चांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर

“शेतक-यांचा स्वयंनिर्णय”
आजची ही परिषद अगोदर तुमची, निदान तुमच्या तालुक्यापुरती तरी संघटना करून मग तुमच्यांपैकीं कोणातरी पुढा-यास अध्यक्ष नेमून मजसारख्या बाहेरच्यांना केवळ सल्लागार म्हणून बोलावलें असतें तर मीं नाकारलें नसतें. तसें न करतां मला पुनः पुनः आग्रह करून आणिलें, म्हणून मीं नाइलाजानें आलों आहे. शेतक-यांची चळवळ ह्यापुढें बाहेरच्यांवर कोणत्याहि कारणांवरून अवलंबून चालणार नाहीं. इ. स. १९२८ च्या ऑगस्टमध्यें पुण्यास, मुंबई इलाख्याच्या शेतक-यांची जमिनीच्या तुकडे बिलाला कसून विरोध करण्याकरितां तांतडीनें एक मोठी परिषद भरविण्यांत आली. त्या वेळीं मीच अध्यक्ष होतों. त्यानंतर मी ताबडतोब पश्चिम आणि पूर्व खानदेश, नाशिक, उमरावती, नागपूर येथें शेतक-यांच्या सभा भरवून, शेतक-यांच्या प्रश्नासंबंधीं जागृति करण्याचा प्रयत्न केला. १९३० सालची हकीकत आपल्यास विदितच आहे. जुन्नर, खेड, हवेली, सासवड वगैरे तालुक्यांतून जवळ जवळ प्रत्येक खेड्यांतून आम्ही हिंडलों. त्यानंतर अहमदनगर व सातारा जिल्ह्यांत हिंडलों. विशेषतः सातारा जिल्ह्यांतील वाळवें तालुक्याची परिषद संघटनेच्या कार्यासाठीं बोरगांवास भरविली. एकंदरींत महाराष्ट्रांतील ह्या सहा जिल्ह्यांतील परिस्थिति मला आतां प्रत्यक्ष अवगत आहे. शेतक-यांत गेल्या दोन वर्षांत जरी अभूतपूर्व जागृति घडली आहे, तरी त्यांच्या संघटनेच्या कार्याला अद्यापि व्हावी तशी नुसती सुरुवातहि झाली नाहीं, असें मला स्वानुभवावरून अगदीं कष्टानें म्हणावें लागत आहे. आणि ह्यापुढें तर दिवसेंदिवस हें कार्य अधिक कठीण, स्वार्थत्यागाचें व धाडसाचें होणार, ह्यांत मला तर तिळमात्र शंका नाहीं.