कोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति

(६) कोंकण ह्या नांवाच्या व्युत्पत्तीसंबंधीं ब-याच विद्वानांनीं आपले बरेच तर्क प्रसिद्ध केले आहेत. ते तर्क पुढीलप्रमाणें मी देत आहें. त्याची व्याप्ति हल्लींच्या कोइमतूर व सालेम ह्या तामिळ जिल्ह्यांत अशी प्राचीन नकाशांत ठरलेली होती. पण कोंग राष्ट्राचे लोक कदाचित् फिरते व कांहीं अंशीं जंगलीहि असावेत. त्यामुळें त्यांच्या राष्ट्राची व्याप्ति ह्या वर सांगितलेल्या हद्दीबाहेरहि पसरलेली असावी. गंग नांवाचें जें राजघराणें उत्तरेकडून येऊन म्हैसुरास प्रतिष्ठा पावलें, त्या राजांना कोंगणी वर्मा असा किताब होता, हें एल्. राइस आणि फ्लीट ह्यांच्या शोधांवरून उघड होतें. वर्मा हें क्षत्रियवाचक केवळ उपपद आहे. पण कोंगणी ह्या अस्सल द्राविडी पदांतील कोंगाण हेंच पद मुख्य आहे. कोंग ह्याचें संस्कृत केलेलें रूप गंग असणें मुळींच अशक्य नाहीं. कोंगण ह्या नांवांत काँग हें आर्येतर जातिवाचक नांव आहे. आण म्हणजे देश असा द्राविड शब्द आहे; त्याचें मूळ स्वरूप आळ् असें आहे. काड आणि काण असेहि अरण्य अगर शेत ह्या अर्थीं कानडींत व तुळु भाषेंत शब्द आहेत, ह्यावरून कोंगाण अथवा कोंकाण हें नांव सिद्ध होतें. ही व्युत्पत्ति जितकी सोपी आहे तितकीच उघड आहे. हिला हरकत काय ती एवढीच कीं, ह्या कोंग राष्ट्राची व्याप्ति प्राचीन नकाशांतून किना-यापासून किंचित् आंत देशावर ठरविण्यांत आली होती. परंतु ही हरकत भाषाशास्त्राची नसून भूगोलशास्त्राची आहे. आणि प्राचीन नकाशे आतांप्रमाणें पूर्णत्वाला पोंचले नव्हते. खालील माहितीवरून ही भौगोलिक हरकतहि निवारतां येण्यासारखी आहे. कोंग जातीचे लोक किना-यावरहि देशांतल्याप्रमाणें पसरलेले आढळतात. ह्या जंगली जातीची एक गुन्हेगार टोळी जमखिंडी संस्थानच्या तुरुंगांत धरून ठेवलेली मीं माझ्या बाळपणीं प्रत्यक्ष पाहिली आहे. शातवाहनाचें राज्य (इ. स. १५० नंतर) बुडाल्यावर त्यांचा दक्षिणेकडील बराच भाग गंग राजांनीं हस्तगत केला. त्याला गंगावाडी ऊर्फ गंगाडी (कोंगाडी) असें नांव होतें, असें एल्. राइस म्हणतो. कोंगाडी ह्या नांवाची एक जंगली जात ठाण्याकडे अद्यापि आढळते. ठाकरवाडी (ठाकरडे), नाईकवाडी (नायकोडे), असे लोक किना-याच्या प्रांतीं आढळतात. हे लोक दिसतात तसे मुळापासून जंगली नसून विपद्ग्रस्त असावेत. कोंकण हा प्रांत मुळांत महार, मांग, भिल्ल, ठाकूर, कोळी, कोंग इत्यादि एके काळीं राज्य केलेल्या लोकांचा होता. कदंबांनीं महारांपासून चालुक्यांनीं मांगांपासून, मौर्यांनीं कोळ्यांपासून राज्यें घेतल्याचे वगैरे जे पुरावे आहेत त्यांतच शोध केल्यास कोंगाचाहि पत्ता मिळणें अशक्य नाहीं. कोडग, कूर्गकोरग, ह्या जंगली व सुधारलेल्या जाती किना-यावर प्रसिद्धच आहेत. कोंग ह्या जातींचा “आण” म्हणजे देश जो कोंगाण, ह्याचा अपभ्रंश कोंकण ह्या नांवानें प्रसिद्ध आहे. चिरकाण, बागलाण, तुरकाण, वगैरे नांवांतहि हाच आण शब्द आहे, व तो अति प्राचीन द्राविड शब्द आहे. पण कोंग राष्ट्र हें द्राविड आहे, कीं कोळ, भिल्ल, माँग इत्यादि पूर्वेकडून द्राविडांच्याहि पूर्वीं आलेल्या अथवा येथीलच मूळ रहिवाशांपैकीं आहे हें ठरविण्यास मात्र पुरावा नाहीं. ते आर्य नाहींत एवढेंच तूर्त म्हणतां येईल. कोंकणाला अपरांत असें दुसरें संस्कृत नांव आहे. परंतु त्याचा प्रस्तुत विषयाशीं कांहींच संबंध नाहीं. म्हणून त्या संस्कृत नांवाचा येथें पाल्हाळ नको.
(७) तें कसेंहि असो, कोंग राष्ट्राशीं किंवा इतर कोणत्याहि एतद्देशीय रहिवाशांशीं चालू कोंकणी भाषेचा संबंध उत्तरेकडील कोणत्या तरी प्राकृताशीं पोंचतो : आणि विशेषेंकरून तिच्यांत कांहीं फार जुनीं संस्कृत रूपें मराठीहूनहि जास्त आढळतात. त्यावरून विशेषत: ही भाषा कोंकणांतली स्थानिक नसून उपरी आहे, एवढें तरी सिद्ध होतें.