तामीळ भक्त

ज्यांच्या प्रभावामुळें भागवतकाराला भागवत लिहिण्याची प्रेरणा झाली, ते तामिळ देशांतील शैव आणि वैष्णवभक्तवृंद भागवताच्याहि पूर्वीं सुमारें २ शतकें, म्हणजे ख्रिस्ती शकाच्या ७ व्या किंवा ८ व्या शतकांत कांची, चिदंबर, मदुरा, श्रीरंग (त्रिचनापल्ली) ह्या टापूंत होऊन गेले. शिवभक्तांना अड्यार आणि विष्णुभक्तांना आळूवार अशी संज्ञा आहे. शैव संत ६३ आणि वैष्णव संत १२ अशी ह्यांची गणना निश्चित आणि प्रसिद्ध आहे. दक्षिणेंतील प्रसिद्ध शैव आणि वैष्णव देवळांतील चौफेर ओव-यांतून ह्यां संतांच्या मूर्तींची अनुक्रमें पूजेसाठीं प्रतिष्ठा झालेली अद्यापि आढळते. जशीं यांचीं गीतें हृदयंगम आहेत, तशींच ह्यांचीं चरित्रेंहि उज्ज्वल अशीं वर्णन करण्यांत येतात. हे संत ब्राह्मणांपासून तों अस्पृश्य अतिशूद्रांपर्यंत सर्व जातींचे होते. शिव आणि विष्णु असा उपास्यांचा भेद हे मानीत नसत. इतकेंच नव्हे तर जातीभेदहि आपसांत मानीत नसत. सर्वांहि जातींच्या हिंदूंना ते हल्लींहि परमपूज्य आहेत. असा हा आधुनिक भागवत धर्म प्रथम कावेरीच्या कांठीं जन्मून नंतर तुंगेच्या, भिवरेच्या, कृष्णेच्या, गोदेच्या कांठाकांठानें पसरत पुढें उत्तर, पूर्व आणि वायव्य हिंदुस्थानांत पसरला. नाथमुनी, रामानुज, विष्णुस्वामी, निंबार्क, मध्व, इत्यादी ब्राह्मण धर्माचार्यांना पुढें ह्यांच्यामुळेच आपापल्या सांप्रदायिक धर्मप्रसाराची प्रेरणा झाली. ह्यांच्या उत्कृष्ट प्रेमामुळे आणि उज्ज्वल वैराग्यामुळेंच जैन आणि बौद्ध धर्मांची बहुजनसमाजातून पिछेहाट झाली. पुढें ह्यांच्या मागून आलेल्या ब्राह्मण आचार्यांनीं राजाश्रय मिळविल्यामुळें त्यांच्या चिथावणीनें जोरजुलमानें वरील बौद्ध-जैनांच्या धर्मांचा नायनाट करण्यांत आला.