महानुभाव पंथ

बाराव्या शतकाच्या सुमारास गुजराथेंत त्रिमल्लदेव नांवाचा राजा होता. त्याच्या पोटीं पुत्र नसल्यानें त्यानें आपलें राज्य विशालदेव नांवाच्या ब्राह्मण प्रधानाला दिलें. श्रीदत्तात्रेयाच्या प्रसादानें विशालदेवाला पुत्र झाला. त्याचें नांव हरपाळ. तरुपणपणीं जुगाराचा नाद लागून ह्यानें राज्य घालविलें, आणि देशोधडीस लागला. फिरतां फिरतां व-हाडांत ऋद्धिपूर येथें इ. स. ११८५ सालीं गोविंद प्रभु नांवाच्या एका विद्वान् आणि विरक्त ब्राह्मणाचा अनुग्रह मिळाला. त्यानें त्याचें नांव हरपाल बदलून श्रीचक्रधर असें नवीन नांव ठेविलें. ह्यापुढें ह्यानें दोनदा विवाह करून पुन: विरक्त होऊन तीर्थयात्रा करीत भटकूं लागला; अखेरीस इ. स. १२६३ सालीं ह्यानें संन्यास घेतला. शिष्यशाखा स्थापन केली, तिचाच पुढें महानुभाव पंथांत विकास झाला. वि. ल. भावे ह्यांनीं आपल्या “महाराष्ट्र सारस्वत” ह्या ग्रंथांत ह्या पंथाचें सहानुभूतिपूर्वक वर्णन केलें आहे. मराठी भाषेची आद्य ग्रंथरचना ह्याच पंथानें करून मराठीच्या जनकत्वाचें श्रेय संपादिलें आहे. ह्यांचा प्रचंड ग्रंथसमूह प्रसिद्ध होईल, तेव्हां ह्याचा आश्चर्यकारक इतिहासच नव्हे, तर मराठी भाषेची पूर्वपीठिकाहि उजेडांत येईल.

महानुभाव ग्रंथांत केवळ कृष्णाचीच उपासना आहे. पण मूर्तिपूजा नाहीं. जातिभेद मुळींच नाहीं. गुरूंचें महत्त्व विशेष आहे. येणेंप्रमाणें लिंगायत पंथाशीं ह्याचें विशेष साम्य आहे. बौद्धांच्या मागोमाग निर्माण झालेल्या ह्या दोन धर्मांतून जीं हीं प्रगतीचीं आणि समतेचीं लक्षणें प्रथम प्रथम रूढ होतीं तीं पुढें ब्राह्मणी धर्माच्या सहवासानें आणि छळानें शिथिल पडलीं. महानुभाव पंथाविषयीं इतर हिंदूंत मोठी तेढ आणि कठोर द्वेषभाव असण्याचें कारण फार गूढ आहे. हा पंथ जातिभेद न मानतां महारमांगांमध्येंहि आपला प्रसार करितो, हें एक ह्या तेढीचें कारण असावें. तरी पण ह्यांच्या धर्मांत हिंदूंना चीड किंवा किळस येण्यासारखें कांहीं नाहीं. हे दुस-या कोणत्याहि  धर्माची निंदा करीत नाहींत, किंवा त्यांच्या वाटेला मुळींच जात नाहींत. तरी हे अद्यापि फार अप्रिय आहेत आणि ह्यांनीं सर्वांत अगोदर केलेली धर्मसुधारणेची आणि विशेषत: मराठी भाषेच्या उत्पत्तीची असामान्य कामगिरी अद्यापि कोणाच्याहि गणनेंतच नाहीं, ही मोठी खेदाची आणि आश्चर्याची गोष्ट आहे.