कबीर

रामानंदाचा शिष्य कबीर ह्यांचा जन्म काशी येथें इ. स. १३९८ सालीं झाला. हा एका ब्राह्मण विधवेच्या पोटीं जन्मला, म्हणून लाज राखण्यासाठीं तिनें त्याला एका तळ्याच्या कांठीं ठेवून दिलें. त्या मुलाची जोपासना एका मुसलमान मोमिनानें केली. हा पुढें मोठा निस्पृह एकेश्वरवादरी निघाला. त्यानें हिंदु आणि मुसलमान ह्या दोन्ही धर्मांच्या खोट्या कल्पनांचा जोरानें निषेध चालविला. त्यामुळें दोही समजांतून त्याला विशेषत: खालच्या जातींतून पुष्कळ शिष्य मिळालें. ह्याचा दोहोंकडून विशेषत: मुसलमानांकडून छळहि फार झाला. शेख ताक्की नांवाचा एक मुसलमान पीर शिकंदर लोदीचा गुरु होता. त्या पिराच्या शिकविणीविरुद्ध कबिरानें फार कडक टीका केली म्हणून ताक्कीनें आपला शिष्य बादशहा याच्याकडून कबिराचा फार छळ मांडिला; पण त्या सर्व दिव्यांतून कबीर निभावला. त्याच्या रामैनी, साक्या व दोहरे प्रसिद्ध आहेत. विशेषत: फटके तर सर्व हिंदुस्थानभर हरिदासांच्या तोंडून ऐकण्यांत येतात. कबीर हा हिंदी वाङ्मयाचा जनक म्हटलें तरी चालेल. मुसलमानापेक्षां हिंदु धर्माकडेच ह्याचा ओढा जास्त होता. त्याचे शिष्यहि आतां हिंदुच आहेत. पण पुष्कळ दिवस कबिराची कडक शिकवण म्हणजे केवळ अरण्यरुदनच होतें. तरी पण कोणी ऐकोत न ऐकोत, कबिराचा संदेश चढत्या सुरांत सारखा पसरतच होता. त्याचा उपदेश रोखठोक, सडेतोड आणि अक्षरशत्रूलाहि सहज पटणारा होता. पुढें त्याला शिष्यसमुदाय पुष्कळ मिळाला; तरी त्यानें कोणत्याहि प्रकारचा ढंग काढून त्यांना भुलविण्याचा व आपल्या स्वत:चे देव्हारे माजविण्याचा प्रयत्न केला नाहीं, ही विशेष ध्यानांत घेण्यासारखी गोष्ट आहे. तो मेल्यावर हिंदु आणि मुसलमान ह्या दोघांनाहि तो आपलासा वाटला. हल्लीं जरी ह्याचें नांव आणि उपदेश सर्व दर्जांच्या लोकांमध्यें प्रिय आहे, तरी ह्याच्या प्रत्यक्ष पंथाचा प्रसार खालच्या वर्गांतच चालू आहे.