मराठे आणि पेशवे

मराठ्यांना साम्राज्याची कल्पना कोणीं दिली, ह्याची पंचाईत बंगाल्याला कशास पाहिजे ? ती मराठ्यांमध्यें स्वयंभू आहे. प्राचीन काळापासून त्या कल्पनेचा इतिहास राजपूत किंवा मराठा ह्या शब्दांतच संक्षेपानें लिहिला आहे. उत्तरेकडील अशोक-मौर्याप्रमाणें राष्ट्रकूट-चालुक्य-यादवांदिकांनीं दक्षिणेंतून दिल्ली कैक वेळां मुळासकट हालविली आहे. जुन्या गोष्टी राहूं द्या. आधुनिक साम्राज्याच्या कल्पनेचा बार शिसादे ऊर्फ भोसले घराण्यानें भरलें आहे. भट घराणें हीहि भोसले घराण्याची एक शाखा आहे. बाजीराव आणि नाना अशीं दोन अपत्यें असतांना भाग्यशाली शाहूमहाराजांना निपुत्रिक कोण म्हणेल ? ज्या विधीनें शाहूचीं औरस मुलें पाळण्यांतच मारलीं, त्यानेंच ह्या दोन मानसपुत्रांना त्यांच्या मांडीवर बसविलें. ब्राह्मणांस आनंद वाटावयास नको किंवा मराठ्यांना राग यावयाला नको. हिंदुस्थानांतील फार दिवसांच्या वर्णविषाचा विध्वंस करण्याची विधिनिर्मितच ही एक युक्ति होती. बाजीरावानें नुसत्या लढवय्येपणांत यश मिळविलें, पण कर्जाखालीं चिरडून मेला. नानासाहेब दीर्घसूत्री व हद्दीबाहेर कपटी होता. कपटाची सूतशेखरमात्रा तो रोज पसा पसा खाऊं लागला. स्वतःच्या भावाच्या कर्तबगारीवरही विश्वास नाहीं, असा हा ब्राह्मणी औरंगजेब आपल्या कपटाच्या थडग्यांत गुदमरून मेला. नादीरशहाच्या स्वारीचा कडू धडा शाहूला व बाजीरावाला मिळाला होता, तरी शाहूमहाराज मेल्याबरोबर ज्या नानाला दाही दिशा मोकळ्या झाल्या असतांहि त्यानें पुढील ११ वर्षें उत्तर हिंदुस्थानांतील मुलुखगि-यांत जाऊन भाग घेऊन पानिपतचें अरिष्ट टाळलें नाहीं, याबद्दल सरदेसायांनीं आपल्या पुस्तकांत फार दोष दिला आहे. पण ह्या दोषाची खरी मीमांसा करण्याचें धैर्य सरदेसायांस नाहीं, तर जदुनाथांत कोठून येईल ? ती मीमांसा हीच कीं, सर्व सत्ता तत्वदृष्ट्याच नव्हे तर तपशीलदृष्ट्याहि केवळ भट घराण्यांतच नव्हे तर खुद्द आपल्याच मुठींत नेहमीं दाबलेली रहावी, अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा नानास भोंवली. अबदाल्लीनें १७४८ पासून १७६१ पर्यंत दिल्लीवर अनेक स्वा-या केल्या. बादशहा मरणान्त वेदनेनें हृदय फोडणा-या किंकाळ्या कुमकेसाठीं फोडूं लागला, मल्हाररावाची लबाडी उघडकीस आली. महादजीशिवाय राणोजी-शिंद्यांचीं जयाप्पा दत्ताजी, शेवटीं जनकोजीचींही पुत्ररत्नें ह्या रणकुंडांत गडप झालीं; शिंदे होळकरांच्या पाळतीवर ठेविलेले स्वतः नानाचेच दिल्लींतील सरदार आणि वकील अनुक्रमें अंताजी माणकेश्वर आणि हिंगणे यांनीं अमूल्य संधी वांया दवडली जात आहे, ती न जावी म्हणून स्वतः नानानेंच यावें म्हणून निर्वाणीचीं पत्रें अनेक पाठविलीं. ह्या कामगिरीवर पाठविलेला रघुनाथराव पूर्ण नालायक ठरून त्याच्या दुहीमुळें शिंदे-होळकर प्रत्यक्ष शत्रु बनले आणि अखेरीस गोविंद बुंदेल्यांनींहि हात टेकले, तरी नाना पुणें आणि कोल्हापूरच्या दरम्यानच लुडबुडतो व अखेरीस पानिपतचें प्रायश्चित्त मिळाल्यावर पश्चात्ताप करण्यालाहि त्याला वेळ न मिळतां तो ऊर फुटून पर्वतीच्या टेकडीवर मरतो, ह्या सर्वांतलें इंगित काय ? तें सरदेसायांनीं किंवा जदुनाथांनीं इच्छा व धैर्य असल्यास सांगावें नाहींतर तोंड आपटावें. इंगित हेंच कीं, नानाचे अतिदीर्घसूत्री
कपट ! न जाणो येवढें अवाढव्य कपटजाळही केवळ साम्राज्य स्थापण्याच्याच सदिच्छेनें नाना आपल्या आत्म्याभोंवतीं गुरफटून घेतलें असेल म्हणून मी देखील ह्या ऐतिहासिक पुरुषाला दोष देत नाहीं. पण तो अपेशी झाला, येवढें तरी आजकालचे ब्राह्मण आणि त्याच्या पिंज-यांतले बंगाली साक्षीदार कबूल करतील काय ?
सरदेसायांची दृष्टि ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादानें विकृत झालेली नाहीं, हें त्यांच्या पुस्तकावरून स्पष्ट दिसत आहे, तरी ते आपल्या विचारसरणीच्या अगदीं अखेरपर्यंत न जातां मध्येंच कोठेंतरी मुक्काम करतात, ह्यांत किंचित धरसोडपणा दिसतो. असो. म. रियासतमध्यें भाग ३ पान ९३ वर सरदेसायांनीं खालील उद्गार अटकेवर झेंडा ह्या मथळ्याखालीं काढला आहे. कोणास वाटेल कीं, हा रघुनाथरावाविषयीं किंबहुना भट घराण्याविषयीं असावा, पण नाहीं. तो उद्गार असा : “सर्वस्व खर्चीं घालून राष्ट्रकार्य करण्याची खरी प्रवृत्ति त्या वेळीं एकट्या शिंद्याशिवाय दुस-या कोणत्याहि सरदाराचे ठिकाणीं राहिलेली दिसत नाहीं. म्हणूनच पुढील सर्व उद्योगाचा भार एकट्या शिंद्यावर पडला; आणि महादजीसारखा पराक्रमी पुरुष पानिपतच्या संकटांतून ईशदयेनें वांचला नसता, तर शिंद्यांचे ह्या उद्योगाचा व त्यांच्या घराण्याचा इतर कित्येक शूर घराण्याप्रमाणें मागमूसहि राहिला नसता.” जाड टाइप मीं एवढ्याचसाठीं घातला आहे, कीं हा ब्राह्मणांचा उद्गार बंगाल्याच्या डोळ्यांत भरावा म्हणून बाकी शिंद्यासारखीं आणखी किती तरी शूर पण इमानी मराठा, व ब्राह्मण घराणीं त्या वेळीं [कदाचित् आतांहि असतील] होतीं, हें सरदेसायांनीं कबूल केलेंच आहे, पण त्यांच्या धरसोडीमुळें अधिक स्पष्ट केलें नाहीं. असो.
पहिला शाहू सन १७४९ त सातारच्या रंगमहालांत वारला नाहीं; तर सन १७६१ त पर्वतीवर वारला ! नाना हे मराठेशाहींत घुसडलेलें शाहूंचे पिल्लूं होतें. त्याचें बरेंवाईट शाहूचे माथ्यावर लादणें इतिहासकारास भाग आहे. पहिला बाजी स्वरूपानें फार देखणा होता. तसाच पानिपतास मारला गेलेला विश्वासरावहि खूपसूरत होता. नातवावर आजाची छाया पडली होती, असें सरदेसाई म्हणतात. शाहूची छाया त्याचा नातू जो नाना त्यावर पडली होती, असें मी म्हणतों. स्वतः लढाईवर न जातां, घरबसल्या रणसंग्रामाची दुरून मुकादमी ऊर्फ भरीव अथवा पोकळ मुत्सद्देगिरी करणें, ही शाहूची खोड नानाला लागली; व ह्या खोडीमुळें ओघानेंच ह्या आजानातवाला दुसरी एक अक्षम्य खोड लागली, ती ही कीं, हाताखालचे पहिल्या नंबरचे मातब्बर सरदार आपसांत भांडूं लागले तर सत्ताबलानें दोघांस नरम करून, पण शाबूत राखून, पुनः कामास न लावतां, त्यांच्यांत कोंबडें झुंझ लावून कोण जिंकेल त्याच्या गळ्यांत बायकाप्रमाणें स्वयंवर माळ घालायची ! ह्या खोडीमुळेंच चंद्रसेन जाधव रुसला व त्रिंबकराव  दाभाड्याचा खून झाला ! हिचा वर्ण नाहीं तरी गुण मात्र नानाला लागला. पुढें नानानें उचललेल्या अक्षम्य खोडीमुळें रघूजी भोसले रुसला; मल्हारराव होळकर व मुरारराव घोरपडे बिथरले; जयाप्पा, दत्ताजी व जनकोजी शिंद्यासारखीं अमूल्य रत्नें बिनमोबदला हारपलीं. हे सारे मराठे होते, पण बंगाल्यांत रघूजीचा सरदार भास्करराव कोल्हटकर चित्पावन ना ?  अलीवर्दीखानानें त्याचा खून करविला, त्याचा सूड उगविण्यास नानानें सढळ हातानें कां मदत केली नाहीं ? आजानातवांच्या ह्या समान खोडींत एक महदंतर होतें. शाहूनें जें हें दौर्बल्य अथवा कपट दाखविलें, त्याच्या मुळाशीं भोसले घराण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा वाढवावी, असा हेतू होता, असें शाहूचा कोणी शत्रूहि म्हणणार नाहीं. पण नानांनीं आपल्या गळ्याभोंवतालीं कपटाचें जें अवाढव्य जाळें गोंवून पानिपतचें पिशाच्च उठविलें व त्याच्या तोंडांत पेटलेल्या अग्नीकुंडांत सर्व महाराष्ट्राची व शेवटीं आपलीहि आहुती दिली, त्या कृत्याबद्दल त्याच्या मित्रासहि काय म्हणतां येईल, हें सांगवत नाहीं. ह्याला इतिहासांत म्हणा किंवा काव्यांत म्हणा, एकच उपमा आहे. नंद घराण्याचा सर्वस्वीं नाश करून पेटलेल्या कुंडांत, मिळमिळीत सौभाग्याला कंटाळलेली झळझळीत विधवा जी मुरादेवी, तिचीच ! मुरादेवी व नानासाहेबामध्येंहि जर कांहीं फरक असेल तर तो इतकाच कीं, बाईच्या कृत्याला यश तरी आलें पण बुवांच्या वांट्याला तेंहि आलें नाहीं ! नसो, पण दोघांचेहि हेतू सार्वजनिक व साम्राज्य संपादक असण्याचा संभव आहे. म्हणून साधनाच्या अभावांचा फायदा दोघांनाहि देऊन तूर्त त्यांना मुक्त करणें मला भाग आहे. निदान ह्यांत मनाचा थोरपणा तरी आहे.
शाहू सन १७६१ त वारला त्याच न्यायानें शककर्ते शिवाजीमहाराज सन १६८० तन वारतां ते वानवडी येथें सन १७९४ त महादजीच्या मरणानें मेले. किंबहुना मारले गेले असावे, असें मला दिसतें. जदुनाथ सरकारला तसें न दिसल्यास माझा काय इलाज ? मोठीं माणसें मरणानंतर पुष्कळ दिवसांनीं मरतात व कीर्ति अजरामर करितात; व लहान माणसें मराणाआधींच मरतात व कीर्ति तर जन्मलेलीच नसते; ही स्थिति व्यक्तींचीच नसून मराठ्यासारख्या अद्यापि जिवंत राष्ट्राचीही आहे, हें जदुनाथाला मीं सांगावें काय ? कुठें मराठ्यांचें फारा शतकांचें साम्राज्य ! कुठें त्यांच्या प्रतिभाशाली कल्पना ! कुठें त्यांचीं चिरस्मरणीय व वंदनीय कृत्यें ! कुठें  त्यांचा दरारा ! एकूण कुठें हा महाराष्ट्र महोदधि आणि कुठें ह्या महोदधीवर उठलेली भट घराण्याची एक भाग्यशाली पण अपयशी लाट ! आणि लाट सागराला कारण, असें प्रतिपादणारा कुठें ह्या बंगाल्याचा द्राविडी प्राणायाम !
जदुबाबू ! महाराष्ट्रभूमि खडकाळ आहे. तिच्यावर चार चार हजार फूट सखल उंच द-याखोरीं आहेत. बंगाल-बिहारप्रमाणें सपाट, मऊ मेणानें पसरलेली व आयतें पीक देणारी नव्हे. पूर्वींचे मराठे राहत. ज्यांनीं परवां साम्राज्य उभारलें ते मावळे नाचणीच्या शिळ्या भाक-या खाणारे व रानडुकरांचीं हाडें चोखणारे होते; आयता रसगुल्ला खाणारे बंगाली बाबू नव्हते. नुसत्या लेखणीनें शांतीचे ढोंग माजविणा-या हल्लींच्या युरोप-अमेरीकेंतहि साम्राज्यें मिळत नाहींत, तर ३०० वर्षांपूर्वींच्या हिंदुस्थानांत तें कसें शक्य आहे ? तरवारीच्या सावलीखालीं लेखणी कागदावर चुरचुर चालते, पण ती तशा उन्हांत व खडकाळ जमिनीवर चालेल का ? महात्मा गांधीजींचीं अनत्याचारांवरील पुराणें ऐकूण जदुनाथ इतक्या लवकर मराठ्यांचा दरारा विसरले काय ? मग काय, आतां बंगालच्या लेखणीनें व गुजराथ्यांच्या सोवळ्यानें किंबहुना महात्माजींच्या केवळ श्रद्धापूर्ण आशीर्वादानेंहि आम्हांला राजकीय मोक्ष मिळणार आहे काय ? पुढच्या गोष्टी पुढें. कारण महादजी शिंद्यानंतर जुन्या युगावर पडदा पडून नवें चालूं झालें आहे. तें असो. पण मागच्या राजकारणाची मीमांसा करतांना जदुनाथानें शिवरायाचें ध्येयहि टाकाऊं ठरविलें, हा कोण ऐतिहासिक अत्याचार ! इतकेंच करून स्वस्थ न राहतां पेशव्यांनीं कल्पना दिली, साम्राज्य दिलें, संपत्ति दिली इ. इ. तिलांजलि देतांना नदीवरचा भट जसा अर्थ समजतांच मंत्र बडबडतो, तशी जुन्या युगाची तिलांजलि देतांना जदुबाबू भाळ्या भोळ्यांना चुकीचा संकल्प सांगत आहेत, त्याचें वर्णन मी कोणत्या शब्दांत करूं ! केवळ शक्य तितक्या सौम्य शब्दांत सांगावयाचें झाल्यास “मराठ्या आजोबाला बंगाली नातू शिकवूं लागला” हें माझें वर्णन आहे. पण नातवाला अक्कलदाढ येईपर्यंत आजोबालाहि धीर आहे, हें मला माहीत आहे. पुरे !