आपला हिंदुस्थान देश, आपला हिंदु समाज इतका अफाट व विस्कळीत आहे कीं त्याचें एकीकरण करून त्याला कार्यक्षम कसें बनवावें हाच प्रमुख राष्ट्रीय पुढा-यांपुढें मोठा प्रश्न पडला आहे. सैन्य जितकें मोठें तितकीं पराभवकाळीं पळतांना अडचण असें म्हणतात; असें सैन्य जीवरक्षणार्थ पळत असतां त्याच्या संख्यातिरेकानें त्याला मोठी गैरसोय होते. आमची स्थिति कांहीं अंशीं अशीच झाली आहे. आमच्या समाजाचें संख्याबळ, बुद्धिबळ, संस्कृतिबळ व ब-याच अंशीं संपत्तिबळ हीं एवढीं मोठीं असतां त्याला अनेक वेळां संख्येनें पुष्कळ कमी पण संघटनेनें अधिक सामर्थ्यवान् अशा समाजापुढें हार खावी लागली आहे. कुंभकर्ण बलाढ्य खरा पण झोपेंतून उठेल तेव्हां, अशी कांहींशी आमच्या हिंदु समाजाची आजची स्थिति आहे. आपल्या महाराष्ट्रापुरतें जरी बोलावयाचें म्हटलें तरी कोणाहि विचारी माणसाला आमचे जातिभेद, मतभेद हे आमचें अधिकच कमी असलेलें सामर्थ्य कसें कमी करीत आहेत तें दिसून येईल. एकाकाळीं सबंध हिंदुस्थानभर भगवा झेंडा फडकवणारा अमचा महाराष्ट्र समाज आज कसा सामर्थ्यहीन व भाग्यहीन झाल्यासारखा दिसत आहे ! असें कां व्हावें ? ज्या महाराष्ट्रीयांचें गुणवर्णन रानड्यांसारख्या स्वप्रांतीयांनीं, अरविंदांसारख्या परप्रांतीयांनीं, इतकें बहारीनें केलें आहे तेच महाराष्ट्रीय आम्ही ना ? मग आम्हांस तें गुणवर्णन कां लागूं पडूं नये ? शेंदीडशें वर्षांच्या अवधींत आमचे झाडून सारे गुण लुप्त झाले कीं काय ? हे व इतर अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा आस्थापूर्वक विचार करणा-या लोकांच्या मनांत उभे राहतात. आम्हीं काय केलें असतांना हे गुण पुनः उदित होतील ? आम्हीं काय करावें म्हणजें आमचें सामर्थ्य वाढेल ? आम्ही महाराष्ट्राचा उत्कर्ष कोणत्या उपायांनीं घडवून आणूं ? हा एकच प्रश्न आज आपल्यापुढें आहे. या प्रश्नाचें जें उत्तर कर्मवीर श्री. विठ्ठल रामजी शिंदे यांनीं दिलें आहे त्याचा योग्य विचार आमच्या समाजांतील लहानथोर स्त्रीपुरुषांनीं केल्यास आमचा उत्कर्ष होण्यास फारसा विलंब लागणार नाहीं. महाराष्ट्रांत एकी नसणें हेंच महाराष्ट्राच्या सामर्थ्यहीनतेचें मुख्य कारण आहे असा कर्मवीर श्री. शिंदे यांचा सिद्धान्त आहे. ज्या दिवशीं ही एकी प्रस्थापित होईल त्या दिवशीं महाराष्ट्राचा भाग्यरवि पूर्ववत् तळपावयास लागेल यांत संशय नाहीं. महाराष्ट्रांतील केवळ हिंदु समाजाचा विचार करतां ब्राह्मण, ब्राह्मणेतर व अस्पृश्य यांच्यामधील भांडणें ज्या दिवशीं मिटतील त्या दिवशीं महाराष्ट्रांतील सर्व चळवळींस इतका जोर चढेल कीं, त्या जोरापुढें कोणाचाहि कसलाहि विरोध चालावयाचा नाहीं. हीं भांडणें इतकीं कां रंगतात, तीं मोडावयास काय केलें पाहिजे, यांत खरा दोष कोणाचा आहे, याचा शांतपणानें व दिलदारीनें विचार होऊन त्यांचा योग्य बंदोबस्त ताबडतोब होणें ही राष्ट्रहिताच्या दृष्टीनें अत्यावश्यक गोष्ट आहे.
या नाजूक प्रश्नाची चर्चा करतांना कर्मवीर श्री. अण्णासाहेब शिंदे यांनीं जी स्पष्ट पण प्रांजल भाषा वापरली आहे, तीबद्दल सर्वांनीं त्यांचे आभार मानले पाहिजेत. ‘हितं मनोहारि च दुर्लभं वचः।’ पृथ्यकर व गोड भाषण करण्यापेक्षां पथ्यकरतेकडेच जास्त लक्ष देऊन अण्णासाहेबांनीं आपले विचार व्यक्त केले आहेत. अण्णासाहेबांचें म्हणणें असें आहे कीं, जरी थोड्याफार अंशानें आजच्या आपल्या या स्थितीबद्दल आपण सर्वच जबाबदार असलों तरी त्यांतून बाहेर पडतांना आपल्या समाजांतील पुढारलेल्या वर्गांनीं सर्वांत अधिक स्वार्थत्याग केला पाहिजे. आम्ही ब्राह्मण, आम्ही क्षत्रिय असा ज्या लोकांस अभिमान वाटतो, त्यांनीं प्रथम कमालीचा स्वार्थत्याग करून इतरांच्या तक्रारी मिटवाव्या व मग आपल्या जातिवंतपणाची व उच्चतेची घमेंड बाळगावी. एका तत्त्वज्ञानें म्हटलें आहे कीं, ‘आपल्या हातानें आपल्याजवळची सत्ता देऊन टाकणें हें प्रत्येक सत्ताधा-याचें आद्य कर्तव्य आहे.’ ब्राह्मणांनीं सर्व समाजाला, मराठ्यांनीं इतर ब्राह्मणेतरांस व अस्पृश्यांस आपल्याजवळचे सर्व अधिकार देऊन त्यांच्या हितार्थ झटावें यांतच महाराष्ट्राचें कल्याण आहे.
श्री. अण्णासाहेबांचा दर्जा व पुढा-यांमधील त्यांचें प्रमुख स्थान हीं लक्षांत घेऊन या बहुमोल उपदेशाचें सर्वजण चीज करतील अशी आशा आहे. आपल्या कर्तृत्वानें व परक्रमानें उदयाला आलेल्या गेल्या पिढींतील ब्राह्मणेतरांमधील कर्मवीर श्री. अण्णासाहेबांचें जें प्रमुख स्थान आहे तें लक्षांत घेतां त्यांनीं महाराष्ट्राच्या उत्कर्षाविषयीं जे कांहीं सिद्धान्त बांधले असतील त्यांचा वाचकांस परिचय करून द्यावा या उद्देशानें ‘किर्लोस्कर’ मासिकाच्या संपादकानें सन १९३५ सालीं त्यांची भेट घेतली व त्यांनींहि आपले विचार मोकळेपणानें सांगितले याबद्दल मी त्यांचा आभारी आहें. शेतीची अभिवृद्धि तसेच व्यापाराची वाढ होण्यास व सार्वजनिक चळवळीस सामर्थ्य येण्यास महाराष्ट्रांतील पक्षोपपक्षांमध्यें एकी झाली पाहिजे व त्याकरितां पुढारलेल्या वर्गांनीं स्वार्थत्याग केला पहिजे असा कर्मवीर श्री. अण्णासाहेबांच्या मुलाखतीचा मथितार्थ आहे. कर्मवीर श्री. अण्णासाहेबांनीं गेलीं तीस-चाळीस वर्षें जी राष्ट्रसेवा केली आहे ती करतांना त्यांना ज्या अडचणी आल्या, जे अनुभव आले, त्या सर्वांचा निष्कर्ष खालील मुलाखतींत आहे असें म्हटलें म्हणजे या मुलाखतीचें निराळें वर्णन नको. कर्मवीर श्री. अण्णासाहेब शिंदे यांनीं सर्व प्रकारच्या पुढा-यांशीं सहकार केला आहे. न्यायमूर्ति चंदावरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्याशीं वेळोवेळीं त्यांनीं सहकार्य केलें आहे. त्यांची जाज्वल्य कार्यनिष्ठा पाहूनच जणू जनतेनें त्यांस ‘कर्मवीर’ ही पदवी अर्पण केली आहे व ती सर्वस्वीं सार्थ अशीच आहे. त्यांची मुलाखत प्रश्नोत्तररूपानें पुढें दिली आहे.
प्रश्न - महाराष्ट्राचा उत्कर्ष होण्यास मुख्य अडचण कोणती ?
उत्तर — महाराष्ट्रांतील मुख्य दोष म्हणजे आमच्यामध्यें एकी नाहीं. ब्राह्मण, मराठे, अस्पृश्य असे तीन तट महाराष्ट्रांत आहेत. या तिघांची दिलजमाई झाल्याशिवाय महाराष्ट्राचा उत्कर्ष होणार नाहीं. ही एकी अजून म्हणण्यासारखी न झाल्यानें महाराष्ट्राचें राजकारण, समाजकारण, धर्मकारण हीं सर्वच अडून राहिलीं आहेत. आपल्या महाराष्ट्राचीं सर्वच दृष्टीनें शकलें झालेलीं असल्यामुळें आमचा उत्कर्ष अगदीं अडून राहीला आहे असें म्हटलें तरी चालेल.
प्रश्न — तें कसें काय ?
उत्तर — खरा महाराष्ट्र ज्याला आपण बृहन्महाराष्ट्र म्हणतों त्यांतला कांहीं भाग कर्नाटकांत गेला आहे, कांहीं निजामाच्या राज्यांत आहे, कांहीं मुंबई इलाख्यापलीकडे मध्यप्रांतांत व व-हाडांत आहे. भौगोलिकदृष्ट्या गुजराथ, बंगाल, पंजाबसारखा आपला प्रांत सलग नाहीं. नुसता मुंबई इलाख्यांतला महाराष्ट्र घेतला तरी त्यामध्यें कोंकण व देश हे भेद आहेतच. मराठ्यांमध्यें कोंकणी मराठे व देशी मराठे हे एक होत नाहींत; ब्राह्मणांत कोंकणस्थ न देशस्थ यांचें सूत नाहीं. निदान ब्राह्मणेतर समजलेल्या लोकांत ऐक्य असेल असें म्हणावें तर तेंहि नाहीं. लिंगायत, मराठे, जैन, अशी ब्राह्मणेतरांत खिचडी आहे. या कारणानेंच ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद हा राष्ट्रीय ऐक्यास बाधक आहे हें माझें मत तो वाद निर्माण झाल्यापासूनचेंच आहे. इतर प्रांतांमधून हिंदुमुसलमान प्रश्न असेल पण निदान हिंदूंत तरी फूट नसेल. तशी आमची स्थिति नाहीं. मद्रासकडील ब्राह्मणेतर पक्ष एकमुखी आहे तसा आमचा मुळींच नाहीं. महाराष्ट्रांत लिंगायतांचे कांहीं चालत नाहीं, कर्नाटकांत मराठ्यांचें कांहीं चालत नाहीं, अशी स्थिती आहे. जेव्हां महाराष्ट्र प्रांत म्हणून एक वेगळाच प्रांत होईल तेव्हां बरें होईल, तोंपर्यंत मात्र हा भेद काम करण्यास जांच यांत संशय नाहीं.
प्रश्न — महाराष्ट्रीयांचें इतर प्रांतांत वजन कसें काय आहे ?
उत्तर – ज्या वेळीं मराठ्यांचें राज्य होतें त्या वेळीं महाराष्ट्रांत दुफळी होती, तरी मराठ्यांचा दबदबा इतर प्रांतांवर होता. दुस-या प्रांतांवर दाब बसवण्यापुरते त्या वेळीं ब्राह्मण व मराठे एक होत असत. त्या वेळेपासून महाराष्ट्रीयांविषयीं इतर प्रांतांत जी आदरबुद्धि होती ती महाराष्ट्राच्या आजच्या पडत्या काळांतहि अंशतः आहे. आजहि महाराष्ट्रीयांची मद्राशावर किंवा बंगाल्यावर जशी छाप पडते तशी मद्राशाची किंवा बंगाल्याची स्वप्रांतीयांवर पडत नाहीं. आमच्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनचें काम करतांना आम्हांला हा अनुभव पदोपदीं येतो. बाहेर वचक पण घरांत दुही अशी आमची आजचीहि स्थिति आहे.
प्रश्न - आपणांमधील ब्राह्मण, मराठे वगैरे भेद सार्वजनिक कार्यामध्यें दिसून येतात असें आपण कशावरून म्हणतां?
उत्तर - आपल्या महाराष्ट्रामध्यें खाजगी संस्थांनीं चालविलेलीं इतकीं कॉलेजें आहेत, पण तीं जणू जातिभेदाच्या तत्त्वावर चालविलेलीं आढळतात. सार्वजनिक कार्याच्या एवढ्या संस्था आहेत, पण त्यांतहि दृष्टि हीच. ब्राह्मणांची संस्था असेल तर मराठे वगैरेंना तेथें प्रवेश नाहीं ! एक वेळ ते दूरच्या मद्राशाला किंवा गुजराथ्याला आपणांत घेतील, पण जवळच्या मराठ्यास घेणार नाहींत! अशी स्थिति कां असावी ? निदान वाङ्मय तरी जातिभेदातीत व पक्षभेदातीत असावें ना ? मराठी भाषा ब्राह्मणांची आहे नी मराठ्यांची नाहीं असें तर नाहीं ना ? पण तेथेंहि असेंच होतें. साहित्यपरिषदेंत ब्राह्मण पाहिजेत तसेच मराठेहि पाहिजेत; पण हे बोलावीत नाहींत व ते जात नाहींत, असा अनुभव आहे. असली ही परस्परांविषयींची साशंकता अन्यत्र कोठें नाहीं. मी बंगाल्यांत नेहमीं जातों, पण महाराष्ट्रांतल्यासारखा कटु अनुभव तिकडे येत नाहीं. आमच्याकडे कोणत्याहि कारणामध्यें गट पडतात. आमचें राजकारण, समाजकारण असें गटांनीं चाललें आहे. असें होऊं नये.
प्रश्न - याला काय उपाय ?
उत्तर - यावर ब्राह्मण लोकांनींच तोड काढली पाहिजे. ब्राह्मणांना वाटतें आपल्याविषयीं सर्वांची पूज्यबुद्धि असावी. कबूल. पण या दृष्टीनें ते मराठ्यांशीं वागतात काय ? ब्राह्मण म्हणणार मराठ्यांमधील क्षत्रियत्व गेलें आहे; मग मराठे तरी म्हटल्याशिवाय सोडतील काय, कीं ब्राह्मणांतलेंसुद्धा ब्राह्मणत्व गेलेलें आहे ? मराठे लोकांमध्यें ब्राह्मणांविषयीं जो पूर्वापार पूज्यभाव होता तो अलीकडे कमी व्हावयास लागला आहे खरा; पण तो अद्यापि सर्व गेला नाहीं. अद्यापिहि पुष्कळ मराठे पूजादि कृत्यांसाठीं ब्राह्मणांस बोलावतातच कीं नाहीं ? ब्राह्मण लोक शिवाजी महाराजांचा उत्सव करतात खरे. पण त्यांची महाराजांविषयीं जी बुद्धि आहे ती सर्व मराठ्यांविषयीं आहे काय ? ब्राह्मणांनीं सहकार्याकरितां हात पुढें केल्यास ब्राह्मण-ब्राह्मणेतरांमध्ये दिलजमाई झाल्याशिवाय राहणार नाहीं. मीं जें म्हटलें तें रूढ जातिभेदांकडे पाहून म्हटलें. मी स्वतः जातिभेद मानीत नाहीं. सर्वांनीं आपापल्या जातीचा व वर्णांचा त्याग केल्यास ताबडतोब एकी होईल असें माझें मत आहे. पण हल्लीं काय आहे ? हे जातिनिष्ठ लोक जात टाकीतहि नाहींत व नीट राखीतहि नाहींत. वर्णभेद टाकले तरच उत्तम. वर्णभेदाची नुसती स्मृति जी राहिली आहे त्या स्मृतीनें घासाघीस मात्र होते. सुंभ जळालें, पण पीळ जळत नाहीं अशी कांहीं अंशीं या बाबतींत आपली स्थिती आहे.
प्रश्न - महाराष्ट्रांतल्या शेतीची काय स्थिति आहे ?
उत्तर - एखाद्या लायब्ररीची व्यवस्था पाहण्याचें काम अक्षरशत्रु असलेल्या माणसाकडे गेलें तर तिची जी दुर्दशा होईल तीच दुर्दशा महाराष्ट्रांतल्या शेतीची आज होत आहे. आज आपण ज्यांना कुणबी म्हणतों ते एकेकाळीं जमीनदार होते. आज त्यांची हलाखीची स्थिति होऊन आपल्या मालकीच्या जमिनीवर ते मजूर झाले आहेत. जैन, लिंगायत, ब्राह्मण, मराठे या शेती न वाहणा-या लोकांकडे (सावकारांकडे) जमिनीची मालकी गेली असून तिचा खरा मालक जो कुणबी तो खंडकरी बनून गेला आहे. ज्याची जमीन तोच खंडकरी अशा स्थितींत तो किती खुषीनें खंड भरील याची कल्पना करा. वसूल नीट न होण्याचें हें एक कारण आहे. इकडे कुणब्याची ही स्थिति, पण नवीन मालक बनलेले जे ब्राह्मण त्यांनीं तरी शेती करावी; पण ते सगळेच बी. ए. होऊन नोकरीच्या पाठीमागें लागतात. नांगर स्वतः हातीं धरील तोच खरा शेतकरी. ब्राह्मण असो, मराठा असो, हातीं नांगर धरणार नाहीं हें बदललें पाहिजे. शेती घेतली तर जातीनें शेती तरी करा.
प्रश्न - व्यापाराकडे आपणा महाराष्ट्रीयांचें कितपत लक्ष आहे ?
उत्तर - ब्राह्मण असो मराठा असो, त्यांनीं कधीं यापूर्वीं व्यापार केला नाहीं. त्या कारणामुळें आपणाकडे गुजर मारवाडी वगैरे परप्रांतीयांची भरती झाली आहे. इतउत्तर ब्राह्मणांनीं तसेंच मराठ्यांनीं व्यापारांत लक्ष घातलें पाहिजे. भांडवल जमवणें, कारखाने काढणें, पेढ्या स्थापणें हीं कामें आपण केलीं पाहिजेत. ब्राह्मणांचें या गोष्टीकडे लक्ष लागत चाललें आहे हें किर्लोस्कर, ओगले, टिकेकर इत्यादिकांच्या उदाहरणांवरून स्पष्ट होतें. याला लागणारी धाडसी वृत्ति त्यांच्या अंगीं आहे, तिचा योग्य उपयोग झाला तर समाजाचें त्यांत कल्याण आहे. आपल्या लोकांचें सर्व लक्ष जें राजकारणाकडे गेलें आहे त्याचा कांहीं भाग जर अर्थकारणाकडे जाईल—मी राजकारणाच्या विरुद्ध आहें असें समजूं नका—तर आपला उत्कर्ष होण्यास वेळ लागणार नाहीं.
प्रश्न - व्यापारांत आपल्या लोकांनीं कोणतें धोरण पुढें ठेवावें?
उत्तर - ब्राह्मणांमध्यें धाडस आहे. तें गुजराथ्याइतकें नसलें तरी मराठ्यांपेक्षां अधिक आहे. तें त्यांनीं वाढवलें पाहिजे. हें धारिष्ट्य वाढवितांना त्यांनीं जीं साधनें हातीं घेतां येतील तीं घेतलीं पाहिजेत. त्यांत जातिनिष्ठा काय कामाची ? मराठ्यांचें सहकार्य घेऊन आडत्याकडे न जातां जो माल पिकतो तो तेथेंच विकल्यास त्यांत अधिक नफा होईल. आज अशी स्थिती आहे कीं, जो माल उत्पन्न करतो तो बाजारांत गेला कीं, आडत्याच्या बळी पडतो. तो अडतेपणा कमी केला पाहिजे. जो माल उत्पन्न करतो, मग तो ब्राह्मण असो कीं मराठा असो, त्याच्या पदरांत किफायतीचा बराच भाग गेला पाहिजे. हिशेबीपणा हा गुण मराठ्यांत नाहीं, ब्राह्मणांत आहे. तेव्हां दोघांनीं सहकार केल्यास फार छान होईल. कापूस, धान्य, मॅंगनीज वगैरे अर्थोत्पादक द्रव्यें आमच्याकडे पुष्कळ आहेत. पण त्यांचा पुरेपूर फायदा आम्हांस घेतां येत नाहीं. ब्राह्मणांनीं जर इकडे थोडें लक्ष घातलें तर ते राजकारणांतसुद्धां चांगला शह बसवतील. आज स्थिति अशी आहे कीं, आम्हांला शब्दापलीकडे शह बसवितां येत नाहीं. पण अशा रीतीनें सहकार्य झाल्यास महाराष्ट्रीयांच्या म्हणण्यास राजकारणांत जास्त मान मिळेल. जें आरडाओरडा करून किंवा तुरुंगांत जाऊन होणार नाहीं तें या ऐक्याच्या जोरावर होईल व सरकार आमचें महाराष्ट्रीयांचें ऐकूं लागेल.