१ तत्त्वज्ञान : भाष्य-भारुड
ह्या दोन विषयांचा या साहित्य संमेलनाच्या चालकांनीं हा जो एक विभाग कल्पिला आहे त्या दोन्ही विषयांवर मराठींत स्वतंत्र वाङ्मय फारच थोडें, किंबहुना गणनेंत घेण्याइतकें नाहीं म्हटलें तरी चालेल इतकें अल्प आहे. समाजशास्त्रावर अगदीं अलीकडे जें थोडें वाङ्मय होऊं लागलें आहे, तें अद्यापि बाल्यावस्थेंतच आहे. तत्त्वज्ञानांत आमच्या देशाचा दर्जा फारच उच्च, जवळजवळ पहिला म्हटला तरी चालेल. पण तो काळ मागचा. चालू कोणत्याहि प्राकृत भाषांतून त्या मूळ तात्त्विक ग्रंथावर नुसतीं भाष्यें व रूपांतरें झालीं आहेत. अद्यापि तोच प्रकार चालूं आहे. स्वतंत्र भरती नाहीं. ह्या भाष्याची प्रथा प्रत्यक्ष तत्त्वसिद्धान्ताचे मेरुमणि श्रीमदाद्यशंकराचार्य ह्यांनींच घालून दिली, ही त्यांतल्या त्यांत मोठी आश्चर्याची गोष्ट ! स्वामी रामतीर्थ ह्या आधुनिक द्रष्ट्यानें ह्या प्रथेबद्दल श्रीमदाद्यशंकराचार्यांचा निषेध सौम्य भाषेंत का होईना पण धैर्यानें केला आहे. पहिल्या आचार्यांनींच असें केल्यामुळें त्यानंतरच्या संस्कृत आचार्यांना व चालू भाषेंत ग्रंथ
लिहीणा-या ज्ञानेश्वर, एकनाथ इत्यादि तत्त्ववेत्त्यांना आपल्या लिखाणांतून हाच गौण मार्ग पत्करावा लागला आहे. पुढें पुढें तर एका गीतेच्या घाण्याभोंवती मराठींतील समग्र तात्त्विक विचारचक्र फिरूं लागलें ! ज्ञानेश्वराची भावार्थ गीता ह्या भाष्यांत केवळ भक्तीचें स्तोम माजविलें आहे, गीतेची खरी अर्थसिद्धि झाली नाहीं, असा जोराचा आक्षेप घेणा-या वामनपंडितानें तरी आपल्या यथार्थ-दीपिकेंत अव्यभिचरीत कृष्णभक्तीच्या बाहेर फारसा स्वतंत्र ज्ञानमार्ग शोधला काय ? त्यानंतर लोकमान्यांनीं कर्मयोग चोखाळला. पण तोहि गीतेंतच गुरफटून. मूळ गीताच आधीं एक स्वतंत्र दृष्टी नसून, तो एक सुंदर दृष्टिस-मन्वय आहे; आणि तिचा अर्थ सरळ व सोपा असूनहि मागून झालेल्या पंडीतांनीं व आचार्यांनीं अर्थवादाचें भारूड मात्र माजविलें नव्हे काय ? ह्या भारुडाचें महत्त्व फार आहे हें मी आदरपूर्वक कबूल करतों. पण तें वाङ्मयदृष्टीनें आहे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टिनें स्वतंत्र विचारनिर्मिति फार थोडी आहे असेंच म्हणावें लागेल अमृतानुभवासारखे कांहीं ग्रंथ आहेत, पण ते प्रत्यक्ष भाष्य नसले तरी जुन्या दृष्टीचे अनुवादच ठरतात.