काँग्रेस जोंपर्यंत महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल वगैरेसारख्यांच्या मुठींत आहे तोंपर्यंत तरी, ती तुमच्या बाजूस राहील असा मला भरंवसा आहे. म्हणून तुम्हीहि तिला आपला पाठिंबा सरळ मनानें व सढळ हातानें द्याच. पण तुमच्यानें काँग्रेसला काय मदत होणार ? काँग्रेस तर सुशिक्षितांची आणि तुम्ही अक्षरशत्रु. काँग्रेस स्वतः श्रीमंतांच्या हातीं गेली आहे; आणि जाणें साहजिकच आहे. तुम्ही तर दरिद्री. मला एकदां वाटत होतें कीं, ही सारी काँग्रेसची चळवळ शेतक-यांनींच काबीज करावी. पण हल्लींच्या स्थितींतील हिंदी शेतक-यांनीं काँग्रेस काबीज करणें जवळ जवळ ब्रिटिश राज्य काबीज करण्याइतकेंच अशक्य नाहीं काय ? काँग्रेस जोंपर्यंत अनुकूलच आहे तोंपर्यंत तुम्हीहि तिच्या उलट जाण्याचें कारण काय ? आज काँग्रेसनेंहि तुमच्या संघटनेचें प्रत्यक्ष कार्य आपल्या शिरावर घेतलें नाहीं. याचें कारण काँग्रेसची तशी इच्छा नाहीं असें मुळींच नसून प्रस्तुतच्या हातघाईच्या लढाईंत तिला तशी वेळ व सवडच नाहीं. म्हणून नुसत्या आशीर्वादावरच तुमची ती प्रामाणिकपणें समजूत करीत आहे. तुम्हीहि प्रामाणिकपणें तिचें हित चिंता, - तिच्याशीं प्रतारणा करण्यांत तुमचें तिळमात्र हित नाहीं. पण मला सांगावयाची मुद्द्याची गोष्ट ती हीच कीं, तुम्ही ह्यापुढें कोणावरहि – प्रत्यक्ष काँग्रेसवरहि, अवलंबून राहूं नका. हें सांगण्यांत मी काँग्रेसचा अपमान करीत नसून, केवळ तुम्हांला सावध करीत आहे. काँग्रेसचें कार्य बहुतांशीं आणि आतां तर सर्वांशीं राजकारणाचें आहे. मी तुम्हांला स्पष्ट बजावीत आहे कीं, तुमच्यापुढचें कार्य मुख्यतः राजकारणाचें नसून तें अर्थकारणाचें किंवा सामाजिक स्वरूपाचें आहे, हें मी स्वतः राजकारणाला भिऊन किंवा कोणाची भीड ठेवून सांगत आहे असा गैरसमज होऊं देऊं नका. उलट, मला असें उघड दिसत आहे कीं, शेतक-यांना तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यांतच परकीय सरकार काय किंवा स्वकीय सावकार काय, नोकरशाही काय किंवा भावी सनदशीर स्वराज्य काय, कोणत्याहि मानवी सत्तेला वेसण घालण्याचें सामर्थ्य आहे, हें खरें नव्हे काय ? आणि हें स्वातंत्र्य, शेतकरी बंधूंनो, तुमच्या हातीं आयतेंच खाऊच्या पुड्याप्रमाणें कोठून तरी आणून देण्याचें सामर्थ्य आजच्या काँग्रेसमध्येंहि नाहीं; इतरांना तर तशी इच्छाच नाहीं. मग आतां तुम्ही तुमचा स्वार्थ सुधारणें आवश्यक नाहीं काय ?
काँग्रेसविषयी आणखी एक गोष्ट निर्भींडपणानें मला येथें सांगणें जरूर आहे. काँग्रेस म्हणजे सा-या देशाच्या म्हणजे त्यांतील सर्व वर्गांच्या कल्याणासाठीं विचार करणारी व त्या विचाराची अंमलबजावणारी संस्था आहे. थोडक्यांत सांगावयाचें तर ती आमची भावी पार्लमेंट आहे. पण अशी कोणती पार्लमेंट आजपर्यंत जगाच्या इतिहासांत झाली आहे कीं, जिनें आपल्या कक्षेंतल्या सर्वच वर्गांचें हित सारख्या प्रमाणांत साधलें आहे ? ही समदृष्टि मनुष्यमात्राच्या व्यवहारांत तरी जवळ जवळ अशक्य आहे. सर्व पार्लमेंटमधली राणी जी हल्लींची ब्रिटिश पार्लमेंट तिलादेखील आजवर जें साधलें नाहीं, तें आमच्या भावी पार्लमेंटला साधेल अशी अवास्तव आत्मस्तुति करणें हा माझा धर्म नाहीं. शेतकरी हा राष्ट्राचा एक विशिष्ट अर्थात सर्वांचा पोशिंदा म्हणून सर्वांत अत्यंत महत्त्वाचा व संख्येनें मोठा वर्ग आहे हें खरें. तथापि, इतर अल्पसंख्याक व परपुष्ट वर्गांइतकें वजन शेतक-यांचें आजवर कोणत्याच पार्लमेंटवर पडलें नाहीं. मग अनेकांच्या वजनाखालीं सहज दडपून जाणा-या आमच्या राष्ट्रीय सभेवर, शेतकरी बंधूंनो, तुमचें काय म्हणून वजन पडावें ? तरी काँग्रेसला तुमची कळकळ वाटते ही गोष्ट निःसंशय खरी आहे. पण ती कळकळ, पुढें ह्या देशांत भिन्न भिन्न वर्गांत स्पर्धा किंबहुना वैर माजल्यावर टिकेल, किंबहुना टिकली तरी तुम्हांला खरें आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वयंनिर्णय आयतेंच आणून देण्याइतकी परिणामकारी ठरेल असें समजणें म्हणजे निव्वळ दुधखुळेपणाचें दिसतें. तूर्त महात्मा गांधींसारख्या लोकोत्तर सत्पुरुषाच्या हातीं काँग्रेसचे सर्वाधिकार आहेत. हल्लींच्या लष्करी आणीबाणीच्या अवस्थेंत असें होणेंच इष्ट व जरूर आहे. पण अशा सर्वाधिकारी थोर पुरुषाला झालें तरी सर्वच पुढारलेल्या व मागासलेल्या लहानथोर वर्गांचें हित हांकेसरशीं साधणें शक्य आहे काय ?