रामानंद

दक्षिणेंत श्रीरामानुजाचार्यांनीं श्रीवैष्णव पंथाची स्थापना केल्यावर त्याच्या शाखा त्यांनीं सर्व हिदुंस्थानभर पसरल्या. तो स्वत: सर्व देशभर तीर्थयात्रा करून आला. म्हैसूरचा जैन राजा विष्णुवर्धन याला वैष्णव धर्माची दीक्षा दिल्यावर त्याच्या आश्रयानें त्याच्या राज्यांत मलेकोट येथें एक प्रसिद्ध वैष्णव देऊळ व मठ स्थापिला. ह्याच ठिकाणीं रामानंद ह्या गौड ब्राह्मणाचा जन्म झाला, असें मॅकालिफ म्हणतो. सर भांडारकर म्हणतात, हा प्रयाग येथें इ. स. १३०० च्या सुमारारस जन्मला. ह्यानें स्थापिलेल्या पंथाचें मुख्य उपास्यदैवत कृष्ण नसून राम आहे, हा एक विशेष आहे. ह्यानें केलेल्या तीर्थाटनांत ह्याचा मुसलमानांशीं व बौद्धांशीं संबंध आला असावा असें दिसतें. ह्यामुळें त्याच्य पंथांत जातिभेदाला मुळींच महत्त्व नाहीं. शिवाय ह्यांची सर्व शिकवण हिंदी भाषेंत झाल्यामुळें बहुजनसमाजांत ह्याचा प्रसार फार झाला. ह्याच्या प्रसिद्ध तेरा शिष्यांपैकीं पीपा राजपूत, कबीर मोमीन, सेना न्हावी, धन्ना जाट, रोहिदास चांभार आणि पद्मावती ही एक बाई होती. हा इ. स. १४११ सालीं १११ वर्षांचा होऊ वारला. ह्याच्या शिष्यांपैकीं कित्येकांनीं पुढें आपापले नवीन वैष्णव पंथ सर्व उत्तर हिंदुस्थानभर काढलें. ह्यांचीं कामें हिंदी भाषेंतच चालल्यानें देशी भाषेचा प्रसार झाला.