जयराम पिंड्ये नांवाच्या कवीनें केलेला वरील चंपू ऊर्फ श्री शहाजी राजे ह्यांची प्रशस्ति शोधून काढण्याचें श्रेय प्रसिद्ध शोधक रा. राजवाडे ह्यांनीं मिळविलें आहे, त्याबद्दल कोणीहि इतिहासभक्त ह्या शोधकाचा सदैव ऋणीच राहील. हा चंपू प्रसिद्ध करतांना राजवाडे ह्यांनीं मराठींत एक विद्वत्तापूर्ण बारीक टाइपाच्या २०० पानांची प्रस्तावना जोडली आहे. शोधकाच्या विद्वत्तेची किंबहुना मार्मिकतेचीहि शंका घेणें कोणासहि सोपें जाईल असें वाटत नाहीं. पण मूळ चंपू ७६ पानांचा व त्याची प्रस्तावना २०० पानांची हा प्रकार ‘मिया मूठभर तर दाढी शेरभर’ असा झाला आहे. जयराम कवीनेंहि उघडपणें श्री शहाजी प्रशस्ति ह्या नांवानें काव्य न लिहितां, त्याला राधामाधव-विलासाची प्रस्तावना जोडून, श्री शहाजीच्या कीर्तीला विनाकारण दुय्यमपणा आणिला आहे. मनुष्याची स्तुति केली असतां ती कोणी वाचणार नाहीं, म्हणून कवीनें राधाकृष्णाच्या स्तुतींत श्री शहाजीची स्तुति मिसळून देण्यांत श्री शहाजीचें महत्त्व वाढेल असें कवीचें लाघव आहे, अशी संपादकानें क्लुप्ति लढविली आहे. मूळ चंपूच्या आधारें शहाजी राजे ह्यांच्या चरित्राचें मराठींत विवरण करण्यांत संपादकानें चरित्रनायकाविषयीं आपला योग्य आदर व अभिमान व्यक्त केला आहे. ह्या मार्मिक विवरणाप्रीत्यर्थ प्रस्तावनेचीं १२५ पानें म्हणजे ६२ रकाने खर्ची पडले आहेत, ह्यांत फारसें कांहीं वावगें नाहीं. आधुनिक काळांतील पहिलें हिंदु स्वराज्य स्थापण्याचें मुख्य श्रेय श्री शिवछत्रपतींना देऊन, त्याच्या पूर्वतयारीचें श्रेय त्यांच्या जनकांना ह्या तडफदार शोधकानें दिलें आहे, ह्यांतहि कांहीं आश्चर्यकारक नाहीं. आश्चर्य इतकेंच कीं, मध्यंतरीं श्री रामदासाच्या नांवानें किंचित् तुणतुणें वाजविण्याची हुक्की ह्या जाड्या शोधकालाहि आली आहे. रामदास आणि श्री शिवप्रणीत स्वराज्य यासंबंधीं चालू प्रख्यात वादाचा दाब राजवाड्यांच्या इतरत्र थैमान करणा-या लेखणीवरहि पडून तिनें आपली दुडकी चाल ह्या खडकाळ प्रदेशांत किंचित् आवरलेली आहे, हें त्यांतल्या त्यांत समाधान मानण्यासारखें आहे ! परंतु जणूं काय ह्या प्रदेशांतील कांटेरी लगाम आपल्या नाच-या लेखणीला आवडला नाही हें पाहून, प्रस्तावनेच्या बाकी उरलेल्या ७०।७५ पानांत मालकानें तिला केवळ स्वैर संचार करूं दिला आहे, असें म्हटले असतां फारशी अतिशयोक्ति होईल, अशी आम्हांला भीति वाटत नाहीं. हीं पाऊणशें पाने ह्या विद्वान शोधकानें स्वतंत्र ग्रंथद्वारां लिहिलीं असतीं तर चंपूच्या, अगर श्री शहाजीच्या, किंबहुना राजवाडे ह्यांच्याहि कीर्तीला मुळींच कमीपणा आला नसता. इतकेंच नव्हे तर दक्षिणेंतील मानववंश, तौलनिक भाषा, व्युत्पत्ति, कालमान, देशरूढी वगैरे गंभीर विषयांवर ह्या नाणावलेल्या लेखकांचे अधिक जबाबदार विचार आम्हांला वाचावयास मिळाले असते, अशी आशा करण्यांत आम्ही त्यांचा कसलाहि उपमर्द करीत नाहीं. कुठली राधा, कुठला माधव, त्यांचा कसला विलास, त्यांत जुन्या मतांच्या पिड्यांनीं श्री शहाजीचें चरित्र कालविलें म्हणून नव्या मताच्या राजवाड्यांनींहि त्याच कालवणांत वरील महत्त्वाच्या विषयांवरील आपल्या घाईनें बनविलेल्या मतांची खिचडी कालवावी, हें लेखकाचें नसले तरी निदान वाचकांचें मोठें दुर्दैव आहे. राजवाडे म्हणजे कांहीं असे तसे शोधक नव्हत. त्यांचीं कांहीं मतें आदरणीय नसलीं, तरी लोकांना वाचनीय वाटणारच ! मग एका जुन्या चरित्राच्या लांबट प्रस्तावनेंत त्यांनीं आपलीं इतकीं महत्त्वाचीं व अवजड मतें अशा आगंतुक रीतीनें का घुसडलीं हें समजण्यालाहि वाचकाला किंचित् संशोधनच करावें लागत आहे. एकंदरींत सर्वच प्रकरण ‘आठ हात लांकूड, तर नऊ हात ढलपी’ अशा न्यायाचें झाल्यानें पुढेंमागें हें एक मिश्रजात ऐतिहासिक काव्य म्हणून प्रसिद्धीला येईल कीं काय न कळे.
शेवटच्या ४३ रकान्यांतील राजवाड्यांच्या प्रत्येक विधानाचें परीक्षण करणें म्हणजे त्यांच्याहूनहि प्रचंड ग्रंथाचा विस्तार करावा लागेल. त्यांचीं सर्वच विधानें खोटीं आहेत, किंवा खरीं आहेत असें म्हणण्याचें धाडस कोणासहि करतां येणार नाहीं. कां, तर पुष्कळ ठिकाणीं त्यांनीं आपले पुरावे दिले आहेत व तेहि बरेच परिश्रम करून दिले आहेत. त्यांचीं विधानें निरुत्तर खात्री करणारीं नसलीं, तरी विचाराला प्रेरक आहेत, इतकें प्रांजलपणें कबूल करून प्रस्तावनेच्या ह्या भागासंबंधीं आम्हांला जें जें कांहीं सामान्यत्वें व विशेषकरून आक्षेपार्ह वाटतें तें वाचकांपुढें ठेवण्याची रा. राजवाड्यांची परवानगी घेतों.
आमच्या मतें सर्वसामान्य आक्षेप असा आहे : इतिहासकार किंवा संशोधक ह्यानें आपल्या स्वतःच्या लाडक्या भावना, पक्षपात, धर्म, समजुती, सामाजिक अथवा वैयक्तिक लकबा, ह्यांपासून स्वतःस निदान इतिहास हा विषय हातीं असे तोंपर्यंत तरी, अलग ठेवावें. रा. राजवाडे ह्यांनीं ही खबरदारी घेतली आहे असें दिसत नाहीं. ज्यांना हा ताटस्थयोग साधत नाहीं, त्यांनीं इतिहासाचा नादच सोडावा ! नाहीं तर नदीच्या उगमांतच विष कालविण्याच्या पातकाचे धनी त्यांना व्हावें लागेल ! आर्य म्हणजे कोणी एक अति श्रेष्ठ मानववंश, अनार्य म्हणजे त्याच्या उलट चट सारे हलके वंश, आर्यांची वर्णव्यवस्था म्हणजे एक अजब चीज, जणूं तिच्यांत कांहीं दैवी जादू भरली आहे, ती भौतिकवृत्तिपर नसून आध्यात्मिक वृत्तिदर्शक अथवा स्थितिदर्शक आहे, ह्या वर्णव्यवस्थेच्या गुरुस्थानीं ब्राह्मण हे अगदीं मुळापासून होते, व ते अद्यापि तसेच आहेत; क्षत्रिय आणि वैश्य, हे वर्ण त्यांच्या तुलनेनें हीन दर्जाचे आहेत इतकेंच नव्हे तर ब्राह्मणांपासून रक्तानें व वृत्तीनें (मग ती वृत्ति भौतिक असो वा आत्मिक असो) हे प्रथमपासूनच अलग आहेत, ह्या व अशा इतर कल्पना आमच्या अवाढव्य देशांत बद्धमूल झाल्या आहेत व आमच्यांतील अनेक पुरातन मिश्र संस्कृतीमुळें, किंबहुना ख-या संस्कृतीच्या अभावामुळें अशा ह्या अनैतिहासिक कल्पनांना अगदीं सोवळें धार्मिक स्वरूप प्राप्त झालें आहे. ह्यामुळें विशेषतः धार्मिक अथवा सामाजिक विषयावर तात्त्विक विचार करावयाचा झाल्यास आमच्या देशांत खरे अधिकारी पुरुष विरळाच सांपडतील. आर्यांशिवाय द्राविड नाग, मुद्गल (मोगल) इत्यादि अनार्य वंश आर्यांच्या पूर्वीं अथवा मागून ह्या देशांत आले किंवा आले होते; व ते कित्येक बाबतींत आर्यांहून जास्त, तर कित्येक बाबतींत आर्यांहून उच्चतर अथवा सुसंस्कृत अशा स्थितींत होते. अथवा शक, पल्लव, जाठ इत्यादि वंश आर्यांच्या घरींच राहणारे, किंबहुना तदंगभूतहि असतील असा संभव आहे; ह्यामुळें हिंदी आर्यांचा प्रदेश कल्पनेनेंहि नक्की रेखाटतां येत नाहीं. मग वस्तुतः निश्चित करण्याचें धैर्य इतिहासाचा गंधहि ज्यांना नाहीं, त्यांच्याशिवाय इतरांस होणें शक्य नाहीं. आर्यांची व्याप्ति निश्चित ठरवितां आली, तरी रक्तानें अस्सल आर्य हिंदुस्थानांत आज शंभरांतच नव्हे तर हजारांत तरी एक नेमका निवडून काढतां येईल कीं नाहीं, ह्याची शंका आहे. रक्तानें आर्य कोणास म्हणतां येईल, हें ठरविणें ज्यांना हल्लींचें मानववंशशास्त्र माहीत नाहीं त्यालाच सोपें जाईल. अशीं अज्ञानी धन्य माणसें आपल्यास आर्यच काय, तर ब्राह्मण अथवा क्षत्रिय ही पदवी छातीवर हात ठेवून स्वीकारण्यास लाखानेंच नव्हे तर कोटिशःहि पुढें येतील. आणि ह्या अनैतिहासिक चढाओढीस शंकराचार्य म्हणविणारे, ज्ञानी डोळे झांकून हातभार लावतील ह्यांत कांहीं आश्चर्य नाहीं. आश्चर्य आहे तें हे कीं, इतिहासकार म्हणविणारीं कांहीं मोठमोठीं धेंडें ह्या भानगडींत आजवर पडत आलीं आहेत. फार तर काय, प्रसिद्ध पंडित शिरोभूषण भाषाशास्त्र पारंगत मॅक्स मुल्लर हे जर आज जिवंत होऊन आर्य कोण, अनार्य कोण हे ठरवूं लागले, तर केवळ भाषांच्या अनिश्चित पुराव्यावरूनच त्यांनीं ज्यांचें आर्यानार्यत्व ठरविलें तें प्रस्तुत मिळणा-या इतर पुराव्यावरून अबाधित ठेवतील कीं नाहीं ह्याची वानवाच आहे !
मानव वंशांविषयीं सिद्धान्त ठोकून देणें दिवसेंदिवस इतकें कठीण होत चाललें असतांहि आमच्या देशांतील विशेषत: आमच्या महाराष्ट्रांतील कांहीं इतिहास संशोधक कित्येक जातींच्या उगमाविषयीं बिनधोक सिद्धान्त प्रसिद्ध करीत आहेत; आणि अशा शोधकांत राजवाडे ह्यांची गणना होत आहे ह्याचें आम्हांस आश्चर्य वाटत आहे. बरेच परिश्रम करून ही मराठ्यांची पूर्वपीठिका ठरविण्यांत त्यांना पूर्ण यश आलें आहे असें आम्हांस वाटत नाहीं. मराठे हे मूळचे फार प्राचीन काळीं हिंदुस्थानाबाहेर राहणारे व पुष्कळ दिवसांपूर्वीं फिरत फिरत दक्षिणेंत येऊन वसाहत करून राहिले, किंवा मूळचे दक्षिणेंतच राहणारे ही देखील सहजासहजीं ठरवितां येण्यासारखी गोष्ट नाहीं. भाषाशास्त्राचा पुरावा गणनेंत न घेतला, तरी शरीरमापनशास्त्र आणि पुरातन वैवाहिक चालीरीती कांहीं अशा सर्वत्र आढळतात कीं, कदाचित् ते दक्षिणी द्रविड असतील, अशी शंका घेण्यास जागा मिळते. देवकांची चाल, मातुल कन्येशीं विवाह वगैरे गोष्टींत त्यांचें दक्षिणेंतील इतर द्रविडांशीं साम्य आढळतें; पण इतर पुष्कळ गोष्टींत ह्यांचें शकांशीं विशेषतः पल्लवाशीं फार साम्य असल्यामुळें हे बाहेरून येऊन येथील द्रविडांत मिसळले असावेत, असा अधिक संभव आहे. हे लोक क्षत्रिय आहेत ह्यांत शंका नाहीं. वंशदृष्ट्या शकांचा आर्यांतच समावेश होत असल्यानें ह्या मुद्यावर म्हणण्यासारखा मतभेद माजविला नाहीं तर तूर्त चालवून घेतां येईल. पण मराठ्यांना दक्षिणेकडील क्षत्रिय कल्पून ते उत्तरेकडील क्षत्रियापेक्षां दर्जानें हीन आहेत, अशी राजवाड्यांनीं आपली भावना करून मराठ्यांवर इतिहासकाराला न शोभण्यासारखी जी आग पाखडली आहे, ती मात्र प्रमाणाबाहेर आहे. रावबहादूर चिं. वि. वैदयांनीं “मध्ययुगीन भारत, भाग २ रा परिशिष्ट ५” ह्या आपल्या नवीन ग्रंथांतील भागांत राजवाड्यांची ही चूक दुरुस्त करण्याचा जोराचा प्रयत्न केला आहे. त्याकडे वाचकांना हवाला देऊन तूर्त काम भागण्यासारखें आहे. दक्षिणेकडील क्षत्रिय जे मराठे त्यांच्यांतहि पुनः महाराष्ट्रिक, बिराटे, आणि रट्टे जे आहेत, ते परस्परांहून भिन्न आहेत, असा राजवाडे ह्यांनीं शेरा दिला आहे. त्यासंबंधीं वैद्यांनीं ज्याअर्थीं कांहींच उल्लेख केलेला नाहीं, त्याअर्थीं ह्या मुद्यांचा जास्त विचार करणें जरूर आहे.