केबा

केबा : पूर्वींप्रमाणें हे महारोगी, अपंग, बेवारशी भिकारी लोक अजून मोठमोठ्या देवळांच्या वाटेवर याचना करीत बसलेले आढळतात. असे अपंग याचना करीत बसलेले मीं इतालीसारख्या प्राचीन अमदानींतल्या रोम व इतर क्षेत्रांचा ठिकाणीं यूरोपांतहि प्रत्यक्ष पाहिले. आमच्या हिंदुस्थानांतल्या क्षेत्रांतल्या भिका-यांचा येथें उल्लेखहि करण्याची मुळीं गरज नाहीं. हा वर्ग समाजबाह्य आहे ह्यांत कांहींच नवल नाहीं. मात्र मंडालेपासून ८।१० मैलांवर असलेल्या मेंढाई नांवाच्या खेड्याजवळ केबांची मीं एक स्वतंत्र लहानशी वसाहतच पाहिली. ती मीं पुढें विस्तारानें वर्णिली आहे.
चौथा वर्ग जो माफीच्या गुन्हेगारवर्गाचा तो हल्लीं ब्रिटिश अमदानींत कोठेंच आढळणें शक्य नाहीं. पूर्वींच्या स्वराज्यांत ‘राजा कालास्य कारणम्’ हें तत्त्व जोरावर होतें. राजाची वैयक्तिक मर्जी संपादन केल्यावर प्याद्याचा जसा फर्जी तसाच सात खून करून आपली हुशारी दाखविणाराला माफी मिळून उलट शहर कोतवाली मिळविणारांचीं बरींच उदाहरणें पाहण्यासाठीं ख-या संशोधकाला ब्रह्मदेशापर्यंत फार लांब जावयासहि नको. हल्लींच्या कोठल्या लोकछंदानुवर्ति ब्यूरॉक्रसीच्या सी. आय. डी. मध्येंहि असले पाणीदार माफीबहाद्दर शोधीत बसल्यास मिळणार नाहींत अशी कोण हमी घेईल ? मात्र पूर्वींच्या ब्रह्मी स्वराज्यांत अशा लोकांना दरबारांत जरी वेतन मिळे तरी तेवढ्यावरून समाजांत त्यांना मान्यता न मिळतां उलट बहिष्कार पडे असें ब्रह्मदेशाच्या वाङ्मयांत वाचिलें आहे. पॅगवे हे अशा पोलीस व जेलर लोकांना नांव पडण्याचें कारण ह्यांच्या गालांवर ह्यांनीं पूर्वीं केलेल्या गुन्ह्यांची कायमची निशाणी म्हणून एक गोलाकार शिक्का मारलेला असे. अलिकडच्या  कांहीं गुन्हेगारांना पाश्चात्य सुधारलेल्या सोन्याच्या तलवारी नजर करण्यांत आल्या आहेत हा जुन्यानव्यांत एक फरक ध्यानांत धरण्यासारखा आहे. एरवीं पाणीदार गुन्हेगारांना उगाच शिक्षेंत खितपत न टाकतां आतांप्रमाणेंच पूर्वींहि कोठें कोठें समाजकार्याला लावण्यांत येत होतें हें ह्या ब्रह्मदेशांतील उदाहरणावरून उघड होतें.
असो. येथपर्यंत मीं ह्या चार पांच बहिष्कृत वर्गांचा उल्लेख व वर्णन केलें. ब्रह्मदेशांत जाईपर्यंत व गेल्यावरहि कित्येक आठवडे येथें आमच्या देशांतल्याप्रमाणें ग्रामबहिष्कृतवर्ग असेल अशी कल्पनाहि माझ्या मनाला शिवली नाहीं. पण वर सांगितल्याप्रमाणें अकस्मात मीं जेव्हां असे वर्ग कांहीं विवक्षित प्राचीन ठिकाणींच आढळण्यासारखे आहेत असें ऐकल्यावर मीं त्यांचा जारीनें शोध चालविला. पण दक्षिण ब्रह्मदेशांतील पुराणमतवादी अशिक्षित ब्रह्मी लोकांकडून मला त्यांची थोडीबहुत माहिती मिळाली. पण तीहि उडवाउडवीनेंच मिळूं लागली. म्हणून उत्तर ब्रह्मदेशांत बौद्धधर्माचें खरें साधन पाहावयास गेलों असतां खालील पांच खेडीं मीं ह्या निरनिराळ्या वर्गाची वस्तुस्थिति प्रत्यक्ष घरोघर जाऊन निरीक्षण करण्याकरितां निवडून काढिलीं. त्यांपैकीं तु. डै डो. ह्या (हलालखोर) वर्गांचें मात्र प्रत्यक्ष पाहण्यास मला वेळ मिळाला नाहीं. पण बाकीच्या चार ठिकाणीं मात्र मी चांगला सुशिक्षित जाणत्या ब्रह्मी दुभाष्याला घेऊन घरोघरीं फिरून ह्या निराळ्या वर्गांतल्या वृद्ध आणि वजनदार लोकांना भेटून त्यांनीं दिलेलीं उत्तरें व शिवाय प्रत्यक्ष स्थिति निरखून पाहून खालचीं सविस्तर टिपणें लिहिलीं आहेत तीं माझ्या रोजनिशीवरून येथें थोडक्यांत उतरून घेत आहे. प्रोम शहराजवळील खेड्यांत मात्र माझी जी खडतर निराशा झाली ती पुढें दिलीच आहे.
येथें मला एक गोष्ट नमुद करणें अवश्य वाटत आहे कीं, ही ह्या बहिष्कृत वर्गांची स्थिति आतां अगदीं झपाट्यानें सुधारत आहे. आणखी १०।१५ वर्षांत मला दिसलीं तितकीं तरी ठिकाणें व कुटुंबें मीं पाहिलेल्या स्थितींत पुढील संशोधकांस आढळतील कीं नाहीं ह्याची मला जबर शंकाच वाटत आहे. फार तर काय आतां आतांहि ह्या बहिष्कृत वर्गांना त्यांच्या मूळ नांवानें संबोधण्याचें मोठें शिताफीचें व धैर्याचें काम आहे. ब्रह्मी लोकांचा स्वभाव अत्यंत चिडखोर, उतावळा व तामसी आहे. थोड्या कारणावरून ते वर्दळीला येऊन हातघाई करितात. त्यामुळें दुभाष्याचें काम करून ही नसती उठाठेव करण्यास मला शांत व समंजस माणसें मिळणेंहि बरेच वेळां मुष्किलीचें झालें व पुष्कळदां अर्ध्या दमाच्या दुभाष्यांनीं माझी ऐन वेळीं निराशा करून माझा बेत ढासळून टाकला. म्हणून माझा सर्व भार माझ्यावर किंवा वाटाड्यावरच न टाकतां अगोदर अनेक उपायांनीं खालील ठिकाणच्या लोकांचा विश्वास मला संपादावा लागला. ब्रह्मी लोक जितके उतावळे तितकेच भोळे व दिलदारहि आहेत. विश्वास बसल्यावर ते आपलें सर्व हितगुज - आपल्या उलट असलें तरी मोकळ्या मनानें सांगतील, हा भरंवसा मला अंतःकृत आधुनिक सुशिक्षणानें अर्धवट भाजून निघालेल्या ब्रह्मी लोकांच्या समागमानें जो आला नाहीं, तो तेथील बहिष्कृतांच्या समागमांत आला. हिंदुस्थानांत काय किंवा कोठें काय वरिष्ठ म्हणून गाजणा-यापेक्षां त्यांनीं पायाखालीं तुडविलेल्या कनिष्ठ वर्गांतच त्या राष्ट्राच्या ख-या माणुसकीचीं व स्थानिक स्वभावाचीं लक्षणें सुक्ष्म संशोधकांस जास्त आढळून येण्यासारखीं आहेत हें मीं माझ्या निरनिराळ्या देशांतील आजन्म घेतलेल्या अनुभवांवरून म्हणूं शकतों !