(१५) कोणत्याहि दोन भाषांचा परस्पर संबंध ठरवावयाचा असल्यास केवळ शब्दकोशाचा पुरावा फारसा महत्त्वाचा नाहीं, हें दालगादो यांचे म्हणणें अगदी खरें आहे. खरी तुलना करणा-यांनीं त्या भाषांच्या व्याकरणाची आणि स्वरशास्त्राच्या दृष्टीनें त्यांच्या स्वरवैशिष्ट्याची म्हणजे Phonology चीच केली पाहिजे. ही तुलना करीत असतां दालगादोसारख्या जाड्या अनेक भाषाभिज्ञाला मराठी ही कोंकणीची आई नसून फार तर बहीण असावी, आणि ती धाकटी बहीण असावी, असें कां मत द्यावें लागलें ह्याचा खुलासा होतो. इतकेंच नव्हे तर ह्या पंडीतांच्या ह्या मतांत पुष्कळच तथ्य असावें, हें कबूल करणेंही भाग पडतें. परंतु एतद्विषयक एक मोठी अडचण अशी आहे कीं, कोंकणींतील सारस्वत पोर्तुगीजांनीं नष्ट केल्यामुळें ह्या भाषेची वाढ कशी झाली हें समजून तिचें मराठीशीं तंतोतंत नातें कसें आहे हें निश्चित ठरविणें अत्यंत कठीण झालें आहे. वरील ऐतिहासिक विवेचनांत एवढेंच सुचविण्यांत आलें आहे कीं, ह्या दोन्ही भाषांचें परस्पर नातें नसून त्या परस्परभिन्न आणि स्वतंत्र आहेत असें जर कोणी म्हणेल तर तें खरें ठरणार नाहीं; उलट ह्यांचें फार जवळचें नातें आहे. आतां त्यांच्या पुढें जाऊन हें जवळचें नातें मायलेकींचें आहे, कीं बहिणीबहिणींचे आहे, हें दिसेल तितकें पाहावयाचें आहे. कोंकणींत पोर्तुगीजांच्या जुलमामुळें ग्रंथरचना तर अशक्यच होती; तथापि कोंकणीचा पोर्तुगीज कोश आणि तिच्यांतल्या म्हणींचा संग्रह वगैरे जे विद्वत्तापूर्ण ग्रंथ दालगादो ह्यांनीं प्रसिद्ध केले, इतकेंच नव्हे तर तिचें नीट अध्ययन रूढ व्हावें, म्हणून त्या पंडीतानें जे स्वार्थत्याग सोसून व मार्गांत कर्मठ धर्माधिका-यांनीं जीं विघ्नें उपस्थित केलीं त्यांना न जुमानतां दीर्घ प्रयत्न केले ते तर चिरस्मरणीय आहेत. थोडक्यांत सांगावयाचें तर, ह्या पंडिताचे तौलनिक भाषाशास्त्रावर फार मोठे उपकार झाले आहेत, ही गोष्ट विशेषतः हिंदी देशभक्तांनीं सदैव ध्यानांत बाळगण्यासारखी आहे, हें जाणूनच पुढील तुलनेकडे वळणें बरें. एरवीं कृतघ्नतेच्याच नव्हे तर उथळपणाच्याही दोषाला आम्ही पात्र होऊं.