प्रसिद्ध सम्राट् अशोक हा महान् बौद्ध भागवत होता हें खरें. त्यानें राजाश्रय दिला नसता तर बौद्ध धर्म सर्व आशिया खंडांतच नव्हे पण भरतखंडांतहि जितका पसरला तितका पसरला नसता. ज्यानें प्रत्यक्ष आपल्या युवराज मुलाला आणि मुलीलाहि भिक्षूची दिक्षा देऊन त्यांना संचारासाठीं सिंव्हलद्वीपांत पाठविलें आणि ज्यानें सर्व आशिया खंडभर चहूंकडे बौद्ध प्रचारक पाठवले, त्याची बुद्धभक्ति काय वर्णावी! पण ह्या भक्तीचा विपरीत परिणाम अशोकाच्या कुळालाच नव्हे तर हिंदुस्थानांतील बौद्ध धर्मालाहि भोगावा लागला हें (इतिहास पुढें प्रांजलपणें ज्याला सांगेल तेव्हां सांगो) तूर्त तरी एक कटु सत्य आहे येवढें खरें. अकबरानें सर्व धर्माना विशेष हिंदु धर्मांला जवळ केलें म्हणून पुढें त्याच्या मुलानातवांच्या वेळीं आणि विशेषत: औरंगजेबाच्या वेळीं जसे हिंदूंचे हाल झाले, तसेंच किंबहुना जास्त मगध राजवटींत बौद्ध धर्माचे हाल झाले. कारण अशोकामागून जे राजे त्याचे गादीवर बसले ते अनत्याचारी, व कदाचित् दुर्बळ निघाल्यामुळें पुष्यमित्र नांवाच्या एका सेनापतीनें त्याचें राज्य बळकावून मोठ्या जोरजबरीनें ब्राह्मण धर्माचा प्रचार चालविला. त्याच्या घराण्याचें नांव शुंग घराणें असें होतें. ह्यानें फार अनन्वित कृत्यें केलीं. विशेषत: त्यानें मौर्य घराण्यांतील व बौद्ध धर्माचा प्रसार करणा-या इतर राजकुलांचा भयंकर उच्छेद मांडिला. शुंग घराणें कण्व नांवाच्या ब्राह्मण मंत्र्यानें बुडवून त्याचें राज्य बळकाविलें. त्याचें घराणें फार अप्रिय झालें म्हणून त्याचें राज्यहि फार दिवस टिकणें अशक्य झालें. पुढें ह्या कण्व घराण्याचा कलिंगच्या खारवेल नांवाच्या महाप्रतापि शैव-जैन राजानें पराभव केला. शेवटीं दक्षिणेंत आंध्रभृत्यांचें साम्राज्य स्थापन झाल्यानें मगध साम्राज्याचा अस्त झाला. तथापि ह्या धामधुमींत वैष्णव धर्माचा बराचा जम बसला हें खरें. महाभारताची सुधारून वाढविलेली आवृत्ति निघाली. अश्वलायन गृह्यसूत्रांत ज्याचा भारत ह्या नांवानें उल्लेख आहे, त्याचे पुढें महाभारत होऊन त्याचीहि झपाट्यानें हल्लींच्या प्रचंड महाभारतांत वाढ होऊं लागली, ती ह्याच बौद्धांच्या व जैनांच्या उलट उठविलेल्या धामधुमीच्या काळीं झालेली असावी, असा पुष्कळ ति-हाईत विद्वानांचा तर्क आहे. ही सर्व वाढ नुसती बौद्ध– जैनांच्याच नव्हे तर त्यांच्याहून जुनाट असलेल्या शैव धर्माच्याहि उलट होती. महाभारतांत शिवदेवतेचा पुष्कळ गौरव करण्यात आला आहे. कदाचित् मूळ भारत नांवाचें महाभारतांत रूपान्तर शिव भागवतांनींच किंवा सात्वतांनीं केलें. श्वेताश्वेतर-उपनिषद्कर्ते आणि पुढील पतंजलि भाष्यकार ह्या शिव भागवतांतलाच होता. पुढें मौर्य कुलाचा उच्छेद करून शुंग नांवाचें ब्राह्मणी साम्राज्य मगध देशांत सुरू झालें तेव्हां महाभारताचा शैव स्वरूपांतून हल्लींच्या वेष्णव स्वरूपांत प्रचंड विस्तार झाला. पण शांतिपर्व, अनुशासन पर्व इत्यादि अवाढव्या नवीन पर्वांची भर पडून वासुदेव कृष्णाचेच नव्हे तर तो ज्याचा अवतार कल्पण्यांत आला, अशा काल्पनिक विष्णु देवाचेहि नवीन देव्हारे पसरविण्यांत आले. ह्या धामधुमींत बौद्धांच्या पाली वाङ्मयाला तोंड देण्यासाठीं महाभारताचीच नुसती वाढ नव्हे, तर कित्येक नवीन स्मृत्या व निरनिराळ्या सात्वत संहितेसारख्या सांप्रदायिक भागवत संहिताहि संस्कृतांत निर्माण झाल्या. मौर्य साम्राज्य आणि त्याचा बौद्ध धर्माला आश्रय चालूं राहिला असता तर वैष्णव सांप्रदाय कदाचित् अस्तित्वांतहि आला असतां कीं नसतां ह्याची शंका आहे. ह्या साम्राज्यक्रांतीनंतर कित्येक हिंदी राजवटींतील कित्येक प्रसिद्ध पुरुषांनीं वैष्णव धर्म स्वीकारून मथुरेंतील व मध्य हिदुंस्थानांतील इतर देवळांना इमारती, जयस्तंभ वगैरे स्मारक देणग्या दिल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत.