भागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिले)

व्याख्यान पहिलें
पुणें येथें एकनाथषष्ठीनिमित्त रा. शिंदे ह्यांनीं वरील विषयाच्या प्रस्तावनेदाखल प्रवचन केलें, तेव्हां ठाण्याचें प. लो. वा. भावे ह्यांच्या महाराष्ट्र सारस्वत ह्या पुस्तकांतील एकनाथासंबंधीं प्रकरण वाचून भागवतधर्म व महाराष्ट्रधर्म हें कोडे किंचित् उलगडण्याचा त्यांनीं प्रयत्न केला. भागवतधर्माचा राजकारणाशीं उगाच संबंध लावून न्या.रानडे ह्यांनीं ही वावटळ उठविली होती. मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष ह्या पुस्तकांत रानड्यांनीं ही देशाभिमानाची धूळ उठविली, आणि ती एकनाथांच्या भागवतधर्मावर व्याख्यानें देऊन त्यांनीं जी पसरविली ती महाराष्ट्राच्या चिदाकाशांत अद्याप उसळत आहे. महाराष्ट्रधर्म श्रीशिवरायांनीं स्थापिला, श्रीरामदासांनीं त्यांचा कैवार घेतला. पण निदान महिपतीच्या कालापर्यंत कोणाहि जीवन्मुक्त वारक-यानें भागवतधर्माची परिणती राजकारणी महाराष्ट्रधर्मांत होते, अशी ग्वाही दिली नाहीं. ती त्याची दिशाच नव्हती. रा. भावे ह्यांचे उतारे वाचून दाखवून, रा. भावे ह्यांनीं भागवतधर्माची व महाराष्ट्रधर्माची सांगड घालून अव्यापार केला आहे, असें रा. शिंदे ह्यांनीं आपलें मत दिलें. भावे म्हणतात कीं “भागवतधर्म मऊ आहे, पण त्याच्यांत बुद्ध, जैन, महंमदी वगैरेंसारख्या धर्मांशीं झगडून त्यांना हटविण्याचें सामर्थ्य आहे.” (पान २२६) पुढें ह्या दुग्धरसाचा उत्तम मेवा बनवून, महंमदी धर्मानें उच्छेद मांडला असतां, एकनाथांनीं त्याचा रतीब महाराष्ट्राला लावला, आणि त्याला आपल्या काळजाचा उबारा देऊन त्यांत हालचाल सुरू केली. पुढें ह्याचाच आणखी इतर रसायनांशीं मिलाफ करून श्रीसमर्थ रामदासांनीं महाराष्ट्रधर्म बनवला. (पान २२७) उत्तरेकडून महंमदी वारें जोरानें वाहत होतें, तसे इतर दिशांनींहि महाराष्ट्रधर्माला विघातक असें वारें वाहूं लागलें होतें. जैनांच्या पोटांतून निघालेला लिंगायत धर्म, कबीरपंथ, दादूपंथ वगैरेंनीं महाराष्ट्राच्या चातुर्वर्ण्यप्रमुख आचारांवर व विचारांवर सारखे आघात मांडले होते. मानभावपंथानेंहि हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. स्वराज्य तर पूर्वींच लयास गेलें होतें व आतां स्वधर्मालाहि राजयक्ष्मा लागल्याचीं चिन्हें दिसूं लागलीं होतीं. स्वभाषाहि खालावत चालली होती. (पान २४०-४१) वगैरे “स्व” ची आपत्ति दाखवून, त्यावर तोडगा म्हणून एकनाथांनीं आपला भागवतधर्म निरूपिला, असा रा. भावे यांचा भाव आहे. हा भाव प्रत्यक्ष एकनाथांना तरी मान्य होईल कीं नाहीं, याविषयीं रा. शिंद्यांनीं आपली शंका प्रदर्शित केली. भागवतधर्म ऐहिक व्यवहाराचें महत्त्व जाणत आहे, तो केवळ पारलौकिक अतिरेकांत कधींच तृप्त नसतो. ऐहिक परोपकाराच्या सात्त्विक प्रेमाला भागवतधर्म कधीं कोठेंच पारखा नाहीं. उलट त्याचा तो आत्माच आहे. पण भावे सांगतात तसल्या “स्व”च्या दुर्गंधीची भागवतधर्माला कधींच बाधा घडत नाहीं. हें पाहण्यास दूर जावयास नको. महाराष्ट्रधर्मी भावे आणि भागवतधर्मी महिपति यांचीं काव्यें एकमेकांजवळ ठेवून निरखून पाहिल्यास दोहोंची तफावत सामान्य माणसालाहि तत्काळ पटण्यासारखी आहे, अशी शिंदे ह्यांनीं साक्ष दिली.
आपण स्वतः महाराष्ट्रधर्माच्या उलट नसूनहि त्याची बाधा मात्र भागवतधर्माला घडूं देण्यास तयार नसल्याचे शिंद्यांनीं सांगितलें, इतकेंच नव्हे, तर जसजसा ह्या स्वाभिमानी महाराष्ट्रधर्माचा शाब्दिक सुकाळ झाला, तसतसा महाराष्ट्रांतूनच काय पण अखिल हिंदुस्थानांतूनहि भागवतधर्म आपला पाय मागें घेऊं लागला. श्रीएकनाथांनीं जी स्वदेशाची व स्वभाषेची सेवा केली ती स्वाभिमानाला जागा करण्यास केली नसून श्रीज्ञानदेवांनीं कथन केलेला विश्वात्मकभाव जागा करण्यासाठींच केली. कोणाहि सामान्य वारक-यास भागवतधर्माचें वर्म काय म्हणून विचारतां तो चटकन् उत्तर देतो कीं, “कोणाहि जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचें” मग श्रीएकनाथच, रा. भावे ह्यांच्या स्तुतीस भुलून, ह्या विश्वात्मक भागवतधर्माचें आकाश आपल्या महाराष्ट्रधर्माच्या मुठींत दाबून ठेवूं पाहतील काय ? असो.
भागवतधर्माच्या आकाशाला हिंदु-मुसलमान, ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद, स्वपरदेशवाद, इहपरलोकवादाचीं ठिगळें कसल्याहि भोळ्या अगर चलाख हेतूनें चिकटवूं पाहणा-याची निराशाच होणार. ज्या एकनाथ, तुकारामांसारख्यांनीं स्वतःला जिंकलें, त्यांनाहि हल्लींच्या “स्वराज्यवादी” पक्षाला अनुकूल असें व्होट देण्यास लावण्यानें एखाद्याची घटकाभर करमणूक होईल, पण अध्यात्म मार्गांत तिळमात्रहि प्रगति होणार नाहीं, असें सांगून शेवटीं सर्वात्मक भावानें परमात्म्याची प्रार्थना करून रा. शिंद्यांनीं उपासना समाप्त केली.