टीपा

१. भागवत धर्माचा विकास
हिंदुस्थानचा पूर्वापार विस्तृत इतिहास लिहिण्याचा श्री. अण्णासाहेब शिंदे यांचा मानस होता. परंतु कामाच्या व्यापामुळें हें राहून गेलें. पुढें १९२५ सालीं त्यांना थोडीशी फुरसद मिळाल्यानंतर हिंदुस्थानांतील धर्माचा इतिहास लिहिण्याचा विचार पक्का केला. हा सर्व इतिहास लिहून पुरा होण्यापूर्वीं त्या ग्रंथाची विस्तृत प्रस्तावना लिहावी व तिच्यावरून मग “धर्माचा इतिहास” लिहावा असें ठरविलें. त्याप्रमाणें १९२५ सालीं भागवत धर्माचा इतिहास ह्या विषयावर पांच संशोधक व्याख्यानें लिहून काढलीं. आणि तीं व्याख्यान रूपानें लोकांसमोर ठेवलीं. पहिलें व्याख्यान पुणें येथें १७ जुलै १९२५ रोजीं झालें.
दुसरें व्याख्यान पुणें येथील प्रार्थना समाज मंदिरांत २४ जुलै १९२५ रोजी झालें. तिसरें व्याख्यान २८ जुलै १९२५ रोजीं प्रार्थना समाजांत झालें. चौथें व्याख्यान प्रार्थना समाजांत १८ जुलै १९२५ रोजीं झालें. पांचवें व्याख्यान प्रार्थना समाजांत ३१ ऑगस्ट १९२५ रोजीं झालें.
२. मराठ्यांची पूर्वपीठिका अथवा रट्टवंशोत्पत्तीविषयीं शास्त्रीय विचार
मराठ्यांची पूर्वपीठिका ह्या विषयावर रत्नाकर मासिकांत तीन लेख प्रसिद्ध झाले. पहिला लेख मार्च १९२९ च्या अंकांत प्रसिद्ध झाला. दुसरा, मे १९२९ च्या अंकांत प्रसिद्ध झाला व तिसरा लेख मे १९३१ च्या रत्नाकर अंकांत प्रसिद्ध झाला. तिसरा लेख प्रसिद्ध होण्यास विलंब झाला. कारण १९३० सालच्या कायदेभंगाच्या चळवळींत कारावासाची शिक्षा झाल्यामुळें ते सहा महिने तुरुंगांत होते.
३. अस्पृश्यांचें राजकारण
पुणें येथील ‘वसंत व्याख्यान मालें’त झालेलें हें व्याख्यान आहे. या व्याख्यानाची हस्तलिखित प्रत अण्णासाहेब शिंदे यांच्या कागदपत्रांत मिळाली. हें व्याख्यान प्रथमच प्रकाशित होत आहे.
४. महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग
१९३५ च्या मार्चमध्यें किर्लोस्कर मासिकांत प्रसिद्ध झालेली मुलाखत. मुलाखतीच्या प्रारंभीं संपादकांनीं प्रस्तावना दिली होती. त्या मूळ प्रस्तावनेसह येथें अण्णासाहेब शिंदे यांची मुलाखत पुढें दिली आहे. ही मुलाखत ३१ डिसेंबर १९४८ रोजीं ‘तरुण महाराष्ट्र’ मध्यें पुनर्मुद्रित केली होती.
५. तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र
इ. स. १९३५ च्या डिसेंबरमध्यें बडोदें येथें महाराष्ट्र साहित्य संमेलन भरलें होतें. या संमेलनांत वेगवेगळ्या विषयांवरील चर्चेसाठीं शाखा संमेलनेंहि भरलीं होतीं. या वेळीं ‘तत्त्वज्ञान व समाजशास्त्र’ ह्या शाखासंमेलनाचे अध्यक्ष म्हणून अण्णासाहेब शिंदे यांची निवड झाली होती. या वेळीं अध्यक्षपदावरून केलेलें भाषण.
६. महाराष्ट्र नानाशंकरशेटला कां विसरला ?
या विषयावर दोन लेखांक लिहिण्याचा अण्णासाहेबांचा मानस होता. पहिल्या लेखांत महाराष्ट्र नानाशंकरशेटला कां विसरला याची चर्चा करण्यापूर्वीं ते विसरण्यास खरोखर पात्रच आहेत का, असल्यास ते संस्मरणीय पुरुष कां आहेत याची चर्चा करण्याचा त्यांचा विचार होता. दुस-या लेखांत ते जर संस्मरणीय होते तर मग महाराष्ट्र त्यांना कां विसरला याची चर्चा करण्याचा त्यांचा विचार होता. अण्णासाहेब शिंदे यांच्या घरच्या खासगी लेखसंग्रहांत यांपैकीं पहिलाच लेख मिळाला. दुसरा लेख मिळाला नाहीं. बहुधा तो लिहुन पुरा झालेला नसावा असें वाटतें. या लेखाची हस्तलिखित प्रत त्यांच्या लेखसंग्रहांत मिळाली. हा लेख प्रथमच प्रकाशित होत आहे.
७. दारूचा व्यापार : सरकार आणि बहुजनसमाज
हा लेख अण्णासाहेब शिंदे यांच्या खासगी लेखसंग्रहांत मिळाला. लेख त्यांच्याच हस्ताक्षरांत असून तो अप्रकाशित स्वरूपांत होता. लेखावरील निश्चित तारीख व वर्ष आढळत नाहीं.
८. कोंकणी व मराठी
विविधज्ञानविस्तारच्या १९२६ सालच्या जुलैमध्यें हा लेख प्रसिद्ध झाला.
९. कानडी आणि मराठी
श्री. रा. भि. जोशी यांनीं ‘नवीन मराठी भाषेची घटना’ हें पुस्तक प्रसिद्ध केलें. त्याला पुरवणी म्हणून ‘कानडी-मराठीचा परस्पर संबंध’ हा लेख प्रसिद्ध केला आहे. हा लेख केसरीनें चार लेखांकांत प्रसिद्ध केला. हे चार लेखांक अनुक्रमें ३० ऑक्टोबर, २० नोव्हेंबर, ४ डिसेंबर व १४ डिसेंबर १९२३ रोजीं प्रसिद्ध झाले आहेत.
१०. महाराष्ट्र विद्यापीठ व कर्नाटक
‘विजयी मराठा’ या साप्ताहिकामध्यें २९ मार्च १९२६ रोजीं प्रकाशित झालेला लेख.
११. राधामाधव विलासचंपू आणि रा. राजवाडे
जयराम पिंडे नांवाच्या कवीनें ‘राधामाधव विलासचंपू’ नांवाचें काव्य लिहिलें आहे. हें काव्य शोधून काढण्याचें श्रेय इतिहासाचार्य राजवाडे यांच्याकडे जातें. हें काव्य प्रकाशित करीत असतांना श्री. राजवाडे यांनीं त्याला दोनशें पानांची विस्तृत प्रस्तावना लिहिलेली आहे. या काव्यामधून शहाजी महाराजांच्या कर्तृत्वावर प्रकाश फेकलेला आहे. परंतु या प्रस्तावनेच्या निमित्तानें शहाजीराजे यांच्या कार्याचें मूल्यमापन करीत असतांनाच इतरांवर त्यांनीं टीका केली आहे. त्यामुळें या प्रस्तावनेला उत्तर देण्यासाठीं अण्णासाहेब शिंदे यांनीं चार लेख १९२३ सालच्या ‘विजयी मराठा’ मधून प्रसिद्ध केले. हे लेख १९२३ च्या ऑगस्टमध्यें प्रसिद्ध झालेले आहेत. या लेखांबाबत अण्णासाहेब शिंदे लिहितात - ‘ह्याच प्रस्तावनेंत राजवाड्यांनीं जैन-लिंगायतांशीं भांडकुदळपणा केला म्हणून टीकात्मक लेखांची भाषा फार कडक झाली आहे.’
१२. पुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय (!) कामगिरी
प्रो. जदुनाथ सरकार यांचे मराठ्यांच्या इतिहासासंबंधीं केसरीच्या ४ नोव्हेंबर १९२४ च्या अंकांत कांहीं विचार प्रसिद्ध झालेले आहेत. या लेखांत प्रो. जदुनाथ सरकार यांनीं महत्त्वाचे विचार मांडले आहेत. अण्णासाहेब शिंदे यांनीं त्यांच्या विवेचनाला उत्तर म्हणून लेख ‘विजयी मराठा’ मध्यें १ डिसेंबर, ८ डिसेंबर व १५ डिसेंबर १९२६ रोजीं तीन लेख लिहिले.
१३. मराठेतर कोण ?
‘विजयी मराठा’ मध्यें १९२६ सालीं एप्रिलमध्यें प्रसिद्ध झालेला लेख.
१४. वेदोक्त कीं पुराणोक्त ?
‘विजयी मराठा’ मध्यें १९२२ सालीं एप्रिलच्या सुमारास प्रसिद्ध झालेला लेख.
१५. चातुर्मास्य : तुकोबा व त्यांची टवाळी
‘सुबोध पत्रिके’मध्यें २९ ऑगस्ट १९२६ रोजीं प्रकाशित झालेला लेख.
१६. कौलिकता हाच आत्मीय शिक्षणाचा पाया.
२ जानेवारी १९३८ रोजीं ‘सुबोध पत्रिकेमध्यें प्रसिद्ध झालेला लेख.
१७. पूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगति
तारीख मिळत नाहीं. हस्तलिखित साहित्यांत मिळालेला लेख.
१८. महाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी
बडोदें येथील ‘जागृति’ मध्यें प्रसिद्ध झालेला लेख. दिनांक ६ मे १९२२.
१९. महात्मा फुले व केशवचंद्र सेन
अण्णासाहेब शिंदे यांचें १२ डिसेंबर १९२६ रोजीं श्रीशिवाजी हायस्कूलमध्यें झालेलें व्याख्यान. त्यांच्या या व्याख्यानाजी छापील प्रत त्यांच्या संग्रहांत मिळाली. हें व्याख्यान लेखरूपानें प्रथमच प्रकाशित होत आहे. ब्रह्मानंद केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजाचे थोर प्रवर्तक. त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८३८ रोजीं झाला. महात्मा फुले हे महाराष्ट्रांतील थोर समाजसुधारक व सत्यशोधक समाजाचे संस्थापक. त्यांचा मृत्यु २७ नोव्हेंबर १८९० रोजीं झाला. नोव्हेंबर महिन्यांत या दोन थोर पुरुषांपैकीं एकाची जयंती व दुस-याची पुण्यतिथी आली. या निमित्तानें अण्णासाहेब शिंदे यांनीं दोघांच्या जीवनकार्याचा तौलनिक अभ्यास करून हें व्याख्यान दिलें.
२०. ब्रह्मानंद केशवचंद्र सेन : त्यांचें विश्वधर्मविकासांतील स्थान
प्रकाशनकाल निश्चितपणें मिळत नाहीं. त्यांच्या संग्रहांत प्रसिद्ध लेखाची प्रत मिळाली.
२१. अस्पृश्यांची शेतकी परिषद
३० ऑक्टोबर १९२६ रोजीं पुणें येथें झालेल्या अस्पृश्यांच्या शेतकी परिषदेपुढील अध्यक्षीय भाषण. हें भाषण अप्रकाशित स्वरूपांत त्यांच्या लेखसंग्रहांत मिळालें.
२२. मुंबई इलाखा शेतकरी परिषद : पुणें
१९२८ साली पुणें येथें झालेल्या वरील परिषदेपुढील अध्यक्षीय भाषण.

१९२८ च्या सुमारास मुंबई सरकारनें कौन्सिलमध्यें दोन बिलें आणलीं होतीं. एक सारावाढीचें व दुसरें तुकडे बंदीचें. हीं दोन्हीं लोकांना अत्यंत अप्रिय होतीं. या वेळीं शेतक-यांत मोठी जागृति निर्माण झाली होती. १९२८ च्या सुमारास गुजरातमध्यें सरदार वल्लभभाई पटेल यांनीं करबंदीची चळवळ करून फार मोठें यश मिळविलें होतें. त्यामुळें या काळांत शेतक-यांमधील आत्मविश्वास वाढला होता. स्वाभाविकच महाराष्ट्रांतहि सारावाडी व तुकडे बिलाबद्दल आंदोलन सुरू झालें होतें. त्यामुळें या वेळीं मुंबई इलाख्यांतील मराठी भाषिक शेतक-यांची मोठी परिषद रे मार्केटांत (सध्यांच्या महात्मा फुले मंडईंत) भरलेली होती. या परिषदेस निरनिराळ्या जिल्ह्यांतून सुमारें पांच हजार शेतकरी आले होते. स्वागताध्यक्ष म्हणून श्री. बाबूराव जेधे यांचें प्रारंभीं भाषण झालें होतें. या प्रसंगीं अध्यक्षीय भाषण जें झालें तें येथें लेखरूपानें दिलें आहे. त्यांच्या भाषणाची हस्तलिखित प्रत त्यांच्याच संग्रहांत मिळाली.
२३. प्रांतिक सामाजिक परिषद : सातारा
१९२५ सालीं सातारा येथें झालेल्या परिषदेपुढील अध्यक्षीय भाषण.
२४. संस्थानी शेतकरी परिषद : तेरदळ
तेरदळ (दक्षिण कोंकण) येथें भरलेल्या संस्थानी शेतकरी परिषदेच्या पहिल्या अधिवेशनापुढील अध्यक्षीय भाषण. हें भाषण ३ जानेवारी १९३२ रोजीं झालें.

२५. अखिल भोर संस्थान प्रजापरिषद.
ही परिषद मौजे पाथरशेत (तालुका प्रचंडगड) येथें ७ मे १९३१ रोजीं झाली. या परिषदेपुढील अध्यक्षीय भाषण.
२६. वाळवें तालुका शेतकरी परिषद, बोरगांव
सातारा जिल्ह्यांतील वाळयें तालुक्याची शेतकरी परिषद बोरगांव येथें ६ जून १९३२ रोजीं झाली. त्या वेळीं झालेलें अध्यक्षीय भाषण.
२७. चांदवड तालुका शेतकरी परिषद
चांदवड तालुक्यांतील शेतक-यांची परिषद वडनेर येथें १९ सप्टेंबर १९३१ त भरली होती. या परिषदेपुढील अध्यक्षीय भाषण.
२८. ब्रह्मदेशांतील बहिष्कृत जमात
पुणें येथील भारत इतिहास संशोधक मंडळासमोर ३१ मे १९२७ रोजीं वाचलेला निबंध २३-६-१९२७ च्या नवाकाळमध्यें प्रसिद्ध झाला.
परिशिष्ट
(१) Indian Civilization : The Indian Daily Mail, January 21, 1925.
(२) भागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म एप्रिल १९२६ च्या पहिल्या आठवड्यांत सासवड येथें वारकरी पंथाच्या वतीनें नामदेव समाजोन्नति मंदिरांत श्री. तुकारामांच्या पुण्यतिथीनिमित्त पहिलें व्याख्यान झालें होतें. दुसरें व्याख्यान पुणें येथें श्रीशिवाजी मराठा शाळेंत झालें. या व्याख्यानाचा वृत्तान्त १७ जून १९२९ रोजीं विजयी मराठामध्यें प्रसिद्ध झाला. हा वृत्तान्त श्री. कर्मवीर शिंदे यांनीं नजरेखालून घातलेला असावा असें वाटतें.
ब्राह्म समाज आणि बौद्ध धर्म
१९२८ च्या एप्रिलमध्यें ब्राह्म समाजास ५० वर्षें पूर्ण होतात. या निमित्तानें ८ एप्रिल १९२८ रोजीं श्रीशिवाजी मराठा शाळेंत ‘ब्राह्म समाजाची स्थापना कां व कशी झाली व त्याचें ५० वर्षांचें कार्य कसें घडलें’ यावर व्याख्यान झालें. या व्याख्यानाचा सारांश विजयी मराठामध्यें २३ एप्रिल १९२८ रोजीं प्रसिद्ध झाला.