केवळ ब्राह्मणेतर द्वेष

मागील तीन अंकांत रा. राजवाड्यांनीं जवळ जवळ अखिल महाराष्ट्राची नाचक्की केली आहे हें दाखविलें. त्यांचें संशोधन म्हणजे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादावरील एक चित्पावनी पांचवा वेदच म्हटलें तरी चालेल. ह्या आधुनिक परशुरामानें २२ वे वेळां पृथ्वी निःक्षत्रिय करून सबंध महाराष्ट्राला आग लावण्याचा घाट घातला आहे. पान १९८ वर, विश्वामित्रावरहि ह्मण करण्याच्या महत्वाकांक्षेनें ह्या ब्राह्मणानें वर्णव्यवस्थेच्या उपक्रमाची एक नवीनच सृष्टी निर्माण केली आहे. ती अशी : “ (१) प्रथम ब्राह्मण उर्फ ब्रह्मन् हा एकच शुक्लभाश्वर वर्णी वर्ण होता. (२) त्याला रक्तलोहित वर्णी क्षेत्र उर्फ क्षत्रिय लोक भेटून ब्रह्मक्षत्र नामक द्वैवर्ण्य बनलें. (३) पुढें विश लोक सामावून त्रैवर्ण्य उत्पन्न झालें. (४) शेवटीं उत्तर कुरूंत व उत्तर मद्रांत कृष्णवर्ण शूद्रांचा समावेश होऊन जगप्रसिद्ध चातुर्वर्ण्य झालें.” रा. राजवाड्यांच्या मतें ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हेही जणूं रक्तानें भिन्न आहेत असें त्यांच्या ह्या लिहीण्यावरून दिसतें. ब्राह्मण हेच आर्य बाकीचे कोणीतरी. कदाचित चित्पावन तेवढेच आर्य असतील ! एकूण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तिघे एकजात आर्य हें मतहि राजवाड्यांच्या सोंवळ्याला चालत नाहिंसें दिसतें ! इतकेंच नव्हे, तर त्यांच्या स्वप्नसृष्टींत आर्याचा असा एक काल होता कीं आर्यांचे सारे आदमी (औरती नव्हेत, त्या शूद्राहूनहि अधम) गण्या, गोप्या, ढौल्या, दगड्या-चट सारे, पळीपंचपात्री वाजविणारे सफेतीहून पांढरे ब्राह्मणच होते. ह्यांत ते एकच गोष्ट सांगावयाला विसरले कीं हे सगळे आदमी चित्पावनच होते. असो. ह्या एकजात पांढ-यांनीं हळूहळू रंगितांच्या औरती लाटल्या आणि जीं पोरटीं झालीं, तीं बापाच्या वाणाचीं समजण्यांत आलीं. ह्यालाच पितृसावर्ण्य असें जाडें नांव आहे. पुढें गौतम बुद्ध नांवाच्या एका सोंगाड्या संन्याशानें फार घाण केली. कां, तर त्यानें आर्यांची कंदुरी आणि रक्ताभाताचा नैवेद्य बंद केला. तो स्त्रिया व शुद्रांना वेदांतील गुपित सांगूं लागला ! तो चित्पावन असता तरी आमच्या ह्या परिसरामाला खपतें. पण तो एक दुष्ट क्षत्रिय होता. दुष्ट कसा म्हणाल तर त्याला पळीपंचपात्रीचा वीट आला होता. आणि त्यांने स्त्री-शूद्रांना (जे भाळे भोळे गौतमाच्या काळापूर्वीं ब्राह्मणांच्या पायांवर लोटांगण घालीत होते,) ब्राह्मणांच्या पायांवरून उचलून त्यांच्या स्वतःच्या तंगडीवर उभे राहण्यास शिकविलें ! त्यामुळें हल्लींच्या जाती झाल्या, असें हे परिसराम संशोधक सांगतात. बौद्धधर्मामुळें सबगोलंकार झाला अशी कोल्हेकुई आजवर ऐकूं येत होती, तर आतां आपल्या परिसरामाला बौद्धामुळें जातिभेद माजला असें म्हणण्याची उलटी वाचा फुटूं लागली आहे. काळीज उलटें तेथें वाचा कशी सुलटी असावी !
“बौद्धामुळें आपल्या आयाबहिणींची चालरीत सारी गेली” अशी पांढ-या ब्राह्मणांस काळजी पडली म्हणून त्यांनीं मातृसावर्ण्याचा कायदा केला, असा राजवाड्यांनीं शोध लावला आहे ! जणूं ते करतील तीच पूर्वदिशा; निदान राजवाड्यांची अशी समजूत दिसते. ते म्हणतात कीं बुद्धाच्या काळापर्यंत पांढरा नर व मादी ह्यांचे पोटीं जी प्रजा होई तिचा वाण पांढरा समजला जाई. म्हणजे पितृसावर्ण्याचा कायदा होता. पुढें बुद्धानें जें पाखंड माजविलें त्यामुळें ब्राह्मणांना आपल्या आयाबहिणींची नीति सांभाळण्याकरितां अशा प्रजेचा वाण ठरवावा लागला. म्हणजे संस्कृत भाषेंत सांगावयाचें झाल्यास मातृसावर्ण्याचा कायदा करावा लागला. हा ब्राह्मणी कायदा कधीं कोणीं केला असो वा नसो, पण त्याबद्दल प्रायश्चित् बौद्ध धर्माला काय म्हणून ? चोर सांपडत नाहीं तर संन्याशाला बळी देण्याचाच हा न्याय दिसतो ! ज्याअर्थीं बौद्ध हे सोंगाडे संन्याशी त्याअर्थी त्यांना सुळीं देण्यांत पुण्यच आहे ! ते ब्राह्मण असते तर त्यांच्याकडे वांकड्या डोळ्यांनीं पाहण्याचीहि कोणी छाती करूं नये असें मनुस्मृति म्हणाली असती. त्यांनीं शूद्र स्त्रीशीं दंगामस्ती केली म्हणून काय झालें ? पण तेंच उलट जर एखाद्या शूद्रानें एखाद्या ब्राह्मणीवर हात टाकला तर त्याला नुसती देहान्त शिक्षाच नव्हे तर त्याच्या पुढील पिढ्यांना यावच्चंद्रदिवाकरौ अस्पृश्यपणाची सजा ! आणि ह्याचें कारण काय तर राजवाडे म्हणतात बौद्ध धर्म !! राजवाड्यांच्या विचारांचा व भाषेचा ग्राम्यपणा हुबेहूब दाखवावा म्हणून आम्हीं मुद्दाम ह्या रकान्यांतील भाषा त्यांना आवडेल अशी स्वीकारली आहे. अमेरिकेंतील निग्रो स्त्रीपुरुषांसंबंधी तेथील हल्लींचे पांढरे नराधम जे लिंचिंगचे रूपानें अत्याचार व अनाचार करितात, तेच बुद्ध पूर्वकालीं व किंचित् उत्तर काळींही ब्रम्हावर्तांत चालूं होते; व ते अजीबात बंद करण्यासाठीं पितृसावर्ण्याचे ऐवजीं मातृसावर्ण्याचा कायदा करून ब्राह्मणांनीं मोठें पुण्य जोडलें, असा राजवाड्यांच्या पराशर स्मृतीचा भावार्थ दिसतो.
हिंदुस्थानांतील मानववंशमीमांसेची अशी मखलाशी करूनच राजवाड्यांनीं ब्राह्मणांचा वरिष्ठपणा स्थापण्याचा हा प्रयत्न केला आहे असें नव्हे तर, भाषा विकासमीमांसेंतहि त्यांनीं असाच पक्षपात दाखविला आहे. त्यांच्या मतें संस्कृत भाषा काय ती ब्राह्मणांनाच येत होती व तीही ब्राह्मण पुरुषांलाच. बाकी चट् सा-या मानव प्राण्याची आणि ब्राह्मणांच्या बायकांची देखील त्या भाषेंत जीभच वळत नव्हती; म्हणून ते सर्व प्राणी हेंगाडी प्राकृत त्यांना ‘शौद्री’ बोली बोलत असत, असा शेरा दिमाखानें मारला आहे. जैन बौद्ध क्षत्रियांनीं आपला धर्म, स्त्रिया, वैश्य आणि शूद्रांमध्यें अफाट पसरला. इतकेंच नव्हे तर विद्येंत मागासलेल्या दक्षिण प्रांतीं जंगली जातींतहि ह्या बौद्ध जैन प्रचारकांनीं अत्यंत विरक्त आणि दिगंबर राहून आपल्या उदार धर्मांप्रमाणें आपल्या संस्कृत वाङ्मयाचा आणि विविध साहित्याचा किती झपाट्यानें प्रसार केला हें ज्यांना समजून घ्यावयाचें असेल त्यांनीं आम्हीं गेल्या अंकांत सांगितलेले विजयनगरचे प्रोफेसरद्वय रामस्वामी अयंगार आणि बी. शेषगिरीराव ह्यांचें गेल्या वर्षीं प्रसिद्ध झालेलें पुस्तक वाचावें; म्हणजे राजवाड्यांची वरील गर्वोक्ति किती फोल आणि दुःखावर डाग देण्यासारखी क्रूर आहे हें स्पष्ट दिसेल.
रा. राजवाड्यांच्या चातुर्वर्ण्यासंबंधीं कल्पना फारच गांवढळपणाच्या व अनैतिहासिक आहेत. ते म्हणतात त्याप्रमाणें चातुर्वर्ण्याची संस्था केवळ हिंदुस्थानच्या हद्दीवरील उत्तर कुरूंतच हिंदी आर्यांमध्यें होती असें नसून, ही संस्था इराणांतील आर्यांमध्यें, व शिवाय हिंदुस्थानाबाहेर राहणा-या प्राचीन शक पार्थवांमध्येंहि रूढ होती. अथ्रवण = ब्राह्मण, रथयेष्ठारः = रठ्ठे (ऊर्फ क्षत्रिय), वास्त्रियस् = विश, हूतोक्ष = हूईटी (शूदोई शूद्र) असे वर्ण व तद्वाचक वरील शब्द हिंदुस्थानाच्या बाहेरिल झेंद अवेस्ता भाषेंत होता. ह्यावरून शूद्र हे देखील (निदान ह्या शब्दांनीं ओळखलें गेलेलें राष्ट्र तरी) खात्रीनें अनार्यच होते कीं नाहीं याचा संशय येत आहे. उलटपक्षीं ब्राह्मण आणि सूर्यवंशी क्षत्रिय हे वर्ण द्राविड अथवा अनार्य होते असें पार्जीटरचें मत आहे. शूद्र हा शब्द वेदांत आढळत नाहीं. तो पुरुषसूक्तांतच “पद्भयां शूद्रो अजायत” असा आढळतो. पण पुरुषसूक्त हा वेदांतील अगदीं अलीकडचा भाग असून तो प्रक्षिप्त असावा असाहि कांहीं ख-या संशोधकांचा तर्क आहे. “कंदाहारांत शूद्रोई नांवाचें एक राष्ट्र होतें व दक्षिण सिंधू नदीचे तीरावर शूद्रोस ह्या नांवाचें एक शहर होतें” असें लासन् नांवाच्या जर्मन वैदिक संशोधकाचें म्हणणें आहे. परंतु ब्राह्मण तेवढेच आर्य आणि शूद्र म्हटलें कीं सारे अनार्यच-नव्हे तर कुत्र्यांहून देखील कमी-अशा ज्या गांवढळांची समजूत आहे, त्यांच्यापुढें जर्मन पंडितांचेंच काय पण प्रत्यक्ष स्वर्गांतील बृहस्पतीचेंहि मत आणून ठेविलें तरी त्यांचा ब्राह्मणेतरद्वेष कसा कमी व्हावा ! अशाच ब्राह्मणांनीं आज दोन हजार वर्षें हिंदुस्थानांत ब्राह्मण आणि शूद्र ह्या दोनच जाती आहेत, परशुरामानें २१ वेळां पृथ्वी निःक्षत्रिय केली, वैश्यांची तर उत्तमांत गणनाच नाहीं; वगैरे वगैरे मतें ब्राह्मणेतरांच्या रोमरंध्रांतून समरस करून दिलीं आहेत.
ज्यांच्या डोळ्यांत क्षत्रिय व वैश्य भरत नाहींत त्यांनीं “अतिशूद्र” ह्या नांवानें “अस्पृश्य” गणलेल्या महारामांगांना बरें पाहावें ही तर अशक्यच गोष्ट. जणूं काय महारांमांगांना चार शिव्या हासडल्याशिवाय शहाजीचें चरित्र पुरें होतच नाहीं. म्हणून, पान १४१ वर राजवाड्यांच्या लेखणींतून खालील मुक्ताफळें गळून पडलीं आहेत. “त्रैवर्णिक ज्याला दासकर्म म्हणत, तें अर्धरानटी शूद्र उच्च व सुखाचें कर्म समजत. सध्यां महारमांग लोक यूरोपियनांच्या रेल्वेवर खडी फोडण्यांत जसा अभिमान बाळगितात व ग्रामसंस्थेंत महारकी करीत बसण्यापेक्षां खडी फोडण्याची कामगिरी करण्यांत उच्चतर व किफायतशीर धंदा मिळाला म्हणून संतोष मानतात, तसाच अभिमान व संतोष त्रैवर्णिकांची वेठबिगार करण्यांत त्या कालच्या अर्धरानटी शूद्रांना वाटे.” बिचा-या महारामांगांनो ! खरेंच कां अझुनी तुम्ही इतके नादान आहांत !! आजकालच्या महारामांगांच्या सात्त्विक महत्त्वाकांक्षा ज्या राजवाड्यांना दिसत नाहींत, त्यांनीं वेद कालच्या “शूद्र” नांवाच्या बाणेदार राष्ट्राचा उकिरडा कां फुंकावा हें गूढ आम्हांला कळत नाहीं. पान १४० वर त्यांनीं वैश्यांचीहि अशीच नाहक कुरापत काढली आहे.
ते म्हणतात, वैश्य हे “स्वास्थ्याच्या काळांत ब्रह्मक्षत्रियांहून जास्त पटाईत असत; परंतु डावपेंचाच्या व ठोकाठोकीच्या कामांत पंगू असत. ह्या पंगू पण द्रव्योत्पादक टोळीला ब्रह्मक्षत्रियांनीं विश हें नांव ठेविलें, परंतु त्यांचें मूळ नांव पणी असावें, व हे पश्चिमेकडील पणी लोकांचें - ज्यांना आधुनिक युरोपिअन लोक फिनीशिअन्स व प्राचीन रोमन प्यूनिक म्हणतात - सवंश असावेत, किंवा पूर्वेकडील पीतवर्ण चिनी लोकांशीं वंशसंबद्ध असावेत.” पण ही सर्व मीमांसा वैश्यांना पंगू म्हटल्याशिवाय राजवाड्यांना करतां आली नसती काय? पंगूंत पंगू जात ब्राह्मणांची; पण तीच आज, ज्या जातींत पूर्वीं हर्षवर्धनासारखे सम्राट् निपजले तिला म्हणते पंगू! ‘लंगडं तें लंगडं, पण गांवदरीला बी चरत न्है’ अशी एक कुणब्यांत म्हण आहे, ती राजवाड्यांना लागू पडते. पणी शब्दावर जी त्यांनीं व्युत्पत्तीची कोटी लढविली आहे तीहि अशीच लंगडी दिसते. कारण पृथु नांवाचें प्राचीन राष्ट्र भारतीय युद्धाच्या पुष्कळ पूर्वीं हिंदुस्थानच्या सरहद्दीवर होतें. त्याचें मूळचें नांव पर्णी असें होतें, असें प्राचीन रोमन इतिहासकार स्ट्रॅबो ह्याचें म्हणणें आहे. ह्यावरून पणी हे फिनिशिअन्स किंवा पंगू वैश्य नसून पृथु, पार्थव, अथवा पल्लव नांवाचे शूर क्षत्रिय वर्णाचें व बहुतकरून आर्यवंशाचें एक राष्ट्र होतें; इतकेंच नव्हे तर त्या पर्णी अथवा पल्लवांनीं, रोमन लोकांच्या ज्या स्वा-यावर स्वा-या ख्रिस्ती शकापूर्वीं इराणावर झाल्या त्या मागें हटवून सुमारें ५०० वर्षेंपर्यंत भूमध्य समुद्रापासून तों पंजाबापर्यंत एक मोठें साम्राज्य चालविलें. त्याच पल्लवांशीं मराठ्यांचें अतिसाम्य आहे हें मागील अंकांत सांगितलेंच आहे. त्याचा विस्तार करण्यास येथें स्थळ नाहीं. पुढें केव्हांतरी ह्या साम्याचा विस्तारपूर्वक विचार करूं.
थोडक्यांत समारोप करावयाचा झाल्यास राजवाड्यांना कोणाचेंच बरें पाहावत नाहीं असें दिसतें ! दुर्योधनाप्रमाणें त्यांना स्वतःशिवाय सर्व जग वाईटच दिसत असावें काय? जातीनें जरी ते ब्राह्मण म्हणवितात तरी ज्याच्या त्याच्यावर ते आपली लाठी उगारल्याशिवाय संशोधनाचें (?) एक पाऊलहि टाकण्याची त्यांची पात्रता दिसत नाहीं. शठं प्रति लाठ्यं हा क्षत्रियांचा गुण. जैन बौद्धांनीं तोहि टाकून दिला. पण निरुपद्रवी किंबहुना निराश्रितांवरहि राजवाड्यांची लाठी चालते; मात्र ते ब्राह्मण व त्यांतल्या त्यांत चित्पावन नसावेत इतकेंच त्यांचें पाहणें असतें! हा कसला गुण अथवा कोणता वर्ण !! अतिशूद्रालाहि हा गुण साधणें कठीण !! ह्या उर्मटपणालाच राजवाडेसाहेब राष्ट्रीयपणा असें समजत असावेत. नाहीं तर ब्राह्मणापेक्षां वैश्य पंगू असें त्यांना कां वाटलें असतें? राष्ट्रीयपणाचें हें एक विशिष्ट लक्षण अशी गैरसमजूत विशेषतः महाराष्ट्रांत अलीकडे पसरूं लागली आहे. हा लाठी-प्रयोग निदान राधामाधवविलासचंपूंत तरी नसेल असें आम्हांस वाटलें होतें; पण विपरीत प्रकार येथेंहि दिसल्यामुळें आम्हांला टीकेची लाठी उचलावी लागली, ह्याबद्दल आम्ही दिलगीर आहों. ब्राह्मण येथून तेथून सर्वच वाईट असें कोणीहि ब्राह्मणेतरांनीं म्हणूं नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. पण राजवाड्यांसारख्यापुढें आमचा नाइलाज होतो. चित्पावनांतहि भूषणभूत रत्नें गेल्या पिढींत झालीं; पुढें होतील. प्रागतिक म्हणजे केवळ पोटार्थी नव्हे हें आगरकरांनींच आपल्या त्यागानें दाखविलें; राष्ट्रीय म्हणजे उर्मट नव्हे हें गोखल्यांनीं आपल्या विनयानें शिकविलें; फार काय पण संशोधक म्हणजे केवळ उकिरडा उकरणारा नव्हे, हें श्री. चिं. वि. वैद्य अद्यापि आपल्या जबाबदार परिश्रमानें सिद्ध करीत आहेत. पण असे अपवाद थोडे. उलट ब्राह्मण म्हणविणा-यांत चहूंकडे “वाचि वीर्यंद्विजानो” ऊर्फ लाठीप्रयोगाचाच सुकाळ झाल्यानें त्या संसर्गामुळें राजवाड्यांच्या लेखणीनें दोन हजार वर्षांपासून इतिहासांत प्रसिद्ध झालेल्या मराठ्यांवर अराष्ट्रीयत्वाचा वार केला ना ! आणि तोहि शहाजी शिवाजीच्या नांवानें ! अर्वाचीन मराठ्यांवरचा राग त्यांनीं गौतम, महावीर इत्यादि प्राचीन क्षत्रिय आचार्यांवर काढून, त्यांच्या प्रचारकांची गणना सोंगाड्या संन्याशांत तरी निदान इतक्या उद्दामपणानें करावयाला नको होती. समजा, एखाद्या जैनाला राग येऊन, त्यांनीं राजवाड्यांना ‘हिजडे संशोधक’ म्हटलें तर त्यांना व त्यांच्या जातभाईंना तें आवडले काय?
विक्षिप्तपणा, उर्मटपणा, एकपक्षीयता इत्यादि विक्षोभकारी दुर्गुण नसते तर राजवाड्यांच्या लेखणीचा आजकाल होत आहे त्यापेक्षां किती तरी पटींनीं जास्त गौरव झाला असता. संशोधनाच्या कामीं त्यांनीं जी दगदग सोशिली आहे व जी सेवा बजावली आहे तीहून जास्त फारच थोड्यांनीं बजावली असेल, हें आम्हीं त्यांना प्रत्यक्ष पाहिलें नाहीं तरी त्यांच्या परिश्रमावरून म्हणूं शकतों. प्रस्तुत ग्रंथांतहि त्यांनीं जी वर्णनीय तडफ दाखविली आहे, तिचेबद्दल आम्हीं त्यांचें अभिनंदन प्रथमच केलें आहे. पुढल्या पिढ्यांनीं त्यांना कलमबहाद्दर म्हणून आठवावें; हा कोणी एक कलमकसाई होता असें हिणवूं नये, एवढीच आमची इच्छा आहे, आणि ह्या इच्छेनेंच त्यांच्या लेखणीच्या वारांनीं ज्या कोणा मुक्या-पांगुळ्यांना जखमा झाल्या असतील त्यांची आम्ही ह्या टीकेच्या मिषानें शुश्रूषा केला आहे. “आर्तत्राणाय वः शस्त्रं न प्रहर्तु मनागसि” इतकें सुचवून राजवाड्यांची आम्ही रजा घेतों.