गुप्तांच्यानंतर उत्तरेकडे इ. स. ७ व्या शतकाचे आरंभीं हर्ष वर्धनाचें आणि दक्षिणेकडे चालुक्यांचें अशीं साम्राज्यें झालीं. हीं दोन्हीं घराणीं शैव होतीं, तरी बौद्ध आश्रय त्यांनीं बंद केला नाहीं. तथापि प्रथम शैवांचा आणि मागाहून वैष्णवांचा हल्ला दक्षिणेकडे व प्रथम वैष्णवांचा आणि मागाहून शैवांचा हल्ला उत्तरेकडे होऊं लागल्यामुळें जैन व बौद्ध धर्मांचा पाय एकसारखा मागेंच पडूं लागला. ह्या झटापटींत कोणाचा कसा काय जय झाला, हें ठरविणें कठीण आहे. बौद्धांनीं वैदिक धर्माला हुसकावून लावलें, पण ब्राह्मणांनीं मंदिरें, मूर्ति, तंत्रें, ध्यानें, उत्सव, पुराणें व तीर्थस्थळें इत्यादि बौद्धांच्याच सर्व साधनसामग्रीची हळूहळू आणि बेमालूमपणानें नक्कल करून त्यांचेंच सर्वस्व बळकावून त्यांना वाटेला लावलें; आणि अशा चातुर्यानें नवीन राजांच्या आश्रयाखालीं आपल्या शैव व वैष्णव संप्रदायांची उभारणी केली. “वैदिक देवतांना न मानणा-या व त्यांची पूजा न करणा-या लोकांची मनधरणी करण्यासाठीं नवीन दैवतकल्पनांना अनुसरून ब्राह्मणांना आपलें वाङ्मयच फिरवावें लागलें. जुन्या गोष्टींस नव्या कल्पनांना पटेल असलें काव्यमयरूप देण्याच्या भरांत ऐतिहासिक दृष्टि नष्ट झाली. ब्राह्मणांनीं यज्ञकार्याचें नेतृत्व टाकून देऊन लोकांच्या कल्पनांना काव्यमयरूप देण्याचें पतकरलें. त्यांच्या देवाचे जेव्हां त्यांनीं पोवाडे गाण्यास सुरुवात केली, तेव्हांच त्यांना आपलें वर्चस्व राखतां आलें.” (ज्ञानकोश विभाग ४ पान १८८) इंद्र, चंद्र, सूर्य, वरुण इ. वैदिक देवांच्या आराधना बंद पडून त्यांच्या जागीं शिव, विष्णु, देवी, गणपति इ. लौकिक देवतांचे देव्हारे पसरून त्यांचीं पुराणें ब्राह्मणांना रचावीं लागलीं. वेदमंत्र व यज्ञयाग मागें पडून तांत्रिक मूर्तिपूजा माजली. गोमांस खाणारे व सोमरस पिणारे ब्राह्मण आतां कांदे-लसणासहि शिवेनातसे झाले. महायान बौद्धांचा धर्मपाल तोच शैव हिंदूंचा नटराजा, प्रज्ञापारमिता ती सरस्वती, मंजुश्री ती शीतला, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे वैष्णवांचे चार व्यूह ते बौद्धांचे ध्यानीबुद्ध वगैरे देवाणघेवाण होऊन, शैव, बौद्ध आणि वैष्णवांच्या उपास्य दैवतांची परस्पर सारखी सरमिसळ चालली होती. ह्या दंगलींत कोण जिंकला व कोण हरला हें ठरविणारानें कसें ठरवावें? जो आपलें रूप अधिक वेळां व अधिक लवकर पालटील, जनमनाचें अधिक रंजन करील, वेळोवेळीं बदलणा-या राजसत्तेचा रंग ओळखून उगवत्या सूर्याची उपासना नेहमीं करीत राहील, त्याला जय हा ठेवल्यासारखाच असतो! पण असल्या जयाचा धर्माच्या शुद्ध स्वरूपाशीं आणि त्याच्या ख-या विकासाशीं कसा संबंध पोंचतो, हें शोधून काढून त्याचा खरा अर्थ करणें, इतिहासकारांना फार जड जातें.