महाराष्ट्र भागवत धर्माचा खरा संस्थापक कोण ? ह्या प्रश्नाचा निर्णय करण्याइतके निश्चित पुरावे हल्लीं उपलब्ध नाहींत. नामदेवानें किंवा ज्ञानदेवानें, किंवा दोघांनीं मिळूनच हें कार्य केलें असावें. पुराव्याच्या अभावीं शेवटचेंच अनुमान तूर्त आम्हांला स्वीकारावें लागतें. “ज्ञानदेवें घातला पाया तुका झाला कळस” ही भाविक उक्ति वारक-यांमध्यें प्रसिद्ध आहे. तरी पण महीपतिबाबांनीं आपल्या भक्तिविजय ग्रंथात १० व्या अध्यायांत, हा पाया कोणीं घातला, याविषयीं चांगला खुलासा केला आहे. ज्ञानदेव हे तीर्थयात्रेस निघण्यापूर्वीं पंढरपुरास येऊन देवाजवळ नामदेवास आपल्याबरोबर पाठविण्यास विनवीत आहेत. पण नामदेवाला आपल्याजवळून दूर पाठविण्यास देव नाखुष आहेत. अर्थात् देवाला ज्ञानदेवापेक्षां नामदेव अधिक प्रिय दिसतात. चुकविण्यासाठीं देव ज्ञानदेवाला विचारतात कीं, त्यांच्यासारख्या ज्ञान्याला तीर्थयात्रेची काय जरुरी ? देव विचारतात :- “तेवी ज्ञानदेवा तुजकारणें । कासया पाहिजे तीर्थाटन । वायां विचार करूनिया मनें । व्यर्थ कासया हिंडशी ।। येरू (ज्ञानदेव) म्हणे जी सत्यसत्य । तुम्ही सांगतां यथार्थ । परी नामया ऐसा प्रेमळ भक्त । घडवी संगत मज याची ।।३९।। याचे संगतीचें घेऊन सुख । देहाचें करावें सार्थक । ऐसें म्हणोनि चरणीं मस्तक । ठेविला देख निजप्रीति ।।४०।।” एकूण संस्थापनेची कल्पना जरी ज्ञानदेवांनीं काढली हें खरें धरिलें तरी नामदेवाशिवाय ख-या घटनेचें कार्य ज्ञानदेवाकडून होणें दुरापास्त होतें. ज्ञानदेव पंडीत होता, भक्त नव्हता. शिवाय संन्याशाचा मुलगा असल्यानें ब्राह्मणांवरहि त्याचें वजन नव्हतें, तर बहुजनसमाजावर कोठलें येईल ? ज्ञानेश्वरी जरी गीतेवर टीका होती तरी मूळ संस्कृतापेक्षांहि ही मराठी अधिकच दुर्बोध झाली होती. पुढें तिचा एकनाथानें जीर्णोद्धार करीतोंपर्यत ती अप्रसिद्धच होती. शिवाय ती टीका अद्वैतपर होती; म्हणून व्यासाला ज्याप्रमाणें वेद आणि पुराणें संपादन करून जडत्व आल्यामुळें भागवत लिहूनच भक्तिमार्गानें आपले मनाची शांति करावी लागली, तद्वतच ज्ञानदेवालाहि नामदेवाच्या भक्तिमार्गानेंच आपल्या
‘ देहाचें सार्थक’ शोधावें लागलें, असें महीपति म्हणतो. नामदेव हा भक्त आणि कीर्तनकारहि होता. त्याला मराठी, हिंदी आणि कांहिंसें कानडीहि येत होतें. पण पंडीत नव्हता, तरी ज्ञानदेवापेक्षां कर्ता पुरुष होता. कारण पूर्वाश्रमीं तो प्रसिद्ध आणि यशस्वी लुटारू होता, असा एका अभंगरूपानें, त्याचाच कबुलीजबाब आहे. त्या वेळच्या राजानें ( रामदेवराव यादव ) त्याच्यावर पाठविलेल्या ८४ स्वारांची त्यानें कत्तल केली होती, हें त्याचेंच म्हणणें खरें असेल तर तो पूर्वाश्रमीं एक यशस्वी पुंड पाळेगार होता. ज्ञानदेव आणि नामदेव हे दोघेहि धर्मानें गोरखनाथपंथी शैव होते. पण महाराष्ट्रांत शैव-वैष्णवांचा कधींहि फारसा विरोध नव्हता. भागवत धर्माची घटना ह्या दोघांना जाणूनबुजून करावयाची होती, म्हणून त्यांनीं पंढरीचा वारकरीपंथ स्थापन केला असावा; आणि ह्या कामीं कदाचित् त्यांना देवगिरीच्या राजसत्तेचा आश्रय असावा, अशी जबर शंका येते. कारण ज्ञानदेव आणि नामदेव ह्यांनी ह्या नवीन पंथाच्या घटनेसाठीं हिंदुस्थानभर जी यात्रा केली त्या सुप्रसिद्ध यात्रेंत परसा भागवत, चोखामेळा, सांवता माळी आणि विसोबा खेचर वगैरे संत पुरुष होते (भावेकृत महाराष्ट्र सारस्वत, पान १६४). ही यात्रा प्रथम काशीला न जातां दिल्ली येथील बादशहाकडे जाते, तेथें त्यांचा छळ होतो, नंतर पंजाबमध्यें प्रचार करून भावी शीख धर्माच्या उदयाला ही यात्रा कारण होते; मग पुढें काशीला जाते आणि बराच पल्ला मारून पुढें ओढिया नागनाथाच्या शैव देवळांत बळेंच वैष्णव धर्माचें संकीर्तन करिते; वगैरे ह्या दोघांची कांहीं गूढ कारवाई त्या वेळच्या संदिग्ध काळांतून अस्पष्ट दिसून येत आहे. ह्या कारवाईचा उलगडा वरील कोणत्या तरी राजाच्या आश्रयाशिवाय होणें सोपें नाहीं. ही यात्रा परत आल्यावर पंढरीच्या देवाला आनंद होतो, आणि त्या आनंदाच्या भरांत देव, नामदेव शिंपी आणि बहिष्कृत ज्ञानदेव आणि वरील यात्रेंत सामील झालेल्या इतर हीन जातींच्या भक्तांबरोबर एकाच पंक्तीस जेवून स्वतःची आणि पंढरीच्या ब्रह्मवृंदाची जात बाटवितो. ह्या ‘भ्रष्टाकाराचें’ इंगित काय ? पंढरीचें ठाणें पूर्वीं बौद्ध धर्माचें आणि नंतर शैव धर्माचें होतें. पांडुरंग हें नांव विष्णूचें नसून पूर्वीं शिवाचें होतें. अजून पंढरीस एक जुनें शिवालय आहे. प्रथम त्यांतील महादेवाचें दर्शन घेऊनच मग विठोबाच्या दर्शनाला जाण्याचा वारक-यांचा परिपाठ आहे (सर डॉ. भांडारकर V.& S. पान ८८). हा जो वारकरी पंथाचा दिग्विजय नामदेवाच्या प्रभावानें करण्यांत आला तो महाराष्ट्रांतील शैव धर्मावर किंवा बौद्ध धर्मावर ? राष्ट्रकूट घराणें कांहीं काळ बौद्ध आणि नंतर शैव होतें; आणि चालुक्यांचा विशेष कल शैव धर्माकडे आणि केव्हां केव्हां वैष्णवांकडेहि होता. आतां पंढरीस ठाणें दिलेल्या श्रीनामदेवाच्या आश्रयाखालीं आणि देवगिरीच्या यादवांच्या आश्रयाखालीं हा वैष्णवांचा उठाव करण्यांत आला असावा.