उपसंहार

येथपर्यंत मराठी वाङ्मयाचा जुन्या नव्या काळांतील वरील दोन महत्त्वाच्या विषयासंबंधीं ग्रंथांचा आणि घडामोडींचा विचार झाला. आतां पुढें काय करावयाला पाहिजे, ह्याविषयीं उपसंहारादाखल एक दोन मुद्द्यांसंबंधीं विचार करून हें भाषण पुरें करितो. तत्त्वज्ञानाचा जो साक्षात्कारी भाग आहे त्यासंबंधीं कोणी कोणाला सांगून शिकवून तो होण्यासारखा नाहीं. जो दुसरा तार्किक भाग आहे त्यांत खरी भरीव ग्रंथनिर्मिति व्हावयाची तर तिच्या पूर्वीं निरनिराळ्या विषयांवर प्रायोगिक व वैज्ञानिक अध्ययन पुरेसें झालें पाहिजे. पण ह्या बाबतींत आमची विद्वान् मंडळी आणखी किती काळ पाश्चात्त्यांच्या श्रमावर हात टेकून राहणार हें कळंत नाहीं. बंगाल्यांतील सर जगदीशचंद्र बोस, डॉ. पी. सी. रॉय, मद्रासकडील डॉ. रामन् ह्यांचीं उदाहरणें महाराष्ट्रापुढें आहेतच. प्रत्यक्ष तत्त्वज्ञानांतच प्रो. राधाकृष्णन् यांनीं स्वदेशीं व परदेशीं बरीच कीर्ति मिळविली आहे. पण तीसुद्धां पौरस्त्य तत्वज्ञानाचें नुसतें समर्थन (Apologia) म्हणूनच मिळविली आहे. अलीकडे मराठींतून त्यांच्या ग्रंथांचा अनुवाद होत आहे. ‘Hindu View of Life’ ह्या त्यांच्या चार सुंदर ‘हिबर्ट लेक्चर्सचा’ मराठींत अनुवाद श्रीयुत बाबूभाई मेहता ह्या गुजराथी गृहस्थानें नुकताच प्रसिद्ध केला आहे. श्री. नरसिंह चिंतामण केळकर ह्यांनीं आपला ‘भारतीय तत्त्वज्ञान’ हा ग्रंथ ह्याच वर्षीं प्रसिद्ध केला आहे. पण तो केवळ “संकलनात्मक आणि संक्षिप्तच झाला आहे”. प्रसिद्ध षड्दर्शनाशिवाय आणखी सहा सातच दर्शनांचें दिग्दर्शन केळकरांनीं केलें आहे; पण पाली ब्रह्मनाल सूत्रांत श्रीगौतमबुद्धांनीं आपलें दर्शन सांगण्यापूर्वीं त्या वेळीं भारतांत निदान ६४ तरी भिन्न भिन्न दर्शनें होतीं असें स्पष्ट म्हटलें आहे. तात्यासाहेबांनीं ह्या प्रदेशावर कांहीं प्रकाश पाडला असता तर त्यांच्या पुस्तकांत कांहीं नाविन्य आलें असतें. मराठींत स्वतंत्र दर्शनांचा योग केव्हां येईल तेव्हां येवो, तोपर्यंत विश्वविद्यालयांतील विद्वानांनीं भारतीय तत्त्वज्ञानाचें शास्त्रीय शोधन करून कालानुक्रम आणि विषयानुक्रम निर्विकारपणानें जुळवून तत्त्वज्ञानाचा एक नवीन इतिहास तरी लिहिणें फार अगत्याचें आहे. नवी दृष्टी नसली तरी पुढील अध्ययनाला एक नवीन दिशा दाखविण्याचें श्रेय ह्या प्रयत्नानें मिळेल. समाजशास्त्राच्या बाबतींत मुंबई विद्यापीठानें बरींच वर्षें एक संस्था रडतकढत चालविली  आहे. पण तिचें दृश्य फळ कांहींच दिसत नाहीं. निदान मराठी वाचकांना तरी कांहीं लाभ झालेला दिसत नाहीं. स्वतंत्रपणानें काम करणा-यांपैकीं रा. सा. ना. गो. चापेकरांच्या ‘बदलापूर ग्रंथाचा’ उल्लेख वर झालाच आहे. ते म्हणतात त्याप्रमाणें हें बदलापूर गॅझेटच तयार झालें आहे. त्यांचें मन:पूर्वक अभिनंदन करून मला आमच्यांतील तरुण विद्वानांना एक नम्र सूचना करावयाची आहे कीं, अशा प्रकारची अखिल भारतांतून विषयवार आणि आंकडेवार कसोशीची माहिती ब्रिटिश सरकार आणि संस्थानें ह्यांनीं आज ५-६ दशवार्षिक खानेसुमारींतून अगदीं पुरून उरण्यासारखी मिळवून ठेविली आहे. Ethnography Survey, Philological Survey वगैरेंचे द्वारें आज ५०-६० वर्षें अलोट खर्च आणि श्रम करून सामग्री मिळविण्याचें काम चाललें असून, त्याचे साह्यानें पाकसिद्धीचे कामाला मात्र अदयाप कोणीच पुढें येत नाहीं हें कसें? भरतखंड म्हणजे एक अपरूप मानवी म्यूझियम आहे. मराठ्यांना महाराष्ट्रांत ही विपुल सामग्री हाताशीं तयार आहे. ह्या बाबतींत माझे मित्र श्री. दिवेकरशास्त्री आणि श्री. श्री. म. माटे ह्यांनीं जे श्रम केले आहेत त्यांचा उल्लेख करणें जरूर आहे. विशेषतः श्री. माटे यांचा ‘अस्पृष्यांचा प्रश्न’ हा ग्रंथ सुंदर असून समतोल आहे ह्याबद्दल मी त्यांचें अभिनंदन करितों. महाराष्ट्रांतील ग्रामसंस्था, महाराष्ट्राची वसाहत, जमीनधारापद्धति असा एक एक सुटसुटीत विषय घेऊन त्यांतच आयुष्य वेंचणाराला पुरेशी सामग्री वाट पाहात आहे.

महाराष्ट्रांतील समाजरचनेवर लिहिणारांनीं ह्यांतील ग्रामसंस्थेपेक्षां जातिसंस्थेकडेच अधिक नजर पुरविली आहे; आणि तीहि माझी जात थोर, तुझी जात नीच या अशास्त्रीय भावनेनें. यांतील कित्येक जाती अथवा जमाती आपआपल्या अंतर्बाह्य आचारांत किती स्वयंनिर्मित होत्या हें कुणाच्या लक्षांत यावें तितकें येत नाहीं. वैयक्तिक किंवा सामाजिक गुन्हे अथवा दोष घडल्यास त्यांच्या निवाड्यासाठीं किंवा बंदोबस्तासाठीं ह्या जाती सरकारी न्यायखात्याकडे जात नसत. अशी पंचाईत जातगंगा करी किंवा क्षेत्राच्या ठिकाणीं ग्रामाधिकारी जोशी असत त्यांच्याकडूनहि हा मनसुबा होत असे. त्या जोश्याची निवड गांवच्या गोताकडून होत असे. ते गोत म्हणजे गांवच्या सर्व जातींच्या प्रमुखांचें पार्लमेंट असे, असे कज्जे अलीकडे शंकराचार्यांच्याकडे जातात. पण शंकराचार्यांचे ग्रामाधिका-यांच्या अधिकारावर अतिक्रमण आहे आणि तो ग्रामाधिकारी दोनशें वर्षांपूर्वीं चालवूं देत नसत, हे धुळ्याचे वकील भास्कर वामन भट ह्यांनीं भा. इ. सं. मंडळाचें त्रैमासिक वर्ष १३ अंक ३ यांत सप्रमाण दाखविलें आहे. मंडळाचें संशोधक श्री. शंकरराव जोशी यांच्याकडे अशा कज्ज्यांचीं दोषपत्रें आणि शुद्धिपत्रें बरींच पाहावयास मिळतील. तसेंच गांवपाटील आणि जातपाटील यांचे अधिकार आणि कार्यक्षेत्रें कशीं भिन्न होतीं हेंहि श्री. शंकरराव जोशी ह्यांनीं स्पष्ट दाखविलेलें आहे. त्रैमासिक वर्ष २ पृष्ठ १३४-३५ ह्यांत म्हटलें आहे कीं, “न्यायमनसुबी सरकारांत न्यावयाचें प्रयोजन नाहीं. सर पाटील याहि करावा. बदअंमल कोली लोकामधें जाला तरी त्याचा न्याये दिवाणांत न आणावा. अलिकडे दिवाणांत नेतात ते न न्यावे.” हें पत्र समस्त अष्टागर प्रांतांतील कोळी ज्ञातीबद्दलचें आहे. मी कर्नूल जिल्ह्यांत हिंडत असतांना तेथील धनगर जातीमध्यें अद्यापि हाच प्रकार पाहिला.

महाराष्ट्रांतील जातिसंस्था आणि ग्रामसंस्था ह्यांचा कारभार मध्ययुगांत देखील लोकसत्तात्मक होता.

राज्यक्रांति झाली तरी या लोकसभेवर परिणाम होत नसे. हल्लींच्या इंग्रजशाहीनें मात्र ही सत्ता नामशेष करून टाकली आहे.

विद्याखातें, कायदे करणारें विधिमंडळ, निवाडा करणारें न्यायखातें आणि अंमलबजावणी करणार प्रधान मंडळ, ही वस्तुत: परस्परांहून भिन्न व स्वतंत्र असावयास पाहिजेत. पोलीसखातें व लष्करखातें एवढेंच काय तें सरकारकडे असावें, असें प्रसिद्ध समाजशास्त्री हर्बर्ट स्पेन्सर ह्यांनीं आपल्या ‘Proper Functions of the State’ या निबंधांत कंटरवानें सांगितलें आहे. तरी पाश्चात्त्य राज्यसंस्थेनें लोकांचे सर्वच हक्क आपल्या मुठींत वळले आहेत, आणि हेंच अतिक्रमण सर्वत्र चालूं आहे. नवभारत, ग्रंथमालेंतील ‘महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास’ चे लेखक प्रो. पेंडसे ह्यांनीं ह्या विषयाचें विवेचन केलें असतें तर बरें झालें असतें. मराठ्यांचें आणि पेशव्यांचे दफ्तर आणि ठिकठिकाणीं अद्यापि सांपडणारीं कागदपत्रें ह्यांचा उपयोग करून न घेतां श्रुति स्मृति आणि वारक-याचें भारुड ह्यांतच हे प्रोफेसर गुरफटलेले आहेत. कोळी जसा आपल्या जाळ्यांतच गुंतून मेलेला आढळतो, तशी महाराष्ट्राच्या इतिहासाची गत या ग्रंथप्रिय लोकांनीं केलेली दिसते. समाजशास्त्राच्या भावी अभ्यासूंनीं ह्या कवचाच्या बाहेर यावें, तेव्हांच खरा इतिहास कळेल, आणि नवीन समाजशास्त्र बनेल.

मोंगलाईनंतर श्रीशिवछत्रपतीनें हिंदुपदपादशाही स्थापन केली तेव्हांपासून सामाजिक स्वातंत्र्यावर राजाचें आक्रमण सुरू झालें. आपल्या घराण्यांतील लग्नापुरती त्यांनीं पांच कुळी निर्माण केली. शेवटच्या प्रतापसिंह महाराजांनीं मराठा ज्ञातीवर नियंत्रण घालण्यासाठीं एक शिरस्तापत्र तयार केलें. त्यावर भोसले, महाडीक, शिरके, मोहिते आणि गुजर ह्या पांच कुळींतील ४३ प्रमुख मराठ्यांच्या सह्या आहेत. ह्याची अस्सल प्रत भा. इ. सं. मंडळांत आहे. मराठ्यांनीं आपसांतच शरीरसंबंध करावा. मध्यंतरी पेशवाईमुळें मराठे ज्ञातींतील शिरस्ते विसकळीत झाले होते. ते सुरळीत चालावेत. हीं दोन कलमें स्पष्ट उल्लेखिलीं आहेत. आश्रित ब्राह्मणांनीं मराठ्यांचें पौरोहित्य ते सांगतील त्याप्रमाणें करावें, न केल्यास दुस-या ब्राह्मणाची नेमणूक व्हावी. ह्याबाबत शेवटचें अपील छत्रपतीकडे यावें असा निर्बंध आहे.

अस्पृश्यतेचा छडा लावण्यांत-निवारणाचा भाग तर राहूं द्या -- मला स्वत:ला जो जन्मभर अनुभव आला आणि आनंद झाला तो लक्षांत घेतां मला आणखी जन्म मिळाले तरी ते ह्याच शोधनांत आणि सेवाशुश्रूषेंत खर्चीन अशी उमेद वाटत आहे. एकच इशारा द्यावासा वाटतो. अशीं कामें पूर्वग्रह अजिबात टाकून दिल्याशिवाय कोणीं केव्हांहि हातीं घेऊं नयेत. ३६ वर्षांपूर्वीं ‘हिंदु धर्म आणि सुधारणा’ या ग्रंथाच्या विद्वान् कर्त्यांनीं आपल्या ग्रंथाच्या शेवटच्या प्रकरणांत असा निष्कर्ष काढिला कीं, ब्राह्मण जातीनें हजारों वर्षें विद्याव्यासंगाचे अतिश्रम केले, इतकेंच नव्हे तर कनिष्ठ जातींचा उद्धार सतत स्वार्थत्याग करून चालविला. त्यामुळें त्यांच्या बुद्धीला वैक्लव्य झालें आहे. आणि त्यांच्या संख्येचा नव्हे तर गुणांचाहि झपाट्यानें –हास होत आहे. त्यानंतर ३६ वर्षांनीं आज पाहावें तों श्री. गो. म. जोशी ह्यांनीं आपल्या हिंदु-समाज-रचनाशास्त्र ग्रंथांत अगदीं उलट प्रकारचा छातीठोक सिद्धान्त काढला आहे तो असा - सृष्टीच्या घडामोडींत ब्राह्मण जात एकच आज ४ हजार वर्षें टिकून राहिली आहे. तीच जात सुप्रजनन करण्यास लायक आहे. श्री. गोळे मागें म्हणून गेले कीं कनिष्ठ जातींवर विद्याव्यासंगाची आणि लोकसेवेची सारी जबाबदारी सोपवून ब्राह्मणांनीं स्वस्थ खेडेगांवांत जाऊन राहावें आणि आपली तनदुरुस्ती आणि मनदुरुस्ती करावी. ह्याच्या उलट जोशी आज म्हणतात. ब्राह्मणांनीं आपलीच संख्या शक्य तितकी वाढवावी आणि कनिष्ठांची शक्य तितकी घटवावी. आम्हीं कोणाचें ऐकावें?  आपल्या मतें पिसें परि तो आहे जैसें तैसें || तुका म्हणे वादें | वाया गेलीं ब्रह्मवृंदें || हा खरा प्रकार आहे असें समजून दोघांकडेहि दुर्लक्ष करावें झालें !

माझी तरुणांना हात जोडून विनंती आहे कीं, बाबांनो, तुम्ही आपले सर्व पूर्वग्रह पुन: सोडून द्या; आणि तुमच्यासाठीं आधींच मिळवून ठेविलेल्या माहितीला तुमच्या स्वत:च्या स्थानिक निर्विकार अनुभवांची जोड देऊन, अशी कांहीं नवी दिशा दाखवा कीं जेणेंकरू आमचे पूर्वग्रह नाहींसे होतील, आणि नवीन आशा उत्पन्न होईल. परमेश्वर करो आणि हे मराठी वाङ्मयाचे पांग फिटोत !