वाङ्मय

कानडी ही मराठीपेक्षां जवळ जवळ एक हजार वर्षें अधिक पूर्वींची भाषा असल्यानें तिचें वाङ्मयहि अधिक जुनें, विविध आणि अभिजात असणारच. आठव्या शतकांत नृपतुंग ऊर्फ अमोघवर्ष राष्ट्रकूट ह्याच्या वेळीं मराठी ही “महाराष्ट्री” च्या उदरातूंन वाङ्मयाच्या दृष्टीनें तर राहोच, पण बोलण्याच्या उपयोगी अशी भाषा, या दृष्टीनेंहि बाहेर स्वतंत्र रूपानें वावरत होती कीं नाहीं ह्याची शंका आहे. अशा वेळीं ह्याच नृपतुंगाच्या नांवावर कविराजमार्ग नांवाचा अलंकारशास्त्राचा ग्रंथ कानडींत प्रसिद्ध होता. चंपू नांवाचा काव्यप्रकार संस्कृतांत आढळण्यापूर्वीं कानडीनेंच तो प्रथम प्रचारांत आणला. दिगंबर पंथी धगधगीत वैराग्याच्या तापांतून बचावूनहि जैन कवींनीं शृंगारलीलावतीसारखीं काव्यें कानडींत रचल्यावर मग कोठें हजार-पांचशें वर्षांनीं रघुनाथ पंडितानें आपलें नलदमयंती-स्वयंवर हें शुद्ध शृंगाराचें पहिलें काव्य रचलें; आणि तोहि पण तंजावरकडचाच होता असें म्हणतात. अनुप्रास म्हणून शब्दालंकाराचें जें एक अंग आहे तें निर्माण करण्याचें सर्वस्वीं श्रेय कानडीलाच आहे असें सागंतात; आणि कानडींतला हा अनुप्रास पुढें मोरोपंतांनीं व रघुनाथपंतांनीं उचलला. इतकेंच नव्हे तर मध्ययुगीन संस्कृत वाग्देवीलाहि हा दक्षिण देशांत मिळालेला मणी आपल्या गळसरींत ओवण्यास कमीपणा वाटला नाहीं ! यक्षगान ह्यासारखीं कानडी नाटकें झाल्यावर किती तरी शतकांनीं पुढें अण्णा किर्लोस्कराला पहिलें नांव घेण्यासारखें संगीत नाटक रचण्याची प्रेरणा झाली. आणि तोहि बेळगांवकडचाच होता ! उत्तरेकडील व-हाडांत मराठींत नाट्य-संगीत अद्यापि नाहीं. कीर्तन ही संस्था अस्सल मराठी असावी अशी कित्येकांची फुशारकी आहे. पण अंपलवासी नांवाचे मलबारी कीर्तनकारांची स्तुती सेन्सस रिपोर्टांतूनसुद्धां अद्यापि दुमदुमत आहे.
वैष्णव-शैवांच्या भक्तिपंथाचा उदय प्रथम द्रविड देशांतच झाल्यानें तुटक पदांचा व ललितांचाहि बहर तिकडेच अगोदर झाला; नंतर कीर्तनाचा प्रचार इकडे आला. पुरंदर विठ्ठलानें कृष्णलीलेचा रस कानडींत जितका व जसा वठविला आहे तशी व तितकी करामत बिल्हणचरित्राचें मराठी कवितेंत भाषांतर करणा-या बीडकर विठ्ठलालाहि साधली नाहीं. पदें आणि लावण्यांसारख्या लौकिक काव्यांतहि कानडीचीच सरशी होती. नाहीं म्हणावयाला पोवाड्याची मात्र कानडींत उणीव भासते. कारण कर्नाटकांत अलीकडे बरींच शतकें स्वराज्याचा दुष्काळ गाजत आहे ! ज्ञानेश्वरापासून रघुनाथपंतापर्यंत मराठी कवींनीं शिकस्त करून वरील पारडें पालटलें. हल्लीं तरी वैनगंगेपासून तुंगभद्रेपर्यंत व पलीकडे क्वचित् कावेरीपर्यंतहि मराठी वाङ्मयाचा दरारा चालू आहे. पण ह्या सर्व भाषाक्रांतीचें आणि हल्लींच्या मराठीच्या वैभवाचें बरेंचसें श्रेय कानडीलाच आहे. चालुक्य आणि राष्ट्रकूट राजांचे पदरीं कित्येक कवि आणि पंडित कानडी व तेलगू ह्या दोनहि भाषांत प्रवीण असलेले राहत असत. तसेंच देवगिरीच्या यादवांचे पदरीं कानडी किंवा तेलगू आणि मराठी भाषेंत पारंगत असे पंडीत असले पाहिजेत. शहाजीचे पदरीं जयराम पंड्ये नांवाचा बारा भाषांची प्रौढी मिरवणारा कवि अशाच मासल्याचा होता. सातारच्या आणि तंजावरच्या भोसल्याच्या आश्रयानें मराठीची वाढ कानडीहून अधिक झाली. शेवटीं काव्यरसांत ज्या कानडीनें एकदां इतका मोठा कीर्तिरव गाजविला त्याच हतभागी कानडींत अलीकडे अशी एक अभद्र म्हण पडली आहे कीं, “आरी अरसु, हिंदुस्थानी सरसु, कन्नड बिरसु” म्हणजे मराठी मर्दानी, मुसलमानी सरस आणि कानडी ही राठ !
वयाच्या मानानें मराठी ही सर्वांत मागाहून जन्मलेली म्हणून सृष्टिक्रमानें ती शेवटची असावी. पण केवळ राजकारणाचे जोरावर तिनें हिंदुस्थानांत संख्येच्या मानानें आतां चौथा नंबर पटकाविला आहे. आणि अभिजात वाङ्मयाचे जोरावर तर तिचा आज दुसरा नंबर आहे. काव्याच्या, जुनेंपणाच्या व भाषेच्या इतिहासाच्या दृष्टीनें पाहतां, ज्ञानेश्वरीसारखा आभिजात ग्रंथ, पहिला नंबर पटकाविणा-या बंगालींत तरी आहे कीं नाहीं ह्याची मला निदान शंका आहे. जुन्या तामील कानडी भाषेंतील वाङ्मयाचा मात्र अद्यापि नीट शोध लागला नाहीं. तो जेव्हां पूर्णपणें लागेल तेव्हां भारतीय संस्कृतिविषयकच काय, पण मानववंशशास्त्रासंबंधीं हल्लींच्या कित्येक मतांत आमूलाग्र उलथापालथ होण्याचा बराच संभव आहे !