अण्णांच्या लेखसंग्रहाबाबत - २

तीर्थरूप अण्णांचा मी धाकटा मुलगा. माझ्या पाठची बहीण लहानपणींच १९२० सालांत वारली. त्यामुळें अण्णांचा माझ्याकडे ओढा लागला. म्हणूनच बालवयांत माझा अण्णांचेबरोबर हुबळी, बंगलोर, मंगळूरपासून ते कलकत्ता, नागपूर वगैरे भागांपर्यंत प्रवास घडला. याच कारणानें त्यांच्या साप्ताहिक प्रार्थना, उपासना, नैमित्तिक सभा-संमेलनांसारख्या समारंभात माझी उपस्थिति होत असे. इतकेंच नव्हे तर १९३० सालच्या कायदेभंगाच्या चळवळींत अण्णांनी जे दौरे काढले त्यांमध्येंहि मला त्यांनीं आपल्याबरोबर नेलेलें होतें !
पुष्कळसा पत्रव्यवहार ती. अण्णा मजकरवींच करून घेत. त्याचप्रमाणें वृत्तपत्रांत छापण्यासाठीं म्हणून जो कांहीं व्याख्यानाचा मजकूर असे तो ते स्वत: मलाच कथन करीत आणि मी तो लिहून काढीत असे. याच पद्धतीनें त्यांनीं आपल्या आत्मचरित्राचा समग्र मजकूर मला कथन केला आणि तो मी लिहून काढला. असें करण्यांत कदाचित् त्यांचा हेतु एवढाच असावा कीं, माझें सामान्यज्ञान वाढावें, आणि शालेय भाषेपेक्षां अधिक भाषावृद्धि व्हावी. १९४० सालानंतर ती. अण्णा वार्धक्याने आणि मधुमेहाच्या विकारानें अधिकच दुर्बल झाले. त्यांची प्रसिद्धिपराङ्मुख असल्यानें चरित्राच्या बाबतींत मींच नेट धरून तें कसेंबसें तडीस नेलें. त्यामुळें समग्र आत्मचरित्र पुस्तकरूपानें प्रकाशित पहाण्याचें भाग्य कांहीं त्यांना लाभलें नाहीं. ही खंत मला लागलेली असावयाची व ती मी वारंवार त्यांचेजवळ व्यक्त करीत असे. तेव्हां ते माझ्या भावुकतेची आल्यागेल्यादेखत टरच उडवीत.
ती. अण्णांची वृत्ति अतिशय शिस्तबद्ध तर माझी अगदीं उलट प्रकारची. याकरतां मला पुष्कळदां बोलणीं खावी लागत. प्रस्तुत लेखसंग्रहाबाबतहि असाच एक प्रसंग घडला. अण्णांच्यापाशीं ब-याचसा ग्रंथसंग्रह होता. एक दोन प्रशस्त कपाटांत तो ग्रंथसंग्रह सामावलेला असे. पुढें त्याची हयगय आमचेकडून होऊं लागलेली अण्णांच्यानें बघवेना. तेव्हां त्यांनीं तो सारा ग्रंथसंग्रह एका सार्वजनिक संस्थेला तिच्या वाचनालयाकरितां देणगीदाखल देऊन टाकला. कारण ग्रंथसंग्रहाचें वाचन तर दूरच राहो; पण त्यावरील धूळ देखील दूर करण्याचें काम आम्हां दोघां भावांकडून महिनो-महिने कांहीं होत नसे!  म्हणून ग्रंथसंग्रहाची विल्हेवाट ती. अण्णांनी आपल्या डोळ्यांदेखत लावली तें योग्यच झालें. तसाच प्रकार प्रस्तुत लेखसंग्रहाबाबत घडला. हे लेख निरनिराळ्या वृत्तपत्रांतून, किंवा मासिकांतून प्रसिद्ध झालेले होते. हें सर्व छापील लिखाण एका कापडी गाठोड्यांत मी बांधून ठेवलेलें होतें. एके दिवशीं या लेखांच्या गाठोड्यास वाळवी लागल्याचें अण्णांच्या दृष्टोत्पत्तीस आलें. अण्णांनीं माझ्यावर जो गहजब केला तो मलाच ठाऊक. इतकेंच नव्हे तर दुसरे दिवशीं हें सारें लेखसंग्रहाचें बोचकें देखील सार्वजनिक वाचनालयास देण्याकरतां म्हणून जेव्हां अण्णांनी त्या वाचनालयाचे व्यवस्थापकांस बोलावलें तेव्हां मात्र मला राहवेना. अगदीं गयावया करून मी ह्या लेखांचें बोचकें त्या इसमाचे हातून घरीं आणून ठेवलें अन् अण्णांचेजवळ आणाभाका वाहून त्यांचे योग्य प्रकारें जतन करण्याचें मी अभिवचन दिलें. ह्या वचनास मीच नव्हें तर माझे गैरहजेरींत माझे बंधु श्री. प्रतापराव देखील अक्षरश: जागले. हेंच आमचे परी एक मोठें कार्य म्हणावें लागेल.
आत्मचरित्राच्या प्रकाशनाबाबत किती अडचणी आल्या, त्यांत किती यातायात झाली, किती निराशा पदरांत पडली, तें मींच जाणें. तेव्हा ह्या छापील लेखांचें प्रकाशन कधीं काळीं होईल अशी मला चुकूनदेखील कल्पना नव्हती. परंतु आत्मचरित्राच्या प्रकाशनाचे बाबतींत जसा श्री. ठोकळ यांनीं मला दिलेला आपला शब्द पुरा केला, तसाच या लेखसंग्रहाच्या बाबतींत देखील पुरा केल्यांनें माझ्या आनंदास आणि आश्चर्यास पारावार राहिला नाहीं. चालूं महागाईच्या काळांत देखील श्री. ठोकळ यांनीं अण्णांच्या लेखसंग्रहाच्या पुनर्मुद्रणाचें खर्चिक काम यथोचित रीत्या तडीस नेलें याबद्दल मीं त्यांचा शतश: आभारी आहे. त्याचप्रमाणें श्री. ठोकळांच्या इतकीच आगळी आस्था बाळगून अण्णांच्या लेखांचें संकलन व त्यांना परिशीलनपूर्वक प्रस्तावना लिहिण्याचें जें महत्कार्य प्राचार्य मा. प. मंगुडकर यांनी केलें, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार मानण्यांत मी माझा बहुमान समजतों.
ती. अण्णांच्या आत्मचरित्रावरून लोकांना त्यांच्या एकंदर जीवनाबद्दल इत्थंभूत माहिती मिळेल, तर या लेखसंग्रहावरून त्यांचे विचार कसे होते, त्यांची वृत्ती कशी होती, त्यांची राजकीय, सामाजिक आणि धार्मिक दृष्टि कशी होती, याचा सुगावा लागेल, असा भरंवसा वाटतो. पण हें सांगणें देखील लहान तोडीं मोठा घांस घेण्यासारखेंच वाटतें.
रवींद्र विठ्ठलराव शिंदे