चातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी

चातुर्मास्याचा इतिहास चमत्कारिक आहे. बौद्ध, जैन आणि ब्राह्मणादि पंथांचे परिव्राजक पूर्व काळीं अखिल भारतांत हिंडत. पावसाळ्याचे चार महिने कोठें तरी विहारांत राहात. तेव्हां आसपासचे श्रावक जन त्यांचेकडे उपासनेस जात. पौर्णिमा, अमावास्या, दोन अष्टम्या हे महिन्यांतून चार दिवस उपोसथाचे ठरलेले असत. उपोसथाचा अर्थ उपोषण असा वैष्णव पंथानें केल्यावर ह्या चार तिथींच्या ऐवजीं दोन एखादशा झाल्या. आषाढ शुद्ध एकादशीपासून तों कार्तिक शुद्ध द्वादशीअखेर चार महिने पावसाळ्याचें चातुर्मास्य जें हल्लीं प्रचारांत आहे, तें भागवत काळापासून चालत आलें आहे. श्रावण पौर्णिमेला बौद्ध भिक्षूंना नवीन चीवर वस्त्रें देण्याचा किंवा ब्राह्मणांना यज्ञोपवीतें (जानवीं) देण्याचा मोठा विधी असे. ह्या पुनिवेला पोवती, राखी, दोरे इत्यादि देण्याचीं किंवा घालण्याचीं जीं व्रतें बायकांत पसरलीं, त्यांचें कारण सापाचें विष बाधूं नये, स्वकीय परकीय असा भेदभाव राहूं नये, सुंदर अर्भकांना किंवा तरुण स्त्रीपुरुषांना दृष्टीदोष घडूं नये, आपला भाऊ आणि नवरा दीर्घायु व्हावे इत्यादि भोळ्या भावाचे तांत्रिक तोडगेच होत. ते महायान बौद्ध धर्मांतून किंवा प्राचीन शैव तंत्रमार्गांतून आले आहेत. पोटाळलेल्या साधु, गोसावी, भटें वगैरेकडून ह्याच चातुर्मास्यांत विशेषतः बायकामुलांमध्यें अशा तोडग्यांना ऊत आणला जातो पण ख-या भागवत किंवा ब्राह्म धर्माला हे तोडगे विरोधक आहेत, हें तुकारामांनीं खालील अभंगांत सांगितलें आहे.
आली सिंहस्थ पर्वणी | न्हाव्यां भटां झाली धणी ||१||
अंतरीं पापाच्या कोडी | वरी वरी बोडी डोइ दाढी ||२||
बोडिलें तें निघालें | काय पालटलें सांग वहिलें ||३||
पाप गेल्याची काय खुण | नाहीं पालटले अवगुण ||४||
भक्ति भावें विण | तुका म्हणे अवघा शीण ||५||
व्रतें आणि तोडगे केवळ मतलबासाठीं करण्याचा तुकारामांना वीट होता. इतकेंच नव्हे तर क्षुद्र देवतांचीहि मात्रा तुकोबाजवळ चालत नव्हती. त्यांना क्षुद्र म्हणणारे महापंडित व पदवीधर देखील खालील देवांच्या नांवांवर राष्ट्रीय उत्सव आजकाल चालवीत आहेत. त्या सर्व देवांचा तुकारामांनीं किती रोकडा निषेध केला आहे, तसा कोणी तरी लोकसंग्रहकर्ते आज करीत आहेत काय?
नव्हे जाखाई जोखाई | मायराणी मणाबाई ||१||
बळिया माझा पंढरीराव | जो या देवांचाहि देव ||२||
रंडी चंडी शक्ति | मद्य मांसारें भक्षिती ||३||
बहिरव खंडेराव | रोटी सुटी साठीं देव ||४||
गणोबा विक्राळ | लाडू मोदकांचा काळ ||५||
मुंजा म्हैसासुरें | हे तो कोण लेखी पोरें ||६||
वेताळें फेताळें | जळो त्यांचें तोंड काळें ||७||
तुका म्हणे चित्तीं | धरा रखुमाईचा पति ||८||
ह्या चतुर्मास्यांत न्हाव्यां-भटांची जी धणी होत आहे, ती बायकांकडूनच नसून मतलबी आणि राष्ट्राच्या नांवानें पोत पाजळणा-या पदवीधरांकडूनहि ती होत असते. विशेषतः भाद्रपद मासांत स्वतःच्या आयाबहिणींचाहि उद्धार देशभक्तांच्या अव्वल आखाड्यांत आतां लवकरच सुरू होईल. तुकारामांच्या धर्माला संताळ्याचा धर्म म्हणून हांसणारे महाराष्ट्र सारस्वतभक्त व संशोधक अलीकडे पुस्तकें लिहून पोट भरीत आहेत पण अशांचा मतलबसिंधु तुकाराम ओळखून काय म्हणतात तें पाहा :-
ओनाम्याच्या काळें | खडे मांडविले बाळें ||१||
तेचि पुढें पुढें काई | मग लागलिया सोई ||२||
रज्जु सर्प होता | तोंवरीच न कळतां ||३||
तुका म्हणे साचें | भय नाहीं बागुलाचें ||४||
राष्ट्रधर्माची कड घेऊन अलीकडील रा. भावे ह्यांच्यासारख्या संशोधकांनींहि तुकारामांना नांवें ठेविलीं आहेत. वटसावित्रीला यमाचा बागुलबोवा दिसून ती भ्याली. तसे हे आजकालचे ओनामा पंडित मुसलमानांना भिऊन गणोबाच्या भजनीं लागले आहेत. तुकारामांवर टीका करून आपण विद्वान म्हणवीत आहेत. पण तुकाराम त्यांच्या धर्माला बागुलबोवाचा धर्म म्हणत आहेत ! असल्या धर्माला खडे ठेवून मुलांना हिशेब शिकविण्याप्रमाणें ख-या भक्तांनीं कमअस्सल ठरविलें आहे. जोंवर कळत नाहीं, तोंवरच दोरी सापाप्रमाणेंच भिवविते, असें तुकोबा म्हणतात. त्यावरून परिणत अवस्थेंत पंढरपूरची मूर्तभक्तिदेखील त्यांना अपुरी वाटली असावी, येरवीं पुढील अभंग त्यांनीं केला नसता.

मनोमय पूजा | हेचि पढीये केशी राजा ||१||
घेतो कल्पनेचा भोग | न मानेचि बाह्यरंग ||२||
अंतरीचें जाणें | आदि वर्तमान खुणें ||३||
तुका म्हणे कुडें | कोठें सरे त्याच्यापुढें ||४||
मनोमय पूजा केशीराजाला पढीय म्हणजे प्रिय आहे, म्हणून तुकाराम बाहेरच्या रंगाला मानीत नाहींत. ते भक्तीच्या खुणेनें आदिवर्तमान ओळखतात. पण आम्ही इतिहाससंशोधक मात्र कोंबड्यासारखे उकिरडाच उकरीत आहोत ! नम्रता व भक्तिभाव ह्याशिवाय इतिहाससंशोधक काय, कीं सत्यशोधक काय, कोणीच होऊं शकत नाहीं !
चातुर्मास्याचें आणखी एक गुळचट लक्षण आहे, तें हें कीं, ह्या महिन्यांत जितके उपास असतात, तितक्याच मेजवान्याहि असतात. त्यामुळें गोडघाशेपणा वाढला आहे. एकादशीची गुडधणी आणि द्वादशीची पुरणपोळी ह्या दोहींवर हक्क सांगणारे हरीचे लाल ह्या चातुर्मास्याचे शेवटीं लठ्ठ होतात; बिचा-या बायकांच्या हाताला मात्र तेलाच्या लाटलाटून घट्टे पडतात ! जोशी बिल पास झालें त्यामुळें फार तर ग्रामजोशी नष्ट होतील. घरोघरीं गोडावलेलीं पोटें पुष्टच होणार त्यांची काय वाट? लहानपणीं मी एकदां माझ्या आईचे माहेरचे खेड्यांत गेलों होतों. तेथील कुलकर्ण्याचे घरीं श्रावण मासांत रोज पुरणाचें जेवण बिनचूक होत असें. सोमवार शिवाचा, मंगळवार गौरीचा, शुक्रवार लक्ष्मीचा, बुधवार विठोबाचा, गुरुवार दत्ताचा, शनिवारीं शनीसंतर्पण आणि रविवारीं त्याचा बाप जो सूर्य त्याच्या नांवानें आराधना ! श्रावणांतील एकादशीच्या दिवशीं देखील बायकांना पुरण घालावेंच लागे. खेड्यांत एकच जरी ब्राह्मणाचें घर असलें, तरी बाहेर गांवाहून ब्राह्मण सवाष्णी आणावी लागत असे, आणि दुष्काळांतहि हा कुळाचार चालविणें भाग पडे ! असा हा चातुर्मास्यांतल्या क्षुद्र दैवतांचा महिमा आहे ! तो वर्णन करण्यास ब्राह्मण हरिदासाशिवाय कोण समर्थ आहे ! पण तुकारामांनीं मात्र त्यांचें खरें मर्म वरील अभंगांत अचूक ओळखलें आहे.
चातुर्मास्याचा हा दुसरा महिना केवळ सुखजीवी सावलींतल्या लोकांतच दिसतो. खेड्यांतील श्रमजीवी बहुजनसमाजाला गूळ मिळतच नाहीं, मिळाला तरी त्याची चट नाहीं. त्यांना तो समाज ताकावर तृप्त राहून, शहरांतील सुखजीवी लोकांचे सण आणि व्रतें साजरीं करण्यासाठीं तूप, तांदूळ, गहूं, गूळ हे पदार्थ विपुल पुरविण्याच्या कामीं चार महिने सारखा रानांत खपत असतो. ऐतखाऊ लोक दिवसा हा खादाडधर्म आचरून, रात्रीं गांवांत राहून कथाकीर्तनें, गोंधळ, जागरणें, पोथीपारायणें, ह्यांत आपला मोक्ष हुडकीत असतात. पण तुकाराम आपल्या कीर्तनांत कोणत्या रसाची प्रौढी मिरवितात तें पाहा !
घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हातीं ।।
मुक्ता आत्मस्थिति सोंडवीन ।।१।।
ब्रह्मभूत काया होत असे किर्तनीं ।।
भाग्य तरी ऋणी देवा ऐसा ।।२।।
तीर्थ भ्रामकासी आणीन आळस ।।
कडू स्वर्गवास करिन भोग ।।३।।
सांडवीन तपोनिधा अभिमान ।।
यज्ञ आणि ज्ञान लाजवीन ।।४।।
भक्ति भाग्य प्रेमा साधीन पुरुषार्थ ।।
ब्रह्मींचा जो अर्थ निज ठेवा ।।५।।
धन्य म्हणवीन येह लोकीं लोकां ।।
भाग्य आम्हीं तुका देखियला ।।६।।
पण ही सर्व प्रौढी रा. भावे ह्यांच्यासारख्या सारस्वतभक्ताला काय होय ! त्यांनीं आपल्या ‘महाराष्ट्र सारस्वताच्या’ नव्या आवृत्तीच्या ३५८।३५९ पानावर तुकाराम आणि रामदास ह्यांच्या ध्येयांची तुलना करून १२ कलमांत तुकारामांची निंदा व रामदासांची स्तुति केली आहे, ती त्यांच्याच शब्दांत अशी आहे.
१ तुकाराम संसारांत गुरफटला : रामदास विरक्त !
२ तु. संकटें डौलानें सांगतो : रा. ब्रहि काढीत नाहीं !
३ तुकारामाला शेवटीं काळजी बायकोची : रामदासाला शिवाजीची !
४ तु. अडाणी : रा. आचार्य !
५ तु. राजकारण नाही : रा. मुत्सद्दी !
६ तु. लंगोटीची आवड : रा. गाढवाचा तिरस्कार !
७ तु. पंढरीपलीकडे गेला नाहीं : रा. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत ११०० मठ स्थापिले !
८ तु. दैववादी खुळसट : रा. प्रयत्नशाली वीर !
९ तु. परंपरेंत रुतलेला : रा. नव्या वाटा पाडिल्या !
१० तु. शिष्यांवर दाब नसे : रा. खरमरीत शासन करी !
११ तु. जगाला उपदेश : रा. महाराष्ट्रापुढें जग अल्प !
१२ तु. रानांतला टाळकुट्या : रा. चें ध्येय “महाराष्ट्रानें आनंदवनांत सिंहासनावर बसून चांडाळ बडवावें”
असल्या सत्यशोधापुढें भागवतधर्मानें काय रडावें !  वरील अभंगांतील कुठें तुकोबारायाची प्रौढी, कुठें असलें हें इतिहाससंशोंधन ! जुन्या खेडवळ ब्राह्मणांची चातुर्मास्यांत चंगळ, तर नवीन नागर ब्राह्मणांची शहरांतून नित्य दिवाळी ! तुकाराम प्रत्यक्ष ब्राह्मज्ञान्यालाहि लाळ घोटावयाला लावीत आहेत, तर हे भटजी आजकालच्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचा कोळसा उगाळून त्याचा टिळा प्रत्यक्ष तुकारामांच्याच कपाळाला लावूं पाहात आहेत !  म्हणूनच आपल्या अनुयायांस अगदीं शेवटला उपदेश खालील अभंगाचे द्वारा करून तुकाराम हा हतभागी देश सोडून गेले !
ऐका ऐका भाविक जन । कोण कोण व्हाल ते ।।
तार्किकांचा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ।।
नका शोधूं मतांतरें । नुमगें खरें बुडाल ।।
कलीमध्यें दास तुका । जातो लोकां सांगत ।।१।।