कानडी क्रियापदें

कोणत्याहि भाषेमध्यें साधारणतः नामवाचक अथवा विशेषणवाचक शब्दांची परस्पर देवघेव होते, हें युरोपांतील अथवा हिंदुस्थानांतील अर्वाचीन भाषांच्या देवघेवीवरून आपल्या सहज ध्यानांत येईल. पण क्रियावाचक शब्दांची देवानघेवाण सहसा होत नाहीं. कारण धातुवाचक शब्द त्या त्या भाषेचें सारसर्वस्व असतात. म्हणून ते वडील मुलांप्रमाणें दत्तक घेण्याला कठीण किंवा असंभवनीय असतात. परंतु कानडींतलीं पुष्कळ क्रियापदें हल्लींच्या मराठींत उजळ माथ्यानें वावरत आहेत. त्यांपैकीं विस्तारभयास्तव थोडीं देतों. कुट्ट = मारकूट, तब्बू = दाब, सरी = सरक, बडिसू = (जेवण) वाढ, बोग्गू = वाक, वडी = बडीव, तुळी = तुडव, तुंबू = भर, कलसु = कालव, उगळू = थुंक, जेज्जू = चेच, आप्पळिसू = आपट, केदरु = खरड, ओदरू = ओरड, कोरि = कोर, किलबु = कळक, तिळिसू = कळीव, हेदरु = भेदर. त्याचप्रमाणें दोन भाषांचा कांहीं तरी विशेष आनुवंशिक संबंध असल्याशिवाय खालील शब्दांची देवघेव होणें शक्य नसतें. उदाहरणार्थ, शरीराचे अवयव, जवळच्या नात्याचे शब्द, इ. भाषेच्या व्यवहाराला अशा शब्दांची अनिवार्य गरज असते. म्हणून जेव्हां दोन भाषेंत असे शब्द सामान्यपणें आढळतात तेव्हां त्यांपैकीं जी जुनी असते तिच्याशीं नवीचा निकट संबंध आहे असें मानल्याशिवाय गत्यंतरच नाहीं. त्यांपैकीं कांहीं शब्द खालीं देंतों, ते असे -
नात्याचे शब्द – अव्वा = आई (आवा, आऊ), अप्पा = बाप  (अप्पा, आबा), अक्का = मोठी बहीण, तंगी = लहान बहीण, अण्णा = मोठा भाऊ, तम्मा = लहान भाऊ, दोड्ड = दादा, नन्न = नाना, ताई = आई (ताई), तंदी = बाप (तात), आत्ते = आते, कक्क = काका, माव = मामा, अज्ज = आजा. शरीराचे अवयव – बट्ट = बोट, होट्टी = पोट, गल्ल = गाल, मांडि = मांडी, पिंड्रि = पिंड्री, कोळ्ळ = गळा, तले = टाळू, बगल = बगला, बाजू, शिरा = शीर, यदि = छाती, झिपरी = केंस, झिपरी.
अव्ययें – कडक = वर, किळक = खालीं, इत्तकडे = इकडे, आत्तकडे = तिकडे, इष्टु = इतुकें, एतुलें, लगु (लघु) = लवकर, बेगने = बिगिबिगि, लवकर इ. इ.