कोंकणी व मराठी परस्पर संबंध

 (१) आर्य आणि अनार्य (आर्येतर हिंदी) ह्यांच्या संस्कृतींची तुलना हा मुख्य विषय. त्यांच्या भाषांची तुलना हें त्यांच्या अध्ययनाचें एक मुख्य साधन. मराठी ही एक आर्यभाषेशीं संबंध असलेली प्रचलित भाषा, आणि कानडी ही तामिळशीं संबंध असलेली एक चालू भाषा. ह्यांचा निकट संबंध महाराष्ट्रांत गेल्या सहस्त्रकांत जुळला कसा, हें मीं इ. स. १९२३ चे अखेर ‘केसरी’ पत्रांत लेखद्वारा दाखविलें आहे. कारण हा निकट संबंध सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीनें विशेषतः तौलनिक-भाषा दृष्टीनें फार महत्त्वाचा आहे. त्याच दृष्टीनें कोंकणी व मराठीचाहि संबंध महत्त्वाचा आहे.
(२) कोंकणी (मालवण, गोंवा, मंगळूर इ. ठिकाणची) ही मराठीची उपभाषा गणली जात आहे. पण इतिहासाच्या दृष्टीनें हें विधान फारच कसोशीनें पारखणें जरूर आहे. मराठी, जी हल्लीं प्रौढ ग्रांथिक भाषा झाली आहे तिचा एक हजार वर्षांपूर्वींचा इतिहास माहीत नाहीं. किंबहुना तो होता कीं नाहीं हेंहि निश्चयानें आज सांगवत नाहीं. कोंकणी तर अशा प्रौढपणाला कधीं पोंचलीच नाहीं. पोर्तुगीजांच्या राक्षसी अत्याचारांतून ती आज जिवंत आहे, हेंच मोठें भाग्य. अशा परिस्थितींत ह्यांची तुलना करावयाची ती दोहोंच्या व्याकरणांवरूनच. कोंकणीचें सारस्वत नाहीं निदान तें उपलब्ध नाहीं. जें स्वल्प आहे, तें अगदीं अलीकडचें. कोंकणीचीं लहान लहान व्याकरणेंहि एकदोन शतकांतलींच, व तींहि सहज मिळत नाहींत. अशा अनेक अडचणी आहेत.

(३) डॉ. सबॅतियन रुदाल्फ दालगादो, D.D., D.C.L., G.C. हे एक सर भांडारकरांच्या तोडीचे नामांकित पंडित होऊन गेले. पूर्वाश्रमीचे सारस्वतब्राह्मणकुलोत्पन्न. शेवटीं ते रोमन कॅथॉलिक पंथाचे मोठे धर्माचार्य झाले. सुमारें पंचवीस वर्षांपूर्वीं त्यांनीं एक मोठा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यांत त्यांनीं २१७७ अस्सल कोंकणी म्हणी संपादन केल्या आहेत. (कोइँब्रा, पोर्तुगाल, इ. स. १९२२). हें एक वाङ्मयच म्हणावयाचें. ह्यांना पूर्व आशियांतील पुष्कळच प्रचलित भाषा अवगत होत्या. त्यांचा प्रवासहि विस्तृत होता. ह्यांनीं एक कोंकणी-पोर्तुगीज कोश (Glossari Lasso Asiatico-Coimbra Portugal, 1921 A.D.) पांच वर्षांपूर्वीं प्रसिद्ध केला. पण हे ग्रंथ परकीय भाषेंत आणि रोमन लिपींत आहेत. इ. स. १९१२ मध्यें “Influence of the Portugese Vocabulary on the Asiatic Languages” ह्या नांवाचा एक तौलनिक भाषाविषयक ग्रंथ ह्यांनीं प्रसिद्ध केला. ह्यावरून त्यांचें अनेक भाषाप्रभुत्व कळतें. कोंकणीच्या पूर्वापार संबंधाविषयीं ह्या पंडितानें आपल्या वरील ग्रंथांच्या प्रस्तावनांतून जे सिद्धान्त ग्रथित केले आहेत, त्यांचा सारांश असा :-
१. खुद्द गोमांतकांत नागर लोक जी भाषा बोलतात तीच खरी कोंकणी भाषा. उत्तरेकडे कुडाळीवर मराठीचा संस्कार, आणि दक्षिणेकडे मंगळूरांतील कोंकणीवर कानडीचा संस्कार, जास्त झाला आहे.
२. खुद्द गोमांतकांतहि हल्लींचे गोवनी भाषेंत एकदशांश शब्द पोर्तुगीज आहेत.
३. ही कोंकणी भाषा संस्कृत नाटकांतील बालभाषेसारखी आहे.
४. हिच्यांत कारकें, काळ, व धातुसाधितें विपुल आहेत; म्हणजे ही Inflective आहे. म्हणून ही संस्कृतजन्य भाषा आहे. द्राविड अथवा आर्येतर म्हणजे Agglutinative नाहीं.
५. व्याकरणदृष्ट्या ही मराठीहूनहि संस्कृतच्या अधिक जवळ आहे.
६. चालू मराठीपेक्षां जुन्या मराठीशीं हिचें सादृश्य अधिक आहे.
७. उच्चाराच्या दृष्टीनें (Phonology) ही गौडी भाषा आहे. विशेषतः बंगालीसारखी आहे.
८. ही मराठीची शाखा किंवा अपभ्रंश नव्हे.
९. सारस्वत ब्राह्मणांची जी भाषा नष्ट झाली असें कांहीं युरोपिअन प्राच्य भाषावेत्ते समजतात, ती हीच असावी. बिहार प्रांतांतील तिरहुतहून जे गौड सारस्वत कोंकणांत आले त्यांनीं ही कोंकणांत सुरू केली असावी. इ. इ.

(४) अलीकडे मुंबईचे रावसाहेब डॉ. चव्हाण ह्याच विषयावर व्याख्यानें देत असतात. ते हींच मतें प्रतिपादित आहेत. डॉ. दालगादो ह्यांचे ग्रंथ पोर्तुगीज भाषेंत आहेत. त्यांच्या विचारांचा प्रसार रा. सा. चव्हाण इंग्रजींत करीत आहेत, हा एक आम्हांवर उपकारच आहे. मराठींत करते, तर बहुजनसमाज ह्या उपकारांचा अधिक वांटेकरी झाला असता. तौलनिक व ऐतिहासिक व्याकरणांत अधिक खोल शिरून ह्या विषयावर त्यांनीं अधिक प्रकाश पाडावा अशी त्यांना विनंती आहे.