“प्रिपॉनंट नांवाचे सरकारी धर्मोपदेशक केव्हां केव्हां दोनशें तीनशें अर्भकांना व लहान मुलांना आपल्या जिल्ह्यांतील दौ-यांवर बाप्तिस्मा देत असत व वाटेनें जाणा-या कोणाहि वाटसरांना स्पॉन्सर्स किंवा गॉडफादर्स म्हणून घेत असत. ह्या दत्तक पित्यांना ख्रिस्ती धर्माची कसली गंधवार्ताहि नसे. ह्या प्रांतांतील बहुतेक सर्व बौद्ध भिक्षूंवर, त्यांच्या लहानपणीं ह्या नाटकी बाप्तिस्म्याचा प्रयोग घडलेला असे.” (हा प्रयोग अलीकडच्या बॉया स्काउट्स व गर्लगाईड्सप्रमाणेंच करण्यांत येत असे म्हणावयाचें.) “मूर्तिपूजेसंबंधानें ब्रिटिश सरकारचें धोरण डच सरकारच्या अगदीं उलट असे. डच ही पूजा उखडून टाकीत तर ब्रिटिश प्रथम तिची गय करीत व पुढें तिला पाठिंबा देत असत... सन १८१५ त जेव्हां कँडीचें राज्य ब्रिटिश सत्तेखालीं आलें तेव्हां असें उघड धोरण जाहीर करण्यात आलें कीं बुद्धाचा धर्म हा अभंग आहे. त्याचे विधी-संस्कार, आचार्य, व देवस्थानें हीं सरकारी खर्चानें संरक्षिलीं जातील.” History of Missions by Rev. W. Brown Vol. I Page 17-18. मौंटस्टुअर्ट एलफिन्स्टननें आपल्या Rise of the British Power in the East ह्या पुस्तकांत म्हटलें आहे कीं, “पूर्वखंडांत पोर्तुगीज, डच, फ्रेंच राष्ट्रांच्या प्रसाराला अखेरीस मागें टाकून इंग्रजानेंच सर्वांवर जय मिळविला, तो त्या सर्वांच्या अपात्रतेमुळें व ब्रिटिशांच्या पात्रतेमुळें.” ती पात्रता म्हणजे ही संधिसाधुपणाचीच अपूर्व कारागिरी होय ! असो.
सन १७७३ पर्यंत चांचे, लुटारू, ह्यांच्यांशीं व्यापारी मंडळ्यांनीं सहकार्य करून व नंतर चांच्यांना बंदोबस्त झाल्यावर ख्रिस्ती धर्मप्रचारकांशीं लागेबांधे राखून, ब्रिटिश मुत्सद्द्यांनीं पूर्वखंडांत विशेषतः ह्या भरतभूमींत विश्वधर्मघटनेचा पाया जाणून किंवा नेणून घातला आहे. कोणी म्हणेल, धर्मघटनेच्या पवित्र कार्यांत चांचे, भामटे, संधिसाधूंचा संपर्क कां लावतां? “लंडे गुंडे हिरसे तट्टू ह्यांची संगत धरूं नको” असें लावणीकार सांगोत बिचारे. पण इतिहासकाराला असें सोंवळें नेसून चालावयाचें नाहीं. त्याला सगळ्यांचाच परामर्श घ्यावा लागतो. प्लांटेन नांवाच्या समुद्रावरील एका वाटमा-यानें तर मादागास्कर बेटावर आपली राजरोस वसाहत स्थापिली होती. त्याचीं सात आठ लढाऊ गलबतें होतीं. सन १७१९ मध्यें तर त्यानें मलबार किना-यावर हल्ला चढवून, गोव्याचा व्हाइसरॉय त्या वेळीं स्वदेशीं परत जात असतां त्याला गिरफदार केलें; व कंपनीच्या जहाजांना पिटाळून लावलें. शेवटीं त्याचा बंदोबस्त झाल्यावर तो मराठा सरदार आंग्रे ह्यांच्या आश्रयाला राहिला पण त्यानें आपला सनातन धंदा सोडला नाहीं. (एलफिन्स्टन : सदर पान ७५ भाग २) ह्या प्लँटन गुंडापासून, सुधारक लॉर्ड बेंटिकपर्यंत, सिरामपूरच्या ख्रिस्ती प्रचारापासून तों ब्राह्मसमाज, रामकृष्ण मिशनच्या वगैरे थोर पुरुषांपर्यंत सर्वांनींच धर्मक्रांतीची तळी उचलण्याला आपापल्या परीनें हात लावला आहे. मग पक्षपात कां?
विश्वधर्माचें जगड्व्याल सत्कार्य, आदर्शवादी साधुसंत आणि वास्तववादी मोठे मोठे जग जिंकणारे अलकंदर, चेंगिजखान इ. आणि त्यांचे गुंड भैरव ह्या सर्वांच्याच कृतीचें फळ आहे. जीवनशास्त्रांत नानाप्रकारच्या वनस्पतींचे फुलाफळांच्या गर्भाधान संस्कारांत जीवित पराग वाहून नेण्याचें कार्य म्हशीचे केस, डुकराचे दांत, भुंग्याचे पाय, हरिणाचीं शिंगें हीं बिनबोभाट करीत असतात. मोठ्या राजसूययज्ञांत महान् अध्वर्यु व ऋग्विजांबरोबर, समिधा आणण्याचे काबाडकष्ट कोळ्या कातक-यांवर पडतात. एकादा व्हाइसरॉय एकाद्या मोठ्या संस्थानिकाकडे पाहुणा आला तर शिकारीच्या सोहोळ्यांत रान तोडणारे व हांके ह्यांची कामगिरी विसरून चालत नाहीं. तसेंच विश्वधर्माचे निरीक्षणांत इतिहासकाराला गीतेंत सांगितलेली समदृष्टि ठेवावी लागते. ह्या दृष्टीनेंच पुनः आपली सांखळी ओढूं या.
सन १७७३ च्या रेग्युलेशन ऍक्टमुळें बेबंदशाही मिटून सुरळीत राज्ययंत्र चाललें. सन १७८३ त हिंदुस्थानांतील रणभूमीवर फ्रेंचांचा कायमचा पाडाव होऊन ब्रिटिश अजातशत्रू झाले. ह्या दुस-या कोणी युरोपियनचा त्यांना हेवादावा उरला नाहीं असें व्हर्सायच्या तहानें ठरलें. पुढच्या लढाया ब्रिटिशांना हिंदुस्थानांतल्या राजवटीशींच निर्वेधपणें करावयाला वेळ मिळाला इतकेंच नव्हे, तर हिंदुस्थानांतील राज्यकारभार-यंत्र नवीन घडवून समाजरचनेंत पुनर्घटना करावयाला अपूर्व संधि मिळाली म्हणून हा संधिकाळ महत्त्वाचा ठरतो. ह्या कामीं राममोहनाचें अवतारकार्य सुरू झालें. तें ३० वर्षें चाललें. हे सन १८०३ मध्यें सरकारी नोकरी सोडून स्वतंत्र सार्वजनिक सेवा करून ब्रिटिशसत्तेशीं विधायक सहकार्य करूं लागले. ते १८३३ मध्यें इंग्लंडांत ब्रिस्टल शहरीं वारले. ह्या अवतारकार्याचा तपशील सांगण्याचें हें स्थळ नव्हे व वेळहि नाहीं. ह्या पुढचा टप्पा १८३३ पासून सन १८५८ पर्यंतचा २५ वर्षांचा काळ, देवेंद्रनाथ ठाकूरचा होय. तोहि लवकरच नजरेवेगळा केला पाहिजे. राममोहनानें ब्राह्मसमाजाचा नुसता पाया रेखाटला. ठाकूर महर्षीनें त्यांत रंग भरून ओटाहि भरून काढला. बेंटिकनें समाजसुधारणा केली. मेकॉलेनें शिक्षणाचे आराखडे बांधले; आणि डलहौसीनें बहुतेक सर्व एतद्देशीय रियासतीवर वरवंटा फिरवून भरतभूमींत ब्रिटिशसत्ता जवळ जवळ एकजिनशी केली ह्यानंतर विकास नाटकाचा पडदा पाडून थोडा वेळ १८५७ च्या बंडाची नाट्यछटा दाखविण्यांत आली. पुनः पडदा उघडला, तों अकस्मात आमचे चरित्रनायक ब्रह्मानंद केशवचंद्र सेन सज्ज होऊन पुढें उभे राहतात.
केशवचा काळ १८५८ पासून १८८३ अखेर अवघा २५ वर्षांचा आहे. कोठें धर्मविकासाचें अनंत कार्य ! कोठें केशवचंद्रांचीं हीं २५ वर्षे ! गेल्या ५ शतकांतील कार्यांत केशव लहानगा भासतो. इ. स. १५५६ सालीं जिनीवाहूनहि पहिलें प्रॉटेस्टंट स्विस मिशन ब्राझिल देशास निघालें म्हणून वर सांगितलेंच आहे. त्याचवर्षीं हिंदुस्थानच्या सरहद्दीवर महात्मा अकबर जन्मला. पूर्व व पश्चिमेला जोडणारा तो एका दिव्य सांखळीचा अपूर्व दुवाच होता. अबुल फजल ह्या विद्वान मित्राच्या साहाय्यानें अकबरानें ह्या आधुनिक काळांत धर्माला पहिला उजाळा दिला. केशवच्या प्रवर्तक (Apostalic) दरबाराप्रमाणें अकबर हा हिंदु, मुसलमान, पार्शी, ख्रिस्ती, बौद्ध, यहुदी वगैरे सर्व तज्ञांची दर शुक्रवारीं एक उलेमा भरवीत असे. त्यानें विश्वधर्माची एक प्रत्यक्ष स्थापनाच केली (दिने इलाही). पण ती टिकली नाहीं. भयंकर प्रतिक्रिया मात्र घडली. अबुल फजलच मारला गेला. औरंगजेबाच्या हट्टाग्रहानें १५० वर्षांचें मोंगलांचें राज्यहि धुळीस मिळालें. त्या धुळींतून ब्रिटिशांची सत्ता उभी राहिली. पुनः पूर्व आणि पश्चिमेचें संघर्षण कितीतरी मोठ्या प्रमाणावर चालू झालें. त्यांतून राममोहनाचें सर्वधर्मसमन्वयाचें कार्य नांवारूपास आलें. ब्राह्मसमाज १८२८ मध्यें उघडला जाऊन प्रसिद्ध ट्रस्ट-डीड १८३० त प्रथम मंदिरप्रवेशाचे वेळीं घोषित झालें. राममोहनाचा अस्सल वारसा केशवचंद्रानें १८५८ मध्यें उचलला.
राममहोन राय महापंडित होता, तसाच शतक्रतूहि होता. सर्व कांहीं होता, पण त्याला वेळ पुरला नाहीं. अकालीं वारला. केशवचंद्र पंडित नव्हता. त्याचें बळ प्रेरणा व प्रार्थना ह्यांतच होतें. तेंच खरें धार्मिक बळ. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे केशव म्हणून एक प्रेरणेचा ज्वालामुखी पर्वतच होऊन गेला. तो २५ वर्षें टिकला हीच मोठी गोष्ट. जेथें ख्रिस्त ३ वर्षांत पडद्याआड झाला, तेथें केशव २५ वर्षें काळोखाशीं झगडत होता. ह्याचें कारण काळ त्याला अनुकूल होता. विश्वधर्माचा बार भरून तयार होता. केशवनें नुसती यशस्वी गोलंदाजी केली. प्रेरणा जें एका क्षणार्धांत व प्रार्थना ५ मिनिटांत चमत्कार घडविते तें शब्दपांडित्य आणि बाह्यघटना संबंध १०० वर्षांतहि घडवूं शकत नाहीं हें ब्राह्मसमाजाच्या इतिहासावरून उघड होतें.
केशवनें कल्पिलेला धर्मसंघ अदृश्य होता. (Invisible Church). ह्या अदृश्य संघावर त्याची अमोघ इंग्रजी वैजयंती वाहूं लागली, म्हणजे दृश्य संघाचे डोळ्यापुढें तारे चमकूं लागत ! तरुणांची, वृद्धांची, स्त्रियांची, मुलांची, मित्रांची, शत्रूंची त्याच्या वाकयज्ञांत आहुति होत असे. महर्षी देवेंद्रनाथ ठाकूरचें व केशवचें फार दिवस पटण्यासारखें नव्हतें. त्यांचें कोणाशीं पटलें? शेवटीं त्यानें १८५६ त स्वतंत्र भारतवर्षीय ब्राह्मसमाज काढला. त्याच्यापेक्षां कितीतरी मोठा, बुद्धीचा खंदक राजा राममोहन राय ३० वर्षें सारखा शोध, युक्तिवाद आणि आर्जव करून मस्तिष्क रोगानें वारला. उलट केशवानें हुकूम करावा, इतरांनीं ऐकावें हा क्रम होता, तोंपर्यंत ब्राह्मसमाजाची ऊर्फ दृढ विश्वधर्माची स्थापना व वाढ झाली. जेव्हां हा क्रम ढिला पडला तेव्हां सर्वच जणूं थंडावलें. त्याच्या चरित्राच्या शेवटीं “नवविधान” संघाची घोषणा झाली (१८७७). पण त्याचें कार्य अगोदरच संपलें होतें. असलें कार्य कधीं रेंगाळत नाहीं.
राममोहनाच्या महत्कार्याचीं दोन मुख्य अंगें होतीं. पहिलें धर्मसमन्वय, दुसरें भारतीय लोकसमाजाची पुनर्घटना. दोन्हीला केशवनें स्पष्ट मूर्त स्वरूप दिलें. पहिल्याचें कार्य वरिष्ठ वर्गांत अद्याप चाललें आहे. दुस-याचा परिणाम बहुजनसमाजावर घडत आहे. ह्यांतच केशवाचें वैशिष्ट्य आहे. केशवचाच वारस हल्लीं महात्मा गांधीकडे आला आहे. त्याच्या ब्राह्मसमाजाला काँग्रेस हें नांव पडलें आहे.
भरतभूमि ही पुरातन काळापासून सर्व जाणत्या जगाची आध्यात्मिक माता होऊन राहिली आहे. १५ व्या शतकापासून जडवादी पाश्चात्य जगाचें लक्ष ह्या पुण्यभूमीकडे लागलें. राममोहन राय व केशवचंद्र आणि त्याचे अनुयायी प्रतापचंद्र मुजुमदार व वेवेकानंद वगैरे जे इंग्लंड-अमेरिकेला गेले. तें शिकण्यासाठीं नसून शिकविण्यासाठींच गेले असें म्हणण्यांत कांहीं आत्मश्लाघा नाहीं. त्यांचें स्वागत त्याच थाटानें झालेंहि. राममोहन रायला ब्रिटिश पार्लमेंटमध्यें (Ambassador) पौरस्त्य प्रतिनिधीची खुर्ची मिळाली. केशवचा सत्कार डॉ. मार्टिनो, मेक्समूलर, जॉन स्टुअर्ट मिल, फ्रॅन्सिस न्यूमन, प्रधान ग्लॅडस्टन, मिस मेरी कार्पेंटर व प्रत्यक्ष महाराणी व्हिक्टोरिया ह्यांनीं केला. तरी पण तो गर्वानें फुगून गेला नाहीं. तो मनानें दीनच होता. वरून तो हुकूमशहा दिसत होता तरी, अंतरांत फार लाजाळू होता. ह्यामुळेंच त्याची छाप वरिष्ठ वर्गावर तशीच जनतेवरहि पडली. त्यामुळें धर्मसमन्वयाचे धडे त्यानें भारतीय उच्च वर्णीयांना, पाश्चात्य पंडितांना व धर्माधिका-यांनाहि दिले. हें प्रो. मॅक्समूलरसारख्या जगविख्यात पंडितानेंहि कबूल केलें आहे. राममोहन हा तुलनात्मक धर्माध्ययनाचा आद्य प्रवर्तक अशी ज्यांनीं घोषणा केली त्या मॅक्समूलरनेंच पाश्चात्य विद्यालयांतून ह्या शास्त्राची पुढें पूर्तता केली.
जी गोष्ट मॅक्समूलरनें विद्यालयाच्या ध्येयांत केली ती केशवानें लौकिक पूजेंत व सहानुभूतींत केली. त्याला त्यानें “नवविधान” हें नांव ठेविलें.
असा दिग्विजय संपादून सन १८७१ सालीं केशवचंद्र विलायतेहून परत आल्यावर आपलें दुसरें कार्य जनता संपर्काचें (Mass Contact) त्यानें मोठ्या धडाडीनें सुरू केलें. धर्मविषयाला ही नवीनच कलाटणी मिळाली म्हणावयाची. स्वस्त वाङ्मय, स्त्रीविमोचन, लौकिक शिक्षण, मद्यपानबंदी व अपंगांची सेवा ह्या पंचसूत्री समाजसुधारणेचा पाया घातला. त्यावरच भावी राष्ट्रीय सुधारणेची इमारत आतां दिसत आहे. ह्यांत हिंदुस्थानचे व्हाइसरॉयसारखे बडे अधिकारीहि त्याचें सहकार्य मागत असत व स्वतः देत असत. ब्राह्मसमाज म्हणजे केवळ डोळे मिटून प्रार्थना करणारी मंडळी नव्हे, हें राममोहनापासून नुकतेच दिवंगत झालेल्या श्री. कृष्णकुमार मित्रापर्यंत प्रत्येक ब्राह्मानें सिद्ध केलें आहे. हें सर्व कशानें झालें? धर्माचीं दोन अंगें, अंतःसाधन व बाह्यसेवा ह्या दोन्हीला केशवानें आपल्या आयुष्याचें सर्वस्वी अर्पण केलें होतें. उरी ठेवली नव्हती. अनासक्तीनें प्रपंच त्यानें केला, तो धर्मसाधनासाठीं समाजोन्नतीसाठीं केला. शेवटचा काळ जरी शारीरिक व मानसिक क्लेशांत गेला तरी सन १८८४ च्या जानेवारी ८ तारखेस त्यांचा जो अंत झाला तो अकालीं निधन मात्र म्हणतां येत नाहीं ! त्याचें कार्य संपलें होतें. पुढें मनूहि पालटला.