व फटकळ भाषेंत केली आहे. त्यावरून तुकारामांच्याहि मागें १०० वर वर्षें ख-या भागवतधर्माची ज्योत अगदींच मावळलेली दिसत नाहीं. अशा प्रकारच्या ह्या भागवतधर्माचें मुख्य कार्य सांगतांना रा. शिंदे म्हणाले, “(१) धर्मभेद, (२) जातिभेद, (३) मूर्तिपूजा, (४) अतिवैराग्य, (५) अतिकर्म, (६) अतिज्ञात, (७) ग्रंथप्रामाण्य, (८) गुरुपुजा, (९) राजकारण, (१०) तर्कवाद, (११) तात्पुरता हितवाद, ह्या ११ बाह्य गोष्टींचा ख-या धर्माशीं घटस्फोट भागवतधर्मानेंच केला.” हें शिंदे ह्यांनीं महिपतीच्या ग्रंथांतील उतारे देऊन सिद्ध केलें. “ज्ञानदेवें घातला पाया | तुका झाला कळस ||” ही वारकरी म्हण कांहीं अंशीं दुरुस्त करण्यासाठीं वारकरी पंथाचा महाराष्ट्रांतच नव्हे तर अखिल हिंदुस्थानांत प्रसार करण्याच्या कामीं श्रीनामदेवांनीं जो भाग उचलला तो श्रीज्ञानदेवांसच काय, पण प्रत्यक्ष श्रीतुकोबांनाहि उचलणें शक्य झालें नाहीं; म्हणूनच नामदेवांचें अवतारकृत्य श्रीतुकोबांनीं आटोपलें, हें महिपतीचें काव्यमय मत यथार्थ आहे, असें शिंदे ह्यांनीं आपलें मत दिलें.
आम्ही वैकुंठवाशी | आलों ह्याच
कारणाशी | बोलीले जे ऋषी |
साच भावें वर्ताया ||

हा तुकारामांचा सात्त्विक दावा हल्लींचा वारकरी अगर तदनुषंगी कोणताहि पंथ किती सिद्ध करीत आहे हा प्रश्न अलाहिदा आहे. मात्र हाच दावा हल्लींचे ब्राह्मसमाज, आर्यसमाज व सत्यशोधक समाज ह्यांचा आहे, असें शिंदे म्हणाले. अगोदरच्या उदार पंथांनीं हा दावा सिद्ध केला असता, तर हे नवीन समाज निघावयाला अवकाशच उरला नसता. पण भागवतधर्माचें क्षेत्र सनातन व सार्वत्रिक असल्यानें, तें पूर्णपणें आक्रमण्याला हे नवे समाज अपुरे पडल्यास कोणी आश्चर्य मानण्याचें कारण नाहीं. जेथें श्रीचक्रधर महानुभाव, ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम, नानक, कबीर, चैतन्य, राममोहन राय, दयानंद, ज्योतिबा फुले अशांनीं हात टेकले, तेथें पूर्ण यशाचा चंग कोण बांधिल? अहंकाराचा नाश ह्यांतच भक्तीचा विजय आहे. आणि तेथेंच भागवतधर्माची ध्वजा फडकत आहे, असा निर्वाळा देऊन रा. शिंदे ह्यांनीं सासवड येथील प्रवचन आटोपलें.

ब्राह्म समाज आणि बौद्ध धर्म
व्याख्यान तिसरें
मूळ ब्राह्म समाज राजा राममोहन रॉय यांनीं कलकत्त्यास इ. स. १८२८ सालीं स्थापन केला. त्याचा शवसांवत्सरिक उत्सव सर्व हिंदुस्थानभर येत्या ऑगस्ट महिन्यापासून होणार आहे. ब्राह्म समाजाची स्थापना अनेक विघ्नांना तोंड देऊन राममोहननीं केली व ते लवकर विलायतेस सन १८३० सालीं गेले व तिकडेच वारले. ह्या निराश्रित अर्भकाची जोपासना पुढें महर्षि देवेंद्रनाथांनीं केली. तसेंच सन १८५८ सालीं पुढें ईश्वरचंद्र सेन ह्या अत्यंत प्रतिभाशाली तिस-या पुढा-याचा लाभ ह्या समाजास घडला.
ह्या वेळीं हिंदुस्थानांत अवघ्या १२ ठिकाणीं ब्राह्म समाजाच्या शाखा होत्या. त्या साधारण ब्राह्म समाज स्थापन झाल्या वर्षीं म्हणजे १८७८ (मे महिन्याच्या १५ तारखेस) सालीं १२४ शाखा हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतांतून व भाषेंतून झाल्या. ह्या तिस-या पुढा-यानें केवळ संख्येच्या दृष्टीनेंच समाजाची अशी असामान्य वाढ केली असें नव्हे, तर त्यानेंच ह्या धार्मिक सुधारणेस हिंदुस्थानांत प्रत्यक्ष सामाजिक जीवनाचें स्वरूप दिलें. त्याच्या वेळीं हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतांत इतरहि स्वामी रामकृष्ण, दयानंद सरस्वती, ईश्वरचंद्र विद्यासागर, म. ज्योतिबा फुले, ज. रानडे, तेलंग इत्यादि धार्मिक व सामाजिक सुधारक होते. पण ते केवळ पुरुषांच्याच सभा करीत आणि त्यांच्याशींच वादविवाद करून सुधारणा घडवूं पाहात, पण केशवचंद्रानें आबालवृद्धांना, बायकापुरुषांना, सुशिक्षितांना फार तर काय, पण स्वकीय परकीयांनाहि हालवून जागें केलें, व त्यांचा ब्राह्म समाज स्थापिला !
मग इतक्या प्रभावशाली पुढा-याच्या उलट साधारण ब्राह्म समाज नांवाची अधिक विकसित स्वरूपाची ब्राह्म समाजाची तिसरी आवृत्ति कां काढावी लागली? हा मोठा चित्ताकर्षक प्रश्न आहे खरा ! कोणत्याहि चळवळीच्या आरंभीं एकाच प्रेरित विभूतीचें प्राधान्य असतें. तसेंच ब्राह्म समाजाच्या पहिल्या ५० वर्षांत बहुतेक एकतंत्रीपणाच होता. मग त्या एकतंत्राचें अधिष्ठान राजा राममोहन राय असो, देवेंद्रनाथ असो, किंवा केशवचंद्र असो, एका धीरोदात्त व्यक्तीनें हालवावें, व इतरांनीं हालावें, असा प्रकार होता. पण ब्राह्म समाज ही प्रधानतः स्वातंत्र्यजनक संस्था होती. अर्थात ह्या ५० वर्षांत ब्राह्म समाजांतच नव्हें, तर अखिल भारतांत धार्मिक, सामाजिक आणि राजकीय विचाराच्या स्वातंत्र्याची प्राणप्रतिष्ठा झाली होती. ह्या पूर्वतयारीचें श्रेय राममहोन, देवेंद्र आणि केशवचंद्र आणि त्यांच्या प्रभावळींतील निकट अनुयायांस देणें अवश्य आहे. पण ५० वर्षांनंतर ह्या स्वातंत्र्योन्मुख चळवळीचीं सर्व सूत्रें एकाच हातांत राहणें शक्य नव्हतें. मग तो हात कितीहि पराक्रमी असो, कीं पूज्य असो, कीं पवित्र असो ! वर वर पाहणा-यांस साधारण ब्राह्म समाजाची स्थापना कुचबिहारच्या लग्नाच्या वादामुळें झाली, असें वाटणें साहजिक आहे, पण तें चुकीचें आहे. केशवचंद्रांना ब्राह्मवधूचें वय किमान पक्षीं १४ वर्षांचें असावें, असा आपणच सरकारी कायदा पास करून घेतला आणि स्वतःचीच मुलगी कुचबिहारच्या तरुण राजकुमाराला दिली. तिचें वय १४ वर्षांहून किंचित कमी आणि राजकुमाराचें वय १८ वर्षांहून कमी होतें, म्हणून घनघोर वाद उपस्थित झाला. इतकेंच नव्हे तर त्यामुळेंच त्यांच्या अनेक प्रिय अनुयायांनीं त्यांचें पुढारीपण झुगारून देऊन आपली ब्राह्म समाजाची निराळी शाखा काढली हें खरें, परंतु ही लढाई केवळ व्यक्तींची नसून तत्त्वांची होती. मताप्रमाणें वागणूक झालीच पाहिजे पण ती व्यक्ति कर्तूम् अकर्तूम् अन्यथा कर्तूम् समर्थ केशवचंद्र झाली म्हणून काय झालें? प्रश्न केवळ ब्राह्म मताचाच नव्हता, तर त्याच्या अनुष्ठानाचा होता. शिवाय आतांपर्यंत समाजाचें कार्य केवळ भावना आणि प्रेरणा ह्या दैवी तत्त्वांवरच चाललें होतें. सर्वांचीं मतें घेऊन युक्तायुक्ततेचा विचार करून एखादी कार्यपद्धतीची सनद आंखण्यांत आली नव्हती. त्यामुळें ह्या पदाला अत्यंत तीव्र व कडू स्वरूप आलें. आणि शेवटीं स्वातंत्र्य तत्त्वाचें शरीर जो सनदशीरपणा त्याचाच विजय झाला. आणि कलकत्त्याच्या टौन हॉलमध्यें प्रचंड जाहीर सभा भरून केशवचंद्रांच्या विरुद्ध साधारण ब्राह्म समाजाची जोरदार स्थापना झाली ! त्या गोष्टीला आज ५० वर्षें झालीं !
ह्यानंतर ब्राह्म समाजांत स्त्रिया, तरुण, लहान मुलें, वृद्ध, विद्वान, गृहस्थ आणि कामकरीवर्ग ह्या सर्वांचा समान दर्जानें कसा प्रातिनिधिक तत्त्वानें समावेश होऊं लागला आणि हिंदुस्थानभर ह्याच शाखेचा विस्तार केशवचंद्रांच्या नवविधान नांवाच्या शाखेहूनहि कसा अधिक झाला, ह्याचें सविस्तर वर्णन श्री. अण्णासाहेबांनीं केलें. नंतर ते म्हणाले कीं, ब्राह्म समाज व बौद्ध धर्म ह्यांत एक फरक ध्यानांत ठेवण्यासारखा आहे. ब्राह्म धर्मांत मनुष्यजातीच्या सर्व धर्मपंथांचा समन्वय होतो, ही गोष्ट खोटी नाहीं. अर्थात् ब्राह्म धर्म म्हणून एक निराळा नवाच धर्म आहे, असें मुळींच नव्हे. पण बहुतेक जुने धर्म पंथ – विशेषतः बौद्ध धर्म हा व्यक्तिविशिष्ट स्वरूपाचा आहे. बौद्ध धर्माचाहि संघ प्रत्यक्ष सिद्धार्थाच्या काळापासून पुरातन आहे. तरी हा बौद्धसंघ म्हणजे केवळ भिक्षुसंघच म्हणजे केवळ संन्याशांचा संघच होता. गृहस्थाश्रमालाच मुळीं बौद्ध धर्मांत गौणस्थान आहे. मग धर्माच्या कौटुंबिक व सामाजिक स्वरूपाकडे ह्या धर्मांत दुर्लक्ष्य झाल्यास नवल काय? आदले दिवशीं प्रत्यक्ष धर्मानंद कोसंबी ह्यांनींच बौद्ध धर्माची अवनति कां झाली, ह्याचीं कारणें सांगतांना स्पष्ट एक कारण असें सांगितलें कीं बौद्ध भिक्षू व प्रत्यक्ष गौतमबुद्धानेंहि जातिभेदाच्या मुळावर कितीहि आघात केले तरी, बौद्ध गृहस्थाश्रमीयांनीं हिंदुस्थानांत तरी ह्या जातिभेदाचें निरसन करावें तितकें केलें नाहीं, म्हणून शेवटीं चार वर्णांच्या आतां चार हजारांवर जातींची आणि असंख्य पोटजातींची बजबजपुरी आज ह्या अभागी देशांत माजली आहे. ब्राह्म धर्माचें स्वरूप आणि कार्य ह्याचें उलट आहे. ह्या धर्मांत जगद्गुरु तर नाहींच पण उलट साध्या पुरोहिताचेंहि बंड नाहीं. ज्याचा तोच पुरोहित. धर्माच्या सर्व तत्त्वांना सामाजिक प्रत्यक्ष स्वरूप यावयाचें झाल्यास केशवचंद्रांसारख्या प्रतिभाशाली गुरूलाहि केवळ त्यांच्या आसनावरून खालीं आणावें लागतें; इतकेंच नव्हे तर आपल्या घरांतील मावशीबाई व आजीबाई, तरुण बाबू आणि लहान बेबी ह्यांचेंहि सहकार्य सामाजिक अनुष्ठानांत साधावें लागतें. हें शेवटचें काम अत्यंत कठीण आहे. आणि ह्याशिवाय तर कोणतीहि शुद्धि अथवा कसलेंहि संघटन होणें केवळ अशक्य आहे. हा सामाजिक स्वर्ग जर कोणी गेल्या शतकांत ह्या पृथ्वीवर आणिला असेल, तर तो एका साधारण ब्राह्म समाजानेंच, ह्यांत मुळींच अतिशयोक्ति नाहीं.
बौद्ध धर्माविषयीं श्री. अण्णासाहेबांचा अलोट आदर आहे. आजकाल त्यांचें लक्ष्य बहुतेक बुद्धाच्या ध्येयाकडे गुंतलें आहे, असें त्यांनींच स्पष्ट सांगितलें. आणि ते म्हणाले कीं, ध्येय सामाजिक स्वरूपांत आणावयाचें झाल्यास, पंडित शिवनाथशास्त्री, विजयकृष्ण गोस्वामी, नवद्वीपचंद्रदास अशाच आधुनिक भिक्षूंची जरूरी आहे आणि त्यांनीं झालें तरी शहरांतल्या अर्धवट सुशिक्षितांपेक्षां बहुजनसमाजांतल्या बायकामुलांचेंच साहाय्य संपादिलें पाहिजे. येरवीं जेथें बौद्ध धर्माची अवनति झाली तेथें नवशिक्या ब्राह्म समाजाची काय कथा?