हिंदुस्थान आणि हिंदु धर्म म्हणजे एक विचित्र मायपोट आहे. जें हिंदुस्थानांत नाहीं तें जगांत इतरत्र कोठेंच नाहीं असें म्हटल्यास अतिशयोक्ति फारशी होईल असें वाटत नाहीं. हिंदुस्थानांत ज्या वेळोवेळीं राज्यक्रांत्या झाल्या आहेत, त्या केवळ खड्या सैन्याच्या जोरावर झाल्या आहेत, असें मुळींच नाहीं. अशा सैन्यापेक्षां पेंढारावरच येथील राजांची व सम्राटांची विशेष मदार असे. जसें राजकारण, तसेंच धर्माचरण, तसेंच समाजकारण आणि तशाच थाटाचा सर्व सार्वजनिक व्यवहार! एखाद्या पुरातन क्षेत्रांतल्या जीर्ण देवालयाचीं सर्व लक्षणें सूक्ष्म निरखून पाहिल्यास, तें स्थान एखाद्या पुरातन अनार्य वर्ण गुरूंचा मठ असावा, कीं राजाचा किल्ला असावा कीं
व्यापा-यांची अथवा पांचालांची उतारपेठ असावी कीं कांहींच नसून केवळ पेंढा-यांचें संकेत-स्थान असावें कां आणखी कांहीं तरी असेंच गौडबंगाल असावें हें कांहींच कळेनासें होतें. धर्म हा एक समाजशास्त्राचा भाग आहे. परकीय पंडित हिंदुस्थानांतील धर्मासंबंधीं नाना तर्कवितर्क चालवून हा विषय कुरतडीत बसतात! पण हिंदुधर्माची मीमांसा ‘जेथल्या बोरी तेथल्याच बाभळी’ ह्या न्यायानेंच झाल्यास अंशत: कांहीं तरी कार्यभाग होईल. एरव्हीं ग्रंथविस्तारच पाहून घ्यावा!